Vimeo ची गोष्ट! - Welcome to Swayam Talks
×

Vimeo ची गोष्ट!

नविन काळे

या स्पर्धेच्या युगात आपलं वेगळं स्थान निर्माण करणं आव्हानात्मक आहे. मात्र अनावश्यक आक्रमकतेला फाटा देत आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करुन वाटचाल केली तर बलाढ्य प्रतिस्पर्ध्याला टक्कर देण्याचे सामर्थ्य प्राप्त होऊ शकते, सांगतोय नविन काळे.
 

Published : 7 June, 2021

Vimeo ची गोष्ट!

ऑनलाईन व्हिडिओ म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर एकमेव नाव येतं ते म्हणजे यूट्यूब! यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या फोनच्या खिडकीत एका क्लिकवर जणू 'विश्वरूप' दर्शनच घडू लागलं. अक्षरशः हवा तो विषय 'सर्च' करा आणि तुम्हाला त्या विषयातील आणि त्याबद्दलचं वाट्टेल ते यूट्यूबवर मिळतं. यूट्यूबने ज्ञानाचं लोकशाहीकरण केलं.

पण आज मात्र मी तुम्हाला सांगणार आहे एका अनोख्या व्हिडिओ कंपनीबद्दल! त्या कंपनीचं नाव आहे - व्हिमिओ (Vimeo)! यूट्यूबच्या तुलनेत कमी युजर्स असलेल्या, पण एका ठराविक वर्तुळात प्रचंड लोकप्रिय असलेल्या या कंपनीने मागच्याच महिन्यात - २५ मे रोजी - NASDAQ या अमेरिकेतील स्टॉक एक्सचेंजवर आपल्या कंपनीचे शेअर्स सर्वसामान्य जनतेसाठी खुले केले. नेमक्या याच बातमीने संपूर्ण जगाचे लक्ष व्हिमिओकडे वळले.

नक्की काय आहे व्हिमिओ? YouTube पेक्षा यात काय वेगळं आहे? व्हिमिओचं नक्की बिझनेस मॉडेल काय आहे? समोर YouTube नावाचा अजस्त्र स्पर्धक असतानाही व्हिमिओने आपलं स्वतःचं स्थान कसं निर्माण केलं?

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण व्हिमिओचा जन्म यूट्यूबच्याही आधीचा. यूट्यूबची स्थापना २००५ मध्ये झाली तर व्हिमिओचा जन्म त्याच्या एक वर्ष आधी. अमेरिकेतील झॅक क्लीन (Zach Klien) व जेक लॉडविक (Jake Lodwick) या दोन तरुणांनी 'व्हिमिओ' या व्हिडिओ प्लॅटफार्मची स्थापना केली. ‘Video and Me' या दोन शब्दांच्या खेळातून 'व्हिमिओ' या नावाचा जन्म झाला. व्हिडिओ 'पोस्ट' करायची जागा याहून वेगळी अशी व्हिमिओची ओळख नव्हती. पुढे दोनच वर्षांत IAC (InterActiveCorp) नावाच्या जगद्विख्यात मीडिया कंपनीने व्हिमिओ या कंपनीला विकत घेतलं.

यूट्यूबची मालकी आता गुगलकडे आली होती. समोर युट्युबसारखा तगडा प्रतिस्पर्धी असताना यूट्यूबची कॉपी होऊन राहणं व्हिमिओला परवडणारं नव्हतं. त्यामुळे व्हिमिओने लोकप्रियतेच्या मागे न धावता स्वतंत्र वाट निर्माण करायचा निर्णय घेतला. हा एक धाडसी निर्णय होता, पण याच निर्णयाने व्हिमिओला स्वतःचे स्थान निर्माण करण्यात यश मिळाले. व्हिमिओने ठरवलं की आपण व्हिडिओ निर्माण करणाऱ्या कलाकारांच्या गरजा ओळखून व्हिडिओ तयार करण्यासाठीची 'Tools' देणारे त्यांचे हक्काचे डिजिटल व्यासपीठ निर्माण करायचे व ही सेवा देण्याचे पैसे आकारायचे.

व्हिडिओ दाखवण्यासाठी जाहिराती घेऊन बक्कळ पैसा कमावण्याचा एक 'महामार्ग' यूट्यूबने तयार केलेला असूनही व्हिमिओने मात्र स्वतःची पायवाट तयार करायची ठरवली - व्हिमिओने व्हिडिओजकरिता जाहिराती न घेण्याचा निर्णय घेतला! त्या काळात हा निर्णय घेण्यात देखील खूप मोठी जोखीम होती. पण नेमक्या याच निर्णयामुळे व्हिमिओचे वेगळेपण अधोरेखित झाले व 'Ads Free' अनुभवाचं महत्त्व कळालेले अनेक 'Video Creators' व्हिमिओकडे आकर्षित होऊ लागले.

२०१६ साली व्हिमिओने आणखी एक मोठं पाऊल उचलायचं ठरवलं. व्हिमिओने नेटफ्लिक्सला टक्कर द्यायची ठरवली. पण त्या दृष्टीने मोर्चेबांधणी करताना त्यांच्या लक्षात आलं की 'Content Creation' ही अत्यंत खर्चिक आणि दमवून टाकणारी गोष्ट आहे. त्यासाठी आवश्यक असलेली सर्व कौशल्ये नेटफ्लिक्सकडे आहेत म्हणून आपण त्यात उतरणे योग्य नाही. अशी उपरती होऊन व्हिमिओने अखेरीस या निर्णयातून माघार घेतली व आपले संपूर्ण लक्ष Video Creators वरच केंद्रित करायचे ठरवले.

व्हिमिओच्या स्थापनेनंतर तीन चार वर्षातच IAC आणि मूळ संस्थापकांमध्ये मतभेद होऊन, संस्थापक कंपनीमधून बाहेर पडले होते. त्यामुळे व्हिमिओला एका उत्तम नेतृत्वाची गरज भासत होती. अंजली सूद नावाची भारतीय वंशाची एक तरुणी व्हिमिओमध्ये मार्केटिंग तज्ज्ञ म्हणून रुजू झाली तेव्हा कुणाला कल्पनाही नव्हती की हीच मुलगी भविष्यात या संपूर्ण कंपनीचे नेतृत्व करणार आहे. २०१७ साली वयाच्या केवळ ३३ व्या वर्षी व्हिमिओची CEO झालेल्या अंजलीचा व्हिमिओच्या सध्याच्या यशात महत्वाचा वाटा आहे. सर्वांना न पटणारे अनेक कठोर निर्णय घेऊन अंजलीने व्हिमिओच्या ध्येय आणि उद्दिष्टांमध्ये एक प्रकारचा 'फोकस' आणला. आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या 'यशाने' घाबरून न जाता आपल्याला जे करायचंय त्यावर १०१% विश्वास ठेवून काम करत रहायची प्रेरणा तिने आपल्या सहकाऱ्यांना दिली. म्हणूनच आपल्या मूळ उद्दिष्टांपासून दिशाभूल करणारे सर्व प्रकल्प बाजूला ठेवत व्हिमिओने Software as a Service (SaaS) Provider हाच आपल्या व्यवसायाचा केंद्रबिंदू करण्याचे ठरवले. त्यामुळे फिल्म्स तयार करणाऱ्या मोठमोठ्या कलाकारांपासून ते अगदी हौशी व्हिडिओमेकर्सपर्यंत कोणीही व्हिमिओ सेवा देत असलेली साधने वापरून उत्तम प्रतीचे व्हिडिओ तयार करू शकतात.

“सर्वांना यूट्यूब माहित असतं, पण व्हिमिओ फारसं कुणाला माहीत नाही. यावर काय वाटतं?” मुलाखतकाराने अंजलीला विचारलं. अंजली शांतपणे म्हणाली, “व्हिमिओवर किती ट्रॅफिक असायला हवं याची आम्हाला कधीच चिंता नसते, कारण आम्ही जाहिराती दाखवत नाही. जगभरातील Video Creatorsना काही सुंदर निर्माण करण्यात आम्ही किती आणि कसं योगदान करू शकू, हाच आमच्या चिंतनाचा विषय असतो.”

नुकत्याच लिस्टेड कंपनी झालेल्या व्हिमिओचा NASDAQ वर स्टॉक कोड आहे - VMEO! "आम्ही आता 'पब्लिक' झालो; आता तुम्ही देखील व्हिमिओचा एक भाग होऊ शकता" हे सुचवण्यासाठी व्हिमिओने - आता आम्ही VMEO झालो, आमच्यातल्या 'I' गळून पडला! या अर्थाची अतिशय कल्पक जाहिरात केली होती.

कोरोनाने संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था कोलमडून टाकली. पण डिजिटल - विशेषतः मनोरंजन क्षेत्रातील व्यवसायांसाठी कोरोना अक्षरशः वरदान ठरला. घरी बसून कंटाळून गेलेल्या लोकांचे ऑनलाईन व्हिडिओ पाहण्याचे प्रमाण मागच्या दोन वर्षात इतके वाढले की या सर्व डिजिटल मनोरंजनाच्या क्षेत्रातील कंपन्यांचे विक्री आणि नफ्याचे आकडे गगनाला भिडले! यात व्हिमिओ देखील अपवाद नाही. व्हिमिओच्या वेबसाईटवरील माहितीचा आधार घेऊन सांगायचे तर आज जगभरातील सुमारे २० कोटी माणसे व्हिमिओचे प्रेक्षक असून १६ लाख माणसे पैसे भरून व्हिमिओची सेवा वापरतात. 'निदान आता तरी व्हिमिओला यूट्यूबचं भावंड म्हणणं थांबवा!' असं एक सूचक विधान अंजली सूदनं नुकतंच केलं!

आपल्याला हवंय ते मिळवण्यासाठी 'आपल्याला काय नकोय' हे आधी माहित असावं लागतं. गर्दीच्या कलकलाटाकडे दुर्लक्ष करून आपल्या आत उमटणारा तो क्षीण आवाज ऐकण्यासाठी एक वेगळी ताकद लागते. लोक हसतात-रागावतात-चिडवतात- सल्ले देतात. त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करून आपल्या ध्येयाकडे शांतपणे मार्गक्रमण करत राहणं नक्कीच सोपं नसतं. 'मला गर्दी हवीय की दर्दी हवे आहेत' हे एकदा ठरलं की मग आपला निर्णय सिद्ध करण्यासाठी जो काही संघर्ष करावा लागेल तो करण्याची ताकद तुम्हाला अत्यंत कष्टाने कमावावी लागते. या सगळ्यातलं बरचसं व्हिमिओच्या बाबतीत लागू पडतं म्हणून व्हिमिओची ही गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करावीशी वाटली.

स्वतःवरचा विश्वास डळमळीत झाल्यामुळे समोर दिसणारा सोप्पा मार्ग निवडून पुढे सरकण्याचा मोह होणं, कुणाला टळलंय? त्या क्षणी एक दीर्घ श्वास घेऊन व्हिमिओची गोष्ट आठवायची. आपल्या आतला 'I' पुन्हा एकदा बळकट होतो की नाही बघा!

- नविन काळे

लेखक हे ‘स्वयं’चे सह-संस्थापक आहेत.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

काळजी वाहणारे Robot युग!

Robots बद्दल गेले अनेक वर्ष आपल्याला कुतूहल आहे. मानवी गरजा समजून त्यावर supercomputing च्या साहाय्याने emotional support देणारा robot बनवता आला...

चेकलिस्ट: मतदान करण्यापूर्वीची!

निवडणुकांत मतदान करण्यापूर्वी आपण कधी चेकलिस्ट बनवली आहे का? मतदार राजा सजग झाला तर राजकारण अधिक गंभीर होऊ शकते. आता...

चांगुलपणाची प्रतिमा : मिसेस हॅरिस

कधी उगाच उदास वाटतं, माणुसकी, चांगुलपणा यावरचा विश्वास कमी व्हायला लागतो, उगीच चिडचिड होत असते, राग राग करून काही होणार...