भाषणांचा कार्यक्रम ? तोही तिकीट काढून ? - Welcome to Swayam Talks
×

भाषणांचा कार्यक्रम ? तोही तिकीट काढून ?

नविन काळे

भाषण म्हणजे बोअरिंग, व्याख्यान म्हणजे रटाळ अशा perceptions मधून बाहेर पडत 'स्वयं'चे प्रेक्षक तिकीट काढून कार्यक्रम हाऊसफुल्ल करतायत. प्रेक्षकांना price आणि value यातला फरक समजावून सांगण्याच्या या प्रवासाबद्दल सांगतोय नविन काळे
 

Published : 7 September, 2020

भाषणांचा कार्यक्रम ?  तोही तिकीट काढून ?

मी गिरगावात लहानाचा मोठा झालो. बाबासाहेब पुरंदरे, राम शेवाळकर, अटलबिहारी वाजपेयी, शंकर वैद्य, बाळासाहेब ठाकरे, शिवाजीराव भोसले या मंडळींची 'लाईव्ह' भाषणे / व्याख्याने प्रत्यक्ष ऐकणे हा त्यावेळच्या सांस्कृतिक जडणघडणीचा भाग होता. 'लाईव्ह' ऐकता ऐकता भारावून जाण्यात आणि एकूणच त्या माहोलची एक वेगळीच नशा आहे याची जाणीव झाली होती.पुढे काळ बदलला. टीव्ही, मोबाईल वगैरे माध्यमांमुळे वक्त्यासमोरची गर्दी आटू लागली. प्लास्टिकच्या रिकाम्या खुर्च्या, रिकाम्या मळलेल्या सतरंज्या, खुडखुड आवाज करणारा पंखा, मध्येच कानठळ्या बसवणारे कुsssई आवाज करणारे माईक्स, समोर बसलेले संस्थेचे कार्यवाह, काही गृहिणी, दामटवून बसवलेली काही लहान पोरं, ज्याला समोरच्या कार्यक्रमात जराही इंटरेस्ट नसतो असा साऊंडवाला पोरगा आणि काही हौशी पेन्शनर्स… अशा काही 'चकटफु' कार्यक्रमात उत्तमोत्तम वक्ते आणि विषय सडून जाताना पाहत होतो. कार्यक्रमाच्या नियोजनाचा अभाव म्हणजे जणू आपल्या लोकांचे बलस्थान ! कार्यक्रम वेळेत सुरू न होणे, वक्त्याची ओळख अत्यंत रूक्षपणे करणे, अत्यंत रटाळ सत्कार समारंभ, कंटाळवाणी स्वागत गीते आणि मुख्य वक्त्याचे भाषण झाल्यावर एक लांबलचक आभार प्रदर्शन-कम-सुचना-कम संस्थेतील आनंदी / दुःखी बातम्या वाचन आणि कार्यक्रमानंतरच्या अल्पोपहाराला अचानक होणारी गर्दी…या सगळ्यात मूळ भाषण, विषय आणि वक्ता त्या फळ्यावरच्या पुसट झालेल्या अक्षरांत उरले होते.

का माहीत नाही, हे चित्र बदलायला हवं असं मनोमन वाटत होतं. भाषणे / व्याख्याने हे माध्यम पुनर्जीवित करायचं असेल, रसिक बुद्धिवादी प्रेक्षकांना पुन्हा एकदा या माध्यमाकडे खेचायचं असेल त्या फॉरमॅट मध्येच काही मूलभूत बदल करावे लागणार होते.त्या दृष्टीने जो विचार झाला, होतोय त्या प्रयत्नाचे नाव आहे - स्वयं टॉक्स !स्वयं कल्पनेची उभारणी होत असतानाच एका गोष्ट पक्की केली होती की हा कार्यक्रम 'free' करायचा नाही, याचं तिकीट असलं पाहिजे ! यात दोन उद्देश होते. एक म्हणजे पैसे देऊन तिकीट काढणारा माणूस हा कार्यक्रम अधिक गांभीर्याने घेईल. त्याची या सगळ्या प्रयत्नाशी एक बांधिलकी राहील. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे, तिकीट काढल्यामुळे प्रेक्षक या कार्यक्रमातून व आपल्याकडून value addition ची अपेक्षा करतील व ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण बांधील राहू. या value मध्ये दोन्ही गोष्टी आल्या. एक म्हणजे कार्यक्रमाचा content आणि दुसरं म्हणजे त्या कार्यक्रमाचा एकूण अनुभव.यातल्या पहिल्या भागाकडे नंतर येऊ.कार्यक्रमाचा एकूण अनुभव सुरू होतो तो प्रेक्षकाने ऑनलाइन तिकीट काढणे या प्रक्रियेपासून. तो अनुभव कसा आहे? कार्यक्रमाच्या आधी मेसेजेसमधून मिळणारी कार्यक्रमासंबंधित माहिती, संपर्क क्रमांक, पार्किंग मिळेल की नाही, चहापान असेल की नाही इतक्या बारीक सूचना…मग कार्यक्रमाचे ठिकाण, तिथले एकूणच वातावरण कसे आहे ? त्यांचे स्वागत करण्यासाठी आमचे कुणी प्रतिनिधी आहेत ना, टॉयलेट स्वच्छ आहेत ना ? सर्वांना चहा / अल्पोपहार / जेवण व्यवस्थित मिळतंय ना, आसन व्यवस्था आरामदायी आहे ना ? एसी सुरू आहे ना ? कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी त्यांच्या कानावर काय प्रकारचं संगीत पडतंय ? कार्यक्रम वेळेत सुरू होतोय ना ?…. स्वयं च्या बाबतीत सांगायचं तर या आणि अशा बारीक बारीक गोष्टींचा केवळ विचारच होत नाही तर या सर्व गोष्टी आणि वाटून दिलेल्या जबाबदाऱ्या यांची एक लेखी चेक लिस्ट असते व त्याचे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असते.खुद्द कार्यक्रमाच्या production value बाबतीत आम्ही कमालीचे चोखंदळ आणि काही प्रमाणात आग्रही आहोत. सभागृहाची निवड, स्टेज कसं आहे, lights चा उत्तम वापर व त्यासाठी आवश्यक कुशल तंत्रज्ञ, उत्तम साऊंड (ध्वनी व्यवस्था), LED Wall, नेपथ्य, camera angels यावर वादविवाद चर्चा झाल्यावरच गोष्टी पूर्णत्वाला जातात.संपूर्ण कार्यक्रमाचे 'मिनिट टू मिनिट' नियोजन तयार असतं. कार्यक्रमात मांडले जाणारे विषय लोकांना आवडतील, त्यांना काही नवं देतील, त्यांना हादरवून टाकतील, त्यांना खुर्चीला खिळवून ठेवतील या प्रकारचे असावेत यासाठी खूप विचार झालेला असतो. यासाठी संबंधित वक्त्यांकडून चोख तयारी करून घेण्यात येते (याबद्दल पुढच्या एका भागात पाहू !), प्रस्तावना वा समारोप जो कोणी स्वयं कार्यकर्ता करेल त्याची स्क्रिप्ट तयार असते…डॉ उदय निरगुडकरांचे प्रश्न व त्यावर वक्त्यांची उत्तरे,  प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद आणि कार्यक्रमाच्या दरम्यान क्वचित उत्स्फूर्तपणे घडणाऱ्या घटना सोडल्यास या संपूर्ण कार्यक्रमाची 'रंगीत तालीम' आमच्या ऑफिसमध्ये आधीच घडलेली असते ! त्यामुळे काही गोष्टींचा अपवाद सोडल्यास, पहिल्या प्रेक्षकाने सभागृहात पाय ठेवल्यासपासून शेवटचा प्रेक्षक बाहेर जाईपर्यंतचा सगळा कार्यक्रम आमच्या टीमने आधीच पाहिलेला असतो !लोकांना अपेक्षित असलेल्या value पेक्षाही काही अधिक आपण देऊ शकतो का याबद्दल आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो.भाषण म्हणजे बोअरिंग, रटाळ.. व्याख्यान म्हणजे 'दिमाग का दही'… अशा perception मधून लोकांना बाहेर काढायचं असेल तर आधी त्या विषयांमध्ये असलेला preaching चा दर्प काढावा लागेल.. एखादा विषय रंजकपणे मांडला तर लोकांना तो भावतो. लोकांना चांगलं ऐकायला पाहायला आवडतं यावर मुळात आपला विश्वास असावा लागतो. त्यांना तुमच्या प्रवासात सहप्रवासी करायचं असेल तर त्यासाठी एकच प्रभावी माध्यम आहे, ते म्हणजे storytelling ! लोकांना तुमची गोष्ट आवडली तर ते तुमच्यासोबत हसतात, रडतात, अस्वस्थ होतात, तुमची गोष्ट आणखी चार लोकांना सांगतात, तुमच्या गोष्टीशी कायमचे जोडले जातात.Swayam Talks is all about storytelling.
 
भाषणाच्या कार्यक्रमाला तिकीट काढून कोण येईल?
हा प्रश्न विचारून 'स्वयं'च्या पहिल्या दोन वर्षी आम्हाला सगळ्यांनी वेड्यात काढलं. पण शांत राहून, प्रसंगी तोटा पत्करून आम्ही आमच्या पद्धतीने काम करत राहिलो. आज स्वयं चा कार्यक्रम हाऊसफुल्ल होतो तेव्हा खरा विजय या मूळ कल्पनेचा होत नाही तर त्या कल्पनेवर विश्वास दाखवणारा रसिक प्रेक्षक जिंकत असतो. 'सर्वार्थाने अपेक्षित value' त्यांना स्वयंमध्ये नक्की मिळते. आणि त्याहीपेक्षा आपल्यासारख्या समविचारी मंडळींनी हे सभागृह तुडुंब भरलंय हा आनंद त्यांच्यासाठी कदाचित जास्त मोठा असतो !

- नविन काळे

लेखक हे ‘स्वयं’ चे संस्थापक सदस्य आहेत.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

Get Better Each Week #15

हा ब्लॉग म्हणजे तुमच्या मेंदूचा दर आठवड्याचा व्यायाम आहे! या ब्लॉगमुळे तुम्ही दर आठवड्याला काही नवीन तर शिकालच, पण...

Get Better Each Week #14

हा ब्लॉग म्हणजे तुमच्या मेंदूचा दर आठवड्याचा व्यायाम आहे! या ब्लॉगमुळे तुम्ही दर आठवड्याला काही नवीन तर शिकालच, पण...

Get Better Each Week #13

हा ब्लॉग म्हणजे तुमच्या मेंदूचा दर आठवड्याचा व्यायाम आहे! या ब्लॉगमुळे तुम्ही दर आठवड्याला काही नवीन तर शिकालच, पण...