सकारात्मक व्हा .... Positive नको - Welcome to Swayam Talks
×

सकारात्मक व्हा …. Positive नको

पराग खोत

एखाद्या गोष्टीच्या आहारी जाणं म्हणजे काय? ते आपण अनुभवलं. त्याच्यावर मात करत, त्याच्या प्रभावाखालून बाहेर पडणं कसं आवश्यक आहे हे सांगतोय, पराग खोत
 

Published : 19 April, 2021

सकारात्मक व्हा …. Positive नको

गेल्या वर्षीपर्यंत हे दोन एकमेकांचे प्रतिशब्द होते. आज काळाने त्यांचे अर्थच बदलून टाकले आहेत. Be Positive हा परवलीचा शब्द आज नकोसा झालाय. ‘सकारात्मक’ या मराठमोळ्या शब्दाने त्याच्या इंग्रजी भावंडाशी संबंध तोडले आहेत. Positive या शब्दाची दहशत पसरलीय. लोक भीतीच्या सावटाखाली वावरताहेत. कालपर्यंत ऐकिवात असलेला ‘तो’ आज आपल्या घरांपर्यंत आलाय. ‘तो’ आपल्या मनात शिरलाय.

बस्स … आता हीच वेळ आहे आपल्याकडून निकराचा हल्ला करण्याची. आयुष्यात बदल घडवून आणण्याची. नव्या युगाचा प्रारंभ करण्याची. गेले वर्षभर जणू त्या नावाचा जप करतो आहोत आपण. येनकेनप्रकारेण त्याच्याशी जोडून घेण्याची अहमहमिकाच लागलीय जणू. आता जरा त्याच्यापासून मानसिकरित्या फटकून वागायला लागूया. ती माहिती, ते आकडे, ते आजार, ते उपाय, ती काळजी आणि …. ते नाव. हे सगळं आपल्या मन:पटलावरुन एकदा पुसून टाकू. एवीतेवी सवय झालीच आहे ना त्या तथाकथित New Normal ची … मग आपणही पुन्हा एकदा Normal होऊयात की ! वेगळं काहीतरी करायला लागूयात की !

Frontline Warriors त्याच्याशी शिर तळहातावर घेऊन लढताहेत. पण त्यांच्यासाठी आपण काय करतोय? विनाकारण त्या रोगाच्या भक्ष्यस्थानी पडून त्यांचे काम वाढवून ठेवतोय? पुरेशी वैद्यकीय सुविधा मिळाली नाही म्हणून त्यांच्यावर हल्ले करतोय? आपल्याला शिस्त पाळायची नाही म्हणून व्यवस्थेला दोष देतोय? की इतरांवर विनोद करण्याच्या नादात स्वत:चंच हसं करुन घेतोय?

विनोद हे तुमच्या दु:खांवरचं सर्वोत्तम अस्त्र आहे असं म्हणतात. पण इथे ते अस्त्रच आपल्या लक्ष्याच्या भक्ष्यस्थानी पडलंय. विनोदाचे सगळे प्रकार, विषयाचं वावडं असल्यागत त्या एकाच शब्दाभोवती फिरतायत. Creativity तिथे सुरु होते आणि एक मोठ्ठं वर्तुळ पूर्ण करुन तिथेच जाऊन संपते. आपले सगळे शब्दच्छल, विडंबनं, व्यंगचित्रं आणि साहित्य त्या एकाच गोष्टीभोवती केंद्रित होणं इतकं गरजेचं आहे का? आपल्या सर्जनशीलतेला इतकं बंदिस्त ठेवायला हवं का?

कुठलीही कृती प्रत्यक्षात येण्याआधी त्याची प्रतिमा आपल्या मनात तयार होत असते. ती प्रतिमा जितकी स्वच्छ आणि निरोगी तितकी ती कृती फलदायी असते. आपल्या मनातल्या प्रतिमा दूषित होत चालल्या आहेत का? त्या आपल्याला मानसिकरित्या दुर्बल करतायत का? आणि म्हणून आपण या रोगाला बळी पडतोय का? कणखर मन हे लढाऊ शरीराचा पाया असते. मग हा नकारात्मक गोष्टींचा चहुबाजूने होणारा मारा आपल्याला कमकुवत करतोय का? राजकारण आणि वृत्तवाहिन्या आपले मानसिक खच्चीकरण करताहेत का?

त्यातच Whatsapp या महान शोधाने ऊत आणलाय. खरीखोटी माहिती, व्हिडिओज, मीम्स, राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि वैद्यकीय (अ)ज्ञान यांचा महापूर आलाय. या महापुरातून वाचण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलेले चिरंतन तत्वज्ञान. ‘महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती’ या न्यायाने नम्रपणे या Whatsapp ज्ञानाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे म्हणजे या गजबजाटात टिकून राहणे होय. आपला सारासार विचार संपता कामा नये याची काळजी घ्यायला हवीय.

चला तर मग, या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करुन आपले नेहमीचे आयुष्य जगायला लागूया. ज्याप्रमाणे या लेखात एकदाही तो तीन अक्षरी शब्द आला नाही त्याचप्रमाणे तो शब्द आणि ती जाणीव आपल्या आयुष्यातून हद्दपार करुया. तुमच्या संभाषणात, समाज माध्यमात आणि घरातही ते उल्लेख नकोतच. त्या आकडेवारीने काही फरक पडत नाही. उगीच जिवाला घोर लावून त्याबद्दल विचार करणे सोडून देऊया. आम्ही आमच्या सगळ्या ग्रुप्सवरुन त्याला हाकलून दिलाय. घरातून, दारातून आणि मुख्य म्हणजे मनातून दूर सारलाय. आम्ही मुक्त झालोय. आपण मुक्त होऊया. नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींना आपण आपल्या उत्पत्तीपासून तोंड देत आलो आहोत ना? त्यातच ही एक आहे असं समजूया आणि मानव ही निसर्गाची सर्वोत्कृष्ट निर्मिती आहे हे सप्रमाण सिद्ध करुया. सर्वच दृष्टीने सकारात्मक होऊया.

-पराग खोत

लेखक हे ‘स्वयं’च्या Content Team चे सदस्य आहेत.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

Related blogs


 

पितृपक्ष आणि रिसायकलिंग

शॉपिंगचा किडा चावूनही पुन्हा एकदा 'शुद्धीत' आणणाऱ्या एका अनोख्या अनुभवाबद्दल सांगतोय, नविन काळे

आता जोहराचं काय होणार?

तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यानंतर तिथल्या नागरिकांची होणारी जीवघेणी होरपळ आपण सगळेच जण पाहतोय. मात्र अशा...

एका नव्या प्रवासाची नांदी

‘अवकाश प्रवास’ (Space Tourism) हे स्वप्न आता येत्या दशकभरात सत्यात उतरणार आहे. जगातल्या मोठ्या उद्योगांनी त्यादृष्टीने पावले...