हायपरलूप - तंत्रज्ञानाचा नवा आविष्कार - Welcome to Swayam Talks
×

हायपरलूप – तंत्रज्ञानाचा नवा आविष्कार

प्रसन्न पेठे

तंत्रज्ञानाची प्रगती बेफाम वेगाने होत चालली आहे. मानवी बुद्धिमत्तेने केलेल्या अचाट प्रगतीचे द्योतक असलेले काही शोध-प्रयोग लवकरच आपल्या जीवनाचा भाग होऊ घातले आहेत. अशाच एका वेगवान प्रयोगविषयी आपल्याला सांगतोय प्रसन्न पेठे. 
 

Published : 28 December, 2020

हायपरलूप – तंत्रज्ञानाचा नवा आविष्कार

तंत्रज्ञानाची प्रगती बेफाम वेगाने होत चालली आहे. मानवी बुद्धिमत्तेने केलेल्या अचाट प्रगतीचे द्योतक असलेले काही शोध-प्रयोग लवकरच आपल्या जीवनाचा भाग होऊ घातले आहेत. अशाच एका वेगवान प्रयोगविषयी आपल्याला सांगतोय प्रसन्न पेठे.

आपल्यापैकी बऱ्याच जणांनी कधी ना कधी इंद्रायणी एक्सप्रेस किंवा इंटरसिटी एक्सप्रेसने मुंबई ते पुणे प्रवास केला असेल. जरा आठवा बरं तो प्रवास! आपण घरून लवकर निघून सकाळी ६.३० लाच दादर स्टेशन गाठलेलं असतं. आपला कोच कुठे येईल त्याचा अंदाज घेऊन तिथे उभे राहात, आसपासच्या माणसांची, हमालांची, बुटपॉलिशवाल्यांची, स्टॉलवाल्यांची लगबग बघेपर्यंत ट्रेन येते. आपली रिझर्वेशनवाली चेअर पकडून आपण विसावतो. गाडी लगेचच वेग घेते. बरोबर कुणी असेल तर आपल्या गप्पा रंगलेल्या असताना, साधारण ठाण्याच्या पुढे कुठेतरी पॅन्ट्रीचा माणूस खाण्याची ऑर्डर घ्यायला येतो. इतर ९९% माणसांसारखीच आपणही ऑम्लेट - ब्रेडची ऑर्डर देतो. कल्याणच्या आसपास कुठेतरी गाडी असताना आपली डिश हातात येते.

आता विचार करा एरवीच्या ह्या रुटीननुसार आपण दादरला ६.५२ ला गाडीत बसून ठाण्याच्या थोडं पुढे ट्रेन जाऊन ७.३० ला ऑम्लेटची ऑर्डर देण्यापर्यंतचा हा ठराविक अर्धा तास होईपर्यंतच, जर आपण थेट पुण्यालाच जाऊन धडकणार असू तर??? तुम्ही म्हणाल, "ह्यॅ! हे कसं शक्य आहे?" पण wait … हे होऊ घातलंय. नजिकच्या भविष्यकाळात असं केवळ अर्ध्या तासात दादरहून थेट पुण्याला पोहोचणं शक्य होणार आहे आणि त्यासाठी जो अद्भुत आविष्कार वापरला जाणार आहे त्याचं नाव आहे "हायपरलूप". 'आता हे काय नवीनच?' असा प्रश्न पडला असेल तर जाणून घेऊया काय असणारेय ही विलक्षण टेक्नॉलॉजी ते.

विमानं, ट्रेन्स, कार्स आणि बोटींच्या नंतरचा हायपरलूप हा पाचवा प्रवासाचा प्रकार. सध्याच्या फास्टेस्ट ट्रेन्सपेक्षाही प्रचंड वेगानं म्हणजे ताशी हजार ते बाराशे किलोमीटर इतका प्रचंड वेग गाठू शकणारा हा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अद्भुत आविष्कार असेल. एका अत्यंत कमी दाबाच्या नळकांड्यातून (ट्यूबमधून) प्रवासी बसलेल्या कॅप्सूलला (छोट्या वाहनाला) इलेक्ट्रिक प्रॉपल्शनच्या सहाय्याने अचाट आणि अफाट गती दिली जाऊन, गुरुत्वबलावर मात करत चुंबकीय बलाच्या जोरावर ते वाहन ट्रॅकच्यावर हवेत तरंगत, त्या लांबच लांब ट्यूबमधून अतर्क्य आणि कल्पनातीत स्पीडनं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाईल - अशी रचना असणारा अद्भुत प्रकार म्हणजे हायपर लूप. अर्थातच हा सर्व प्रवास त्या बंदिस्त ट्यूबमधून होणार असल्यामुळे त्याचा आजूबाजूच्या पर्यावरणावर दुष्परिणाम होणार नाही. हायपरलूपने प्रवास करणाऱ्यांना बाहेरच्या बदलणाऱ्या हवामानाच्या स्थितीचा त्रास होणार नाही आणि ही सर्व रचना भूकंपाला टक्कर देईल अशीच असेल. या अद्भुत वाहनामुळे वेळेत तर अफाट बचत होईलच पण त्याचबरोबर प्रचंड इंधनही वाचणार हे महत्त्वाचं. कारण हायपरलूप चालणार तो मुख्यत्वे इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक लेव्हिटेशन आणि सोलर एनर्जीवर. याचा आणखी फायदा म्हणजे लोकांना शहरांमध्ये उद्योगधंदे असले तर नोकरीनिमित्त तिथेच जागा शोधायची कटकट नको. दूर कुठेही राहून पटकन नोकरीच्या ठिकाणी पोहोचून लवकरात लवकर आपापल्या कुटुंबियांमध्ये परतता येईल. यातल्या प्रत्येक वाहनात जरी नेहमीच्या ट्रेनच्या तुलनेत कमी लोक बसू शकणार असले तरी कमीत कमीत कमी वेळात खूपच लोकांची ये-जा होईल.

मला आठवतंय, माझ्या दहावीच्या काळात मुंबई दूरदर्शनवर "स्टार ट्रेक" ही इंग्लिश सिरीयल लागायची आणि त्यामध्ये 'टाइम वार्प'मधून जात अंतराळातली लक्षावधी प्रकाशवर्षांची प्रचंड अंतरं पट्कन कापणारी अद्भुत यंत्रणा त्यात दाखवलेली असायची. आपल्या सुदैवानं आता एकविसाव्या शतकाच्या तिसऱ्याच दशकात, अगदी अंतराळातली अंतरं नाही, तरी देशांतर्गत प्रचंड अंतरं कमीत कमी वेळात पार करू शकणारी अशी टेक्नॉलॉजी 'याचि देही याचि डोळा' पाहण्याचं भाग्य बऱ्याच जणांना लाभणार आहे हे नक्की.

अर्थात त्या लांबच लांब ट्यूबचं बांधकाम हे अवाढव्य खर्चाचं आणि जिकिरीचं असणार आहे. पण 'स्पेस एक्स'चा एलोन मस्क आणि 'व्हर्जिन' ग्रुपचा रिचर्ड ब्रॅन्सन असे दोन दादा बिझिनेसमन हे प्रोजेक्ट्स हाती घेताहेत त्यामुळे पुरेशा आणि योग्य त्या चाचण्या झाल्यावर आपल्याला हा अद्भुत प्रवास कधी करायला मिळणार याची उत्सुकता जगभर आहे. अमेरिकेतल्या "डेव्हलूप टेस्ट" फॅसिलिटीमध्ये नुकतीच ९ नोव्हेम्बरला व्हर्जिन हायपरलूपची पहिली यशस्वी चाचणी घेतली गेली आणि आपल्याला सर्वांना अभिमान वाटावा अशी बाब म्हणजे त्यात पुण्याच्या पॉवर इलेक्ट्रॉनिक स्पेशालिस्ट मराठी इंजिनीयरने, तनय मांजरेकरने त्यातून १५ सेकंदात ५०० मीटर्सचा यशस्वी प्रवास केला. त्यामुळे यापूर्वीच्या महाराष्ट्र शासनाने व्हर्जिन कंपनीशी मुंबई-पुणे प्रवासासाठी हायपरलूप सिस्टीम बसवण्याची केलेली बोलणी लवकरच साकार होऊन आपण पूर्वीच्या ट्रेनमध्ये दादरहून निघाल्यावर ऑम्लेट - ब्रेडची ऑर्डर देऊन ते हातात मिळण्याअगोदर पुण्यात पोहोचलोही असू.

- प्रसन्न पेठे
लेखक हे स्वयं टॉक्सच्या Content Team चे सदस्य असून त्यांची दोन पुस्तके स्वतंत्ररित्या प्रकाशित झालेली आहेत.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

Related blogs


 

पितृपक्ष आणि रिसायकलिंग

शॉपिंगचा किडा चावूनही पुन्हा एकदा 'शुद्धीत' आणणाऱ्या एका अनोख्या अनुभवाबद्दल सांगतोय, नविन काळे

आता जोहराचं काय होणार?

तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यानंतर तिथल्या नागरिकांची होणारी जीवघेणी होरपळ आपण सगळेच जण पाहतोय. मात्र अशा...

एका नव्या प्रवासाची नांदी

‘अवकाश प्रवास’ (Space Tourism) हे स्वप्न आता येत्या दशकभरात सत्यात उतरणार आहे. जगातल्या मोठ्या उद्योगांनी त्यादृष्टीने पावले...