सहज सोपी सकारात्मक सोच - Welcome to Swayam Talks
×

सहज सोपी सकारात्मक सोच

पराग खोत

कोरोना परिस्थिती, लशींचा तुटवडा, तोत्के वादळाची भीती या सगळ्यांमुळे आलेली हतबलता आपल्याला सतावतेय. मात्र कुठल्याही संघर्षाच्या वेळी एक सामान्य माणूस स्वबळावर ते युद्ध जिंकून देऊ शकतो, याची प्रचिती आपण अनेकदा घेतलीय. आज पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती करण्याची वेळ येऊन ठेपली आहे, सांगतोय पराग खोत.
 

Published : 17 May, 2021

सहज सोपी सकारात्मक सोच

आज नकारात्मकतेने कळस गाठलाय. आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या आणि घडत नसलेल्या सुद्धा गोष्टींचं नकारात्मक ग्लोरिफिकेशन करुन आपल्यासमोर मांडलं जातंय. विचार करायला सुद्धा वेळ मिळू न देता या सर्व बातम्या आपल्यावर व्यवस्थित हॅमर केल्या जाताहेत. आपल्या मदतीवर अवलंबून असलेले देश आता आपल्याला मदत करण्याची भाषा करु लागले आहेत. हे सर्व आपल्या लक्षात येतंय का? ते कोण करतंय, का करतंय ते महत्त्वाचं नसून त्यातून आपण बाहेर कसं पडावं याचं सोप्पं गणित मांडूया.

आजचीच गोष्ट घ्या. कोरोनाची कायम असलेली भीती, त्यातच एका खासदाराचा झालेला दुर्दैवी मृत्यू, इस्राएल आणि हमास मधला वाढता संघर्ष, तोत्के वादळाने घडवून आणलेला विध्वंस, अपुऱ्या पुरवठ्यामुळे बंद पडलेली लसीकरण मोहीम अशा लोकल ते ग्लोबल बातम्यांतून नकारात्मकतेचा डोस आपण प्रसारमाध्यमातून घेतला. त्यासोबतच राजकीय आरोप, भ्रष्टाचाराची नवनवी प्रकरणं, निवडणूका आणि नियमांची पायमल्ली, रोज लागणाऱ्या आगी, लस मिळविण्यासाठीची सामान्यांची धडपड आणि कधी नव्हे इतक्या जवळून होत असलेलं मृत्यूचं दर्शन याचा भार आहेच. हे सर्व डोक्यावर घेण्याची आपली क्षमता आहे का? मुळात याची आवश्यकता आहे का? हे सर्व कधी थांबणार आणि कोण थांबवणार?

या प्रश्नाचं साधं उत्तर आहे - आपण. ‘विचार करतो तो माणूस’ अशी जर आपली व्याख्या केली असेल तर आज आपण त्या व्याख्येला जागतो आहोत का? आपली विचार करण्याची क्षमता खुंटली आहे का किंवा ती मारुन टाकण्याचा प्रयत्न होतोय का? सर्वसामान्यांना पद्धतशीरपणे Target केलं जातंय का? गोंधळांचं वातावरण निर्माण करुन आपला स्वार्थ साधला जातोय का? परस्परविरोधी विधानं आणि कृती करणारे राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते यामुळे आपण भांबावून गेलोय का? सोबतच निसर्गाची अवकृपा झाल्यागत एकामागोमाग एक आपत्ती आपल्यावर कोसळताहेत का? याचा नीट विचार करण्याची आवश्यकता निर्माण झालीय. संघर्षाला पर्याय नाही. तो युगानुयुगे सुरुच आहे. आज तो तीव्र करावा लागणार आहे एवढंच. तो करण्याची आपली क्षमता आपल्याला टिकवून ठेवावी लागणार आहे इतकंच.

या क्षणाला एक मोठ्ठा पॉझ घ्यावा आणि आपली स्वत:ची जीवनशैली तयार करावी हे उचित ठरेल. भीती ही सार्वकालिक भावना आपल्या मनातून दूर झाली की बरेच प्रश्न सुटू शकतील. आपले आरोग्य उत्तम आहे आणि ते आपणच राखायचे आहे या गोष्टीपासून सुरवात करु. बाहेर जी काही नियमावली आहे ती पाळून आपण घरात किंवा घराबाहेर नियमित व्यायाम करु शकतोय. हसतखेळत कुटुंब आणि मित्रमंडळींसोबत संवाद साधू शकतोय. घरुन काम सुरु आहेच. फारशी आर्थिक ओढाताण नाही. जमेल तेव्हा इतरांना मदत करण्याची आपली वृत्ती आणि परिस्थिती आहे. मग कुठे चुकते आहे की ज्यामुळे आपण अस्वस्थ आहोत? तर नको त्या गोष्टी केल्यामुळे आपण दु:खी होतोय.

काही गोष्टी करण्याचे प्रयत्नपूर्वक टाळता येईल का याचा विचार करुया. लस मिळवण्यासाठीची धडपड थांबवूया. ती योग्य वेळी प्रत्येकाला मिळणारच आहे. तोत्के वादळ कसं पुढे सरकतंय याची लिंक बघण्याचे टाळूया. तुम्ही पाहिलं न पाहिल्यानं ते त्याची दिशा बदलणार नाही. वृत्तवाहिन्यांवरच्या सततच्या बातम्या आणि व्हाट्सअप वरचं ज्ञान हे आपल्याला अपडेट ठेवत नाही तर अपसेट करतं म्हणून त्याच्यापासून दूर राहूया. कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा धोका टाळण्यासाठी काय करावं याचा विचार आत्तापासून नको करुया. कदाचित ती येणारच नाही किंवा आली तरीही आपल्याला कळणारही नाही इतकी सौम्य असेल.

आपण जसे आहोत तसेच राहूया. सर्वसाधारण नियम पाळले तरी आपण सगळ्या आजारांपासून दूर राहू शकतो ही सकारात्मकता अंगी भिनवूया. फार काही विशेष करायची गरज नाही. एक दु:स्वप्न म्हणून या सगळ्याकडे पाहिलं की नवी पहाट उजाडणार आहे याची खात्री पटेल. एक प्रिस्क्रिप्शन म्हणून वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्या, समाजमाध्यमं आणि वैयक्तिक संवाद यातल्या सगळ्या नकारात्मक बातम्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुया. शतकानुशतके अशी परिस्थिती येतेच आहे. अनेक साथीचे रोग येऊन गेले, महायुद्धे संपली, आर्थिक मंदी सरली तरी हा समाज टिकून आहे. आपण सखोल विचार करुन सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या प्रत्येकच गोष्टीकडे दुर्लक्ष करुया. हे ही दिवस जातील हे आपण अनुभवत आलो आहोच.

आपल्याला भीतीच्या सावटाखाली ढकललं जातंय आणि तसं करण्यामागे काहींचे हितसंबंध गुंतलेले आहेत. त्यात आंतरराष्ट्रीय राजकारण, फार्मा लॉबीज, अब्जावधींचे व्यवहार आणि इतरही बऱ्याच गोष्टी अंतर्भूत असू शकतात. या सगळ्यांचा बीमोड एक साधा माणूस वैयक्तिक पातळीवर करु शकतो हे समजून घेऊया. मी या व्यवस्थेचाच एक भाग आहे आणि त्याच्यावर मी भार होणार नाही असा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन अशी प्रतिज्ञा करुया. आपल्यासोबत नेहमीप्रमाणे ती अदृश्य शक्ती आहेच. आपण आपलं, आपल्या कुटुंबाचं आणि आपल्या समाजाचं स्वास्थ्य राखलं तर या भयानक आजारापासून आपलं संरक्षण करण्यासाठी अहोरात्र लढणाऱ्या यंत्रणेवरचा ताण आपण कमी करु शकतो याची जाणीव ठेवूया. मग त्यात सगळेच आले. आपलं सरकार, आपले कोरोना योध्दे, आर्थिक मदत करणारे उद्योजक, खेळाडू आणि इतर सर्वच. या लढाईत आपल्यासाठी लढणारी ती सगळी आपलीच माणसं आहेत. आपली एक सहज साधी सकारात्मक सोच या सगळ्यातून बाहेर पडायला आपल्याला मदत करेल हे निश्चित.

जे आपल्या आवाक्यात आहे ते करण्याची बुद्धी आणि जे आवाक्याबाहेर आहे त्याकडे दुर्लक्ष करण्याची शक्ती आपल्या सर्वांना मिळू दे. मात्र काय शक्य आणि काय अशक्य हे समजण्याचा आणि पारखून घेण्याचा शहाणपणा त्या जगन्नियंत्याने आपल्याला द्यावा अशी प्रार्थना करुया.

-पराग खोत

लेखक हे स्वंयच्या Content Team चे सदस्य आहेत.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

Related blogs


 

पितृपक्ष आणि रिसायकलिंग

शॉपिंगचा किडा चावूनही पुन्हा एकदा 'शुद्धीत' आणणाऱ्या एका अनोख्या अनुभवाबद्दल सांगतोय, नविन काळे

आता जोहराचं काय होणार?

तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यानंतर तिथल्या नागरिकांची होणारी जीवघेणी होरपळ आपण सगळेच जण पाहतोय. मात्र अशा...

एका नव्या प्रवासाची नांदी

‘अवकाश प्रवास’ (Space Tourism) हे स्वप्न आता येत्या दशकभरात सत्यात उतरणार आहे. जगातल्या मोठ्या उद्योगांनी त्यादृष्टीने पावले...