इन्स्पिरेशनल सिनेमा - Welcome to Swayam Talks
×

इन्स्पिरेशनल सिनेमा

पराग खोत

एका चांगल्या चित्रपटाचा समाजावर काही सकारात्मक परिणाम होतो का ? पराग खोत यांच्या या लेखात तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळतंय का पहा !
 

Published : 28 September, 2020

इन्स्पिरेशनल सिनेमा

एका चांगल्या चित्रपटाचा समाजावर काही सकारात्मक परिणाम होतो का ?
पराग खोत यांच्या या लेखात तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळतंय का पहा !

सिनेमा हे करमणुकीचे एक उत्तम माध्यम आहे. एन्टरटेनमेंट, एन्टरटेनमेंट ॲन्ड एन्टरटेनमेंट असं विद्या बालन डर्टी पिक्चर मध्ये सांगून गेली आहेच. पण हाच सिनेमा एखादा प्रेरणादायी विचार आपल्यासमोर मांडत असेल तर तो आपल्याला तितकाच भिडतो का? सिनेमाच्या यशापयशाची किंवा आर्थिक गणितं थोडी बाजूला सारुन त्याचा विचार करायला हवा. तो सिनेमा पाहून एखाद्याच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडून आल्याचं ऐकलंय? किंवा त्या सिनेमाचा कळत नकळत एक खोल परिणाम आपल्या मनावर झाल्याचं कधी जाणवलंय? एवीतेवी ‘सिनेमा बघून लोक बिघडतात’ हे सिनेमाचा दुःस्वास करणाऱ्या मंडळीचं आवडतं वाक्य असतं. पण सिनेमाचा परिणाम तुमच्या अंतर्मनावर होत असतो याबद्दल दुमत नाही. चांगला सिनेमा बघणं किंवा तो आपल्या मुलांना दाखवणं म्हणूनच महत्त्वाचं ठरतं.

हिंदी सिनेमाचे काही सुजाण दिग्दर्शक, वर्षानुवर्षे अगदी आवर्जून असे प्रगल्भ विचार आपापल्या सिनेमांतून प्रेक्षकांसमोर मांडत आले आहेत. करमणुकीच्या कोंदणात बसवलेल्या त्या हिऱ्यांची काही वेळा योग्य ती पारख झाली तर काही वेळा ते धुळीस मिळाले. पण फार मागे न जाता, आपल्या आणि आपल्या पुढच्या पिढीशी रिलेट होणाऱ्या सिनेमांचा जरी विचार केला तरी आशादायक चित्र दिसेल. नव्या सहस्त्रकात असे सिनेमे आले आणि प्रेक्षकांशी त्यांनी स्वत:ला जोडून घेतले. ते रुक्ष नव्हते. त्यात मनोरंजनासोबतच एक सुस्पष्ट विचार मांडला होता आणि हे सिनेमे कालसुसंगत आणि परिपक्व होते. त्यांनी सामाजिक बदल घडवला असे म्हणणे सध्या थोडे धाडसाचे ठरेल कारण सिनेमा या माध्यमाची तेवढी क्षमता आहे का याबद्दल अभ्यास आवश्यक आहे. मात्र त्यांनी वैचारिक बदलांची बीजं रोवली आणि प्रेक्षकांवर वैयक्तिकरित्या प्रभाव पाडण्यात ते यशस्वी ठरले हे निश्चित.

एखाद्या कलाकृती मधून प्रेरणा मिळते म्हणजे नक्की काय होतं? सिनेमा पाहून माणूस खरंच आपली विचारसरणी बदलू शकतो का? की तो प्रभाव तात्पुरता असतो? आशुतोष गोवारीकरचा लगान हा या पठडीतला सिनेमा. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, आपल्यातील कौशल्यांचा विकास करुन, संघभावनेने बलाढ्य प्रतिस्पर्ध्यावर मात कशी करता येते हे लगानने दाखवून दिले. ती कथा मांडण्यासाठी निवडलेली पार्श्वभूमी आणि त्या सिनेमाचे संवाद या दोन गोष्टींनी अशक्य ते शक्य आहे हा संदेश दिला. ‘चूल्हे से रोटी निकाले के लिए चिमटे को अपना मुॅंह जलाही पडी’ या एका वाक्यात जावेद अख्तरने ते सार सांगून टाकलं होतं आणि ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचलंही.

नंतर ‘स्वदेस’ मधलं ब्रेन ड्रेन रिव्हर्सल असो की ‘चक दे इंडिया’ मधलं टीम बिल्डिंग, चाकोरी मोडून या सिनेमांनी थेट संदेश दिला होता. हे करताना थोडी सिनेमॅटिक लिबर्टी घेतली असेलही पण या सिनेमांनी व्यक्तिमत्त्व विकासाच्या व्याख्या बदलून टाकल्या. प्रचारकी थाट बाजूला ठेवून, करमणुकीच्या माध्यमातून तो जर्म विकसित केला आणि पोहोचवला होता. असे सिनेमे नक्कीच सकारात्मक परिणाम घडवतात. तुमचं बाह्य मन पडद्यावरची ती करमणूक बघण्यात दंग असतानाच, तुमच्या नकळत त्यातला तो प्रखर विचार तुमच्या अंतर्मनात पोहोचत असतो, नव्हे तो तिथे कोरला जात असतो. दिल चाहता है, जब वी मेट, उडान, लक्ष्य, जिंदगी ना मिलेगी दोबारा आणि राॅक आॅन हे सिनेमे या वैचारिक बदलांची सशक्त पायाभरणी करत होते आणि त्याच्यावर कळस चढवला तो ‘थ्री इडियट्स’ ने. या एका सिनेमाने इतके दिवस Subtle असलेल्या सगळ्या गोष्टी एकदम Obvious करुन टाकल्या. “सक्सेस के पीछे मत भागो, काबिल बनो. सक्सेस झक मारके पीछे आएगी” हे तरुणाईचे जणू ब्रीदवाक्य झाले. त्यानंतर सर्वात जास्त स्टार्ट अप कंपन्यांची सुरुवात झाली आणि त्यातल्या बहुसंख्य या स्पर्धेत टिकून राहिल्या. प्रत्येकजण त्यातल्या रॅंचोमध्ये स्वत:ला पहात होता.

आपल्या कर्तृत्वाने बदल घडविणारे खऱ्या जगातील हिरो सिनेमाच्या पडद्यावर आले अाणि समाजात जास्त प्रभावीपणे पोहोचले. मग ते भारताचं नाव आंतरराष्ट्रीय पटलावर नेणारे मिल्खा सिंग, मेरी काॅम किंवा गीता फोगट सारखे खेळाडू  असोत किंवा डोंगर फोडून आपला मार्ग काढणारा दशरथ ‘माॅंझी’ सारखा अनामिक लढवय्या, अरुणाचलम् मुरुगंथम सारखा एकहाती इतिहास घडवणारा ‘पॅडमॅन’ असो की या पुरुषसत्ताक जगात, स्वत्त्व शोधू पाहणारी एकाकी अाणि अस्वस्थ ‘क्वीन’ असो. सिनेमाच्या सशक्त सादरीकरणामुळे त्यांचे विक्रम आणि कार्य लोकांपर्यंत तपशीलवार पोहोचले अाणि प्रेरणादायी ठरले. सिनेमात योग्य विषय योग्य पद्धतीने मांडला गेला तर तो नक्कीच आपला प्रभाव टाकू शकतो आणि त्यात सामाजिक उत्कर्षाची बीजं रोवलेली असतात. भारतीय प्रेक्षकांच्या मानसिकतेवर असलेल्या हिंदी सिनेमाच्या या प्रभावाचा नीट विचार व्हायला हवा आणि उद्याचा नवा, अतिप्रगत आणि अधिक शक्तिशाली भारत घडवण्यासाठी त्याचा सुयोग्य वापर करता यायला हवा. तुमच्या आयुष्यावर प्रभाव टाकणारे आणि विचारात बदल घडविणारे असे कुठले सिनेमे आहेत असं तुम्हाला वाटतं? ते आम्हाला जरुर कळवा.

-पराग खोत

लेखक हे स्वयं च्या Content Team चे सदस्य आहेत.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

चेकलिस्ट: मतदान करण्यापूर्वीची!

निवडणुकांत मतदान करण्यापूर्वी आपण कधी चेकलिस्ट बनवली आहे का? मतदार राजा सजग झाला तर राजकारण अधिक गंभीर होऊ शकते. आता...

चांगुलपणाची प्रतिमा : मिसेस हॅरिस

कधी उगाच उदास वाटतं, माणुसकी, चांगुलपणा यावरचा विश्वास कमी व्हायला लागतो, उगीच चिडचिड होत असते, राग राग करून काही होणार...

स्वच्छतादूत : पद्मश्री एस. दामोदरन

दक्षिण भारतातील ६०० हून अधिक गावे आणि २०० पेक्षा अधिक झोपडपट्ट्यांमधील नागरिकांना उघड्यावर शौच करण्यापासून परावृत्त...