स्वयं' वक्ता ते 'स्वयं' सेवक होण्याचा माझा प्रवास ! (भाग २) - Welcome to Swayam Talks
×

स्वयं’ वक्ता ते ‘स्वयं’ सेवक होण्याचा माझा प्रवास ! (भाग २)

पुष्कर औरंगाबादकर

स्वयं'वक्ता ते स्वयं सेवक होण्याच्या प्रवासातील दुसऱ्या टप्प्यावर काय घडलं याबद्दल सांगतोय पुष्कर औरंगाबादकर !
 

Published : 18 May, 2020

स्वयं’ वक्ता ते ‘स्वयं’ सेवक होण्याचा माझा प्रवास ! (भाग २)

'स्वयं'वक्ता ते स्वयं सेवक होण्याच्या प्रवासातील दुसऱ्या टप्प्यावर काय घडलं याबद्दल सांगतोय पुष्कर औरंगाबादकर !

स्वयं टीम बरोबरच्या पहिल्याच भेटीत आमच्या धमाल गप्पा झाल्या आणि आम्ही सगळे त्या गच्चीतल्या हॉटेल मधून निघालो. पुढचे बरेच दिवस मी विचार करत होतो, आपल्याला स्वयं मध्ये बोलायला सांगतायेत खरं ही मंडळी पण आपण काय बोलायचं!! स्वयंच्या YouTube Channel वर असणारे videos बघितले कि अजूनच दडपण यायचं - "काय कमाल काम करतात लोकं! त्यांच्या व्यासपीठावर जाऊन आपल्याकडे काय आहे मांडण्यासारखं!"

खरं म्हणजे मी एक दोनदा नविनला आणि शिल्पाला कॉल पण केला कि तुम्ही म्हणताय यार पण मी काय मांडायचं मला काही कळेना! अजबच होतं हे माझ्यासाठी कारण ट्रेनिंगमध्ये किंवा कीर्तनात सहज तासंतास (कधी कधी पूर्ण दिवसभर) उत्स्फूर्त बोलायची मला सवय आहे! मग आत्ताच असं का होत होतं? कदाचित या आधी इतरांची चरित्र मांडत होतो आणि आता स्वतःबद्दल बोलायचं होतं म्हणून धीर येत नव्हता. काही कळत नव्हतं.

काही आठवडयांनी नविन, आशय, शिल्पा, भाग्यश्री (स्वयं टीम) पुन्हा पुण्यात आले. आम्ही सगळे माझ्या एरंडवण्यातल्या ऑफिसला भेटलो. कुरुक्षेत्रावर युध्दाच्या सुरुवातीला अर्जुनाची जी अवस्था होती तशी काहीशी माझी अवस्था झाली होती. मी व्याकुळतेनं माझी व्यथा मांडत होतो, आणि गोपाळ कृष्णासारखं स्वयं Talks च्या processचा एक एक अध्याय मांडत स्वयंची टोळी मला Talk साठी तयार करत होती. आता आज हे लिहितांना या सगळ्या गोष्टी आठवल्या की फारच मजा वाटते.

त्या दिवशीच्या त्या दीड तासाच्या 'intense' चर्चेचं फलित म्हणजे मला शिल्पा-भाग्यश्रीने बोलायचा content ठरवायला कशी सुरुवात करायची त्या साठी 'homework' दिला आणि मी धैर्यानं (शौर्यानं नव्हे) Talk साठी तयार झालो! ही सगळी process, ही स्वयं टीमची सगळी मंडळी, त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांची द्दृष्टी, कामाचं culture पाहून मी अक्षरशः स्तिमित झालो होतो! मला आतून असं वाटत होतं, ते माझ्या Talkचं राहूदे हवंतर.. पण "मला पण घ्या ना तुमच्यात (खेळायला).." म्हणजे लहान मुलं जसं मोठ्या मुलांमध्ये खेळायला हट्ट धरतात ना अगदी तसंच! ;)

मला दिलेला होमवर्क घेऊन मी कामाला लागलो. सगळ्यात आधी कॉर्पोरेट कीर्तन ही संकल्पना सुचली ती माझ्या दृष्टिकोनातून नेमकी कशी दिसते ते लिहून काढलं. त्या बरोबरच त्या संकल्पनेचं सुचण्या मागचं back tracking करून माझ्या आयुष्यातले नेमके कुठले पैलू, अनुभवाच्या नेमक्या कोणत्या शिदोऱ्या मला त्या संकल्पनेपर्यंत घेऊन आल्या ते सगळे धागे लिहून काढले. नंतर ती संकल्पना अमलात आणताना झालेला अभ्यास, मनातले विचार, भेटलेली लोकं, त्या चर्चा, आलेल्या अडचणी, गोड - कटू अनुभव.. सगळं लिहून काढलं.. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं कि खरोखर बरंच काही बोलू शकतो आपण आपल्या या प्रवासाबद्दल! अगदी स्क्रिप्ट करणं शक्य नव्हतं कारण मला उत्स्फूर्त बोलण्याची सवय आहे. त्यामुळे माझ्या मनात असणाऱ्या विचारांचे Mind-Maps, Flow-Bubbles बनवले. मग या सगळ्या मुद्द्याचं sequencing करून घड्याळात timer लावला आणि एकदा राहिलोच आरशा समोर उभा!

क्या बात है बसतंय की आपलं २० मिनिटात ! म्हणून जेव्हा आरशासमोर बोलून झाल्यावर timer बघितला तर मी जवळ जवळ ३८ मिनिटं बोलून झालं होतं! बापरे!

आता सगळ्यात कठीण होतं ते म्हणजे हे सगळं २० मिनिटात मांडणं. कीर्तनामध्ये तर २० मिनिटं नमनालाच लागतात हो! आणि ट्रेनिंग मध्ये २० मिनिटात introduction पण संपत नाहीत! हे करायचं कसं! मग मी शिल्पा भाग्यश्रीला अधून मधून कॉल करून प्रचंड छळायचो. "ताई थोडी मिनिटं वाढवून मिळतील का" अशा अथक विनवण्या करायचो. पण त्या दोघी पण काय हुशार! खरं म्हणजे गोड खाल्लं म्हणजे चरबी वाढते; पण गोड गोड बोलून या दोघीनी माझी मात्र सगळी मिनिटांची चरबी उतरवली आणि माझा २० मिनिटांचा Talk तयार झाला.

स्वयं टीमच्या पुढच्या पुणे visit मध्ये मी तो माझा talk नविन, आशय, अजय दादा, वीणा ताई, सांबा, समीर, मंगेश, शिल्पा, भाग्यश्री समोर परफॉर्म केला! माझं बोलून झाल्यावर त्यावर नवीनची एक Signature Reaction मिळाली - "क्या बात है.. मस्त..". आत्ता हे लिहिताना पण मला नविनचा चेहरा आणि आवाज 'मस्त' म्हणताना ऐकू आला. सगळ्यांनी काही inputs दिले ते मी लिहून घेतले आणि त्या बदल्यात माझा हट्ट साधारण अठ्ठाविसाव्यांदा सगळ्यांसमोर मांडला, "मला पण तुमच्यासोबत काम करायचंय.." नविनने चेहऱ्यावरून हात फिरवत, "चालेल.. तुझा talk झाला की बघू.." अशी reaction दिली. सध्या मी त्यातच आनंद मानला.

Talkची तयारी तर झाली, पण आता खरं टेन्शन होतं ते म्हणजे स्वयं Talk नंतर होणाऱ्या Interviewचं. डॉ उदय निरगुडकर उत्स्फूर्त मुलाखत घेणार! बेधडक रोखठोक मुलाखती घेणाऱ्या डॉक्टरांसमोर आपण बोलू शकू का असं वाटत होतं! पण Talkच्या दिवशी हे सगळं टेन्शन बाजूला सारणारी एक वेगळीच मजा झाली. ती पुढच्या भागात बघू!

-पुष्कर औरंगाबादकर

लेखक हे 'स्वयं' च्या Talks Preparation Team चे सदस्य आहेत.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

तरुणाईतील ‘स्वयं’साठी!

तरुणपण जगण्याचा एक मार्ग म्हणजे या तरुणाईशी जोडलं जाणं. या पिढीतील बदलला सामोरं जाताना, त्यांना जर आपण आज मित्रत्वाचा...

वर्ल्ड वाईड वेब खरंच वर्ल्ड वाईड आहे का?

जसं अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत, तसंच इंटरनेटही नव्या पिढीची गरज बनली आहे. आज आपण इंटरनेट च्या जगात...

संगीत आणि नात्याची सुंदर ‘अमेरिकन सिंफनी’!

OTT च्या काळात अनेक पर्याय उपलब्ध असताना मोजक्या वेळात नक्की काय ‘पाहायचं’ हा सध्या सतावणारा प्रश्न आहे. अशावेळी ‘अमेरिकन...