एका नव्या प्रवासाची नांदी - Welcome to Swayam Talks
×

एका नव्या प्रवासाची नांदी

विनीत वर्तक

‘अवकाश प्रवास’ (Space Tourism) हे स्वप्न आता येत्या दशकभरात सत्यात उतरणार आहे. जगातल्या मोठ्या उद्योगांनी त्यादृष्टीने पावले टाकायला सुरुवात केलीय. तंत्रज्ञानाची ही विलक्षण झेप नेमकी कशी आहे? सांगतोय विनीत वर्तक.
 

Published : 16 August, 2021

एका नव्या प्रवासाची नांदी

एलोन मस्क, जेफ बेझोस, रिचर्ड ब्रॅन्सन, मार्क झुकेरबर्ग, रॉबर्ट बिगेलॉव, पॉल ऍलन, जेम्स कॅमेरॉन, नवीन जैन ही नावं आपल्याला नवीन नाहीत. जगातील सगळ्यांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ही नावं येतात. यातील प्रत्येक जण हा अब्जाधीश आहे. तुमच्या लक्षात आलं असेल, की ही सगळीच मंडळी पक्की व्यावसायिक आहेत. त्यांच्या डोक्यात सतत अशा कल्पना आकार घेत असतात, ज्यातून त्यांचा व्यवसाय वृद्धिंगत होऊ शकतो आणि त्यांच्याकडील पैसा दुप्पट, तिप्पट होऊ शकतो. ही सर्व मंडळी जेव्हा एकाचवेळी एखाद्या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी आपले अब्जावधी पैसे लावतात, तेव्हा ती कल्पना येणाऱ्या काळात जगाचं स्वरुप बदलवणारी असू शकते. हे सांगण्यासाठी कोणत्या अभ्यासकाची गरज नाही. सध्या ही मंडळी गेले काही वर्षं अशा एका क्षेत्रात अमाप पैसा गुंतवत आहेत, ज्यातून संपूर्ण जगाच्या प्रवास करण्याच्या कल्पना बदलणार आहेत. यातील प्रत्येकजण एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात आहे. तर हे क्षेत्र कोणतं आहे? त्यातून येत्या १०-२० वर्षांत कसे बदल होणार आहेत? याचा आपल्यावर काही प्रभाव पडणार आहे का? हे सगळं जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

१७ डिसेंबर १९०३ चा तो ऐतिहासिक दिवस होता, ज्यादिवशी राईट बंधूंनी पहिलं विमान आकाशात उडवलं. त्यानंतर हळूहळू स्वप्नवत असणारा हवाई प्रवास, जसजसा तो सुरक्षित होत गेला तसतसा तो सर्वमान्य होत गेला. ऐंशीच्या दशकात जगात एका वर्षात ५० कोटी लोक हवाई प्रवास करत होते, तर २०१९ उजाडताना ही संख्या ४५० कोटींच्या घरात जाऊन पोहोचली होती. जर आपण साधारण १०० वर्षांचा हवाई प्रवास बघितला तर शेवटच्या २०-३० वर्षातील वाढ ही तिप्पट वेगाने झालेली आहे. अर्थात याचं सगळं श्रेय तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीला आणि हवाई प्रवासात असलेल्या सुरक्षिततेला आहे. हे सगळं सांगण्यामागचं कारण इतकंच, की ज्या वेगाने तंत्रज्ञान विकसित होत आहे त्या वेगाने एखादी नवीन कल्पना लोकांच्या आवाक्यात येण्यासाठी पुढे केवळ १०-२० वर्षांचा कालावधी पुरेसा होईल. त्यामुळेच जगातील हे सर्व अब्जाधीश एका कल्पनेच्या मागे हात धुवून लागले आहेत. कारण जो ही कल्पना प्रत्यक्षात उतरवणार तो यातील सगळ्यांत जास्ती नफा कमावणार हे सरळ गणित आहे. ती कल्पना आहे 'अवकाश प्रवासाची'.

'अवकाश प्रवास' हा आताच्या किंवा आपल्या आधीच्या पिढीसाठी एक स्वप्नवत प्रवास होता. अवकाशात रॉकेटमधून अंतराळात जाणं हे स्वप्न माणसाने गेल्या दशकात साकार केलं. चंद्रावर पाय ठेवण्यापासून आजवर अनेक लोक अंतराळात जाऊन आले. पण हा प्रवास अत्यंत खर्चिक आणि एका विशिष्ट गटापर्यंत मर्यादित होता. पण जसं तंत्रज्ञान प्रगती करत गेलं, तसे या प्रवासाचे दरवाजे अनेकांसाठी उघडे झाले. त्यातून सुरुवात झाली अवकाश प्रवासाच्या एक शर्यतीला, ज्यात जगातील वर उल्लेख केलेल्या सर्व अब्जाधीशांनी उडी घेतलेली आहे. याच वर्षी या शर्यतीचं एक मूर्त स्वरूप आपण आकाराला येताना बघतो आहे. ११ जुलै २०२१ ला रिचर्ड ब्रॅन्सन यांनी आपल्या ३ कर्मचाऱ्यांसोबत 'व्ही.एस.एस. युनिटी' ह्या स्पेसशिपमधून अवकाशात यशस्वी प्रवास केला. ही घटना घडत नाही तोवर २० जुलै २०२१ रोजी अमेरिकेने चंद्रावर पाऊल ठेवल्याच्या घटनेला ५२ वर्षं झाल्याचं औचित्य साधत अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी आपल्या 'न्यू शेपर्ड' या कॅप्सूलमधून 'ब्लू ओरिजिन' या आपल्या मालकीच्या कंपनीच्या रॉकेटमधून अंतराळात यशस्वी प्रवास केला. १० दिवसांच्या आत जगातील दोन अब्जाधीशांनी अंतराळात घेतलेली उडी काय दाखवते आहे? तिकडे एलोन मस्क वेगळ्याच कल्पनांना आकार देत आहेत. त्यांच्या स्पेस एक्स या कंपनीचं 'स्टारशिप' हे रॉकेट एकाचवेळी १०० लोकांना घेऊन उड्डाण करण्यासाठी तयार होत आहे. त्याच्या चाचण्याही झालेल्या असून त्याला प्रवासायोग्य बनवण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरु आहेत.

या सगळ्या गोष्टी एकाच कल्पनेकडे जात आहेत तो म्हणजे 'अवकाशातून प्रवास'. खरे तर आपल्यापैकी अनेकांना असं वाटत आहे की अवकाश प्रवास एक थ्रिल, एक स्वप्न, एक अनुभव, एक पिकनिक आणि पृथ्वीला अवकाशातून बघण्याची मज्जा म्हणून लोक त्याच्याकडे बघत आहेत किंवा हे सर्व अब्जाधीश लोक त्यासाठी यावर काम करत आहेत, तर आपण अजून अंड्यात आहोत असं म्हणावं लागेल. याला कारण म्हणजे अवकाश प्रवास हा वरील सर्व गोष्टींसाठी न राहता वेगवान प्रवासाचं साधन म्हणून समोर येणार आहे. अशा प्रवासाला 'पॉईंट टू पॉईंट प्रवास' असं म्हणतात. ही कल्पना कित्येक दशके जुनी आहे पण आता त्याला मूर्त स्वरूप मिळत आहे. आकडे बोलतात म्हणून आकड्यांत स्पष्ट करतो. समजा मला न्यूयॉर्क ते शांघाई असा प्रवास करायचा आहे. ज्याला आता जवळपास १५ तासांचा अवघी लागतो. पण जर आपण अवकाशातून पॉईंट टू पॉईंट प्रवास केला म्हणजे न्यूयॉर्क कडून रॉकेट अवकाशात गेलं आणि ते शांघाय कडे उतरलं तर त्यासाठी फक्त ३९ मिनिटे लागतील. आता हा झाला एक मार्ग. असे जगात १० तासांपेक्षा जास्ती वेळ हवाई प्रवासाला लागतो, असे तब्बल ५,२७,००० हवाई मार्ग आहेत. यातले ५% मार्ग जरी अशा ‘पॉईंट टू पॉईंट’ प्रवासाने जोडले ज्याच्या तिकीटाची किंमत आपण २५०० अमेरिकी डॉलर पकडली तर हा सगळा बाजार तब्बल २००० कोटी अमेरिकन डॉलरच्या घरात जातो. आता लक्षात येत असेल की नक्की या सगळ्या अब्जाधीश लोकांच्या स्पर्धेत काय लपलेलं आहे!

अवकाश क्षेत्र ज्याची उलाढाल आता ४० हजार कोटी अमेरिकी डॉलरच्या घरात आहे, ती २०३० पर्यंत ८० हजार कोटी अमेरिकी डॉलरच्या घरात जाणार आहे. हे सगळे आकडे जेव्हा आपण बघू, तेव्हा लक्षात येईल की जगातील सगळ्या अब्जाधीश लोकांमध्ये अवकाशात जाण्यासाठी स्पर्धा का सुरू आहे! पण हे तितकं सोप्पं नाही. पण १९०३ मध्ये जेव्हा हवाई प्रवास सुरू झाला तेव्हा तोही कुठे सोप्पा होता? कितीतरी अपघात, कितीतरी अपयश, कितीतरी तांत्रिक अडचणी सगळंच समोर होतं. पण आज जेव्हा मागे वळून आपण बघतो, तेव्हा या सगळ्या गोष्टी चिल्लर वाटतात. हीच परिस्थिती अवकाश प्रवासाच्या बाबतीत लागू आहे. आज रॉकेट तंत्रज्ञान, त्यातले धोके, त्यातील अभियांत्रिकी, त्याच्या मर्यादा या सर्वच गोष्टी सगळ्यांपुढे आव्हान म्हणून उभ्या आहेत. पण म्हणतात ना 'डर के आगे जीत हैं', हेच लक्षात ठेऊन ही सर्व मंडळी आव्हानांना सामोरे जात आहेत. आपल्याला लांब जाण्याची गरज नाही. एलोन मस्कची स्पेस एक्स ज्या पद्धतीने स्टार शिपच्या बाबतीत पुढे जाते आहे, ते बघता पुढल्या १०-१५ वर्षांत स्पेस एक्स १०० लोकांना पॉईंट टू पॉईंट प्रवास घडवून आणणारं स्टारशिप नक्की सुरु करेल!

या सर्व बाबतीत भारतीय कुठे आहेत? नाईलाजाने आपल्या शिक्षण पद्धतीत स्वप्नं बघायला कधीच शिकवलं जात नाही. आपण ९९%-१००% मिळवणारे कारकून खूप वेगाने घडवत आहोत, पण त्यातील कल्पनांना मूर्त स्वरूप देणारे अब्जाधीश मात्र नगण्य आहेत. किंबहुना जगात काय चालू आहे, ह्याचा विचार करण्याची आपली आकलनशक्ती सुद्धा आपण गमावून बसलो आहोत. हे श्रीमंतांचे खेळ आहेत म्हणून नाक मुरडणारे नंतर याच कंपन्यांच्या नोकऱ्यांसाठी रांगा लावण्यासाठी सगळ्यांत पुढे असणार आहेत. आजच्या पिढीला आणि आजच्या तरुणांना निदान या अब्जाधीशांची पावले कुठे पडत आहेत, याचा अंदाज जरी आला तरी भारताने खूप मोठा पल्ला गाठला असं मी म्हणेन. जुगाड हा एक गुण भारतीयांच्या रक्तात आहे. पण त्याचा योग्य वापर करण्याची कला आणि शिक्षण मात्र आज आपण योग्य रीतीने देत नाही आहोत, कारण या नवीन पर्वाच्या स्पर्धेत जुगाड म्हणजेच कमीत कमी इनपुट मध्ये जास्तीत जास्त आउटपुट देणारा पुढे जाणार आहे. पण त्यासाठी आधी काळाची पावलं ओळखण्याची प्रगल्भता आणि शिक्षण आपण आत्मसात करणं गरजेचं आहे असं मला मनापासून वाटतं.

-विनीत वर्तक

लेखक हे विविध माध्यमांतून वैचारिक आणि ललित लेखन करत असतात.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

संगीत आणि नात्याची सुंदर ‘अमेरिकन सिंफनी’!

OTT च्या काळात अनेक पर्याय उपलब्ध असताना मोजक्या वेळात नक्की काय ‘पाहायचं’ हा सध्या सतावणारा प्रश्न आहे. अशावेळी ‘अमेरिकन...

सदाबहार ‘लिज्जत’ वाढवणाऱ्या: पद्मश्री जसवंतीबेन पोपट

जसवंतीबेन जमनादास पोपट हे नाव अनेकांना नवे असेलही, पण ‘पद्मश्री’ जसवंतीबेन जमनादास पोपट या बिरुदावलीत हे नाव अधिक...

लीप वर्ष का असतं?

हा ब्लॉग म्हणजे तुमच्या मेंदूचा दर आठवड्याचा व्यायाम आहे! या ब्लॉगमुळे तुम्ही दर आठवड्याला काही नवीन तर शिकालच, पण...