कुछ नही हो सकता इस देश का' या भोवतालच्या वातावरणात 'स्वयं' बरोबरचे काम 'immunity' कसं वाढवतंय याबद्दल सांगतोय, 'स्वयं'चा प्रसन्न पेठे !
"भारत बदल रहा है" असं अत्यंत सकारात्मकतेनं, पाॕझिटिव्हिटीनं माझ्याइतक्या छातीठोकपणे क्वचितच कुणी सांगू शकेल, याचं कारण जवळपास ८८-९० पासून भारताविषयी अत्यंत निराशाजनक वक्तव्य करणारा मी गेल्या आठ-दहा महिन्यांपास्नं खूपच बदलायला लागलोय!आत्ताआत्तापर्यंत माझं दूर्योधनी मन मला समाजात, देशात वाईट काय आहे…वाईट काय घडतंय त्यावरच विचार करुन व्यक्त व्हायला भाग पाडत होतं…पण गेल्या आठंदहा महिन्यांपासून मी कळतनकळत, जाणताअजाणता समाजातल्या चांगल्या गोष्टींही बघायला, अप्रिशिएट करायला आणि खुल्या दिलानं कौतुक करायला शिकलोय..शिकतोय आणि त्याचं कारण आहे आॕक्टोबर'१९ पास्नं ख-या अर्थानं माझ्या आयुष्यात घुसलेलं "स्वयं"!!तोपर्यंत -"जातीपातीत घडवून आणले जाणारे राडे, समाजातल्या बेक्कार समजुती, चालीरिती आणि सिव्हिक सेन्सची कंम्प्लीट बोंब असणारी मेजाॕरिटी जनता". यावर मी अगदी त्वेषानं बोलायचो..व्यक्त व्हायचो…आणि ती सगळी परिस्थिती समाजातला जातींमधला द्वेष, दोन धर्मांतली तेढ, पाकिस्तानी अतिरेकांच्या सत्तच्या कारवाया आणि एकुणातला भ्रष्टाचार/ लाचलुचपत पाहून ; १९८४ सालच्या "सारांश" फिल्ममधलं प्रधान सरांचं (अनुपम खेर) उद्वीग्नतेनं हृदय पिळवटून आलेलं वाक्य -"This country has no future" - मला अगदी गीतावचन किंवा गाॕस्पेल-ट्रुथ वाटायचं आणि मी ते येताजाता कुणाकुणाच्या तोंडावर फेकायचो!
पण नियतीनं अलगदच "स्वयं"ला माझ्यासमोर आणून उभं केलं. "स्वयं"च्या नविनने मला "ये, काम करु बरोबर" म्हटलं.."स्वयं" परिवारानं खूप सहजी "आपलं" म्हटलं आणि मग एका प्रचंड सकारात्मक उर्जामय वातावरणाने भारला गेलो. ..आॕफकोर्स माझ्या जहनमध्ये रुजलेली काहीशी पेस्सिमिस्टीक वृत्ती एकाएकी शून्य झाली नाही. अज्जूनही सभोवताली, समाजात घडणा-या खूप काही गोष्टी अस्वस्थ करतात…पण "स्वयं टाॕक्स"चा माहोल त्यांतनं बाहेर पडायला मदत करतो!! अलगद….!!
मी सध्या पुण्यात आहे खरा, पण आॕक्टोबर'१९पास्नं ते २५ मार्च'२०च्या लाॕकडाऊनपर्यंत बोरिवलीच्या घरुन "स्वयं"च्या विलेपार्ल्यातल्या सुभाष रोडवरच्या आॕफिसमधे रोज जातायेतानाही "स्वयं"चे प्रोग्रॕम्स, त्याची आखणी, त्यातलं माझं अल्पसं काम हे डोक्यात असल्यामुळे ती बोरिवली ते विलेपार्ले प्रवासातली लोकलची (फर्स्ट क्लासच्या 'सेंट मारलेल्या घामट्ट गर्दी'च्या चेंगराचेंगरीतली) कटकट कध्धीच जाणवली नाही याचं श्रेय पूर्णपणे "स्वयं" देत असलेल्या भारलेल्या क्षणांना!! नविन, आशय, दीपाली आणि श्रेया जिवंत ठेवत असलेल्या आमच्या आॕफिसच्या विलक्षण आनंदी वातावरणाला!!"स्वयं"च्या आॕफिसमध्ये…त्या धमाल माहोलमध्ये बसून मी रोज जे अल्पसं काम करत आलोय त्यातनं जो आनंद भरलाय आयुष्यात तो याआधीच्या माझ्या तीसेक वर्षांच्या इंजिनियरिंग जाॕब्समध्ये क्वचितच मिळाला असेल!!!"स्वयं"मुळे जी माणसं जोडली गेली आणि जातायत त्याने तर अक्षरशः 'पावन' होतोय! अनिलकाका, काकू, डाॕ.निरगुडकर, आमची काँन्टेन्ट टीम आणि स्वयं परिवाराचे सगळे स्टाॕलवर्ट्स आणि एकाहून एक अफलातून वक्तेमंडळी यांनी आयुष्य समृद्ध केलंय!!
या निमित्ताने काही वक्त्यांना त्यांच्या कार्यक्रमासंबंधाने भेटण्याचा योग आला त्यात पुण्यातल्या मुक्ता पुणतांबेकर आणि श्वेता कुलकर्णीची अलीकडची भेट लक्षांत राहिलेली!मुक्ता पुणतांबेकरांना भेटण्यासाठी अर्थातच "मुक्तांगण"मधे गेलो होतो. त्याविषयी खूपच ऐकलं/ वाचलं होतंच! पु.लंच्या हस्ते उद्घाटन झालेल्या त्या वास्तूच्या उद्घाटन प्रसंगाचा किस्सा मुक्ता यांच्या तोंडून ऐकणं हा एक वेगळाच अनुभव होता आणि त्यात भर पडली तिथे येऊन पूर्णपणे व्यसनमुक्त झालेल्या पण गुन्हेगारी पार्श्वभूमी (शार्प शूटर) असणा-या मॕरॕथाॕन रनर राहुल जाधवला भेटून त्याचे अनुभव प्रत्यक्ष ऐकताना!! एक वेगळंच थ्रील दाटलं होतं मनात!पुण्यातच दुसरी speaker होती श्वेता कुलकर्णी! इंग्लंडच्या राॕयल अॕस्ट्राॕनाॕमिकल सोसायटीची फेलोशिप अवघ्या २२वर्षांची असताना मिळवणारी यंग अॕस्ट्राॕनाॕमर! मला स्वतःला एकेकाळी स्पेस आणि अॕस्ट्राॕनाॕमीचं प्रचंड वेड होतं आणि श्वेतासारखंच खगोलसंशोधक बनायचं होतं..त्यामुळे तिचंते 'अॕसौट्राॕनईरा'चं आॕफिस..तिथली भन्नाट पोस्टर्स बघून आणि तिच्याशी खगोलशास्त्राविषयी आणि घडामोडींविषयी गप्पा मारताना खूप छान वाटत होतं आणि आपलं स्वप्नं समोर कुणीतरी साकारलंय हे पाहून मनोमनी प्रचंड आनंद आणि कौतुक वाटत होतं….नंतरही माणगावच्या सानै गुरुजी स्मारकात "स्वयं काँन्क्लेव्ह", स्वयं टाॕक्समधे बोलून गेलेल्या पंचवीसेक माजी वक्त्त्यांबरोबर दोन दिवस खेळीमेळीच्या वातावरणात काढताना एक विलक्षण फिलींग आणि समाधान मिळालं होतं…स्वयं मुळे मिळत असणा-या अनेक सकारात्मक क्षणांमधे अश्या अनेक आठवणींची भर पडल्येय आणि खूप खूप छान छान व्यक्तीमत्त्वं भेटताहेत याबद्दल मला माझ्याच भाग्याचा हेवा वाटतोय!थोडं बाभडेपणानं आणि भावूकतेनं शहरयारच्या नज्म़ची ओळ वापरुन म्हणायचं तर -"ज़िंदगी जब भी तेरी बज़्म में लाती है हमें, ये ज़मीं चाँद से बेहतर नज़र आती है हमें.."थँक्यू नविन! थँक्यू आशय! थँक्यू "स्वयं"!!!
-प्रसन्न पेठे
लेखक हे स्वयं टॉक्स Team चे सदस्य आहेत.