ग्रेट माणसं ही अत्यंत सजग असतात. वरकरणी छोट्या वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा जाणीवपूर्वक करणे त्यांना जमते. त्या साठी आवश्यक तो वेळ ती काढतात. मोठ्या माणसांच्या या प्रभावी सवयींचे मर्म उलगडून सांगतोय नविन काळ.
दोन तीन वर्षांपूर्वीची गोष्ट.
आमचे एक ज्येष्ठ मित्र आहेत, श्रीकांत देव.
मी आणि आशय त्यांच्या पुण्यातील ऑफिसमध्ये गेलो होतो. जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर ज्या बहुविध गोष्टींवर कार्यरत असतात, त्यातील एका टीममध्ये देव साहेब आहेत. देव साहेब आणि आमच्या गप्पा चालू असताना मध्येच देव साहेब म्हणाले, 'आज ऑफिसमध्ये डॉक्टर आहेत. भेटायला आवडेल का? आम्ही 'नाही' म्हणायचा प्रश्नच नव्हता.
देव साहेबांनी डॉक्टरांना आमची ओळख करून दिली. डॉक्टरांनी आम्हाला काही प्रश्न विचारून बोलतं करायचा प्रयत्न केला. सुरुवातीचं दडपण आता थोडं कमी झालं. आम्ही 'स्वयं'च्या माध्यमातून काय करतोय हे थोडक्यात सांगत असताना डॉक्टरांचे संपूर्ण लक्ष आमच्या बोलण्याकडे होते. ना त्यांनी एकदाही त्यांचा फोन मधेच 'चेक' केला, ना ते आम्हाला मध्येच अडवून त्यांचं म्हणून काही सांगत होते. आमचं पूर्ण बोलून झाल्यावर काहीतरी आठवून केल्यासारखं ते म्हणाले, “आत्ता जे तुम्ही सांगताय त्याच्या जवळ जाणारं असं काही मी अमुक साली तमुक ठिकाणी बोललो होतो.” डॉक्टर इथेच थांबले नाहीत, त्यांनी त्यांच्या स्वीय सचिवाला फोन करून त्यावेळचे भाषण मागवले. पुढल्या पाच मिनिटांत ते भाषण आमच्या टेबलवर होते. (गोष्टी किती organized असाव्यात याचं हे उदाहरण!) डॉक्टरांनी लगेच त्या अमुक पानावरचा 'तो' संदर्भ आम्हाला दाखवला. ते भाषण सात आठ वर्षांपूर्वीचे होते. डॉक्टरांची या वयातही तीक्ष्ण स्मरणशक्ती असणे हा ग्रेट भाग आहेच पण त्यापेक्षा हे लक्षात आलं की तुम्ही जेव्हा तुमच्या कामावर प्रेम करता (किंवा तुमचं प्रेम असलेल्या गोष्टीत काम करता) तेव्हा तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवण्याची 'तसदी' घ्यावी लागत नाही. डॉक्टर माशेलकरांबरोबर आम्ही अगदीच वीस पंचवीस मिनिटं असू, पण ती माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय भेटींपैकी एक ठरली.
गप्पा मारत बसलो तर असे शेकडो अनुभव सांगता येतील. पण मोठी माणसं 'मोठी' का असतात हा प्रश्न आजही माझ्या अभ्यासाचा विषय आहे. कारण रोज भेटणारा प्रत्येक माणूस काहीतरी नवीन शिकवून जातो.
कामाच्या निमित्ताने विविध विषयांत आणि क्षेत्रांत काम करणाऱ्या व्यक्तींना भेटणं होतं. गेल्या आठ वर्षांत चित्रकार, अभिनेते, राजकारणी, समाजसेवक, पोलीस अधिकारी, उद्योगपती, शास्त्रज्ञ, खेळाडू, शेतकरी, उद्योजक अशा शेकडो लोकांना प्रत्यक्ष भेटण्याचा आणि त्यांच्याशी दीर्घ संवाद साधायचा योग आला. भेटलेली सगळी माणसं सर्वार्थाने परफेक्ट होती, असं म्हटलं तर तो ढोंगीपणा होईल.
आजवरच्या अनुभवांचा लसावि काढला तर लक्षात येतं की या माणसांकडे त्यांच्या technical talent पेक्षा अधिक असं काहीतरी असतं. या देशातील करोडो माणसं क्रिकेट खेळतात पण सचिन एकच आहे. शेकडो अभिनेते आहेत पण अमिताभ त्या सर्वांमध्ये 'उंच' आहे. काय विशेष असतं या ग्रेट लोकांमध्ये? सचिन आणि बच्चन साहेबांना भेटायचा योग अजून तरी नाही आला. पण आजवर ज्या ज्या ग्रेट लोकांना भेटलो त्या सगळ्यांमध्ये काही common qualities पाहायला मिळतात. ही माणसं वेळ पाळतात. स्वतःच्या आणि इतरांच्या वेळेच्या बाबतीत ही माणसं काटेकोर असतात. ते खूप चांगले listeners असतात. बोलताना तुमचं काही आवडलं तर ते नोंदवून घेताना त्यांना कमीपणा वाटत नाही. 'नक्की येतो' वगैरे खोटी आश्वासनं ते देत नाहीत. खूप चांगल्या पद्धतीने 'नाही' म्हणायची कला त्यांना अवगत असते. त्यांचा मोठेपणा ते तुमच्यावर लादत नाहीत. ते मोठे आहेत हे त्यांना त्यांच्यापुरतं ठाऊक असतं. ते तुमच्याशी खूप छान वागतात आणि त्याचवेळी ते आणि तुमच्यामध्ये एक छान अंतर राखतात. त्यांच्या विषयांत ते पारंगत असतातच पण तुमच्याही विषयात ते रस घेतात. त्यांच्यात लहान मुलांमधली उत्सुकता असते. ते चांगलंचुंगलं वाचतात, पाहतात. ते अनुभव समृद्ध असतात. त्यांचा सेन्स ऑफ ह्यूमर मस्त असतो. ते शक्यतो गॉसिप करत नाहीत. कुणाविषयी वाईट बोलायचं झालंच तर ते त्या व्यक्तीला XYZ वगैरे म्हणतात. ते तुम्हाला सन्मानाने वागवतात. आपल्या मेसेजेस, ईमेल्सना ते त्यांच्या सवडीने पण न चुकता उत्तरं देतात.
कोणी म्हणेल, यात ग्रेट काय ? हे सगळेच करतात.
तुम्हाला ऐकून धक्का बसेल, पण वरकरणी सोप्या वाटणाऱ्या गोष्टी अनेक लोकं नाही करत. खोल अभ्यास केल्यावर आपल्या लक्षात येईल की या ग्रेट लोकांनी अत्यंत बेसिक पण महत्वाच्या गोष्टींवर जाणीवपूर्वक काम केलंय. या गोष्टी अंगात भिनायला कष्ट उपसलेत. 'ग्रेट' होण्याच्या नादात आपण ज्ञानार्जन करत राहतो, आपापल्या क्षेत्रात ज्ञानी वगैरेही होतो. पण या मूलभूत गोष्टी मात्र विसरतो. या छोट्या छोट्या गोष्टीच माणसांना मोठं करतात.
Things that brought you here, cannot take you there!
'तिथे' पोहोचायला काहीतरी extra लागतं.
कुठल्याही विद्यापीठाच्या डिग्रीत ते 'extra' मिळत नाही.
कितीही पैसे देऊन एखाद्या दुकानात ते 'extra' मिळत नाही.
गंमत म्हणजे, ते 'extra' मिळवण्यासाठी कुठेच जायची गरज नाही.
ते आपल्या आतच आहे.
जगाच्या दृष्टीने तुम्ही 'मोठे' व्हाल सुद्धा.
पण तेव्हाही ते 'extra' टिकवून ठेवण्यात खरं मोठेपण आहे.
नविन काळे
लेखक 'स्वयं टॉक्स'चे संस्थापक सदस्य आहेत.