तुम्हाला तुमचा ‘पॉज’ सापडलाय का? - Welcome to Swayam Talks
×

तुम्हाला तुमचा ‘पॉज’ सापडलाय का?

नविन काळे

हा ब्लॉग म्हणजे तुमच्या मेंदूचा दर आठवड्याचा व्यायाम आहे! या ब्लॉगमुळे तुम्ही दर आठवड्याला काही नवीन तर शिकालच, पण जगापेक्षा एक पाऊल पुढे राहाल याची आम्ही खात्री देतो.
 

Published : 8 December, 2023

तुम्हाला तुमचा ‘पॉज’ सापडलाय का?

Get Better Each Week #25

मागे एकदा कोणाच्या तरी घरी गेलो होतो. 

थोड्या वेळाने ते गृहस्थ मला त्यांचं घर दाखवायला घेऊन गेले. त्यांच्या बेडरूमच्या सर्व भिंती विविध पोस्टर्सने भरून गेल्या होत्या. पुढच्या दहा वर्षात त्यांचे गोल्स कुठले आहेत, त्यांचे आदर्श कोण आहेत, त्यांनी वाचलेल्या पुस्तकातील त्यांची आवडती वाक्यं असं बरंच काही त्यांनी आपल्या भितींवर लिहून ठेवलं होतं. सकाळी उठलं की डोळ्यासमोर भविष्यातील संपत्तीचा तो ‘मॅजिक नंबर’ दिसेल अशी व्यवस्था होती. वेगवगेळ्या ठिकाणी सुविचार लावले होते. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी उपयोगी अनेक पुस्तके कपाटात छान मांडून ठेवली होती. कोणालाही हे ‘जरा अति’ वाटू शकेल. आपल्या यशाचा रस्ता प्रत्येकाने शोधावा. लोकं हसले तरी प्रत्येकाने जगण्याची स्वतःची पद्धत शोधावी. यात काहीच दुमत नाही. पण मी मात्र या सगळ्यात समोरच्या भिंतीवरचा एक कोरा तुकडा शोधत होतो, ज्यावर काहीही लिहिले नाही ! त्यांच्या प्रयत्नांबद्दल पूर्ण आदर ठेवून माझ्या मनात मात्र एक वेगळीच काळजी होती. हे गृहस्थ शांतपणे झोपत असतील का? सतत यशाचा विचार करण्याच्या या धावपळीत हे गृहस्थ ‘पॉज’ कधी घेत असतील?  

मागे मी एकदा ‘Doing Nothing’ वर लिहिल्याचं अनेकांना आठवत असेल. 

तो ब्लॉग वाचून मला अनेकांनी खूप गमतीशीर प्रतिक्रिया पाठवल्या होत्या. ‘असा कधी विचारच केला नव्हता’ इथपासून ते ‘हे करून (म्हणजे काहीही न करून) बघितल्यावर मजा आली’ या रेंजमध्ये विविध प्रतिक्रिया मिळाल्या. आपल्याला सर्वांनाच रोजच्या धावपळीत ‘पॉज’ची किती गरज आहे हे यावरून लक्षात यावं. 

आपल्याकडे असलेलं पण आपल्याकडून वापरायचं विसरून गेलेलं ते ‘पॉज’ बटण आज शोधूया. 

सकाळी उठून झोपाळलेल्या अवस्थेत पण घाईघाईने ब्रश करायला आपण सगळेच पळतो. लहानपणी जागं झाल्यावर आई सांगायची, ‘कराग्रे वसते लक्ष्मी’ म्हण. आज कळतंय की हा एक ‘पॉज’ आहे ! ब्रश करण्याच्या निमित्ताने आपण आरशासमोर उभे राहतो आणि मनात विचार असतात पुढच्या तीन तासांत आपण काय काय करणार याचे ! खरं तर ‘ब्रश करणं’ हा एक छान पॉज आहे. आंघोळीचं पाणी पडताक्षणी ओठांतून गाण्याची एक मस्त ओळ येणं हा एक पॉज आहे. आंघोळीचं पाणी अंगावर पडण्याचा फील हा ‘पॉज’ आहे. साबणाचा वास लक्षात येणं हा पॉज आहे. मेट्रोमधून उतरल्यावर एस्कलेटरवरून धावत न उतरता त्या सरकत्या जिन्याच्या गतीने शांतपणे खाली येत राहणं हा पॉज आहे. बसच्या लायनीत उभं राहणं पॉज आहे. कामातून ब्रेक घेत थोडा वेळ इंस्टाग्राम बघणं हा एक पॉज आहे. बाहेर एक राउंड मारून येणं हा एक पॉज आहे. कामाच्या टेबलापासून लांब जात चहाचा एक घोट हा एक पॉज आहे. रोजच्या धावपळीत असे छोटे छोटे पॉज शोधावे लागतील. प्रत्येकाने ते आपापले शोधावेत. 

याच टप्प्यावर कामातून पॉज घेण्याची एक वैशिष्ट्यपूर्ण सिस्टीम शेअर करावीशी वाटते. या सिस्टिमला म्हणतात - पोमोडोरो टेक्निक! काय आहे पोमोडोरो ? 

फ्रान्सेस्को सिरिलो (Francesco Cirillo) या इटालियन माणसाने ऐंशीच्या दशकात पोमोडोरो टेक्निक प्रचलित केली. फ्रान्सेस्कोने यासाठी जे यंत्र वापरलं ते टोमॅटोसारखं होतं. टोमॅटोला इटालियन भाषेत पोमोडोरो म्हणतात. म्हणून या टेक्निकचं नाव पोमोडोरो.

फ्रान्सेस्को सिरिलो आणि त्याचे 'पोमोडोरो' यंत्र !

पोमोडोरो टेक्निक समजायला खूप सोपं आहे. 

१. आपल्याला काय काम करायचंय ते आधी ठरवायचं. 

२. ते काम करण्यासाठी पोमोडोरो यंत्रावर पंचवीस मिनिटांचा टायमर लावायचा.          

३. पंचवीस मिनिटांचा अलार्म झाल्यावर पाच मिनिटांचा ब्रेक / पॉज घ्यायचा. 

४. पंचवीस मिनिटं काम-पाच मिनिटांचा ब्रेक ही सायकल चार वेळा झाली की २०/२५ मिनिटांचा सलग ब्रेक घ्यायचा. 

यामुळे कुठलंही काम अधिक प्रभावी होतं असा फ्रान्सेस्कोचा दावा आहे. 

पोमोडोरो हे यंत्र देखील मिळतं पण पोमोडोरोचा टायमर असलेली अनेक Apps आता मोबाईलमध्ये देखील उपलब्ध आहेत. 

यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे पंचवीस मिनिटे संपूर्ण फोकसने काम. दुसरं म्हणजे पंचवीस मिनिटांनी पाच मिनिटांचा कम्पलसरी ब्रेक ! अर्थात हे टेक्निक कधी वापरायचं हे त्या संबंधित कामावर अवलंबून आहे. किती मिनिटे काम आणि किती मिनिटे ब्रेक यापेक्षा पूर्ण फोकसने काही वेळ काम करून ठरवून एक पॉज घेणे याला महत्त्व आहे. 

आपल्या मराठी भाषेत पॉजला एक सुंदर शब्द आहे. अल्पविराम ! 

याच अल्पविरामाची आज आपल्याला गरज आहे. 

पोमोडोरो प्रमाणे तो पाच मिनिटांचा आहे. पण पॉज किती घ्यावा हे प्रत्येकाने आपापलं ठरवावं. पाच मिनिटं, काही सेकंद, काही तास, काही दिवस, काही महिने ! कारण त्या पॉजमध्ये आहेत अनेक शक्यता. नवं काही सुचण्याच्या. नवं काही निर्माण होण्याच्या. नवं काही उमगण्याच्या. 

हा ब्लॉग वाचून झाल्यावर लगेच कामाला लागू नका. काही क्षण शांत बसा. सगळी टेन्शन्स काही क्षण बाजूला ठेवा. कामांच्या यादीकडे थोडावेळ दुर्लक्ष करा. याला फोन करायचाय. याला मेसेज करायचाय. हिचा मेसेज आलाय का ते तपासायचंय. सगळं विसरा. आजूबाजूला बघा. वर पंखा फिरत असेल तर त्या हवेचा फील घ्या. आजूबाजूचे आवाज ऐका.

हा छोटासा पॉज तुम्हाला पुढच्या कामांसाठी केवढं रिफ्रेश करेल बघा ! 

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

पिप्लंत्री ग्रामदूत - पद्मश्री श्यामसुंदर पालीवाल

'बेटी धनाची पेटी' हे आपण ऐकतो, वाचतो. पण हे प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवलं आहे पद्मश्री श्यामसुंदर पालीवाल यांनी! त्यांनी...

काळजी वाहणारे Robot युग!

Robots बद्दल गेले अनेक वर्ष आपल्याला कुतूहल आहे. मानवी गरजा समजून त्यावर supercomputing च्या साहाय्याने emotional support देणारा robot बनवता आला...

चेकलिस्ट: मतदान करण्यापूर्वीची!

निवडणुकांत मतदान करण्यापूर्वी आपण कधी चेकलिस्ट बनवली आहे का? मतदार राजा सजग झाला तर राजकारण अधिक गंभीर होऊ शकते. आता...