सातारा मॅरेथॉन आणि मी ! - Welcome to Swayam Talks
×

सातारा मॅरेथॉन आणि मी !

नविन काळे

कोव्हीड परिस्थिती नसती तर आज - म्हणजे दिनांक १३ सप्टेंबर रोजी - जगप्रसिद्ध 'सातारा हिल मॅरेथॉन'मध्ये सात हजार माणसं धावत असती. या स्पर्धेत भाग घेतलेला नविन काळे काही आठवणी जागवतोय..
 

Published : 14 September, 2020

सातारा मॅरेथॉन आणि मी !

कोव्हीड परिस्थिती नसती तर आज - म्हणजे दिनांक १३ सप्टेंबर रोजी - जगप्रसिद्ध 'सातारा हिल मॅरेथॉन'मध्ये सात हजार माणसं धावत असती. या स्पर्धेत भाग घेतलेला नविन काळे काही आठवणी जागवतोय…


मागच्या वर्षी सातारा मॅरेथॉनमध्ये स्वयं टीममधून आशय, स्नेहल आणि मी भाग घेतला होता. ज्या क्रमाने आम्ही मॅरेथॉनची 'फिनिश लाईन' पूर्ण केली त्याच क्रमाने ही वरील नावे आहेत, हे तुम्हाला कळलं असेल. मी स्नेहल काही मॅरेथॉन वगैरे धावणारे नाही. (आशय मात्र मॅरेथॉन रनर आहे.) पण यावेळी मात्र का माहीत नाही, भाग घ्यावासा वाटला.


२०१५ साली मी, स्नेहल आणि आमचा मित्रपरिवार लडाख मॅरेथॉन धावलो होतो. पण तेही एक गंमत म्हणून. त्यात सातारा मॅरेथॉनचे संस्थापक डॉ संदीप काटे स्वयं मध्ये त्याविषयी बोलून गेल्यानंतरच या मॅरेथॉन मध्ये उत्सुकता म्हणून भाग घ्यावासा वाटला. आशय करतो इतकी प्रॅक्टिस नाही, पण त्यासाठी आम्ही थोडे बहुत पळायलाही लागलो होतो. पळायच्या आधी खूप कंटाळा यायचा पण पळून झाल्यावर मस्त वाटायचं.

आशय, त्याची पत्नी प्रणोती आणि मी-स्नेहल असे मॅरेथॉनच्या आदल्या दिवशी (२४ ऑगस्ट) साताऱ्यात पोहोचलो. जिथे आम्हाला उद्याच्या मॅरेथॉनचे किट मिळणार होते तिथे पोहोचलो. तिथलं vibrant वातावरण पाहून भारावून गेलो. किट घेण्यासाठी हजारो माणसे आली होती. पण अतिशय सुरेख नियोजन, प्रशिक्षित स्वयंसेवक आणि शिस्त या तीन गोष्टींमुळे गोष्टी अगदी सुरळीत घडत होत्या. डॉ संदीप काटे सतत लोकांच्या गराड्यात होते त्यामुळे माफक गप्पा मारून आम्ही त्यांचा निरोप घेतला. स्वयं पुणे स्वयंसेवक समीर आठल्येच्या आई बाबांकडे आमची राहायची सोय होती. उद्या पहाटे उठून हे तीन जवान जणू बॉर्डरवर लढायला जाणार या भावनेने आणि प्रेमाने त्यांनी आमची काळजी घेतली.रविवारी पहाटे साडेपाच वाजता आम्ही नियोजित स्थळी पोहोचलो तेव्हा मैदानात सहा हजार धावपटू उत्साहाने सळसळत होते. डॉ संदीप काटे एका भल्या मोठ्या स्टेजवरून त्यांच्याशी संवाद साधत होते. त्यांच्याकडून warm up exercises करून घेत होते. त्यांना motivate करत होते. अखेर सहा वाजता आम्ही सर्व धावण्यासाठी सज्ज झालो.


धावण्याची सुरुवात राष्ट्रगीताने करायची होती. सहा हजार माणसांच्या मुखातून एका स्वरात राष्ट्रगीत ऐकताना आणि त्यासोबत म्हणताना काय वाटलं हे शब्दात सांगणे कठीण आहे. मॅरेथॉन सुरू झाली. आशय प्रो-लीगमध्ये असल्यामुळे आधीच पुढे होता. मी आणि स्नेहल एकत्र असूनही धावता धावता  आम्ही दुरावलो. माझ्या आजूबाजूला माणसं धावत होती, पण तरीही मी तसा एकटाच उरलो. संपूर्ण सातारा शहर आम्हाला चीअर अप करायला रस्त्यावर उभं होतं. काही लोकं आम्हाला गोळ्या, बिस्किटे, चॉकलेट्स वाटत होती. काही नुसत्याच टाळ्या वाजवून आमचा उत्साह द्विगुणित करत होती. खरी मजा सुरू झाली, जेव्हा कास पठाराचा सुमारे सहा किलोमीटरचा घाट सुरू झाला. साधारण एक किलोमीटर चढ पूर्ण केल्यावर माझा स्टॅमिना आटला आणि मी चक्क चालायला सुरुवात केली.
आधी लाज वाटली पण आजूबाजूला आणखी काही लोकं चालताना दिसल्यावर भीड चेपली. तरी थोडा सपाट रस्ता आल्यावर मध्ये मध्ये धावत राहिलो. तीन चार किलोमीटर अंतरावर ठिकठिकाणी स्टॉल्सची व्यवस्था करण्यात आली होती. तिथे मुबलक एनर्जी ड्रिंक्सची व्यवस्था तर होतीच पण त्याचबरोबर धावणाऱ्या लोकांच्या पायात येणारे cramps काढण्यासाठी काही माणसं होती ! नियोजनातील हा इतका बारीक विचार मनाला स्पर्शून गेला. वेग कमी झाला तर प्रोत्साहन देण्यासाठी काही माणसं होती. घाट चढत असताना बाजूला दिसणारी हिरवीगार दरी मन फ्रेश ठेवत होती. जीवन मरणाचा प्रश्न येत नाही तोवर आपण धावत-चालत राहायचं हे ठरवलं होतं. मी एकवीस किलोमीटर पूर्ण केले ते नियोजित वेळेच्या एक तासानंतर. अर्थातच आशय आणि स्नेहलने ते वेळेच्या आत पूर्ण केल्यामुळे त्यांना मेडल मिळालं, मला नाही. माझी सध्याची फिटनेस लेव्हल बघता,  सर्वांपेक्षा उशिरा का होईना, काहीही शारीरिक दुखापत न होता मी सलग चार तास एकवीस किलोमीटर धावत- चालत पूर्ण केले याचा आनंद मोठा होता.सातारा सारख्या एका छोट्या शहरात डॉ संदीप काटे आणि त्यांची टीम ज्या दिमाखात ही मॅरेथॉन आयोजित करते त्याला तोड नाही. नियोजनात प्रत्येक गोष्ट international standard ची आहे, पण त्याच्या सादरीकरणात 'सातारा टच' आहे हे मला जास्त महत्त्वाचे वाटते. त्याबद्दल संदीप आणि त्यांच्या टीमचे कौतुक करावे थोडे.मी यापुढे किती मॅरेथॉन धावेन मला माहित नाही.

पण ही मॅरेथॉन धावल्यावर लक्षात आलं की मॅरेथॉन म्हणजे केवळ धावणे नाही. तुमची पॅशन ही एकप्रकारे तुमची एकट्याची मॅरेथॉन असते. तिथे तुम्ही एकटेच स्पर्धक असता. सुरुवात करताना तुमच्यासोबत खूप लोक असतात. पण पुढचा रस्ता तुम्हाला एकट्यालाच पार करायचा असतो. या रस्त्यात चढ-उतार येतात. या प्रवासात येणाऱ्या छोट्या मोठ्या यशांना तुम्ही 'फिनिश लाईन' मानता की तुमच्या या प्रवासात अशी कुठली 'फिनिश लाईन'च नाही, हा निर्णय प्रत्येकाने घ्यायचाय.
धावता धावता मध्येच काही लोक तुम्हाला चिअर-अप करतील. फिनिश लाईनवर कौतुक करायला तर गर्दी असेल ! पण एकही माणूस आजूबाजूला नसताना तुम्ही किती वेळ एकटे धावू शकता, यात खरी मेख आहे. एव्हरेस्ट सर करणारा पहिला मानव एडमंड हिलरी लिहितो, It is not the mountains we conquer but ourselves. मॅरेथॉनच्या बाबतीतही असंच म्हणता येईल.धावता धावता..सॉरी..लिहिता लिहिता थोडा 'ऑफ ट्रॅक' गेलो…आज 'प्रत्यक्ष न होणाऱ्या' सातारा हिल मॅरेथॉनची सकाळी आठवण आली आणि मागच्या वर्षीच्या काही अप्रतिम स्मृती जाग्या झाल्या. बस्स..इतकंच सांगायचं होतं.

- नविन काळे

लेखक हे ‘स्वयं’ चे संस्थापक सदस्य आहेत.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

Related blogs


 

पितृपक्ष आणि रिसायकलिंग

शॉपिंगचा किडा चावूनही पुन्हा एकदा 'शुद्धीत' आणणाऱ्या एका अनोख्या अनुभवाबद्दल सांगतोय, नविन काळे

आता जोहराचं काय होणार?

तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यानंतर तिथल्या नागरिकांची होणारी जीवघेणी होरपळ आपण सगळेच जण पाहतोय. मात्र अशा...

एका नव्या प्रवासाची नांदी

‘अवकाश प्रवास’ (Space Tourism) हे स्वप्न आता येत्या दशकभरात सत्यात उतरणार आहे. जगातल्या मोठ्या उद्योगांनी त्यादृष्टीने पावले...