पूर्वतयारीचे शिवधनुष्य - Welcome to Swayam Talks
×

पूर्वतयारीचे शिवधनुष्य

भाग्यश्री महाजन

’स्वयं टॉक्स’ या Live कार्यक्रमात एखादा वक्ता येऊन वीस मिनिटांत प्रभावी भाषण करुन जातो. वरकरणी सहज वाटणाऱ्या या गोष्टीमागे त्या वक्त्याचे आणि टीम स्वयंचे किती परिश्रम असतात याबद्दल सांगतेय भाग्यश्री महाजन.
 

Published : 22 March, 2021

पूर्वतयारीचे शिवधनुष्य

काय? फक्त २० मिनिटेच बोलायचंय? कसं शक्य आहे? अहो, ह्या विषयासाठी दोन तास कमी पडतील. अरे बापरे आणि या वीस मिनिटांच्या सादरीकरणासाठी शिवाय प्रॅक्टिसपण करायचीय? अहो, मला लोकांसमोर बोलण्याची सवय आहे. मी आजतागायत तीनशेच्या वर लेक्चर्स दिली आहेत. आपण रिहर्सलवर वेळ नको घालवूया. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आयत्या वेळी स्टेजवर उभं राहूनसुद्धा नक्कीच वेळ मारून नेईन.

या आणि अशा अर्थाच्या अनेक प्रतिक्रिया आमच्या होऊ घातलेल्या वक्त्यांकडून आम्हाला नेहमीच ऐकायला मिळतात. खरंतर त्यांच्या दृष्टीने त्यांना असे वाटणंही स्वाभाविकच असतं. त्त्यांनी त्यांचा विषय तत्पूर्वी अनेकवार मांडलेला असतो. कधी Formally तर कधी Informally. छानपैकी प्रेझेंटेशन सादर केलेलं असतं. स्वतःची किंवा स्वतःच्याच कामाची माहिती सांगायला रिहर्सल कशाला? असा साधा, सोपा प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला अनेकदा दिसतो.

आपल्या कार्यक्रमाच्या रुपरेषेनुसार आपण १८ ते २० मिनिटांची वेळ ठरवलेली आहे. प्रथमतः त्यांना ही वेळ ऐकायला कमी वाटत असली तरीही आमच्या अनुभवावरून मी निश्चितपणे सांगू शकते की १८ ते २० मिनिटांत 'स्वयं' चे बहुतांश वक्ते उत्तम प्रकारे आणि परिपूर्णतेने त्यांचा विषय मांडून गेलेले आहेत. सोबतच ज्येष्ठ विचारवंत आणि स्वयं मार्गदर्शक डॉ. उदय निरगुडकर त्यांच्या आणि प्रेक्षकांच्या मनातले प्रश्न मार्मिकपणे विचारून वक्त्यांचे विचार प्रेक्षकांना अधिकाधिक उलगडून दाखवत असतातच.

आपण भारतीयांना थोडक्यात आणि नेमके बोलायची सवय नसते. अघळपघळ बोलण्यावर आपला भर जास्त असतो. आमच्या अनुभवानुसार २० मिनिटांच्या वेळेची ही मर्यादा योग्यच आहे. वर्षानुवर्षांची 'भाषण' म्हणजे कंटाळवाणे ही समजूतही खोडून काढता येते. ही कालमर्यादा ठेवण्याची इतरही कारणे आहेतच. मुख्य कारण म्हणजे, हल्ली बहुतांश लोकांचा, प्रामुख्याने डिजिटल माध्यमावरील प्रेक्षकांचा 'Patience' खूपच कमी झालाय. १५ ते २० मिनिटांपेक्षा जास्त, एखाद्याला ऐकणे ही जवळजवळ अशक्यप्राय गोष्ट आहे. तुमचा विषय, तुमचं काम कितीही interesting आणि भन्नाट असो, जोवर तुम्ही ते आकर्षकपणे मांडत नाही तोवर ते ऐकणार तरी कोण? हातातल्या स्क्रीनवर पूर्णपणे स्वत:चा ताबा असणाऱ्या आजच्या श्रोतृवर्गाला चांगलं काही ऐकवायचं असेल तर content शी कुठेही तडजोड न करता प्रामाणिक सच्चेपणाने, नाविन्य जपत आपला talk उत्तम प्रकारे सादर करण्याची जबाबदारी पूर्णपणे वक्त्यावर येते आणि ही वस्तुस्थिति आहे.

प्रत्येक वर्षागणिक आम्ही या गोष्टीवर अधिकाधिक चिंतन करतो आहोत. भाषण वेळेत बसवणे या व्यतिरिक्त talks च्या दृष्टीने विविध मुद्यांचे भान ठेवावे लागते. व्यक्ती तितक्या प्रकृती या नियमानुसार प्रत्येक वक्ता, त्याचा स्वभाव, त्याच्याकडे आम्हाला देण्यासाठी असलेला वेळ, त्यांची कार्यक्षेत्रे वेगळी आणि निवासस्थान या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असतात. आपले विचार आणि कल्पना प्रेक्षकांसमोर मांडता येणं ही देखील एक कला आहे. समाजात अफलातून काम करणारी माणसं बोलण्यात पारंगत असतीलच असं नाही. काही वक्त्यांचे काम हे पूर्णत: वैयक्तिक स्वरुपाचे असते. प्रत्यक्षपणे लोकांचा त्यात सहभाग नसतो. अशा वेळी जवळपास पाचशेहून अधिक लोकांपुढे कसे बोलायचे असा प्रश्न काही वक्त्यांना सुरवातीच्या काळात पडलेला असतो आणि खरंतर इथेच एका सामान्य प्रेक्षकाच्या भूमिकेतून विचार करून, तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत, कुठल्या पद्धतीने त्यांचे विचार जास्तीत जास्त परिणामकारकरित्या लोकांपर्यंत पोहोचतील याचा विचार करून आमची टीम त्यांना मार्गदर्शन करत असते.

त्यांच्या कडूनच त्यांचे काम, त्यांचे विचार, त्यांच्या नवनवीन कल्पना अधिकाधिक प्रभावीपणे मांडता याव्यात या दृष्टीने त्यांना motivate करत असते आणि एकदा का त्यांना सूर गवसला की त्यांचे भाषण हे नुसते श्रवणीयच नाही तर प्रेक्षणीय देखील होते. ह्याचा प्रत्यय 'स्वयं' च्या प्रेक्षकांना नेहमीच येत असतो. आजमितीस 'स्वयं टॉक्स' मध्ये अनेक मान्यवर वक्ते येऊन आपले विचार उत्तमोत्तम पद्धतीने मांडून गेले आहेत आणि त्यातील कित्येकांनी प्रेक्षकांसमोर बोलायची सवय नाही, म्हणून स्वत:च्या भाषणावर अतिशय प्रामाणिकपणे मेहनत घेतली आहे.

‘स्वयं टॉक्स' हा भाषणाचा कार्यक्रम असला तरीही प्रेक्षकांनी कार्यक्रम संपल्यावर घरी जाताना किंवा डिजिटल प्रेक्षकांनी talk ऐकल्यावर एक परिपूर्ण असा दृक-श्राव्य अनुभव घ्यावा याकडे आमचा कटाक्ष असतो. आमच्या वक्त्यांचे विचार त्यांना जास्तीत जास्त प्रभावीपणे मांडता येण्याच्या दृष्टीने त्यांना आम्ही काही युक्त्या, क्लृप्त्या सांगत असतो. अभ्यासपूर्ण आणि परिपूर्ण तयारीचे भाषण होऊनदेखील त्यातला त्यांचा Freshness आणि Spontaneity जायला नको यासाठी प्रयत्न करतो. भाषणाची सुरवात आणि शेवट कसा असावा? त्यांची देहबोली कशी असावी, अगदी मंचाच्या रंगसंगतीला साजेल असा कपड्याचा रंग कुठला असावा ह्याबाबतही सूचना देत असतो.

आपल्या भाषणावर अतोनात मेहनत करणाऱ्या अनेक वक्त्यांचा अनुभव गेली काही वर्षे आमच्या गाठीशी आहे. पल्लवी वर्तक... महाराष्ट्रातील सुळक्यांची राणी. तिने पहिल्या भेटीतच सांगून टाकलं होतं "कितीही वेळा गड चढेन पण स्टेजवर चढून बोलणं थोडं अवघडच होईल मला" तर “माझं काम घरातल्या घरात......माझ्या या फॉस्टर मदरच्या कामाविषयी publicly आणि साचेबद्ध बोलायची अजिबात सवय नाहीये. माझ्यामुळे तुमच्या कार्यक्रमाला गालबोट नको लागायला" असा विचार निरागसपणे आमच्यासमोर मांडणाऱ्या गीतांजली रोहोकलेही तितक्याच प्रामाणिक. याचप्रमाणे सुशांत फडणीस, सुरेखा शिंदे, सुजाता रायकर, उज्ज्वला सहाणे या आणि अशा अनेक वक्त्यांनी आपले भाषण अधिकाधिक चांगले व्हावे यासाठी कसून सराव केला. काही वेळा अनपेक्षितपणे अनेक मुरलेल्या वक्त्यांना भेटीच्या सुरवातीला भाषणाचा सूरच गवसत नाही. परंतु त्यांच्याशी झालेल्या अनौपचारिक चर्चा व सराव सत्रांमधून त्यांच्यात सहजता येते आणि कार्यक्रमानंतर तर ते अक्षरशः प्रेक्षकांच्या गळ्यातले ताईत होऊन जातात.

सांगण्याचा मोह टाळता येत नाहीये म्हणून मुद्दाम सांगते की अनेकदा "आपल्या या चर्चा, भेटी, आपलेच विचार पडताळून पाहण्याच्या, नकळतपणे घडणाऱ्या या आत्मचिंतनाच्या प्रक्रियेमुळे मीच माझ्याकडे, माझ्या कामाकडे नव्याने बघायला, समजायला लागलोय" अशी प्रांजळ कबूलीही अनेकदा वक्त्यांकडून मिळते. 'स्वयं टॉक्स’च्या माध्यमातून नविन काळे, शिल्पा देशिंगकर, सांबप्रसाद पिंगे आणि मी या आमच्या Content Team ला अनेकांना भेटण्याचा योग आला. त्यातले वक्ते म्हणून या मंचावर आले काही पुढेही येतील. चांगले, क्वचित प्रसंगी वाईट, गमतीदार, अवाक करणारे असे अनेक अनुभव मिळाले. मनातलं सांगते, त्यांच्या त्यांच्या विषयात 'बाप' असलेल्या पण रूढार्थाने प्रकाशझोतात नसलेल्या व्यक्तींशी ह्या निमित्तानेजोडले जाण्याचा आनंद हा काकणभर जास्तच असतो.

'स्वयं टॉक्स’च्या या प्रवासात आमचाही खारीचा वाटा असण्याची ती भावना लाखमोलाची आहे. 'स्वयं डिजिटल'च्या या पदार्पणाच्या उंबरठ्यावर मी माझे विचार मांडतेय याचा नक्कीच आनंद आहे. अशा या हटके, कामाने झपाटलेल्या, आपापल्या विषयात तज्ज्ञ असलेल्या व्यक्तींना जवळून भेटण्याची संधी 'स्वयं' ने आणि पर्यायाने नविनने आम्हाला दिल्याबद्दल त्याचे आभार. स्वयं परिवर्तना'च्या या लाटेत सहभागी असण्याचे सुख अनमोल आहे हे निश्चित.

-भाग्यश्री महाजन

लेखिका या ‘स्वयं’च्या Talks Preparation Team च्या सदस्य आहेत.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

चांगुलपणाची प्रतिमा : मिसेस हॅरिस

कधी उगाच उदास वाटतं, माणुसकी, चांगुलपणा यावरचा विश्वास कमी व्हायला लागतो, उगीच चिडचिड होत असते, राग राग करून काही होणार...

स्वच्छतादूत : पद्मश्री एस. दामोदरन

दक्षिण भारतातील ६०० हून अधिक गावे आणि २०० पेक्षा अधिक झोपडपट्ट्यांमधील नागरिकांना उघड्यावर शौच करण्यापासून परावृत्त...

तरुणाईतील ‘स्वयं’साठी!

तरुणपण जगण्याचा एक मार्ग म्हणजे या तरुणाईशी जोडलं जाणं. या पिढीतील बदलला सामोरं जाताना, त्यांना जर आपण आज मित्रत्वाचा...