कृपाळूपणे अल्प धारिष्ट्य पाहे ! - Welcome to Swayam Talks
×

कृपाळूपणे अल्प धारिष्ट्य पाहे !

नविन काळे

औरंगाबादमधील एका कार्यक्रमात अवचितपणे रामदास स्वामींच्या दोन ओळी कानावर पडल्या आणि अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली. मन शांत झालं. काय होत्या त्या ओळी ? 
 

Published : 3 February, 2020

कृपाळूपणे अल्प धारिष्ट्य पाहे !

काल मी आणि आशय कामानिमित्त औरंगाबादमध्ये होतो.

डॉ हेडगेवार रुग्णालयात.

हॉस्पिटलच्या HR विभागाच्या एका कार्यक्रमाला गेलो होतो.

HR कर्मचाऱ्यांच्या 'Monthly Meeting'ला यावेळी कुटुंबातील सदस्यांना आमंत्रित केले होते.

या निमित्ताने त्यांना कळावं की, आपला मुलगा/ नवरा, आपली बायको/ मुलगी/ सून हॉस्पिटलमध्ये काम करतात म्हणजे नक्की करतात तरी काय !

प्रत्येकाने येऊन जानेवारी महिन्यात आपण काय काम केले याचे presentation दिले.

सर्वात लक्षात राहिलं ते तिथे काम करणाऱ्या मावशींनी दिलेलं presentation !

HR मध्ये येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांना चहा पाणी देणाऱ्या मावशी आता स्वतः कम्प्युटर चालवायला शिकल्या, कागद स्कॅन करतात, इतकंच नाही तर वेळप्रसंगी रुग्णालयात नवीन रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचे छोटेसे induction देखील घेतात !

या मावशींनी आपल्या आयुष्यातील पहिले PPT presentation त्या दिवशी रुग्णालयाच्या CEO साहेबांसमोर केले.

थोडंसं घाबरत. अगदी साध्या शब्दात. आपल्या छोट्या छोट्या कृतींमुळे डिपार्टमेंटचा कारभार कसा सुरळीत चालू राहिला, वगैरे ! त्यात मॅनॅजमेन्टचे कुठलेच जडबंबाळ शब्द नव्हते. आकडे नव्हते, ग्राफ्स नव्हते. होतं ते प्रांजळ निवेदन. फारच कौतुक वाटलं मावशींचं !

समारोप अर्थातच रुग्णालयाचे CEO असलेल्या डॉ तुपकरी सरांनी केला.

तुपकरी सर भाषण करत नाहीत. साधं पण छान खुसखुशीत बोलतात. त्यांचा प्रत्येक शब्द स्वयंभू असतो. त्याला कुठल्याही मुलाम्याची गरज नसते. बोलता बोलता सर जुन्या आठवणींच्या गल्लीत भटकून आले.

खिशात पैसे नसूनही काहीतरी करून दाखवायची जिद्द असलेले मेडिकलचे सात विद्यार्थी एकत्र काय आले आणि या हॉस्पिटलची स्थापना झाली. सर हसून म्हणाले, 'पुढे काय होईल हे तेव्हाही माहीत नव्हतं. आजही माहीत नाही !

आला दिवस आनंदाने आणि कष्टाने घालवायचा हेच शिकलो. मला आज एकाने विचारलं, पुढचे प्लॅन्स काय आहेत?

मी म्हटलं, उद्या मला नांदेडला जायचंय इतकंच माहित्ये !'

तुपकरी सर बोलत असताना एका कर्मचाऱ्याचं लहान मूल मस्ती करता करता स्टेजवर आलं !

एखादा 'CEO' वैतागला असता, घेऊन जा याला वगैरे म्हणाला असता.

तुपकरी सर शांतपणे बोलतच राहिले. उलट बोलण्याच्या ओघात त्याला म्हणाले, बस रे इथे !

इतकी सहजता, इतका शांतपणा सरांनी कसा कमावला असेल ?

तुपकरी सर सहजतेने म्हणाले, पूर्वी डॉक्टर म्हणून काम करायचो तेव्हा वाटायचं मला कसलं व्यसन नाही, चैन नाही. मग मिळणाऱ्या पैशांचं करायचं काय ? हेडगेवार रुग्णालयाच्या उभारणीत नऊ वर्ष एकही पैसे न घेता काम केलं !

अडचणी येतात. संकटं येतात. तेव्हा थोडा वेळ शांत बसायचं. मग अडचणींवर मात करण्याची शक्ती येते.

मग बोलता बोलता सरांनी जी ओळ म्हटली, ती मनातून जाता जात नाहीये.

रात्री ती ओळ गुगल केली - कृपाळूपणे अल्प धारिष्ट्य पाहे !

रामदासांच्या मनाचे श्लोकातील छत्तीसाव्या श्लोकातील पहिल्या दोन ओळी समोर आल्या आणि थबकलोच तिथे.

सदा सर्वदा देव सन्नीध आहे ।

कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ॥

देव आपल्या जवळच आहे. हा 'देव' म्हणजे नक्की कोण ? तर, संकटांशी सामना करण्याची आपल्यातली सुप्त शक्ती म्हणजेच देव !

कठीण प्रसंगात तुम्ही धैर्याचं किमान एक पाऊल तरी उचलताय की नाही - हे 'तो' पाहतोय - 'कृपाळूपणे'!

रवींद्रनाथांच्या एका कवितेत खूप छान ओळी आहेत -

विपत्ति मध्ये तू माझे रक्षण कर ही माझी प्रार्थना नाही.
विपत्ती मध्ये मी भयभीत होऊ नये इतकीच माझी इच्छा!!

माझे रक्षण तू करावेस, मला तारावेस ही माझी इच्छा नाही,
तरून जाण्याचे सामर्थ्य माझ्यात असावे इतकीच माझी इच्छा !

काही प्रसंग, काही संवाद, काही क्षण तुम्हाला आयुष्यभर पुरेल असं काही देऊन जातात. तुपकरी सरांच्या तोंडून अगदी सहजपणे आलेला 'कृपाळूपणे अल्प धारिष्ट्य पाहे !' म्हणायचा तो कालचा क्षण असाच आहे बहुदा.

परवाचा दिवस जसा आला तसा गेला..आजच्या दिवसाचीही रात्र झाल्यावर राख होणारे.

कालचा दिवस कधी मावळणार नाही.

- नविन काळे

लेखक हे ‘स्वयं’ चे संस्थापक सदस्य आहेत.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

Related blogs


 

पितृपक्ष आणि रिसायकलिंग

शॉपिंगचा किडा चावूनही पुन्हा एकदा 'शुद्धीत' आणणाऱ्या एका अनोख्या अनुभवाबद्दल सांगतोय, नविन काळे

आता जोहराचं काय होणार?

तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यानंतर तिथल्या नागरिकांची होणारी जीवघेणी होरपळ आपण सगळेच जण पाहतोय. मात्र अशा...

एका नव्या प्रवासाची नांदी

‘अवकाश प्रवास’ (Space Tourism) हे स्वप्न आता येत्या दशकभरात सत्यात उतरणार आहे. जगातल्या मोठ्या उद्योगांनी त्यादृष्टीने पावले...