हा जयघोष असाच दुमदुमत राहायला हवा - Welcome to Swayam Talks
×

हा जयघोष असाच दुमदुमत राहायला हवा

पराग खोत

ऑलिंपिक पदकावर नाव कोरण्याचे स्वप्न बघणारे खेळाडू निर्माण करणं हे एक राष्ट्रकर्तव्य आहे. देशाच्या प्रत्येक घटकाचा यात सहभाग असायला हवा, सांगतोय पराग खोत.
 

Published : 9 August, 2021

हा जयघोष असाच दुमदुमत राहायला हवा

नीरज चोप्राच्या सुवर्णफेकीला ऐतिहासिक महत्त्व आहे. त्याने एक नवा अध्याय लिहीलाय. हा जयघोष असाच दुमदुमत राहील आणि तसा तो राहावा ही प्रार्थना. गेल्या काही वर्षांत ऑलिंपिकसारख्या खडतर स्पर्धांमधला पदकांचा दुष्काळ संपुष्टात आणण्याचे महत्त्वाचे काम भारताच्या जिद्दी खेळाडूंनी केले आहे आणि हे निश्चितच कौतुकास्पद आहे. क्रिकेट हा देव असलेल्या या देशात इतर खेळांकडे होणारे दुर्लक्ष कमी होण्यास या पदकांमुळे मदत होईल अशी अपेक्षा ठेवायला हवी. कुठलाही इव्हेंट असो, तो सुरु असताना त्याविषयी सोशल मिडियावर प्रसारित होणारा मजकूर हा तत्कालिन समाजमनाचं प्रतिबिंब असतं असं मानायला हरकत नाही. नुकतंच एक ॲनिमेशन पाहिलं. त्यात क्रिकेटची बॅट कोरुन कोरुन त्यातून हॉकी स्टिक बनविणारी एक ‘मुलगी’ दिसते आणि ती स्टिक घेऊन ती निघते. किती प्रभावी संदेश दिलाय चित्रकर्त्याने! ह्या आणि अशा अनेक गोष्टी उलगडण्याचा प्रयत्न व्हायला हवा.

ऑलिंपिकचे महात्म्य वेगळेच आहे. तिथे प्रतिनिधित्व करताना लागणारी शारीरिक आणि मानसिक तयारी, त्याआधी वर्षानुवर्षांचा सराव, कठोर परिश्रम आणि कौटुंबिक त्याग यांच्या संयोगातून तो खेळाडू घडत जातो. सोबत अफाट प्रतिभा आणि देशासाठी काही करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती यांचे पाठबळ असते. मात्र हे खेळाडू बिकट परिस्थितीतूनच वर यायला हवे आहेत का? अशा हिरेमाणकांना जोखून त्यांच्यावर वेळीच पैलू पाडणारी एखादी यंत्रणा आपल्या देशात उभी करता येणार नाही का? स्पोर्ट्स ॲकॅडमी नावाच्या संस्था अस्तित्वात असल्या तरीही तिथल्या बजबजपुरीचं वर्णन आपल्याला वेळोवेळी अवगत होत असतं. गलिच्छ राजकारणाचे बळी ठरलेले अनेक प्रतिभावान खेळाडू कधीतरी त्यांची व्यथा जगासमोर मांडतात आणि नंतर कुठेतरी हरवून जातात. हे सगळं बदलता येणार नाही का? अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीत आपण अमेरिका किंवा चीनची बरोबरी करण्याचे डावपेच आखतो आहोत. परंतु ऑलिंपिकमध्ये त्यांच्या जवळ जरी पोहोचायचे असेल तर कराव्या लागणाऱ्या भगीरथ प्रयत्नांचे काय? त्याची आखणी, नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक अशी राजकीय इच्छाशक्ती आणि सामाजिक पाठिंबा आपण निर्माण करु शकणार आहोत का?

ऑलिंपिक स्पर्धा सुरु झाल्यापासून भारतीयांच्या मनातलं चैतन्य आणि सळसळता उत्साह अनुभवास येतो. देशातील खेळाडूंना आपला ‘दिलोजां’ से पाठिंबा असतो. एखादा खेळाडू हरला की सगळा देश चुकचुकतो आणि पदकावर नाव कोरल्यानंतर जल्लोष करतो. सुदैवाने आपण कोणीही त्यांच्यावर टीका करत नाही. त्यांच्या हरण्यानंतर आलेली ती हळहळ अगदी मनापासून असते. पण ही स्पर्धा संपल्यानंतर सगळेच विस्मृतीत जाते. Out of sight, out of mind चा निष्ठुर नियम इथे अगदी ठळकपणे अधोरेखित होतो. पदक मिळवू शकणारा एखादाच मानसन्मान आणि पैसा प्रसिद्धीच्या पायऱ्या चढतो, बाकीचे अनामवीर त्यांच्या खडतर आयुष्यात परततात. अशा पदकांपासून काही पावलं किंवा काही इंच दूर असलेल्या खेळाडूंचाही सोहळा व्हायला हवाय का? किंबहुना ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेला प्रत्येकच खेळाडू आपला नॅशनल हिरो नाही का? Our Army and our Olympians are our real heroes ह्या सूत्राचा अंगीकार करणारे देश प्रगती करत आहेत हे लक्षात घ्यायला हवे. आपण इथे दोघांचीही अवहेलना करत असतो. आपल्याकडे शत्रूराष्ट्रावर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणारे महाभागही आहेत आणि भारत एक सामना हरला म्हणून हॉकीपटू वंदना कटारियाच्या घरासमोर जातीवाचक शिवीगाळ करत धिंगाणा घालणारे खालच्या प्रवृत्तीचे लोकही आहेत. ही मानसिकता कधी बदलणार? आणि म्हणूनच पदकांचा हा जयघोष असाच दुमदुमत राहायला हवा.

आपल्याला टोकियो ऑलिंपिकमध्ये भाग घेणारे आपल्या देशाचे सगळे खेळाडू ठाऊक होते का? जर आपल्याला त्यांची नावे आणि खेळ माहीतच नसतील आपण त्यांना पाठिंबा कसा देणार? ही उदासीनता आपल्याकडे एक क्रिकेट सोडलं तर प्रत्येक खेळात दिसून येते. राजकीय नेतृत्व, शासकीय यंत्रणा, सामाजिक संस्था या सर्वच स्तरांवर हा दुजाभाव आढळतो. दुर्दैवाने क्रिकेट या खेळाचा ऑलिंपिकमध्ये समावेश नाही. पण क्रिकेट खेळणारे जे काही मोजके देश आहेत त्यातल्या इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांचा टोकियो ऑलिंपिकच्या पदक तक्त्यात अनुक्रमे चौथा, सहावा आणि बारावा क्रमांक आहे आणि त्यात भारत ह्यावर्षी आतापर्यंतची सर्वात जास्त पदकं मिळवून सुद्धा सत्तेचाळीसाव्या स्थानावर आहे. पण यात खेळाडूंचा अजिबात दोष नाही. असलाच तर तो भ्रष्टाचाराने पोखरलेल्या आपल्या यंत्रणेचा आणि कारकुनी करण्यात धन्यता मानणाऱ्या आपल्या समाजाचा आहे. थॉमस मेकॉलेने विचारपूर्वक निर्माण केलेल्या भारतीय शिक्षणपद्धतीत खेळाला स्थान दिले नव्हते. त्यांना उत्कृष्ट कारकून निर्माण करायचे होते आणि ते झाले. आपलं दुर्दैव हे की आपण स्वातंत्र्यानंतरही त्याच गुलामगिरीच्या मानसिकतेत खितपत पडलो आहोत. आपले ऑलिंपियन्स तयार होतात ते स्वत:च्या बळावर. आवश्यक तो पाठिंबा त्यांना खूप नंतर मिळतो. भलेही सरकार नंतर त्यांच्या प्रशिक्षणावर कोट्यवधी खर्च करत असेल. पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना जिवाचे रान करावे लागते. परिस्थितीशी झुंजत आणि भ्रष्टाचाराशी लढा देत ते इथवर पोहोचतात आणि अपयशी ठरले तरी पुन्हा नव्या जिद्दीने पुढच्या ऑलिंपिकच्या तयारीला लागतात. म्हणूनच पी व्ही सिंधूने पॅरिस ऑलिंपिक २०२४ ची तयारी आतापासूनच सुरु केल्याची बातमी येते. कारण ह्यावेळी हुकलेलं गोल्ड तिला २०२४ मध्ये मिळवायचं आहे.

तसे सगळेच तयारीला लागले असतील. कारण हरणं हे प्राक्तन असलं तरी हार मानणं हे कुठल्याही खेळाडूच्या रक्तात नसतं. म्हणूनच ते पेटून उठतात आणि यशाच्या जाणिवेने पछाडले जातात. टोकियो ऑलिंपिकमध्ये सुवर्णवेध घेणाऱ्या नीरज चोप्राने २०१७ साली एक ट्वीट केलं होतं. तो म्हणतो, “जब सफलता की ख्वाहिश आपको सोने ना दे, जब मेहनत के अलावा और कुछ अच्छा ना लगे, जब लगातार काम करने के बाद थकावट ना हो, समझ लेना सफलता का नया इतिहास रचनेवाला है.” २०१७ चे हेच शब्द त्याने आज खरे करुन दाखवले आहेत. असे अनेक नीरज चोप्रा, अनेक मीराबाई चानू आणि अनेक लव्हलिना बोर्गोहेन आपल्यामध्ये दडलेले आहेत. त्यांना मार्ग मोकळे करुन दिले जायला हवेत. त्यांच्या वाटेतले सगळे अडसर दूर करुन देशासाठी काही करण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती मदत सर्वतोपरी करायला हवी आणि म्हणूनच …ऑलिंपिकमधल्या पदकांचा हा जयघोष असाच दुमदुमत राहायला हवा.

-पराग खोत

लेखक हे ‘स्वंय’च्या Content Team चे सदस्य आहेत.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

देणगी काहीतरी सुचत राहण्याची!

सर्जनशील असणं याची मुभा सगळ्यांना आहे. आपण एखाद्या गोष्टीचा विचार कसा करतो? आणि त्याचा अवलंब कसा करतो? यावर सारं अवलंबून...

आसामच्या 'लक्ष्मी माँ': पद्मश्री लखिमी बरूआ

आसाम सारख्या दुर्गम भागातील राज्यात महिला सक्षमीकरण आणि सहकार क्षेत्रांत आसामी महिलांचे आर्थिक सशक्तीकरण करण्यात...

कल्पनाशक्तीची नवी 'LINE'

कल्पनाशक्ती जादुई असते. ती नवे क्षितिज दाखवते आणि त्या पलीकडे काय असेल ह्या विचारात पाडते. अशाच एका अद्भुत विचाराला...