आपल्या कामाची जागा कशी आहे, यावर थोड्याफार प्रमाणात आपल्या कामाची गुणवत्ता अवलंबून असते असं म्हणतात.
'स्वयं'चं ऑफिस कसं आहे ? सांगतोय, 'स्वयं'चालेखक प्रसन्न पेठे !
आयुष्यात कुठल्या वळणावर काय घडेल काही सांगता येत नाही नै का? म्हंजे मी अगदी नियती, प्रारब्ध वगैरे मानणारा असलो तरी गेल्या सप्टेंबर'19 चा शेवटचा आठवडा हा विलक्षण योग घेऊनच आला माझ्यासाठी! पुण्यात असताना मी दोन वर्षांपूर्वी माझा मीच इंजिनियरिंग जाॕबमधनं अर्ली रिटायरमेंट घेऊन फ्री-लान्स रायटर झालो होतो. दोन वर्षं एका पोर्टलसाठी काँन्टेट क्रिएटर म्हणून काम केलं होतं. माझं "प्रिन्स चार्मिंग" हे दुसरं पुस्तक याच काळातलं…
सप्टेंबर महिन्यात, निकिताचा ठाण्यातला नवीन जाॕब आणि गार्गीचा मुंबईतला कोर्स यांच्या निमित्तानं आम्ही चौघांनी सामानासकट पुण्याचं घर सोडून बोरिवलीच्या घरी शिफ्ट व्हायचं ठरवलं, त्यावेळी यात नियतीचा काही संकेत असू शकेल हे कुठचं माहित असायला?!!
झालं असं - आम्ही आमच्या बोरिवलीच्या घरी निघालो असताना नवीन आणि आशयशी भेट घडली ती खालापूर टोलजवळच्या "श्रीदत्त"मध्ये!..तेवीस वर्षं पुण्यात काढल्यावर मी पुन्हा बोरिवलीत राहायला येण्यासाठी निघणं आणि अर्ध्या रस्त्यात "श्रीदत्त"मध्ये नवीन, आशयशी अगदी धावती भेट होणं - हे एक वेगळंच सुंदर वळण आलं आयुष्यात! आणि त्या भेटीनेच माझं "स्वयं"मध्ये येणंही झालं! याला काय म्हणायचं? नियती? दैव? सेरेंडीपीटी?.जे काय असेल ते! पण त्यामुळेच एक अतिशय प्रसन्न सिलसिला सुरु झालाय आयुष्यात! …
गेल्या आॕक्टोबरपासून माझ्या आयुष्याला समृद्ध करणाऱ्या अशा क्षणांची रोजची सुरुवात होते तीच मुळी विलेपार्ल्यातल्या सुभाष रोडवरच्या "स्वयं"च्या ऑफिसात शिरल्यापासून! थँक्स टू श्री.उमेश श्रीखंडे, स्वयंचं हे ऑफिस अतिशय कलात्मक नजरेची जाणीव करुन देतं! आॕफिस तसं छोटेखानी पण त्याची रचना आणि मांडणी सुरेखच! त्यात भर पडल्ये ती नवीनच्या कल्पक आयडियेनुसार तिथे ठेवलेल्या "इकिगाय डायग्राम आणि पर्सिस्टंन्स, इंटेग्रिटी, पॅशन आणि क्रिएटिव्हिटीची मूर्तिमंत प्रतीकं असणाऱ्या चार थोर व्यक्तिमत्त्वांच्या फोटोज"मुळे!! ऑफिसचे दोन भाग! प्रवेश करताक्षणी मोठी ओपन स्पेस. आणि पलीकडे अगदी चिंटू पार्टिशन टाकून केलेला दुसरा छोटा भाग. पहिला मोठा भाग अर्ध्याहून व्यापणारं एक लांबरुंद आयताकार आलीशान टेबल! याच टेबलाभोवती आम्ही पाचहीजण बसतो - नवीन, आशय, दीपाली, श्रेया आणि मी!!
अत्यंत टेन्शन-फ्री, हसतखेळत गप्पा मारत आमची "स्वयं"ची रोजची कामं चालतात! विषयांतून विषय निघत साहित्य, कला, संगीत, काव्य, नाटक, चित्रपट, गाणी, गायक, भेटलेली आणि भेटणारी अद्भूत माणसं अश्या चोफेर विषयांवर गप्पांच्या फैरी झडत असतात…नवीनकडून, आशयकडून वाचलेल्या/ ऐकलेल्या पुस्तकांवर आणि पुस्तकांसंदर्भात बोललं जातं…काम एंजाॕय करणे म्हणजे काय ते इथे आल्यावर कळू शकेल! एका भिंतीजवळच्या शेल्फमध्ये काही पॉझिटिव्ह मेसेज देणारी, छान पुस्तकंसुद्धा ठेवल्येत! टेबलवरच लंच करताकरता गप्पांबरोबरच सगळेजण मिळून कधीतररी एखादी सकारात्मक किंवा कल्पनेला चालना देणारी छोटी युट्युब-क्लिपसुद्धा पाहतो! सगळेचजण खूप आनंदी आणि छान मूडमध्ये असतो दिवसभर!
आणि हो, एका बाजूला आमची चिंटू पॅंन्ट्रीसदृश्य जागा! या कोप-यात आॕफिसखालच्या रोडवरच्या टपरीवरून रोज येणाऱ्या चहासंगे आमच्या धमाल गप्पा होत असतात! (चहाची नेक सवय बाकी मीच लावल्ये सर्वांना!)…चहा पिताना गप्पांना धरबंधच नसतो. त्यामुळे हंसून मुरकुंडी वळत कप हिंदकळून चहा सांडणं हेही होतं ओघानं!..
नवीनच्या अनेक पैलूंपैकी एक पैलू म्हणजे तो उत्तम गातोसुद्धा आणि म्हणून एक कोपऱ्यात त्याची सुंदर हार्मोनियम! ऑफिसमध्ये अत्यंत खेळीमेळीचं क्रिएटिव्ह वातावरण असल्यामुळे त्याच्या तोंडून एखादा सुंदर गाण्याचा मुखडा ऐकणं ही नित्याची पर्वणी! क्वचित मूड आला की मधेच उठून नवीन, हार्मोनियमवर आपल्या खास अंदाजात गातोसुद्धा!…कधी एखाद्या संध्याकाळी भाग्यश्री, शिल्पा, सांबा आल्यावर चक्क एक छोटेखानी गाण्याची मैफलसुद्धा सजते…आणि मग तेव्हा स्पेशल चहा-खाऊ होतो हे सांगणे न लगेच!!
आमच्या या ऑफिसमध्ये येणारे नवीन/आशयचे मित्र, "स्वयं टॉक्स"चे वक्ते, आमचे स्पाॕन्सर्स, वेलविशर्स, स्वयं परिवारातली थोर मित्रमंडळी, अनिलकाका आणि काकू (नवीनचे आईबाबा), अमृतयात्रा निमित्ताने येणारी माणसं… ही सारीच मंडळी सुखाचे क्षण घेऊन येत असतात! हा सर्वच माहोल अत्यंत अद्भुत आणि विलक्षण!! भारून टाकणारा! अशा ऑफिसमध्ये काम करायला कोणाला नाही आवडणार?
तसंही मी नेहेमी म्हणतो आयुष्यRich नसलं तरी Enriched हवं! 'श्रीमंती' नसली तरी 'समृद्धी' हवी. आणि ती भरभरून मिळत्येय "स्वयं"मुळे!
माझी आताश्या खात्रीच पटल्ये की मी आयुष्यात थोडंफार पुण्य नक्कीच कमावलंय म्हणून "स्वयं" चालून आलंय आयुष्यात आणि चक्क त्या टीमचा भाग बनून माझ्यापरीनं जमेल तशी अल्प कामं करायचं भाग्य लाभतंय! नवीनच्याच पुस्तकांचं टायटल वापरून म्हणेन - रोज "काहीतरी नवीन" मिळतं इथे!!! I am soo happy…..!!
- प्रसन्न पेठे
लेखक हे स्वयं टॉक्स Team चे सदस्य आहेत.