ऑफिसला येण्याची ओढ ! (....तीही डोंबिवलीहून पार्ल्याला !!) - Welcome to Swayam Talks
×

ऑफिसला येण्याची ओढ ! (….तीही डोंबिवलीहून पार्ल्याला !!)

दिपाली पाटील

सध्याच्या काळात सर्वांना work from home चा आरामदायी पर्याय उपलब्ध असताना 'स्वयं'च्या दिपाली पाटीलला मात्र ऑफिसला येण्याची ओढ लागलीय ! त्या ओढीचं कारण तिच्याच शब्दात वाचण्यात मजा आहे.
 

Published : 13 July, 2020

ऑफिसला येण्याची ओढ ! (….तीही डोंबिवलीहून पार्ल्याला !!)

सध्याच्या काळात सर्वांना work from home चा आरामदायी पर्याय उपलब्ध असताना 'स्वयं'च्या दिपाली पाटीलला मात्र ऑफिसला येण्याची ओढ लागलीय ! त्या ओढीचं कारण तिच्याच शब्दात वाचण्यात मजा आहे !  

अगदी दोन वेळा असं झालं की video call वर आशय दादाशी बोलता बोलता ऑफिस बघून, सगळ्यांचे हसरे चेहरे बघून अचानक रडू आले. असं का झालं असेल ? खरं सांगायचं तर, I am enjoying this lockdown period at fullest !  बऱ्याच  नवीन गोष्टी शिकत आहे, करून पाहत आहे. माझ्या लेकासोबत मनसोक्त खेळत आहे. काही छान वाचते, ऐकते आहे…स्वतःसाठी असा मुबलक वेळ आयुष्यात पुन्हा कधीच आपल्या वाट्याला येणार नाही या हिशोबाने enjoying every bit of it. असं असताना सुद्धा, पहिल्यांदा, इतक्या दिवसांनी ऑफिस बघून रडू का आले? 

मी डोंबिवलीत राहते. डोंबिवली ते पारला ऑफिस आणि पुन्हा डोंबिवली असा जवळ्पास ४ तासांचा प्रवास होतो रोज. मुंबईकरांना एवढा वेळ प्रवास काही नवीन नाही. पण माझ्या ६ वर्षाच्या मुलासाठी वेळ बाजूला ठेवताना मात्र माझ्या नाकी नऊ येतात. बरेच जण म्हणतात, 'मग कशाला जातेस एवढ्या लांब? जवळपास दुसरा जॉब बघ ना.' काय सांगायचं यांना, की हा फक्त 'जॉब' नाही माझ्यासाठी तर ती 'व्यक्त' होण्याची जागा आहे. इतरांना खुळचट वाटणाऱ्या माझ्या कल्पना मांडायचे हे माझं हक्काचं व्यासपीठ आहे. 'व्यासपीठ' हा खूप मोठा शब्द आहे पण हा आमच्या स्वयंच्या ऑफिससाठी साजेसा आहे कारण तुम्ही वयाने, अनुभवाने किती लहान-किती मोठे हे प्रमाण न लावता आपण आपले मत इकडे मांडू शकतो. आपल्याकडे असलेले काम हव्या त्या पद्धतीने वेळेत पूर्ण करण्याची मुभा आहे इकडे. चुका करण्याची परवानगी सुद्धा दिली आहे इकडे. असं सगळं असताना, तुम्हीच सांगा, माझ्यासाठी हा फक्त एक 'जॉब' कसा असेल ? असं ऑफिस, अशी टीम कुठे असते? मला माहीत नाही. आम्हाला work form home चा पर्याय आहे. असं असतानाही आम्हाला घरून काम करायला कधीच आवडत नाही. घरून काम केले तर ……ऑफिसमध्ये आज कोणी नवीन पाहुणे, वक्ते येतील त्यांच्या सोबतच्या गप्पा, चहाच्या वेळेला होणारी एखादी नवीन चर्चा, कोणाला काही नवीन सुचलं  असेल तर ते सगळं मी miss केल्याची हुरहूर दिवसभर राहते. म्हणजेच सुट्टी किंवा Work from Home = FOMO (feeling of missing out) !! एकदा का ऑफिसला पोहोचलो की एवढी लोकलची गर्दी पार करत इकडे पोहचलो की worth वाटतो तो प्रवास. ऑफिसच्या शांत,  हव्याहव्याशा वाटणाऱ्या त्या वास्तूत पाय ठेवला की कामात, नवनवीन विषयात, हास्याच्या कारंज्यात  दिवस कधी संपतो तेच कळत नाही.माझ्या कामाचे स्वरूप operation/administration असे आहे. पण मी अगदी फायलिंग पासून ते ३०० मुलांसमोर एखादा विषय मांडणे या रेंज मधली सगळी कामे करून पाहिली आहेत, करत आहे.  वक्ते, कलाकार, काही दिग्गज ते एखादी अनोळखी व्यक्ती या रेंजमध्ये येणाऱ्या सगळ्यांशीच माझा संवाद होतो. त्यामुळे माझ्यातली सगळी कौशल्ये आजमावायला मला स्कोप मिळतो. कामाच्या निमित्ताने होणाऱ्या प्रवासात भेटणारी विभिन्न व्यक्तिमत्वे, त्यांचे अनुभव हे नेहमीच Unique असतात.


भ्रमंती + संवाद+ सामाजिक कार्य + प्रेरणादायी याच perfect combinationमध्ये आहे माझं  काम ! मी पाचवीत असताना दीर्घ आजाराने माझे बाबा गेले. मी आठवीत असल्यापासून हाताला मिळेल ते काम करायला सुरुवात केली. कॉलेजमध्ये असल्यापासूनच मी समता विचार प्रसारक संस्था या सामाजिक संस्थेत नोकरी करत इतर बरीच लहान मोठी कामे करत होते.  संस्थेच्या कामानिमित्ताने मीटिंग conduct करणे, एखाद्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,  निवासी शिबीराचे व्यवस्थापन ते अगदी एखाद्या मोर्च्यात लाऊड स्पीकरवर घोषणा देणे या सगळ्या गोष्टींचा समावेश होत गेला.
मला मजा वाटत होती या सगळ्याची. माझी संपुर्ण कार्यक्षमता पणाला लागत होती. ही सगळी धुरा सांभाळताना माझा दिवस सकाळी ७ वाजता सुरू होऊन रात्री ३ वाजता संपत असे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे संस्थेच्या कामांमुळे डॉ. आनंद नाडकर्णी, मेधा पाटकर, राजू तांबे, उल्का महाजन या आणि अश्या अनेक दिग्गजांच्या सहवासाची संधी मला वैचारिकरीत्या एका वेगळ्या टप्प्यावर घेऊन जात होती. 'एक साधारण मुलगी' ते 'आताची मी' ह्या माझ्या प्रवासाचाच आनंद मी घेत होते. या सगळ्याला कुठेही परिस्थितीमुळे ओढवलेली दुःखाची झालर मुळीच नव्हती. जीवनाच्या या प्रवासात एका वळणावर माझे लग्न ठरले. मी एका सुखवस्तू कुटुंबात आले. आता मला माझ्या सगळ्या उद्योगांना थांबवावे लागणार होते, कारण आता माझ्याभोवती एक चौकट आखली गेली होती. या चौकटीत माझ्यातल्या उद्योगीपणाला कुठे जागाच नव्हती. आणि त्यामुळे जगण्यातली मजाच हरवली होती.आता जेव्हा मी 'स्वयं' सोबत आहे, तेव्हा मला पुन्हा माझं ते आयुष्य जगता येतंय ! माझा job interview हा एक गमतीशीर किस्सा आहे. तो झाल्यानंतर हा interview होता की गप्पांचा कार्यक्रम असा प्रश्न मला पडतो.  म्हणजे त्यात आवडती पुस्तकं, आजवरचा जीवनपट, social interest, घर, संगीत या सगळ्यावर चर्चा. मी माझ्या मुलाच्या जन्मानंतर, नव्यानेच, ३ वर्षानंतर काम शोधत होते. माझं बाळ सांभाळून मला ही नवीन जबाबदारी पार पाडता येईल ना? याबद्दल मीच साशंक होते. "दिपाली, ज्या दिवशी कामावर यावेसे वाटणार नाही त्या दिवशी येऊ नकोस ! " या नवीनदादा आणि स्नेहलताईच्या वाक्याने मी आश्वस्त झाले की मी माझं घर, माझं बाळ सांभाळूनसुद्धा मी हे काम करू शकते. आज एवढ्या वर्षांनंतर वाटते की. त्या प्रत्येक आईला, गृहिणीला हे आश्वासन मिळाले तर तीसुद्धा  एक नवीन काम हाती घेऊ शकेल ! पाच वर्षे झाली, मी या टीमसोबत आहे. माझ्या या आगळ्या वेगळ्या ऑफीसमुळे, टीममुळे, आमच्या कार्यशैलीमुळे आम्ही सगळेच नेहमी सकारात्मक असतो. त्याचे पडसाद मला माझ्या व्यक्तिगत जीवनात सुद्धा दिसतात ! मी ऑफिसला न जाऊन आज १०८ दिवस झालेत. मला पुन्हा ऑफिसला कधी जाता येईल, माझं 'मी- पण' मला कधी अनुभवता येईल? या विचाराने कदाचित रडू आले ! आणि 'माझं हे ऑफिस किती अद्भुत आहे' या विचारानेच नंतर हसू येत होते बहुतेक ! 

- दिपाली पाटील

लेखिका या स्वयं च्या Operations Team च्या सदस्य आहेत.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

देणगी काहीतरी सुचत राहण्याची!

सर्जनशील असणं याची मुभा सगळ्यांना आहे. आपण एखाद्या गोष्टीचा विचार कसा करतो? आणि त्याचा अवलंब कसा करतो? यावर सारं अवलंबून...

आसामच्या 'लक्ष्मी माँ': पद्मश्री लखिमी बरूआ

आसाम सारख्या दुर्गम भागातील राज्यात महिला सक्षमीकरण आणि सहकार क्षेत्रांत आसामी महिलांचे आर्थिक सशक्तीकरण करण्यात...

कल्पनाशक्तीची नवी 'LINE'

कल्पनाशक्ती जादुई असते. ती नवे क्षितिज दाखवते आणि त्या पलीकडे काय असेल ह्या विचारात पाडते. अशाच एका अद्भुत विचाराला...