'सुट्टी' म्हणजे नक्की काय असतं ? - Welcome to Swayam Talks
×

‘सुट्टी’ म्हणजे नक्की काय असतं ?

नविन काळे

काम 'शून्य' झालं तरी चालेल पण आपण सतत काम करतोय असा आभास निर्माण करण्यात आपल्या देशातील जनतेचा हात कोणी धरू शकत नाही ! पण उद्योजकाला कार्यसंस्कृती रुजवताना वेगळा विचार करावा लागतो. त्याबद्दल सांगतोय, नविन काळे
 

Published : 17 August, 2020

‘सुट्टी’ म्हणजे नक्की काय असतं ?

 नोकरी सोडायच्या आधी मी बारा वर्षे एका प्रसिध्द सॉफ्टवेअर कंपनीच्या legal dept मध्ये काम करत होतो. सोमवार ते शुक्रवार काम, शनिवार-रविवार सुट्टी. त्यामुळे शुक्रवारी संध्याकाळी 'तुरुंगातून सुटल्याचे' एक विजयी फिलिंग आणि रविवारी संध्याकाळी…. ! नोकरी सोडायच्या आधी दोन वर्षे मी त्या रविवार संध्याकाळी एकच विचार करायचो - 'या चक्रातून 'मोक्ष' कधी मिळेल ?'ज्यासाठी नोकरी सोडली ते काम आवडतं होतं. प्रवास, लिखाण, माणसांना भेटणे, संगीत…उद्योजकता नावाच्या एका नवीन अध्यायाची सुरुवात. मग सोमवार, रविवार, शुक्रवार असं काही उरलं नाही. 'विकेंड' ही संकल्पनाच आयुष्यातून पुसली गेली. म्हटलं तर रोज सुट्टी, म्हटलं तर रोज काम.

उद्योजक झाल्यानंतरचे हे सुरुवातीचे दिवस 'हनिमून' सारखे असतात. यात एक विलक्षण रोमॅन्सीटिजम असतो. चोवीस तास फक्त आवडत्या गोष्टींमध्ये. आपण आपल्या वेळेचे राजे वगैरे. आपल्या व्यवसायाची पहिली Balance Sheet हातात आल्यावर मात्र हा रोमान्स संपतो. मोगऱ्याच्या गजऱ्यावरून आपण थेट वाण्याच्या यादीवर येतो.   'स्वयं'च्या बाबतीत सांगायचं तर कुठल्याही उद्योगाप्रमाणे सुरुवातीची काही वर्षे नक्कीच कठीण गेली…आणि ती कठीण गेली म्हणूनच 'उद्योजक' म्हणून जडण-घडण होत गेली. अजूनही होतेच आहे. उद्योगात तुम्ही सायकलवर बसलेल्या माणसासारखे असता. सायकलीची चाकं फिरत राहण्यासाठी तुम्हाला सतत पेडल्स मारत राहावी लागतात. 'स्वयं' बद्दल बोलायचं तर इथे सतत नवीन विचार करत राहावा लागतो. 'छान काही सुचणं' हे दुकानात जाऊन विकत घेता येत नाही. उद्योग करत असताना 'सुचेल तेव्हा करू' ही चैन परवडणारी नसते. डेडलाईन पाळायच्या असतात आणि त्यात चांगलं सुचायलाही हवं असतं. सुचण्याचा तो एक 'युरेका' क्षण डोक्यात फुलण्यासाठी विचारांची जमीन सतत नांगरत ठेवावी लागते. मग तो नांगर कुठलाही असू शकतो. पुस्तकं - रोजचा पेपर - गप्पा - इंटरनेट - लेखन - माणसं - घटना - abstract विचार ! रोजचं जगणंच अधिक सजग संवेदनशील करत जाणं हाच रियाज !कधीकधी डोक्यात इतके विचार येतात की थांबतच नाहीत. कवी म्हणे, प्रियजनाच्या जळणाऱ्या चितेकडे पाहताना अश्रू विसरून मनातल्या मनात कविता करत राहतो. तसंच आता काहीसं झालंय. अमुक एक इंटरेस्टिंग कल्पना 'स्वयं'साठी उपयुक्त कशी ठरेल यावर सतत विचार चालू असतो. रात्री झोपायला अंग टेकवावं तर पॉपकॉर्नप्रमाणे एखादी आयडिया डोक्यात फुटते ! घरात बाकी सगळे काळोखात झोपलेले असतात आणि माझ्या डोक्यात मात्र लख्ख प्रकाशात ती आयडिया ब्रेक डान्स करत असते !  
रात्री डोक्यात विचारांचा असा धुमाकूळ चालू असताना मी अनेकदा पलंगावर मांडी घालून बसतो  आणि स्वतःला समजावतो - आता बस्स ! या क्षणी आपण यावर काहीच करू शकणार नाही, तेव्हा आता झोपुया ! मग मी पलंगावर अंग टाकतो. डोळे बंद करून मी मनातल्या मनात एका मोठया बलूनमध्ये बसून जमिनीपासून खूप लांब लांब उडू लागतो. माझं घर, घरातली माणसं, स्वयं, स्वयं टीम हे सगळं दिसेनासं होईस्तोवर मी उंच उंच जातो….मग त्यातच कधीतरी झोप लागते बहुदा.अनेकांना अजूनही कळलेलं नाहीये की आम्ही ऑफिसमध्ये बसून नक्की करतो काय ! आमच्या ऑफिसच्या आजूबाजूची सर्व मंडळी मनात म्हणत असतील, की ही पोरं कायम ऑफिसमध्ये बसून मोठमोठ्याने हसत बसतात…हे नक्की करतात तरी काय ? उमेश श्रीखंडे यांनी आम्हाला त्यांचं हे ऑफिस देताना गप्पांच्या ओघात एक वाक्य उच्चारलं होतं. कदाचित ते विसरले असतील, पण मी ते कधीच विसरू शकणार नाही. 'हे ऑफिस मी विचार करायला घेतलंय !' या वाक्याने
आमचा या ऑफिसकडे आणि एकूणच काम करायच्या पद्धतीकडे बघायचा दृष्टिकोन बदलला.टिपिकल कॉर्पोरेट जॉब करत असताना आपण प्रत्येकाने बॉसला किंवा इतरांना दाखवायला 'काम करत असल्याचं' ढोंग केलेलं असतं. आमच्या ऑफिसमध्ये आम्ही कुणीच कुणाला 'दाखवायला' म्हणून काम करत नाही. कामाचा कंटाळा आल्यावर इथे आम्ही सिनेमा पाहतो, गाणी ऐकतो, टीव्ही पाहतो, गप्पा मारतो, खातो, वाचतो, युट्यूबवरचा एखादा व्हिडीओ पाहतो, सोफ्यावर जाऊन झोपतो किंवा काही न करता नुसतेच बसून राहतो…आणि मन नाही झालं तर ऑफिसला येतही नाही ! अर्थात या playground ला व्यावसायिक शिस्त, जबाबदाऱ्या यांचं कुंपण आहे.  अनेकांना एकत्र भेटता यावं यासाठी ऑफिस आहे. ती एक जागा आहे. खरं काम तर डोक्यात सुरू असतं. भर सोमवारी तुम्ही जेव्हा कंटाळवाण्या 'एक्सेल' स्क्रोल करत असता, तेव्हा आम्ही कदाचित ऑफिसपासून दूर दोनशे किलोमीटर लांब एखाद्या माणसासमोर बसून (आमच्या कामाचा भाग म्हणून) त्याचं 'सरोद वादन' ऐकत असतो ! म्हटलं तर आम्ही त्यावेळी 'ऑन ड्युटी' असतो ! ऐकायला हे सगळं खूप रोमँटिक वाटतं. ते रोमँटिक आहेही. फक्त तसं आयुष्य जगण्यासाठी वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळ्यांवर भारी किंमत मोजायची तयारी असावी लागते. ती पॅशन जपताना वैयक्तिक आणि व्यावसायिक वेळ असं काही राहत नाही. याचा सगळ्यात जास्त त्रास आमच्या कुटुंबियांना भोगावा लागतो. त्यांच्या समजूतदारपणामुळेच 'निर्मितीच्या प्रसूतीकळा' वगैरेची चैन आम्हाला परवडू शकते.सोमवार ते रविवारच्या चक्रातून कधी मोक्ष मिळेल का ? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मी नोकरी सोडली होती. आज आठ वर्षांनी कळतंय की मूळात 'मोक्ष' ही संकल्पनाच एक illusion आहे. त्या चक्रात फिरत राहणं हे सत्य आहे. तसं फिरत राहणं हा तुम्हाला 'जॉब' वाटतोय की 'गेम' यात खरी मेख आहे…आणि तुमच्यासाठी तो जर 'गेम' असेल, तर मग शुक्रवार काय आणि काय रविवार !
फक्त नावं !

- नविन काळे

लेखक हे ‘स्वयं’ चे संस्थापक सदस्य आहेत.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

देणगी काहीतरी सुचत राहण्याची!

सर्जनशील असणं याची मुभा सगळ्यांना आहे. आपण एखाद्या गोष्टीचा विचार कसा करतो? आणि त्याचा अवलंब कसा करतो? यावर सारं अवलंबून...

आसामच्या 'लक्ष्मी माँ': पद्मश्री लखिमी बरूआ

आसाम सारख्या दुर्गम भागातील राज्यात महिला सक्षमीकरण आणि सहकार क्षेत्रांत आसामी महिलांचे आर्थिक सशक्तीकरण करण्यात...

कल्पनाशक्तीची नवी 'LINE'

कल्पनाशक्ती जादुई असते. ती नवे क्षितिज दाखवते आणि त्या पलीकडे काय असेल ह्या विचारात पाडते. अशाच एका अद्भुत विचाराला...