रुबरू रोशनी : 'स्वयं मुंबई' २०२१ ! - Welcome to Swayam Talks
×

रुबरू रोशनी : ‘स्वयं मुंबई’ २०२१ !

नविन काळे

ध्येयवेड्या माणसांच्या प्रेरणादायी गोष्टी सांगणारा स्वयं टॉक्स ह्या वर्षीच्या बंधनांमुळे कदाचित आपल्याला प्रत्यक्ष पाहता आला नसेल. तो आता स्वयंच्या स्वत:च्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर एका नव्या स्वरुपात दाखल झालाय. स्वयं मुंबई २०२१ चे वक्ते आणि ‘स्वयं डिजिटल’च्या या नव्या माध्यमाविषयी सांगतोय नविन काळे.
 

Published : 30 March, 2021

रुबरू रोशनी : ‘स्वयं मुंबई’ २०२१ !

२०१४ पासून दरवर्षी जानेवारीत होणाऱ्या 'स्वयं'च्या कार्यक्रमाने चोखंदळ रसिकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलंय हे आता वेगळं सांगायला नको. 'कोव्हिड'चं सावट असताना २०२१ मध्ये 'स्वयं मुंबई' होईल की नाही? हा प्रश्न सतावत होता. पण सुदैवाने १७ जानेवारी रोजी 'स्वयं मुंबई' बांद्रा येथील बालगंधर्व रंगमंदिरात हा कार्यक्रम अत्यंत दिमाखात व उत्तम रीतीने पार पडला. २०१४ पासून सुरु असलेली 'स्वयं मुंबई'ची परंपरा मोडली नाही, याचा विशेष आनंद झाला. परंतु शासनाच्या नियमाप्रमाणे हा कार्यक्रम केवळ ५०% प्रेक्षकांच्या उपस्थितीत संपन्न झाल्यामुळे आम्हाला वाटलं की हा कार्यक्रम, या कार्यक्रमातील एकाहून एक असे भन्नाट वक्ते आणि त्यांचे विषय अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायला हवेत. याच कल्पनेतून निर्मिती झाली ती स्वयं डिजिटल ची. आता हा संपूर्ण कार्यक्रम तुम्हाला जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात, अगदी घरबसल्या सहकुटुंब पाहता येणार आहे. तो कसा बघायचा? कुठे बघायचा? हे मी या लेखात सांगणारच आहे, पण तत्पूर्वी जाणून घेऊया यावर्षीच्या भन्नाट वक्त्यांबद्दल ! 

दरवर्षी स्वयं मुंबई कार्यक्रमात सहा वक्ते असतात. पण यावर्षी होते नऊ वक्ते आणि दरवर्षीप्रमाणे सुसंवादक होते डॉ. उदय निरगुडकर ! संपूर्ण दिवसाच्या या महोत्सवाने 'स्वयं मुंबई'चा 'बेंचमार्क' तर उंचावलाच, पण सर्व रसिकांच्या मनात एक अविस्मरणीय आठवण म्हणून स्थान मिळवले. 'स्वयं मुंबई'मध्ये आपण ज्या नऊ अफलातून माणसांना भेटणार आहात, त्यांच्याविषयी अगदी थोडक्यात जाणून घेऊया.

डॉ. मधुबाला चिंचाळकर वयाच्या ५८ व्या वर्षी चक्क अंटार्क्टिकाला जाऊन आल्या. भारतीय शास्त्रज्ञांच्या अंटार्क्टिका संशोधन मोहिमेत त्या डॉक्टर म्हणून सहभागी झाल्या होत्या. गंमत म्हणजे, वयाच्या पंचेचाळीशीपर्यंत त्यांनी पश्चिम मुंबईतून मध्य मुंबईत प्रवास केलेला नव्हता ! 'अंटार्क्टिका'मधले त्यांचे थरारक अनुभव, निसर्गाचे अद्भुत चमत्कार आणि ग्लोबल वॉर्मिंगचा अंटार्क्टिकावर होणारा परिणाम याबद्दल ऐकताना तुम्ही अक्षरशः थक्क व्हाल!   

डॉ. गिरीश चरवड. सुप्रसिद्ध सरोद वादक. उत्तम तबला-पखवाज वादक. चित्रकला आणि थर्मोकॉल कार्व्हिंग मधले उस्ताद. पण या सगळ्याच्या पलीकडे त्यांची ओळख आहे ती संशयित गुन्हेगारांची रेखाचित्रे काढून त्यांना गजाआड करून देण्यात पोलिसांची मदत करणारा 'C Garry' म्हणून ! ही ओळख त्यांनी प्रथमच या व्यासपीठावर उघड केली. गेली अठ्ठावीस वर्षे ते हे काम अत्यंत निष्ठेने करतायत - याबद्दल एकही रुपया मोबदला न घेता !    

सोनाली फडके या 'Upcycling' उद्योजिका आहेत. लोकांनी टाकून दिलेल्या वस्तूंना अधिक सुंदर करून त्यात त्या Value Addition घडवून आणतात. फेकून दिलेल्या कंटेनर्सची अप्रतिम घरे बनवतात. Studio Alternative या आपल्या कंपनीद्वारे त्या अशाच उत्पादनांची निर्मिती करतायत ज्यात ग्राहकांना उत्तम प्रतीचे प्रॉडक्ट्स मिळतील व मुख्य म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास कमी होण्यास मदत होईल.    

विख्यात चित्रकार आभा भागवत या लोकसहभागातून वॉल पेंटिंग्ज करतात. शहरातील / गावातील भिंतींवर, त्या त्या भागातील माणसांचे आणि त्यांच्या जीवनाचे प्रतिबिंब उमटायला हवे असे त्यांना वाटते. महाराष्ट्र, कर्नाटक, नॉर्थ ईस्ट अशा देशभरातल्या विविध राज्यांतील अनेक गावांमध्ये आणि शहरांमध्ये फिरून लोकांमधील चित्रकलेविषयीचे भान वाढवण्याचे काम आभा अत्यंत आस्थेने करतायत.

डॉ. अपूर्वा जोशी या मूळच्या Forensic Accountant आहेत. देशातील गुप्तचर यंत्रणा ज्याप्रमाणे काम करते त्याच पद्धतीने त्या आर्थिक गुन्हे क्षेत्रांत काम करतात आणि वेगवेगळे घोटाळे उघडकीस आणतात.

विख्यात पेटंट तज्ञ डॉ.मृदुला बेळे यांनी उलगडलेले औषधे, त्यांची पेटंट्स आणि त्यावरून होणारे जागतिक राजकारण-अर्थकारण आणि त्याची उदाहरणे प्रत्येक अभ्यासू रसिकाने ऐकावी अशीच !

या प्रत्येकासोबत डॉ उदय निरगुडकर यांनी खुसखुशीत शैलीत साधलेला अभ्यासपूर्ण सुसंवाद हा अगदी चुकवू नये असाच !

यावर्षी सर्वात पहिल्यांदा स्वयंच्या कार्यक्रमात धैर्य दंड या मूळच्या नाशिकच्या पण सध्या अमेरिकेत असलेल्या तरुण शास्त्रज्ञाशी डॉ. निरगुडकरांनी झूम कॉल द्वारे संवाद साधला. अमेझॉनच्या 'अलेक्सा' या लोकप्रिय device च्या निर्मिती टीममध्ये धैर्यने महत्वाची भूमिका बजावली आहे. त्याने लावलेल्या भन्नाट शोधांच्या गोष्टी प्रत्यक्ष त्याच्या तोंडून ऐकण्यात गम्मत आहे.

यावर्षीपासून 'स्वयं गौरव' हा एक विशेष सन्मान सुरु करण्यात आला. कोरोना काळात वैद्यकीय सेवेची तरुण धडाकेबाज फळी उभारणारी 'सेवांकुर' ही संस्था आणि लडाखमध्ये ५५५ किमी धावणारा पहिला व एकमेव भारतीय अशी ओळख असलेल्या आशिष कासोदेकर यांना यावर्षीच्या स्वयं गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. डॉ. उदय निरगुडकरांनी सेवांकुरचे डॉ. नितिन गादेवाड व आशिष कासोदेकर यांच्याशी साधलेला संवाद आवर्जून पहा.

वरील सर्व टॉक्स व मुलाखती तुम्हाला तुमच्या सोयीने, घरबसल्या episodes च्या स्वरूपात पाहता येणार आहेत आणि तेही फक्त ९९ रुपये इतक्या अविश्वसनीय किमतीत! आणखी एक. या ९९ रुपयांत तुम्हाला स्वयं मुंबई २०२१ च्या बरोबरीने स्वयंचे पूर्वीचे कार्यक्रम तसेच वर्षभरात येणारे आगामी कार्यक्रम देखील पाहता येणार आहेत. ('स्वयं'चे कार्यक्रम आता YouTube वर उपलब्ध नसतील याची नोंद घ्यावी.)

स्वयं डिजिटल ची आणखी दोन वैशिष्ट्ये म्हणजे - हे सर्व कार्यक्रम 'Ads Free' असणार आहेत. आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला हे सर्व कार्यक्रम सहकुटुंब पाहता येणार आहेत !

यासाठी तुम्हाला इतकंच करायचंय की https://swayamtalks.org/  या लिंकवर क्लिक करून या वेबसाईटवर जायचंय. होम पेजवर वरच्या बाजूला असलेल्या Login / Sign Up या हिरव्या बटनावर क्लिक करून पुढे जात तुम्ही रजिस्टर करुन पैसे भरलेत की तुम्ही या सर्व व्हिडिओज् चा आनंद घेऊ शकणार आहात.

हल्लीच्या तरुण पिढीसमोर आदर्श नाहीत, क्या होगा इस देश का? ... असे नकारात्मक सूर चहुबाजूंनी उमटत असताना 'स्वयं' मध्ये भेटणारी माणसे तुम्हाला जगण्याची एक नवीन दृष्टी देतील याची खात्री आहे. म्हणूनच 'स्वयं डिजिटल'साठी फक्त ९९ रुपये भरून तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी 'सर्वोत्कृष्ट इन्व्हेस्टमेंट' करणार आहात याची खात्री बाळगा.

'स्वयं'चा अनुभव घेतल्यावर तुम्हाला बरंच काही सापडलं असं वाटेल. त्यातील सर्वात गंमतीची गोष्ट ही असणार आहे की तुम्हाला गवसलेलं ते ‘बरंच काही’ खास कुठून बाहेरून आलेलं नसून ... ते तुमच्याच आतलं असणार आहे ...

‘रुबरु रोशनी’!

- नविन काळे

लेखक हे ‘स्वयं’ चे संस्थापक सदस्य आहेत.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

Get Better Each Week #15

हा ब्लॉग म्हणजे तुमच्या मेंदूचा दर आठवड्याचा व्यायाम आहे! या ब्लॉगमुळे तुम्ही दर आठवड्याला काही नवीन तर शिकालच, पण...

Get Better Each Week #14

हा ब्लॉग म्हणजे तुमच्या मेंदूचा दर आठवड्याचा व्यायाम आहे! या ब्लॉगमुळे तुम्ही दर आठवड्याला काही नवीन तर शिकालच, पण...

Get Better Each Week #13

हा ब्लॉग म्हणजे तुमच्या मेंदूचा दर आठवड्याचा व्यायाम आहे! या ब्लॉगमुळे तुम्ही दर आठवड्याला काही नवीन तर शिकालच, पण...