राष्ट्रभक्तीचे दोन अभिमानबिंदू - Welcome to Swayam Talks
×

राष्ट्रभक्तीचे दोन अभिमानबिंदू

प्रसन्न पेठे

देशहितासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या भारतीय जवानांच्या त्यागाची आणि बलिदानाची ओळख ही या देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला व्हायलाच हवी. ७२ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त, अशाच दोन अभिमानबिंदूंविषयी सांगतोय प्रसन्न पेठे.
 

Published : 25 January, 2021

राष्ट्रभक्तीचे दोन अभिमानबिंदू

देशहितासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या भारतीय जवानांच्या त्यागाची आणि बलिदानाची ओळख ही या देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला व्हायलाच हवी. ७२ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त, अशाच दोन अभिमानबिंदूंविषयी सांगतोय प्रसन्न पेठे.

भारतीयाला आपल्या देशाच्या सीमांचं अविरत रक्षण करणाऱ्या सैनिकांविषयी कमालीचा आदर आणि अभिमान असतो. वाऱ्यावर मोठ्या डौलाने फडकणाऱ्या तिरंग्यासमोर 'वंदे मातरम्' आणि 'जन गण मन' गाताना सगळ्या देशभक्तांच्या डोळ्यात अभिमानाची चमक जाणवते. त्यामुळेच ज्या भक्तिभावाने देवदेवतांची मंदिरं आणि संतांच्या पवित्र वास्तव्यानं भारली गेलेली तीर्थस्थळं बघितली जातात, त्याच भक्तिभावानं आपल्या जवानांच्या शौर्यकथा मांडणाऱ्या 'War Memorials'ना सुद्धा आवर्जून भेटी देणाऱ्या नागरिकांची संख्या प्रचंड मोठी आहे.

२०१९ च्या ऑगस्ट महिन्यात लेह-लडाख ला भेट देण्याचा योग आला होता. पँगाँग लेक, चांगला पास, खारदुंगला पास, नुब्रा व्हॅली या सोबतच तिथे अनुभवलेली दोन अफलातून स्थळं म्हणजे १९७१च्या युद्धात आपण पाकव्याप्त काश्मीर मधून जिंकून मिळवलेली तुर्तुक, त्याक्शी, थँन्गसारखी LOC वरची अप्रतिम निसर्गसौंदर्य ल्यालेली गावं आणि लेह एअरपोर्टजवळचं 'War Memorial'. भारतभरची पर्यटनस्थळं तर अवश्य बघावीतच, पण लेहमधली ही दोन स्थळं कदापि चुकवू नयेत अशीच. म्हणूनच या दोन अभिमान बिंदूंची ही संक्षिप्त ओळख.

तुर्तुकपासून, थँन्ग हे गाव जेमतेम सात किलोमीटर्सवर आहे. १९७१च्या युद्धाच्या दरम्यान भारतीय सैन्याने पाकव्याप्त प्रदेशात ६० किमीपर्यंत आत मुसंडी मारून तुर्तुक, त्याक्शी आणि थँन्ग अशी तीन गावं जिंकली आणि सैन्य पाकव्याप्त प्रदेशात आणखी पुढे जाणार, तितक्यात शस्त्रसंधी जाहीर झाली. मग थँन्ग गावाशीच Line of Control बनवली गेली. तिथेच १८००० फुटांवर एक आणि १९००० फुटांवर एक अशी आपल्या सैन्याची दोन ठाणी आहेत. (२२००० फुटांपेक्षा जास्त ऊंचीवर, बाराही महिने बर्फात तळ ठोकून डोळ्यात तेल घालून पहारा देणारं सियाचेनचं ठाणं हे तिसरं) थँन्गपर्यंत कच्चा रस्ता क्षणोक्षणी मनात उत्सुकता वाढवणारा. समोर पाकव्याप्त काश्मीरचे डोंगर दिसतात आणि एका वळणावर, आपल्या मिलीटरीने लावलेला बोर्ड समोर येतो - "You are under enemy observation!" आजपर्यंत मॉलमध्ये, दुकानांमध्ये, एअरपोर्टवर, सोसायटी काँम्प्लेक्समध्ये "You are under CCTV surveillance" पाटी बघायची सवय. पण इथे थेट अगदी जवळ समोरच दिसणाऱ्या डोंगरातल्या बंकर्समधून, पाक सैनिक आपल्यावर बायनॉक्युलर्स रोखून आहेत, ही भावना विलक्षण असते. शेवटच्या चेकपोस्टजवळ भारताचं शेवटचं थँन्ग गाव आहे. जेमतेम २५ घरं आणि १५० माणसांचं गाव. समोर फेसाळत आणि उधळत निघालेली श्याँक नदी. तीच आपल्याला आणि शत्रूला वेगळं करणारी नैसर्गिक बॉर्डर. समोर आपण बायनॉक्युलर्समधून पाकिस्तानचे बंकर्स बघू शकतो, जिथे तिथे ते शस्त्रसज्ज पाक सैनिक दिसतात. पण आपलेही त्याहून तत्पर आणि शूर सैनिक तिथे समोरच दिवसरात्र पहारा देत असल्याने, आज भारतीय नागरिक तिथपर्यंत निर्धास्त जाऊ शकतात. 'सियाचेन वॉरियर्स' यांच्यातर्फे तिथपर्यंत जाताना ठिकठिकाणी देशप्रेम व्यक्त करणारे सुंदर बोर्ड्स लावलेत. 'Indra col to Indira point India is one' आणि 'From K2 to Kanyakumari Bharat is one' किंवा अगदी पर्यावरण जागृतीसाठी "Plastic or Planet" हे फलक लक्ष वेधून घेतात. पाक सैन्य हिंमत करु नये म्हणून अत्यंत खडतर परिस्थितीत इथल्या सरहद्दीवर अहोरात्र पहारा देणाऱ्या सियाचेन वॉरियर्सना आणि एकूणच भारतीय सैन्याला मनापासून कडक सॅल्यूट करताना छाती अभिमानाने भरुन येते. प्रत्येक भारतीयाने लेहला जावंच आणि हे ठिकाण अनुभवावंच.

दुसरं तीर्थस्थळ म्हणजे लेह एअरपोर्ट रोडजवळचं 'Hall of Fame' हे War Memorial. १९४७ पासून ते आतापर्यंतची, आपल्या आर्म्ड फोर्सेसची विजयगाथा मांडणारी ही अफलातून गॅलरी. किमान दोन तास इथली सर्व दालनं पाहण्यात आणि आपल्या शूर जवानांच्या शौर्यगाथा वाचण्यात सहज जातात. सुरुवातीच्या पहिल्याच दालनात लडाख राज्याचा इतिहास, इथल्या लोकांना सहन करायला लागलेल्या परकीयांच्या स्वाऱ्या, त्यातून चिवटपणे त्यांनी जपलेली त्यांची संस्कृती आणि एकूणच लोकजीवन, चालीरिती यांची भरपूर ओळख आपल्याला होते. पुढच्या दालनात आपण शिरतो आणि पहिल्या पाच सेकंदात अक्षरशः भारावून जातो ते तिथे अत्यंत नेटकेपणाने मांडलेल्या आपल्या ७ परमवीरचक्र विजेत्या आणि ३५ महावीरचक्र विजेत्या जवानांच्या शौर्यकथा वाचताना. हे प्रदर्शन पाहताना विशेषतः, सियाचेनमधे २३००० फुटांवर उणे २० अंशाखालच्या मरणप्राय थंडगार बर्फात आपले जिगरबाज सैनिक कसे राहतात, त्यांचं तिथलं रोजचं जीवन किती कठीण आहे, वर्षभर बर्फात गाडून घेऊन देशाचं रक्षण करणं ही जबाबदारी ते कुठल्या दिलेर वृत्तीनं आणि अचाट धैर्यानं पार पाडतात, त्यांना धड खाता येतं का, झोप मिळते का, इतक्या उंचीवर महिनोनमहिने शून्याखालच्या तापमानात कुटुंबापासून दूर एकटं राहताना किती भयानक मानसिक त्रास होतो, भास आभासांना ते कसे तोंड देतात? हे पाहताना, वाचताना आपण अक्षरशः सद्गदित होतो आणि डोळ्यांच्या कडांचे अश्रू आवरता येत नाहीत.

या Hall of Fame मध्ये खुलासेवार मांडलेली भारतीय सैन्याच्या सर्व युद्धांतली तपशीलवार कामगिरी, त्यावेळची उपलब्ध छायाचित्रे आणि प्रत्यक्ष शस्त्रास्त्रं पाहताना आपण भारावून जातो. आपल्या जिगरबाज सैनिकांची काही वचनं किंवा Slogans आपल्या अंगावर रोमांच उभे करतात. जशी

'We live by chance, Love by choice and Kill by profession'

'On the battlefield, the military pledges to leave no Soldier behind'

'If you can dream it you can do it. It always seems impossible Unless it is done'

या 'Hall of Fame'च्या हुबेहुब प्रतिकृती भारतभर प्रत्येक राज्यातल्या, किमान मुख्य चारपाच शहरांत असायलाच हव्यात. जेणेकरुन देशाबद्दलचा जाज्वल्य अभिमान आणि राष्ट्राचं रक्षण करणाऱ्या जवानांच्या शौर्यगाथा भावी पिढ्यांना स्फूर्ती देतील आणि त्यातूनच आपल्याला राष्ट्रसेवेची प्रेरणा मिळेल हे नक्की.

प्रसन्न पेठे

लेखक हे 'स्वयं टाॅक्स'च्या Content Team चे सदस्य आहेत.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

देणगी काहीतरी सुचत राहण्याची!

सर्जनशील असणं याची मुभा सगळ्यांना आहे. आपण एखाद्या गोष्टीचा विचार कसा करतो? आणि त्याचा अवलंब कसा करतो? यावर सारं अवलंबून...

आसामच्या 'लक्ष्मी माँ': पद्मश्री लखिमी बरूआ

आसाम सारख्या दुर्गम भागातील राज्यात महिला सक्षमीकरण आणि सहकार क्षेत्रांत आसामी महिलांचे आर्थिक सशक्तीकरण करण्यात...

कल्पनाशक्तीची नवी 'LINE'

कल्पनाशक्ती जादुई असते. ती नवे क्षितिज दाखवते आणि त्या पलीकडे काय असेल ह्या विचारात पाडते. अशाच एका अद्भुत विचाराला...