WHY 'The Economist' ? - Welcome to Swayam Talks
×

WHY ‘The Economist’ ?

नविन काळे

लंडनस्थित 'दि इकॉनॉमिस्ट' या नियतकालिकाचा आयुष्यात प्रवेश झाला आणि आपल्या कामातला 'why' हळूहळू गवसू लागला. कसा ते सांगतोय नविन काळे.
 

Published : 21 September, 2020

WHY ‘The Economist’ ?

लंडनस्थित 'दि इकॉनॉमिस्ट' या नियतकालिकाचा आयुष्यात प्रवेश झाला आणि आपल्या कामातला 'why' हळूहळू गवसू लागला. कसा ते सांगतोय नविन काळे.   

आमचं महिन्याचं न्यूजपेपर बिल तीनशे रुपये असताना मी दर आठवड्याच्या  'दि इकॉनॉमिस्ट'साठी अडीचशे रुपये मोजतो. लंडनच्या 'दि इकॉनॉमिस्ट' या साप्ताहिकाचा मी गेली दोन वर्षे वर्गणीदार आहे. हे साप्ताहिक वाचण्यासाठी मी एका वर्षात बारा हजार रुपयांची वर्गणी भरतो.  प्रत्येक वर्षी, स्वतःसाठी केलं जाणारं हे माझं सर्वात महागडं 'शॉपिंग' आहे !   

जागतिक पातळीवर राजकारण, अर्थकारण, तंत्रज्ञान, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांत मागल्या आठवड्यात काय काय घडलं याची वस्तुनिष्ठ माहिती मला या साप्ताहिकात मिळते. ते साप्ताहिक असले तरी 'इकॉनॉमिस्ट' त्याला Newspaper म्हणते.मग ही सगळी माहिती तुम्हाला इंटरनेटवर सुद्धा मिळेल. त्यासाठी इतकी महाग वर्गणी खर्च करायची काय गरज आहे ? अनेकजण विचारतात.  ही वर्गणी मी फक्त मजकूर वाचण्यासाठी भरत नाही, तर ती 'इकॉनॉमिस्ट' नावाच्या गुरूला  माझ्याकडून गुरुदक्षिणा असते. या गुरूने मला केवळ दर आठवड्याच्या घडामोडीच सांगितल्या नाहीत तर न बोलता अनेक गोष्टी शिकवल्या. 'स्वयं'सारखं पूर्णपणे वेगळ्या धाटणीचं काम करताना आवश्यक असणाऱ्या दोन गोष्टी दिल्या - संयम आणि कल्पनेवरील दृढ विश्वास !  'इकॉनॉमिस्ट' कडून काय शिकलो ?

अभ्यासू-सखोल-वस्तुनिष्ठ विश्लेषण: कुठल्याही सवंगतेचा आधार न घेता जगभर पसरलेली यांची टीम दर आठवड्याला माझ्यासाठी माहितीचा खजिना घेऊन येते. हा खजिना इतका असतो की तो संपूर्ण आठवड्यातही पूर्ण वाचून होत नाही. Everything else revolves around the High Quality Content !     

Price आणि Value यातील फरक:  आपण लोकांना उत्तम दिलं तर लोकं त्यासाठी उत्तम मोबदला द्यायला तयार असतात, यावर 'इकॉनॉमिस्ट'ची अगाध श्रद्धा आहे. ही एक व्यावसायिक कंपनी असून त्यांच्या वेबसाईटवरील माहितीनुसार ३१ मार्च २०२० तारीख असलेल्या सहा महिन्यांच्या financials प्रमाणे या नियतकालिकाने सुमारे ३ कोटी १४ लाख पाऊंड्स इतका भरघोस नफा कमावला आहे.   

पिढ्यानपिढ्या relevant कसं राहावं?: 'इकॉनॉमिस्ट'ची स्थापना आजपासून १७७ वर्षांपूर्वी म्हणजे १८४३ साली झाली. या इतक्या वर्षांत जगात किती बदल झाले ! दोन महायुद्धे झाली. जगाची घडी विस्कटणाऱ्या किती घटना या साप्ताहिकाने पाहिल्या असतील. तरीही आज इतक्या वर्षांनी हा वटवृक्ष टिकून आहे, याचा अर्थ त्याची मूळे किती घट्ट आणि खोलवर गेली असतील. उत्तम माहिती पोहोचवणाऱ्या साधनांच्या (tools) प्रेमात न पडता कालानुरूप ती साधने आवश्यक वेगाने बदलत राहण्याची flexibility 'इकॉनॉमिस्ट'कडे आहे. 'इकॉनॉमिस्ट' आता प्रिंट, डिजिटल, शॉर्ट फिल्म्स
व अशा विविध माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचत आहे.

गर्दीच्या मागे न धावता आपला खरा ग्राहक ओळखणे आणि मग त्याला सर्वोत्तम सेवा देणे:
संपूर्ण जगात 'इकॉनॉमिस्ट'चे 'फक्त' सोळा लाख वर्गणीदार आहेत. त्यात सोशल मीडियाचा अंतर्भाव  केल्यास फक्त पस्तीस लाख माणसं 'इकॉनॉमिस्ट' वाचतात, पाहतात. पण तरीही mass मिळवण्याच्या नादात ते अगतिक होताना दिसत नाहीत. कमी माणसांना सेवा देऊनही आर्थिकदृष्ट्या ते कधीच तोट्यात नसतात. हे नियतकालिक जगातील खूप मोजके पण चोखंदळ वाचक वाचतात याबाबत ते समाधानी आहेत.   
 
व्यक्तीपेक्षा तो ब्रँड मोठा असायला हवा: अशी 'इकॉनॉमिस्ट'ची मान्यता आहे. तुम्ही ऐकून अचंबित व्हाल की इथे कुठल्याही लेखाच्या मागे पुढे ते लिहिणाऱ्या संपादकाचे वा पत्रकाराचे नाव नसते.
अपवाद फक्त आमंत्रित लेखकांचा व ज्या दिवशी संपादकाचा त्याच्या / तिच्या कारकिर्दीतला शेवटचा लेख असेल तेव्हा. याबद्दल त्यांच्या वेबसाईटवर शोध घेतला तेव्हा हे पुढील वाक्य सापडलं - In the words of Geoffrey Crowther, our editor from 1938 to 1956, anonymity keeps the editor “not the master but the servant of something far greater than himself…it gives to the paper an astonishing momentum of thought and principle.”

सध्याची आक्रमक, आक्रस्ताळी व अगतिक मीडिया पाहताना १७७ वर्षे तरुण 'इकॉनॉमिस्ट'चे महत्व अधिक अधोरेखित होतंय. 'काम करताना काय टाळायचं' हे 'इकॉनॉमिस्ट' शिकवतंय आणि त्याहीपेक्षा या सगळ्यातलं काय भावलंय तर आपल्या core पासून विचलित न होता शांतपणे काम करत राहायची व्रतस्थ आणि त्रयस्थ वृत्ती - आणि तीही पिढ्यानपिढ्या !  

- नविन काळे

लेखक हे ‘स्वयं’ चे संस्थापक सदस्य आहेत.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

चेकलिस्ट: मतदान करण्यापूर्वीची!

निवडणुकांत मतदान करण्यापूर्वी आपण कधी चेकलिस्ट बनवली आहे का? मतदार राजा सजग झाला तर राजकारण अधिक गंभीर होऊ शकते. आता...

चांगुलपणाची प्रतिमा : मिसेस हॅरिस

कधी उगाच उदास वाटतं, माणुसकी, चांगुलपणा यावरचा विश्वास कमी व्हायला लागतो, उगीच चिडचिड होत असते, राग राग करून काही होणार...

स्वच्छतादूत : पद्मश्री एस. दामोदरन

दक्षिण भारतातील ६०० हून अधिक गावे आणि २०० पेक्षा अधिक झोपडपट्ट्यांमधील नागरिकांना उघड्यावर शौच करण्यापासून परावृत्त...