परवा आमचा मित्र नीरज गांगल दक्षिण कोरियातल्या एका सोशल मीडिया ट्रेंडबद्दल सांगत होता.
या ट्रेंडचे नाव आहे - मुकबांग !
कोरियन भाषेत मुक - जा म्हणजे 'खाणे'. बांग - सॉंग म्हणजे प्रक्षेपित करणे.
तेव्हा, मुकबांग म्हणजे आपल्या खाण्याचे प्रक्षेपण !
टीव्हीवरचे किंवा सोशल मीडियावरचे 'कुकिंग' व्हिडियो पाहायची आपल्याला सवय आहे. पण मुकबांग व्हिडिओज मध्ये आपल्याला स्क्रीनवर खाद्यपदार्थांनी भरलेलं एक भलं मोठ्ठं ताट घेऊन बसलेली एक व्यक्ती दिसते. जणू काही ती व्यक्ती आणि आपण एका टेबलवर बसून एकत्र जेवतोय, या थाटात ती व्यक्ती आपल्याशी स्क्रीनवरून गप्पा मारते. आणि अर्थातच समोरच्या ताटातले विविध पदार्थ खात राहते. या व्हिडियोमधील मिटक्या मारत खाण्याचे, भुरके मारण्याचे, तोंडाचे पचपच आवाज हा त्या व्हिडीओमधील सर्वात महत्वाचा भाग असतो असं मानतात.
नीरजकडून याबद्दल ऐकल्यावर 'हा काय प्रकार आहे' म्हणून युट्युबवर गेलो. 'कुणी जेवत असेल तर त्याच्याकडे पाहू नये' अशा संस्कारात वाढलेल्या माझ्यासमोर अनेक माणसे बकाबका-मिटक्या मारत जेवत होती. पण पंगतीत नव्हे, तर आपापल्या चौकटीत. एकेका चौकटीला लाखो व्ह्यूज होते.
ही 'गंमत' फक्त मलाच माहीत असल्याच्या अविर्भावात मोठ्या उत्साहाने मी घरात मोठ्या उत्साहाने 'मुकबांग'बद्दल सांगायला लागलो. इतक्यात आमचं बारा वर्षाचं अपत्य पट्कन उद्गारलं - 'अच्छा !! ASMR !!'
मग गुगल समोरच्या 'Confession Box' मध्ये मुकबांग आणि ASMR ही अक्षरं टाकली. ASMR म्हणजे Autonomous Sensory Meridian Response. It is a tingling sensation that typically begins on the scalp and moves down the back of the neck and upper spine. 'मुकबांग' मध्ये खाणाऱ्या माणसाच्या तोंडाच्या आवाजांनी म्हणे हा ASMR जागृत होऊन पाहणाऱ्या लोकांना छान वाटतं.
पण सगळ्यात सुन्न करणारी गोष्ट अशी आहे की, आज जगातली एकाकीपणाने ग्रासलेली माणसे प्रामुख्याने मुकबांग व्हिडियोज पाहतायत.. यात फक्त वृद्ध नाहीत तर मोठ्या संख्येने तरुण वर्ग देखील आहे. स्क्रीनवर जेवणाऱ्या त्या व्यक्तीमध्ये ही एकटी माणसं सहभोजनासाठी 'कंपनी' शोधतायत. हे आता सांगायचीही गरज नाही, की 'मुकबांग' ट्रेंडचे भारतात आगमन झालंय व त्यांनाही भरघोस प्रतिसाद मिळतोय.
एका कॅमेऱ्यासमोर बसून लाखो लोकांशी गप्पा मारत जेवणारा तो एकटा माणूस आज डॉलर्समध्ये पैसे कमावतोय.
फक्त, स्क्रीनवर जेवणारा आणि त्याला पाहणाऱ्या लाखो लोकांमध्ये नक्की एकटं कोण आहे हा खरा प्रश्न आहे.
- नविन काळे
लेखक हे ‘स्वयं’ चे संस्थापक सदस्य आहेत.