प्रिसीजन आणि सामान्यजन ! - Welcome to Swayam Talks
×

प्रिसीजन आणि सामान्यजन !

नविन काळे

मागच्या वर्षी कामाच्या निमित्ताने नविन काळे आणि आशय महाजन यांना सोलापूरच्या 'प्रिसिजन' फॅक्टरीला भेट देण्याची संधी मिळाली. तुम्हालाही अवाक करेल असा अफलातून अनुभव सांगतोय, नविन काळे.
 

Published : 20 July, 2020

प्रिसीजन आणि सामान्यजन !

मागच्या वर्षी कामाच्या निमित्ताने नविन काळे आणि आशय महाजन यांना सोलापूरच्या 'प्रिसिजन' फॅक्टरीला भेट देण्याची संधी मिळाली. तुम्हालाही अवाक करेल असा अफलातून अनुभव सांगतोय, नविन काळे.   

२०१८ साली प्रिसीजन कंपनीने सोलापुरात 'स्वयं'चे आयोजन केल्यामुळे या समूहासोबत एक छान नातं निर्माण झालंय. 'प्रिसीजन गप्पा' कार्यक्रमाचं त्यांचं (नावाप्रमाणेच) काटेकोर व जिव्हाळ्याने केलेलं आयोजन पाहून आम्हाला 'प्रिसीजन' ची फॅक्टरी पहायची प्रचंड उत्सुकता होती. 'प्रिसीजन फाउंडेशन'चं काम पाहणारे माधव देशपांडे यांनी आमची इच्छा पूर्ण करण्याची तयारी दर्शवली. गोष्ट आहे मागच्या वर्षीची. मी आणि आशय सोलापुरात जिथे होतो तिथून फॅक्टरीत न्यायला माधवरावांनी गाडी पाठवली होती. गाडी सोलापूर पुणे महामार्गाला लागून पुढे सोलापूर MIDC कडे वळली… प्रिसीजन ही कॅमशाफ्टस् बनवणारी भारतातील क्रमांक एकची कंपनी सोलापुरात आहे. फार तांत्रिक खोलात न जाता इतकंच सांगतो की कॅमशाफ्ट हा प्रत्येक मोटारीच्या इंजिनमधला एक अत्यंत महत्वाचा पार्ट असतो. आणि या पार्टच्या कार्यक्षमतेवर इंजिनची आणि पर्यायाने गाडीची कार्यक्षमता अवलंबून असते. तुम्हाला पटकन आठवतील त्या सर्व देशी विदेशी गाड्यांमध्ये बहुधा प्रिसीजन मध्ये तयार झालेला कॅमशाफ्ट असतो. आपल्या भारतीय रेल्वेसाठी कॅमशाफ्टस् पुरवणारी प्रिसीजन ही एकमेव कंपनी आहे, या एकाच गोष्टीतही प्रिसीजनची महानता अधोरेखित होते. 


श्री यतीन शाह या धाडसी उद्योजकाने १९९२ साली या कंपनीची स्थापना केली. सोलापुरात. त्यानंतर या कंपनीने मागे वळून पाहिले नाही. काही लाखांपासून सुरू केलेला हा उद्योग आता काही 'शे' कोटींपर्यंत पोहोचलाय. प्रिसीजन ने नुकत्याच परदेशातील तीन कंपन्या acquire केल्या ! मी प्रिसीजनने तयार केलेले कॅमशाफ्टस् विकत घेत नाही, मी त्या कंपनीचा भागधारक नाही, माझे कोणीही नातेवाईक तिथे काम करत नाहीत. हा लेख मला प्रिसीजनने लिहायला सांगितलेला नाही. तरीही मला आज या कंपनीबद्दल आवर्जून सांगावसं का वाटतंय ?… आमची गाडी गेटमधून आत शिरली. आपण सोलापूरमध्ये नसून युरोपमधल्या एका शहरात आहोत असा फील आला. हिरवाईने नटलेला भाग. 
शिस्तीने लावलेली पण आनंदाने डवरलेली झाडं. 
स्वच्छ रस्ते. सुबक ठेंगण्या इमारती. माधवरावांनी आमचे हसतमुखाने स्वागत केले. Public Relations हे शब्द अक्षरशः जगणारे माधवराव देशपांडे मला जाम आवडतात. सतत नवीन काही ऐकण्याची आणि आवडलेलं काही शेअर करण्याची  उत्सुकता असलेले माधवराव आम्हाला स्वतः फॅक्टरी दाखवणार होते. आम्ही प्रिसीजनच्या एका प्रशस्त बोर्डरूममध्ये येऊन बसलो. आमचं तिथे येण्याचं प्रयोजन आणि स्वयं बद्दलच्या गप्पा सुरू होत्या. गप्पा सुरू असताना मी बोर्डरूम न्याहाळत होतो. माझ्या लक्षात आलं की कंपनीच्या नावाप्रमाणे अचूकता, शिस्त आणि aesthetics या संपूर्ण वास्तूच्या कणाकणात आहे. खाद्यपदार्थ, पाण्याच्या बाटल्या, आवश्यक स्टेशनरी इतकंच काय तिथे लागणारे रिमोट कंट्रोल्स सुद्धा अतिशय कलात्मक पद्धतीने मांडून ठेवले होते. प्रिसीजनच्या कारखान्यात लोखंडावर प्रक्रिया करणे हा त्या उत्पादन प्रक्रियेचा एक भाग आहे. अशा प्रकारच्या कारखान्यात जमीन काळीकुट्ट असणं, जमिनीवर ऑईलचे काळे डाग असणं हे 'गिव्हन' असतं. आम्ही अडीच तीन तास प्रिसीजनचे कारखाने पाहत होतो. पण आम्ही कारखाने पाहतोय की जहांगीर आर्ट गॅलरी पाहतोय हेच कळत नव्हतं. यात एकाही शब्दाची अतिशयोक्ती नाही. आत्ता सगळं सांगत बसणं शक्य नाही म्हणून एकच किस्सा सांगतो म्हणजे तुम्हाला इथल्या नीटनेटकेपणाची 'लेव्हल' कळेल. आम्ही स्टोअर रूम मध्ये होतो. तिथे raw material अतिशय कलात्मक पद्धतीने व छान बॉक्सेस मध्ये भरून ठेवलं होतं. इथवरही ठीक आहे. पण तिथले झाडू सुद्धा अप्रतिम रंगसंगती साधत रचून ठेवले होते ! तिथल्या एका कारखान्यात एक बोर्ड होता. त्यावर कारखान्याची ही इमारत कधी साफ करायची आहे, त्याची जबाबदारी कोणाकडे आहे, लेटेस्ट रंग कधी लावला होता याची विस्तृत माहिती लावली होती. तिथल्या प्रत्येक मशीनसमोर त्या मशीनमध्ये जाणारे raw material चकचकीत स्टीलच्या भांड्यांमध्ये छान पद्धतीने त्यांच्या महितीसाहित रचून ठेवलेले असते. आता बोला ! आम्ही एका ऑफिसमध्ये होतो. तिथल्या एका शेल्फवर रिमोट, मार्कर असे स्टिकर्स लावले होते आणि चमत्कार म्हणजे त्याच स्टिकर समोर ती वस्तू होती ! आम्ही या सगळ्याचं जेव्हा कौतुक केलं तेव्हा माधवराव हसून म्हणाले, 'आमचे यतीन सर म्हणतात, एकही कॅमशाफ्ट तयार झाला नाही तरी चालेल, पण कंपनीतल्या लोकांच्या अंगात आधी ही शिस्त आणि अचूकता भिनली पाहिजे.' 

आपल्याकडे बेशिस्तपणा, अघळपघळपणा आणि अव्यवस्थितपणाचे उदात्तीकरण करायची अनेकांना सवय आहे. जे व्यवस्थित राहतात त्यांची खिल्ली उडवायचीही एक परंपरा आहे. मला वाटतं हेच वैयक्तिक गुण मग सामाजिक होतात आणि रस्त्यावरची ती बीभत्स फ्लेक्सबाजी, बेशिस्त होर्डिंग्ज, कुठेही लटकणाऱ्या ओंगळ केबल्स याचं आपल्याला समाज म्हणून काहीच वाटेनासं होतं. वाळवी लागलेल्या जुन्या फाईल्सनी भरलेली ऑफिसे सवयीची होतात. गलथान नियोजन केलेले  रटाळ कार्यक्रम आपली संस्कृती होतात… प्रिसीजनला भेट दिल्यावर वाटलं, आपलं छोटंसं ऑफिस मी असं व्यवस्थित ठेवू शकतो का ? माझं घर मी नीटनेटकं ठेऊ शकतो का..? 

मग ठरवलं आपला turnover कदाचित आज प्रिसीजन इतका नसेल, पण आपण प्रिसीजनची याबाबतीत बिनधास्त कॉपी करायची ! स्वयं चं ऑफिस असेल, स्वयं चे कार्यक्रम असतील, आम्ही ते 'प्रिसीजन कल्चर' जगण्याचा प्रयत्न करतोय. वैयक्तिक जगण्यातला आणि कार्यसंस्कृतीमधला तो shabbiness, तो अव्यवस्थितपणा, ते clutter कमीकमी झालं की आयुष्य अधिक नितळ होत जातं. अधिक प्रसन्न होत जातं. स्वतःसाठी आणि इतरांसाठीही ! माधवरावांचा निरोप घेऊन आमची गाडी गेटमधून बाहेर पडत होती. प्रिसिजनच्या आवारातील एका ऑफिसच्या इमारतीकडे लक्ष गेलं. तिथल्या तावदानातील अनेक काचांपैकी एक काच फुटली होती. त्यावर त्याच काचेच्या आकाराचा एक कागद चिकटवला होता. त्यावर सुरेख अक्षरात लिहिलं होतं - Broken Glass. To be replaced by 25 July. मी मनातल्या मनात त्या 'प्रिसीजन कल्चर'ला नमस्कार केला. मनात आलं, माणसाच्या जगण्याचे दोनच प्रकार…प्रिसीजन आणि सामान्यजन !

 - नविन काळे

लेखक हे ‘स्वयं’ चे संस्थापक सदस्य आहेत.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

Related blogs


 

पितृपक्ष आणि रिसायकलिंग

शॉपिंगचा किडा चावूनही पुन्हा एकदा 'शुद्धीत' आणणाऱ्या एका अनोख्या अनुभवाबद्दल सांगतोय, नविन काळे

आता जोहराचं काय होणार?

तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यानंतर तिथल्या नागरिकांची होणारी जीवघेणी होरपळ आपण सगळेच जण पाहतोय. मात्र अशा...

एका नव्या प्रवासाची नांदी

‘अवकाश प्रवास’ (Space Tourism) हे स्वप्न आता येत्या दशकभरात सत्यात उतरणार आहे. जगातल्या मोठ्या उद्योगांनी त्यादृष्टीने पावले...