Get Better Each Week #14 - Welcome to Swayam Talks
×

Get Better Each Week #14

नविन काळे

हा ब्लॉग म्हणजे तुमच्या मेंदूचा दर आठवड्याचा व्यायाम आहे! या ब्लॉगमुळे तुम्ही दर आठवड्याला काही नवीन तर शिकालच, पण जगापेक्षा एक पाऊल पुढे राहाल याची आम्ही खात्री देतो.
 

Published : 14 September, 2023

Get Better Each Week #14

आयुष्यात आनंद शोधताय? काहीही करू नका !

Get Better Each Week च्या आजवरच्या प्रत्येक ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला काहीतरी ‘करायला’ सांगतो. अमुक बघा, तमुक ऐका. अमुक करून बघा. तमुक वाचून बघा. पण आज मी तुम्हाला काहीही ‘न’ करायला सांगणार आहे. हे मी चुकीचं लिहिलंय म्हणून तुम्ही कदाचित हे पुन्हा पुन्हा वाचून बघणार आहात. म्हणूनच मी पुन्हा स्पष्ट लिहितो की आज मी तुम्हाला काहीही ‘न’ करायला सांगणार आहे. 

काय झालंय ना, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण शेकडो गोष्टी करत असतो. एकदा गंमत म्हणून यादी करून बघा. आणि त्यात आपल्या आयुष्यात एक मोठ्ठा ‘राक्षस’ आलाय - आपला स्मार्टफोन. स्मार्टफोन आपला एक अवयव झालाय. फोन करणे, फोटो काढणे, कामांची यादी करणे, ऑफिसची कामं करणे, गप्पा मारणे, वस्तू घेणे, पैसे देणे, कुठे जायचं-कसं जायचं हे ठरवणे, सिनेमा पाहाणे, जाहिराती पाहाणे, गाणी ऐकणे, बातम्या पाहाणे, हवामानाचा अंदाज घेणे, कुचाळक्या करणे, टाईमपास करणे, डेटिंग करणे, शिकणे-शिकवणे… आणि असं काय काय आपण फक्त एका फोनवर करत असतो. पूर्वी काहीतरी करायला आपल्याला कुठेतरी जावं लागायचं. आता ते आपल्याच मुठीत असतं. त्यामुळे आपण दिसताना एकाच जागी असतो, पण आपलं मन सतत ऍक्शनमध्ये असतं. हल्ली आपल्या सर्वांच्या चोवीस तासांची विभागणी तीन भागात होते. एक - आपण काहीतरी काम करत असतो. दोन - आपण झोपलेलो असतो. आणि तीन-  जेव्हा आपण या दोघांमधलं काहीच करत नसतो तेव्हा आपण फोनवर असतो !

जागा असताना मी काहीच करत नाही, ही स्टेज आता आपल्या आयुष्यामधून जवळजवळ हद्दपार झाली आहे. अमुक झालं की तमुक करायचं, हे संपलं की ते आटपायचं.   सगळ्याच गोष्टी एकमेकांना इतक्या चिकटून आहेत की, आपल्या आयुष्यातला ‘पॉज’ आता दिवसेंदिवस कमी होत जातोय. याच टप्प्यावर तो हरवलेला ‘पॉज’ परत मिळवण्यासाठी आज ‘Doing Nothing’ या कृतीची तितकीच आवश्यकता आहे.               

आजचा ब्लॉग हा त्याच दुर्मिळ ‘कृती’बद्दल आहे - Doing Nothing ! 

‘काहीही न करणे’ या गोष्टीला आपल्या समाजात एक निगेटिव्ह रंग दिला जातो. सतत कार्यरत असलेल्या लोकांचं इतकं कौतुक होतं की एखादा माणूस काहीही न करता नुसता बसून असतो याची अनेकवेळा थट्टा केली जाते. पण Doing Nothing ही ‘क्रिया’ करण्यात तेव्हाच मजा आहे, जेव्हा आपल्याकडे करण्यासारखं खूप आहे. There is fun when ‘we choose’ to do nothing when we are in a position to do lot of things. तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल पण ‘Doing Nothing’ हे सुद्धा एक महत्त्वाचं आणि अतिशय कठीण काम आहे ! It is awfully hardwork doing nothing असं ऑस्कर वाईल्डचं एक मस्त वचन आहे. हे वाचून हसायला आलं असेल तर एक प्रयोग करून पाहा. तुमचा फोन लांब ठेवून एका जागी बसा. अगदी comfortable जागी बसा. आजूबाजूला बघा. खिडकी बाहेर बघा. शून्यात बघा. पण डोळे उघडे ठेवून हाताने, तोंडाने, पायाने काहीही न करता शांत बसा. एक मिनिट...दोन मिनिटे…पाच मिनिटं बसलात तर माझ्याकडून शाबासकी. दहा मिनिटे बसलात तर बक्षीस ! तेव्हा कळतं की doing nothing is also a work ! याच विषयावर वाचन करत असताना एक मस्त वाक्य हाती लागलं -  Happiness is….. Doing nothing and then resting afterwards ! 

आपलं सर्वांचंच आयुष्य वस्तू कोंबलेल्या कपाटासारखं झालंय. ते वर्षातून एकदा आवरण्याऐवजी रोजच नीटनेटकं ठेवलं तर? रोज काही वेळ काहीही न करता शांत बसणं हे त्या कपाटातला पसारा आवरण्यासारखं आहे. फोन रिचार्ज करण्यासाठी फोनवर काहीही न करता तो काही वेळ चार्जरला लावून ठेवावा लागतो, तसं आहे थोडं. पण त्यासाठी डोक्यातल्या त्या ‘रिकाम्या जागेचं’ महत्त्व समजावून घेणं आवश्यक आहे. सगळीकडून कानावर गोंगाट ऐकू येत असताना मौनाचं महत्त्व कळायला हवंय. 

मुंह की बात सुने हर कोई 

दिल के दर्द को जाने कौन 

आवाजोंके बाजारोंमें ख़ामोशी

पहचाने कौन। ...... अशी निदा फाजली यांची एक अप्रतिम गज़ल आहे. 

तुम्हाला आणखी एक गंमत सांगतो. जॉन केज नावाच्या एका संगीतकाराची 4’33 (4 Minutes 33 seconds) या नावाची एक जगप्रसिद्ध संगीत रचना आहे. एक पियानिस्ट स्टेजवर येतो. पियानो समोर बसतो. काहीही न वाजवता साडे चार मिनिटांनी निघून जातो. जॉन केजने त्या रचनेला ‘silence’ असं नाव दिलं होतं. त्याच्या मते, त्या साडे चार मिनिटांत त्या ठिकाणी जी शांतता निर्माण झाली, कोणी खोकलं, कोणी हसलं, खुर्चीचा आवाज झाला… या सर्व गोष्टींनी संगीत निर्माण केलं ! त्याची लिंक मी इथे देतोय… हे आगळं वेगळं ‘संगीत’ नक्की ऐका ! https://www.youtube.com/watch?v=JTEFKFiXSx4

अशाच एका भन्नाट कलाकृतीचा मध्ये शोध लागला. पुस्तकाचं नाव आहे Book of the Book ! सुफी गुरूंनी आपल्या शिष्यांना जी शिकवण दिली आहे, ती या पुस्तकात आहे. २१५ पानांच्या त्या पुस्तकात २०० पानांची शिकवण आहे आणि उरलेल्या पंधरा पानांवर या पुस्तकाची माहिती आहे. मग यात भन्नाट काय आहे? तुम्ही विचाराल. सांगतो. ही सर्व दोनशे पानं कोरी आहेत ! एक माणूस दुसऱ्याला काहीही शिकवू शकत नाही - हीच ती शिकवण. म्हणूनच सर्व पानं कोरी आहेत ! 

हे पुस्तक ऍमेझॉनवर उपलब्ध आहे. त्याची किंमत साधारण दोन हजार रुपये असून ही त्या पुस्तकाची सातवी आवृत्ती आहे ! 

दीपक चोप्रा नावाचे एक सुप्रसिद्ध Life coach आहेत. त्यांनी तर सांगितलंय आजूबाजूला बघत नुसते बसा. अट एकच. आजूबाजूला दिसणारी माणसं, घटना, वस्तू, जागा याबद्दल मनात कुठलंही मत निर्माण करायचं नाही. नुसतं बघा. 

Just be an OBSERVER. DON’T BE A JUDGE. त्यांच्या मते हेच मेडिटेशन आहे. हेच ध्यान आहे. 

‘The Importance of Living’ नावाचं Lin Yutang या चिनी लेखकाचं एक अप्रतिम पुस्तक आहे. त्याने त्या भल्या मोठ्या पुस्तकातील एक संपूर्ण लेख ‘काहीही न करता नुसतं लोळत राहण्यावर’ लिहिलंय. त्याच्या मते आपण काहीना काही करण्यामध्ये इतके बिझी झालोय की या साध्या साध्या गोष्टी करण्यामधला आनंद आपण विसरत चाललोय. बाय द वे, हे त्याने १९३७ साली लिहिलंय ! 

‘काहीही न करण्याची’ एक अपूर्व कला आपल्याकडे आहे याचा जर तुम्हाला विसर पडला असेल तर माझी खात्री आहे की या ब्लॉगमुळे तुम्ही या दुर्मिळ कलेचा आता यापुढे ध्यास घ्याल. सगळं (सगळं म्हणजे, मोबाईल सकट सगळं) बाजूला ठेवून दिवसातला काही वेळ फक्त स्वतःजवळ बसा. म्हणजे त्यासाठी ‘स्वतःजवळ बसायची’ प्रॅक्टिस करावी लागेल. होय ! प्रॅक्टिस करावी लागेल ! तुम्ही स्वतःजवळ तेव्हाच बसू शकाल जेव्हा तुम्हाला स्वतःला तुमचीच कंपनी आवडेल ! यासाठी तुम्हाला स्वतःवर प्रेम करावं लागेल. म्हटलं ना, doing nothing इतकं सोपं नाही म्हणून ! 

यापुढे जमल्यास एक मात्र करा. 

रोजच्या To Do लिस्टमध्ये रोज - To do nothing हे लिहायला विसरू नका. 

आणि मग, वर म्हटल्याप्रमाणे काहीही न केल्यावर आराम करायची मजाच काही और आहे !   

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

पिप्लंत्री ग्रामदूत - पद्मश्री श्यामसुंदर पालीवाल

'बेटी धनाची पेटी' हे आपण ऐकतो, वाचतो. पण हे प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवलं आहे पद्मश्री श्यामसुंदर पालीवाल यांनी! त्यांनी...

काळजी वाहणारे Robot युग!

Robots बद्दल गेले अनेक वर्ष आपल्याला कुतूहल आहे. मानवी गरजा समजून त्यावर supercomputing च्या साहाय्याने emotional support देणारा robot बनवता आला...

चेकलिस्ट: मतदान करण्यापूर्वीची!

निवडणुकांत मतदान करण्यापूर्वी आपण कधी चेकलिस्ट बनवली आहे का? मतदार राजा सजग झाला तर राजकारण अधिक गंभीर होऊ शकते. आता...