स्वयं दृश्यम ! - Welcome to Swayam Talks
×

स्वयं दृश्यम !

अजय गोखले

स्वयं' कार्यक्रम प्रत्यक्षात व युट्युबच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहोचण्यात स्वयंच्या सर्वोत्तम निर्मितीमूल्याचा महत्वाचा वाटा आहे. त्याची तांत्रिक बाजू सांभाळणाऱ्या अजय गोखले यांनी आज त्यांचा कॅमेरा बाजूला ठेवत प्रथमच लेखणी हातात घेतली आहे. 'स्वयं'च्या सर्वोत्तम निर्मितीसाठी पडद्यामागे किती माणसं झटताहेत याचा अंदाज आज वाचकांना अजय गोखल्यांच्या पहिल्या लेखात नक्की येईल
 

Published : 11 May, 2020

स्वयं दृश्यम !

'स्वयं' कार्यक्रम प्रत्यक्षात व युट्युबच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहोचण्यात स्वयंच्या सर्वोत्तम निर्मितीमूल्याचा महत्वाचा वाटा आहे. त्याची तांत्रिक बाजू सांभाळणाऱ्या अजय गोखले यांनी आज त्यांचा कॅमेरा बाजूला ठेवत प्रथमच लेखणी हातात घेतली आहे. 'स्वयं'च्या सर्वोत्तम निर्मितीसाठी पडद्यामागे किती माणसं झटताहेत याचा अंदाज आज वाचकांना अजय गोखल्यांच्या पहिल्या लेखात नक्की येईल.

संध्याकाळचे चार नाही वाजले तर मोबाईलवर मेसेज आलेला असतो. 'ठरल्याप्रमाणे, उद्या सकाळी ९ वाजता 'आम्ही नेहमीचेच' येतोय !' …..
….उद्या सकाळपासून स्टुडिओत काय काय घडणार..हे आठवून मला हसायला येतं !
मग वीणाची चौकशी सुरू होते.. जेवायला सगळे येतायत ना? ब्रेकफास्टचं काय ?
'ते सगळं तू बघ. मला उद्या एडिटिंग टेबलवरून हलता येणार नाहीये !'

मंडळी, स्वयं च्या प्रत्येक कार्यक्रमाच्या आधीच्या आठवड्यात हा वरचा प्रसंग असाच्या असा घडत आलेला आहे ! कारण स्वयं स्पीकर्सच्या सर्व AVs (Audio Visual introduction) गेली पाच वर्षे आमच्याच स्टुडियोत होत आहेत !

नविन, आशय, प्रसन्न, श्रेया, ही सगळी गँग सकाळी सकाळी स्टुडियोत जमा होते आणि मग काय !
एडिटिंगचं काम सुरू होतं. हे नको, हे करूया, हा फोटो नको, हा इफेक्ट देऊन बघ, हे कसं वाटतंय वगैरे चर्चा, वादविवाद पार पडल्यावर अर्धं काम पूर्ण होतं. मग आमच्या डायनींग टेबलवर सहभोजन होतं. तिथे एक गप्पांचा फड जमतो. नकला, किस्से, हास्याचे स्फोट चालू झाले की मग काम करायचा कंटाळा येतो. दुपारचं जेवण अंगावर आल्यावर जरा सुस्तीही येते ! मग अर्ध्या तासाच्या अघोषित ब्रेकनंतर पुन्हा एकदा कामाला सुरुवात होते. कधी कधी शिल्पा, भाग्यश्री, सांबा, स्नेहल यांचेही आगमन होते. मग त्यांनी आणलेल्या खाऊ सोबत चहाच्या राऊंडस् होतात..मग पुन्हा गप्पा, धमाल…
…आणि अखेरीस या सगळ्यातून वेळ काढत आमच्या AVs पूर्ण होतात !!

गेली पाच वर्षे हे सगळं सातत्याने आणि अतिशय इमानेइतबारे चालू आहे ! या सगळ्यामध्ये मी या मंडळींची 'थॉट प्रोसेस' काय आहे याचा मागोवा घेत असतो. पहिल्यांदा जरा बाचकायला व्हायचं, पण आता रुळलो. नविन, आशय, प्रसन्न यांना माझ्याकडून काय हवंय याचा आता अंदाज यायला लागलाय. स्वयंचा वक्ता रंगमंचावर यायच्या आधीच प्रेक्षकांना त्या AV वरून वक्त्याच्या कामाचा अंदाज येणे अपेक्षित आहे. यासाठी ती जास्तीत जास्त catchy कशी होईल हे आता डोक्यात घुसलंय. अर्थात याचा डायरेक्टर नविनच. पण त्याच्या डोक्यात काय चाललंय याचाही अंदाज आता पटकन यायला लागलाय. आणि मला वाटतं हेच एडिटरचं कौशल्य आहे. त्यामुळे आता नविनकडून लगेचच 'क्या बात है, बढिया..' अशी दाद येते.

याच बरोबर नविनने स्वयं टॉक्स कार्यक्रमाच्या backdrop designing, lighting आणि shooting चीही जबाबदारी माझ्यावर आणि वीणावर टाकली. या आधी लग्नसमारंभ, ऑर्केस्ट्रा, डान्स शोज, स्टेज शोज अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं मल्टीकॅमेरा शूट, आणि एडिटिंग हा अनुभव गाठीशी होता. स्वयं सारखं काम या आधी कधी केलेलं नव्हतं. पण काम करता करता 'स्वयं हे काहीतरी वेगळं आहे' हे लक्षात यायला लागलं. हे वेगळेपण प्रत्यक्षात स्टेजवर आणि सोशल मीडियावर 'ये कुछ अलग है यार' अशा रीतीने परिवर्तित होणं गरजेचं होतं. यातील कन्टेन्ट प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थित पोहोचण्यासाठी प्रेक्षकांचे लक्षही विचलित होऊ द्यायचे नव्हते. म्हणूनच या कार्यक्रमाचा 'एकूण लूक' साधा पण आकर्षक असायला हवा होता. स्वयं च्या कार्यक्रमाची production value अतिशय उच्च दर्जाची असणे अपेक्षित होते.

या दृष्टीने काम करायला सुरुवात केली. मी आणि वीणाने हे आव्हान स्वीकारलं.

Backdrop चं डिझाइन, त्याचा साईझ, त्याची प्लेसमेंट, वक्त्याची प्लेसमेंट, डॉ निरगुडकरांच्या जागेची प्लेसमेंट…आणि या सगळ्या गोष्टी कॅमेऱ्यातुन कशा दिसतायत त्यासाठी कॅमेरा प्लेसमेंट आणि सर्वात आव्हानात्मक काम म्हणजे त्यानुसार करण्यात येणारं लायटिंग… या सगळ्याचा समन्वय साधत स्वयं चं स्टेज बहरत गेलं. मंडळी, हे सगळं इथे लिहिणं खूप सोपं आहे, पण हे साध्य करण्यात काय घाम निघाला, याची एकंदरीत थॉट प्रोसेस काय आहे ही सगळी मजा एका वेगळ्या लेखातून आपल्यासमोर येईलच ! सुरुवातीला साधा फ्लेक्स ते आता LED wall हा बदल सुखावणारा आहे.

२०१५ पर्यंत स्वयं चे कार्यक्रम दोन कॅमेऱ्याने शूट होत होते. ते बघताना काहीतरी कमी आहे असं नेहमी वाटायचं. आज मला सांगायला अभिमान वाटतो की स्वयं चा प्रत्येक कार्यक्रम 'पाच' कॅमेऱ्यांनी शूट केला जातो, आणि मुंबईच्या कार्यक्रमाचं तर ऑनलाइन एडिटिंग होतं ! आज खचितच एखादा टॉक शो असेल ज्याचं चित्रीकरण पाच कॅमेऱ्यांनी होतं. आज जेव्हा स्वयं च्या व्हिडीओज् ना जेव्हा काही लाखात व्ह्यूज मिळतात, तेव्हा नविनने टाकलेल्या जबाबदारीला आपण योग्य न्याय देऊ शकलोय याचं समाधान वाटतं. स्वयं चं काम करताना वेगळं समाधान का मिळत असावं ? लग्नाचं काय किंवा इतर कार्यक्रमांचं शूटिंग करताना तुम्ही एका विशिष्ट फ्रेमच्या बाहेर जाऊ शकत नाही. एक बांधला गेल्याचं फिलिंग येतं. कामात तोचतोचपणा येतो. पण स्वयं चं काम करताना कुठल्याही फ्रेमचं बंधन नसतं. फ्री हॅन्ड असतो. आणि मला वाटतं हे स्वातंत्र्यच खूप महत्वाचं असतं. मी किती कॅमेरे वापरणार, किती लाईट्स वापरणार असले 'माझ्या डोमेन'मधले कुठलेच प्रश्न मला कोणीही विचारत नाही. यासाठी स्वयं टीमचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. पण आत्ता तर सुरुवात आहे. अभी तो बहुत कुछ बाकी है दोस्तों !!

स्वयंची AV म्हणजे आमचा ओपनिंग बॅट्समन !
ओपनिंग बॅट्समनने पहिल्याच चेंडूवर सिक्सर मारल्यावर जसे प्रेक्षक खिळून बसतात, त्याचप्रमाणे स्वयंची AV पाहून सभागृहातील प्रेक्षक खुर्चीला खिळले पाहिजेत ही जबाबदारी या AVची, म्हणजे पर्यायाने आमच्यावर असते. त्यामुळे या AV अधिकाधिक आकर्षक कशा होतील यावर विचार सुरू झाला…आणि त्यासंबंधात पहिली संधी मिळाली २०१६ मध्ये ! त्या निमित्ताने झालेले प्रवास आणि त्याच्या रंजक कथा पुढील लेखात ! तूर्तास एक अल्पविराम !

काम करता करता स्वयं च्या निर्मिती टीमचा मी एक भाग कधी झालो, हे माझं मलाच कळलं नाही. या सगळ्या ध्येयवेड्या माणसांबरोबर छोटासा का होईना पण खारीचा वाटा मला उचलायला मिळतोय यातच मला समाधान आहे.

Thank you स्वयं !

- अजय गोखले

लेखक हे कुशल व्हिडीयोग्राफर व संकलक असून स्वयं कार्यक्रमांच्या व्हिडीयोग्राफी व संकलनाची जबाबदारी त्यांच्यावर असते.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

चेकलिस्ट: मतदान करण्यापूर्वीची!

निवडणुकांत मतदान करण्यापूर्वी आपण कधी चेकलिस्ट बनवली आहे का? मतदार राजा सजग झाला तर राजकारण अधिक गंभीर होऊ शकते. आता...

चांगुलपणाची प्रतिमा : मिसेस हॅरिस

कधी उगाच उदास वाटतं, माणुसकी, चांगुलपणा यावरचा विश्वास कमी व्हायला लागतो, उगीच चिडचिड होत असते, राग राग करून काही होणार...

स्वच्छतादूत : पद्मश्री एस. दामोदरन

दक्षिण भारतातील ६०० हून अधिक गावे आणि २०० पेक्षा अधिक झोपडपट्ट्यांमधील नागरिकांना उघड्यावर शौच करण्यापासून परावृत्त...