स्वयं' वक्ता ते 'स्वयं' सेवक होण्याचा माझा प्रवास ! (भाग १) - Welcome to Swayam Talks
×

स्वयं’ वक्ता ते ‘स्वयं’ सेवक होण्याचा माझा प्रवास ! (भाग १)

पुष्कर औरंगाबादकर

स्वयं' चा वक्ता ते 'स्वयं' टीम मेम्बर होण्याच्या आपल्या धमाल प्रवासाबद्दल क्रमशः भागांमध्ये सांगतोय, पुष्कर औरंगाबादकर
 

Published : 20 April, 2020

स्वयं’ वक्ता ते ‘स्वयं’ सेवक होण्याचा माझा प्रवास ! (भाग १)

'स्वयं' चा वक्ता ते 'स्वयं' टीम मेम्बर होण्याच्या आपल्या धमाल प्रवासाबद्दल क्रमशः भागांमध्ये सांगतोय, पुष्कर औरंगाबादकर !​​​​​​​

२०१७. माझा मित्र पुष्कराज जोशी मला म्हणाला, "माझा एक मुंबईचा मित्र पुण्यात आला की येणार आहे माझ्याकडे. तेव्हा तू पण ये. मला तुमची ओळख करून द्यायची आहे!" थोड्या दिवसांनी त्याचा तो मित्र त्याच्या घरी आला तेव्हा मी त्याला भेटायला गेलो. पुष्कराजनी त्याच्या त्या मित्राची मला ओळख करून दिली, "हा माझा मित्र नविन काळे. तो लेखक आहे आणि त्याचे 'अमृतयात्रा' आणि 'स्वयं Talks' असे दोन उपक्रम आहेत!"

त्या दिवशी पुष्कराजच्या घरी नविन बरोबर मनमुराद गप्पा झाल्या. मी त्याचे उपक्रम जाणून घेतले. त्याने 'मी काय काय करतो' हे अत्यंत अभ्यासू पद्धतीनं समजून घेतलं. तास दीड तास कसा गेला कळलंच नाही. निघताना नविन मला म्हणाला मी पुन्हा पुण्यात येईन तेव्हा कळवतो आपण नक्की भेटू! एखाद्या वेगळ्या गावात जेव्हा आपली एखाद्या नवीन व्यक्तीशी ओळख होते तेव्हा निघताना असं म्हणण्याची प्रथाच असते. त्यामुळे मी पण अगदी "हो हो नक्की" म्हणालो आणि आम्ही आपआपली वाट धरली. त्या दिवशी वाट वेगळी केली तरी खरं म्हणजे 'स्वयं' बरोबर असणाऱ्या माझ्या अमृत-यात्रेला त्याच दिवशी सुरुवात झाली होती.

४-५ महिन्यांनंतर मला अचानक पुष्कराजचा फोन आला. तो म्हणाला नविनचं तुझ्याकडे काहीतरी काम आहे. तो २-३ दिवसात पुण्यात येतोय. तुम्ही परस्पर भेटून घ्या. नवीनचं माझ्याकडे काय काम असेल? या प्रश्नाचं चिंतन होईपर्यंतच २-३ दिवस सरले आणि आमचं भेटायचं ठरलं. पुण्यामध्ये सेनापती बापट रस्त्यावरील एका उंच गच्चीवर असलेल्या एका हॉटेलमध्ये संध्याकाळी आम्ही भेटलो.

पण या वेळी नविन एकटा नव्हता. त्याच्याबरोबर अजून ४-५ जणा-जणींची 'टोळी' होती. अक्षरशः 'टोळी' हाच शब्द योग्य आहे. कारण कॉलेजच्या मित्र मैत्रिणींमध्ये जशी chemistry असते तशी chemistry त्या सगळ्यांमध्ये मला जाणवत होती. नविनने सगळ्यांशी माझी थोडक्यात ओळख करून दिली. आमच्या गप्पा सुरु झाल्या.. रंगल्या.. मग आपसूक त्यातल्या काही जणांनी मला काही प्रश्न विचारले. मी त्या ओघातच त्यांची उत्तरं दिली.. अशा गप्पा रंगात येत असताना माझ्या मनात विचार येऊन गेला, आपण नुसतेच गप्पा मारतोय.. काहीतरी काम होतं नविनचं आपल्याकडे. त्याचं काय?

म्हणून मी हलकेच नविनला विचारलं, "अरे पुष्कराज म्हणत होता तुझं काहीतरी काम आहे माझ्याकडे.."

"अरे झालं काम !"

'म्हणजे ?"

"अरे तेच तर तुझं काम जाणून घेणं हेच आमचं सगळ्यांचं तुझ्याकडे काम होतं! आणि आपल्या गप्पांमधून झालं ते काम ! आमची सगळ्यांची इच्छा आहे की तू 'स्वयं' मध्ये वक्ता म्हणून यावंस!"

"काय? अरे पण.."

मागच्या वेळेला भेट झाल्यावर 'स्वयं Talks' हा YouTube Channel मी Subscribe करून बरेच Videos बघितले होते. त्यावर असणाऱ्या विविध विषयांमध्ये काम करणारे वक्ते, त्यांचं कार्य पाहिल्यावर मला तर "मी वक्ता व्हावं" ही म्हणजे जरा मस्करीच वाटत होती..

जणू काही मी काय म्हणणार हे त्यांनी सगळ्यांनी ओळखलंच आणि मला म्हणाले, "अरे टेन्शन नको घेऊस. तू आपले जे कुठले वक्ते बघितले आहेस ना, त्यांना सगळ्यांना पण आधी असंच वाटत होतं. आपण एकत्र तयारी करूया.. छान होईल.. तुझा विषय पण खूप छान आहे आणि तुझे efforts लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत.."

त्या दिवशी मला स्वयं Teamच्या सगळ्यात महत्वाच्या गुणाची अनुभूती आली, आणि तो 'गुण' म्हणजे "एक व्यक्ति. एक कल्पना." हे शोधण्याची एक आगळी वेगळी असणारी अक्षरशः 'दैवी दृष्टी'.

माझं भाग्य की मी स्वयं मध्ये वक्ता म्हणून बोलून गेल्यावर "एक व्यासपीठ, अगणित प्रेरणा" या स्वयंच्या टॅगलाईनचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनुभव घेतला. स्वयं मध्ये बोलायच्या या सर्व प्रोसेस मध्ये मी त्या टीमचाच एक भाग कसा झालो हे मलाही नाही समजलं. पण मला हेही आवर्जून सांगण्यात आलं की तुझा स्वयं टॉक होईपर्यंत तू अधिकृत 'स्वयं'सेवक होणार नाहीस ! :) ज्या दिवशी माझा टॉक संपन्न झाला, त्याच रात्री संपूर्ण टीम आमच्या घरी जेवायला होती. जेवण झाल्यावर प्रचंड जल्लोषात माझं स्वयं टीममध्ये आगमन झालं !

'स्वयं'चा वक्ता होण्याचा प्रवास मला खूप काही शिकवून गेलाच, पण स्वयं टीम मेम्बर झाल्यापासूनचा प्रवास पण खूप मजेदार आणि धमाल आहे ! त्याबद्दल पुन्हा केव्हातरी !

- पुष्कर औरंगाबादकर

लेखक हे 'स्वयं' च्या Talks Preparation Team चे सदस्य आहेत.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

Get Better Each Week #15

हा ब्लॉग म्हणजे तुमच्या मेंदूचा दर आठवड्याचा व्यायाम आहे! या ब्लॉगमुळे तुम्ही दर आठवड्याला काही नवीन तर शिकालच, पण...

Get Better Each Week #14

हा ब्लॉग म्हणजे तुमच्या मेंदूचा दर आठवड्याचा व्यायाम आहे! या ब्लॉगमुळे तुम्ही दर आठवड्याला काही नवीन तर शिकालच, पण...

Get Better Each Week #13

हा ब्लॉग म्हणजे तुमच्या मेंदूचा दर आठवड्याचा व्यायाम आहे! या ब्लॉगमुळे तुम्ही दर आठवड्याला काही नवीन तर शिकालच, पण...