अंकुश बहुगुणा, निहारिका NM, आकांक्षा मोंगा, धारणा दुर्गा, विराज घेलानी, यशराज मुखाते, आशिष चंचलानी, कुशा कपिला, गौरव चौधरी, त्रिनेत्रा हलदार, वाणी मूर्ती… यातलं एकही नाव तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही ‘म्हातारे’ होताय असं समजा ! आता हीच नावं तुमच्या टीन एजर मुलासमोर किंवा नातीसमोर उच्चारा. यामधून दोन गोष्टी होतील. एक म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर ‘आजि मी ब्रह्म पाहिले’ टाईप्स भाव उमटतील आणि दुसरं म्हणजे ही नावं तुमच्या मुखातून ऐकल्याने त्यांचा तुमच्याबद्दलचा आदर वाढेल ! मंडळी, हा सस्पेन्स अधिक न ताणता सांगून टाकतो. वर ‘मेन्शन’ केलेली सर्व मंडळी आजच्या सोशल मीडियाच्या विश्वातील डिजिटल स्टार्स असून त्यांना आज लाखो माणसं follow करतायत ! आजच्या भाषेत त्यांना Influencers म्हणतात !
एक काळ असा होता की influence या शब्दाला एक वेगळा वास होता. अमुक एका माणसाचा influence वापरून कामं करून घेणं, किंवा अमुक एक माणूस दारूच्या influence मध्ये होता वगैरे. पण माध्यमं बदलली आणि त्यामुळे शब्दांचे संदर्भही बदलले. एके काळी साबणापासून ते गाडीपर्यंतच्या वस्तू विकण्यासाठी जाहिरातींमधून फिल्म स्टार्स दिसत होते. त्यांच्या चाहत्यांवर कळत-नकळतपणे त्याचा प्रभाव पडत असे आणि वस्तू विकण्यासाठी त्याचा उपयोग होत असे. पण तंत्रज्ञानाने क्रांती केली. दोन महत्त्वाचे बदल घडले. पूर्वी सिनेमा तयार करण्यासाठीची सामग्री काही मोजक्या लोकांकडे होती आणि मामला एकूणच खर्चिक होता. पण मोबाईलवर कॅमेरा आला आणि सगळी गणितच बदलली. ज्याच्या हातात मोबाईल आहे, त्याच्याकडे व्हिडीओ / सिनेमा तयार करण्याची शक्यता निर्माण झाली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तयार केलेला सिनेमा दाखवण्यासाठी त्याला थिएटरमध्ये जाण्याची गरज नव्हती. त्याच्या प्रदर्शनासाठी त्याला घरबसल्या आणि एका क्लिकवर एक distribution network मिळालं - त्याचं नाव सोशल मीडिया ! मध्यमवर्गीयांना परवडणारे बरे मोबाईल फोन्स आणि इंटरनेट यामुळे content creation ही फक्त मोठ्या शहरांची मक्तेदारी राहिली नाही. Creative Power चं विकेंद्रीकरण झालं. छोट्या छोट्या शहरांमध्ये राहणाऱ्या तरुण तरुणींच्या सर्जनशीलतेला एरवी मिळाले नसते असे एक व्यासपीठ मिळाले. सोशल मीडिया हे एका अर्थाने समान नागरिकत्वाचा धडा देणारे एक अद्भुत गाव बनले. मुंबईतला सचिन तेंडुलकर, पोर्तुगालचा रोनाल्डो, बार्शीतला कोणी एक रामभाऊ पासून बरेलीतला कोणी एक सलीम हे सगळे आता एका समान व्यासपीठावर आले…. आणि मग ते लोण परसरतच गेलं !
पुण्याच्या आकांक्षा मोंगाचं उदाहरण घ्या. प्रवासाची आवड असलेल्या आकांक्षाने प्रवास करता करता सोशल मीडियावर स्वतःचे व्हिडीओ टाकायला सुरुवात केली. ऑफबीट ठिकाणे, त्याच्याबद्दलची थोडक्यात पण आकर्षक मांडणी, फ्रेश सादरीकरण आणि अर्थातच त्यातलं सातत्य यामुळे लोकांना ते आवडू लागलं. आज साडेआठ लाखांहून अधिक लोक तिला follow करतात. दिल्लीत जन्म झालेला अंकुश बहुगुणा. त्याने एक वेगळीच वाट निवडली. पुरुषांनी मेकअप का करायचा नाही? अंकुशने सवाल केला. त्याच्यावर टीका झाली पण एका वर्गाकडून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. अकरा लाख followers असलेला अंकुश आता सोशल मीडियावरून पुरुषांना मेकअप टिप्स देतो. अजमेर मध्ये जन्मलेला आणि आता दुबईत गेलेला गौरव चौधरी उर्फ टेक्निकल गुरुजी लोकांना टेक्नॉलॉजीशी संबंधित नवनवीन वस्तूंबद्दल माहिती देत असतो. फक्त YouTube वर त्याचे दोन कोटी तीस लाख subscribers आहेत ! मराठी विश्वात एक प्रसिद्ध YouTuber म्हणून नाव कमावलेल्या पुण्याच्या उर्मिला निंबाळकरने सोशल मीडियावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलीय. कोकणी रानमाणूस म्हणून प्रसिद्ध असलेला सावंतवाडीच्या एका गावात राहणारा प्रसाद गावडे आज लोकांना इंस्टाग्रामवरून कोकणातील माहित नसलेल्या वैभवाची जाणीव करून देतोय. त्रिनेत्रा हलदार ही ट्रान्सजेन्डर व्यक्ती आपल्या स्वतःच्या वेगळ्या व्यक्तिमत्वामुळे चर्चेत असते. Social Media हे फक्त तरुणांचेच माध्यम आहे असं वाटत असेल तर Hold On! ‘आपली आजी’ म्हणून प्रसिद्ध झालेल्या सुमन धामणे या सत्तरीच्या आजींचे सोळा लाखाहून अधिक followers आहेत ! यश पाठक या त्यांच्या नातवाने आपल्या आजीच्या गावरान रेसिपीजचे व्हिडीओ youtube वर टाकायला सुरुवात केली आणि आजीच्या ‘नमस्कार बाळांनो कसे आहात’ या वाक्याने सोशल मीडियाची मने जिंकली. बंगळुरूमध्ये राहणाऱ्या बासष्ट वर्षांच्या वाणी मूर्ती इंस्टाग्रामवरून लोकांना छोट्या छोट्या कृतींमधून आपण sustainable living कसं साधू शकतात हे सांगतात. आज तीन लाखांहून अधिक लोकं त्यांना follow करतात. यात आणखी एक मजेशीर प्रकार आलाय. लहान मुलांच्या आया (आईचं अनेकवचन) आता Mom Influencers झाल्यात ! आपल्या मुलांचं संगोपन, त्यांच्याबरोबर घालवलेले क्षण, त्यांची मस्ती हे सगळं सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या काही ‘Moms’ आता सोशल मीडियावर चर्चेत आहेत ! शिल्पा कामदार, स्मृती खन्ना ही त्यातील काही नावं. तेव्हा मंडळी, ही लिस्ट न संपणारी आहे. जे जग आपल्याला चकित करणारं आहे. कॉमेडीपासून ट्रॅव्हलपर्यंत, फॅशनपासून फुडपर्यंत, म्युझिकपासून टेक्नॉलॉजीपर्यंत प्रत्येक गोष्टीत हे influencers आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकतायत.
याचं बिझनेस मॉडेल अगदी सोपं आहे. या influencers चा स्वतःचा एक चाहता वर्ग आहे. साहजिकपणे या influencers चा त्यांच्या चाहत्यांवर प्रभाव आहे. त्यामुळे अगदी मल्टिनॅशनल कंपन्यांपासून ते अगदी छोट्या उद्योजकांपर्यंत, राजकीय पक्षांपासून ते सामाजिक संस्थांपर्यंत स्वतःच्या कल्पना, स्वतःची प्रॉडक्ट्स विकण्यासाठी, किंवा आताच्या भाषेत सांगायचं तर ब्रँड प्रमोशनसाठी या influencers चा वापर केला जातोय. म्हणजे, मध्यंतरी ए आर रहमानला एका सिनेमाच्या प्रमोशनसाठी संभाजीनगरात राहणाऱ्या युवराज मुखातेबरोबर प्रमोशन करावं लागलं होतं ! आता बोला ! त्यातही यामध्ये ‘हायपर लोकल’ ही एक नवीन संकल्पना रुजत आहे. उदा. मराठी भाषेमध्ये content तयार होणं याला local content म्हणता येईल. पण मालवणी, खान्देशी, वऱ्हाडी, कोकणी भाषेत content तयार होणं याला ‘हायपर लोकल’ म्हणतात. त्यामुळे जर एखाद्या प्रॉडक्टचे प्रमोशन जर कोकणात करायचे असेल तर तिथे अमिताभ बच्चनपेक्षाही तिथला एखादा local influencer जास्त प्रभावी (आणि किफायतशीर) ठरेल. सोशल मीडिया कंपन्या, त्यासाठी content तयार करणारी मंडळी, ते पाहाणारा प्रेक्षक, आणि त्यासाठी पैसे मोजणारे जाहिरातदार अशी एक इको सिस्टीम तयार झाली आहे.
Product promotion, brand integration, brand collaboration यासाठी या influencersना चांगले पैसे मिळू लागले आहेत. YouTube वा instagram साठी व्हिडीओ तयार करणे हे आज अनेकांसाठी चरितार्थाचे साधन बनले आहे. Stastica या कंपनीच्या अहवालानुसार, Influencer मार्केटिंगची २०२२ ची आकडेवारी रुपये १२०० कोटी इतकी होती. २०२८ पर्यंत हा एकदा रुपये २८०० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
अर्थात प्रत्येक गोष्टीप्रमाणे यालाही एक दुसरी बाजू आहे. सोशल मीडियावरील हे जग अतिशय चंचल आहे. यात प्रचंड स्पर्धा आहे. या संपूर्ण Business Model चा पाया आहे, Attention Economy ! सतत ‘समोर दिसत राहण्याच्या’ स्पर्धेत सातत्याने रोज काही ना काही नवीन निर्माण करत राहण्याचे इथे एक वेगळेच प्रेशर आहे. ‘सुचेल तेव्हा’ निर्माण करण्याची चैन इथे नाही. त्यामुळे इथले सर्व content creators अपरिहार्यपणे views, followers, subscribers, watch time या नंबर्सला बांधलेले आहेत. एका आंतरराष्ट्रीय कंपनीने एक सर्वेक्षण केलं आणि त्याचा जो अहवाल तयार केला त्याला नाव दिलं, Creator Mental Health Report. या रिपोर्टनुसार ४३% social creators हे या सर्व धावपळीत burnout म्हणजे मानसिकरीत्या अत्यंत थकून गेलेत ! त्यामुळे इथे दिसणारं ग्लॅमर, पैसा, प्रसिद्धी हे सगळं एका निमुळत्या दोरीवरून चालण्यासारखं आहे. एक लक्षात घ्या. शेवटी ही सुद्धा एक कला आहे. कोणत्याही कलेसाठी लागणारा रियाझ इथेही आवश्यक असणार आहे. सतत बदलत असलेल्या माध्यमांचा अभ्यास, इतर कलाकार काय करतायत त्याचा अभ्यास, टेक्नॉलॉजीचा अभ्यास, होत असलेले सामाजिक बदल, लोकांच्या बदलत जाणाऱ्या सवयी आणि आवडी, स्वतःच्या कामाकडे objectively बघण्याची क्षमता असणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेगाने बदलत जाणाऱ्या या जगात आपली सर्जनशीलता टिकवून ठेवणं हाच या डिजिटल कलाकारांसाठी महत्त्वाचा रियाझ असणार आहे.
‘संधी मिळाली नाही म्हणून रे ! नाहीतर आम्ही पण मोठे कलाकार झालो असतो’ असं म्हणणारे आपल्या आजूबाजूला अनेक जण आहेत. पण आता ही excuse यापुढे कोणाला देता येणार नाही. काहीतरी करून दाखवण्याची संधी आता प्रत्येकाला आहे. त्या संधीचं रूपांतर ते सोन्यात कसं करतायत हे पाहणं, त्या रील्सपेक्षाही, जास्त इंटरेस्टिंग असणार आहे !