शहाणी माणसं - Welcome to Swayam Talks
×

शहाणी माणसं

चित्रा वाघ

वादळाच्या तडाख्यानंतर कसंबसं आपलं आयुष्य सावरणारी ही माणसं निकराने लढा देतात. पॉझिटिव्ह थिंकींगवरच्या पुस्तकांमध्ये न सापडणारी शहाणीव देऊन जातात, सांगतेय चित्रा वाघ.
 

Published : 2 August, 2021

शहाणी माणसं

गेल्या आठवड्यातल्या पाऊस आणि पुराच्या बातम्या ऐकून करोनाच्या संकटातून जेमतेम सावरणाऱ्या मनांवर पुन्हा एकदा आघात झाले. सात-आठ महिन्यांपूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या. तेव्हा कित्येक महिन्यांनंतर मुंबईबाहेर जाण्याचा योग आला होता. समुद्रकिनाऱ्यावरच्या हरिहरेश्वरला जायचं ठरलं. मुंबईबाहेर पडल्यापासूनच लॉकडाऊनचं वातावरण जाणवेनासं झालं होतं. निसर्ग वादळाच्या तडाख्यात प्रचंड पडझड झालेलं हे गाव, नव्या उमेदीने पर्यटकांचं स्वागत करण्यासाठी आतुर होतं. आमचं हॉटेल समुद्रापासून जवळच होतं. सागराची धीरगंभीर गाज कानावर पडली आणि प्रवासाचा शीण कुठल्या कुठे पळाला. सकाळी लवकर उठून समुद्रकिनाऱ्यावर जायचं म्हणून गजर लावलेला पण त्याआधीच पक्ष्यांच्या मंजुळ आवाजाने जाग आली. लहानशा मातीच्या रस्त्यावरून आम्ही दोघे किनाऱ्याच्या दिशेने निघालो. आभा पसरलेली होती. निवांत आयुष्याच्या सगळ्या खुणा पांघरून गाव हळूहळू जागं होत होतं.

प्रत्यक्ष किनाऱ्यावर तर खरोखर भारलेलं वातावरण होतं. क्षितीजापर्यंत पसरलेला निळा समुद्र, आकाशात केशरी, गुलाबी रंगाची उधळण, थंड मऊ वाळूचा मखमली स्पर्श, अनवाणी पावलांवर सुखाची लहर उठवणाऱ्या लाटा … हे सगळं अनुभवत नि:शब्दपणे चालण्याचा मनमुराद आनंद घेऊन तासाभराने आम्ही परत यायला निघालो.
किनाऱ्यावरच बाहेरच्या बाजूला पाच सहा टपऱ्या दिसल्या. त्यातल्या काहींमध्ये बऱ्यापैकी हालचाल दिसत होती. अशा वेळी वाफाळता चहा मिळाला तर सुखाचं वर्तुळ पूर्ण होईल या आशेने नकळतच आमची पावलं त्या दिशेला वळली. नवलाईची गोष्ट म्हणजे इथल्या सगळ्या टपऱ्या बायका चालवत होत्या. काहींनी नुकताच स्टॉल उघडून समोर टेबलं-खुर्च्या वगैरे मांडामांड सुरू केली होती तर काहीजणींनी चहाचं आधण ठेवून कांदे चिरायला सुरुवात केली होती. युनिफ़ॉर्म असावा तसा सगळ्यांच्या अंगावर मळखाऊ रंगांचे पण स्वच्छ गाऊन होते.

“मावशी किती वेळ असता या स्टॉलवर? घरी कधी जाता?” मी विचारलं.
“सात, सव्वा सात वाजेपर्यंत येतो आम्ही. आता संध्याकाळी उशीरा गिऱ्हाईकं गेली की जाणार घरी!”
माझं कुतूहल अधिकच चाळवलं.
“घरचं कोण सांभाळतं? की सगळी कामं सकाळीच उरकता?”
“घरी मुलगी हाय आन सासू पण हाय मदतीला. घरी गेल्यावर रात्रीचं जेवणाचं मी बघते!”
“आणि घरची पुरुषमंडळी?” न राहवून मी विचारलं.
“नवरा हाय, तो जेवणाची ऑर्डर आली की मासे, कोंबडी आणि बाकीचं सामान आणून देतो. एरवी गावात कुठे मिळतील तशी इलेक्ट्रिकची बारकीसारकी कामं करतो.”
“पण मग जेवण करता कुठे?”
“इथेच ताई, या स्टॉलवर सगळं करते मी! भाकरी, भात, मासे, चिकन, डाळ, भाजी… काय ऑर्डर असेल त्या परमानं सगळं!”
बोलता बोलता हात झरझर चालवत तिने आमच्या पुढे गरमागरम पोहे, ऑमलेट-पाव आणि चहा आणून ठेवला. हात धुवायला पाणी दिलं.
“इथे जवळपास पाण्याचा नळ आहे का?” मी हात धुताधुता विचारलं.
“सकाळी घरून येतानाच एक कळशी पाणी घेऊन येते. माजं घर जवलच हाय ताई, नंतर नवरा येतो लागेल तसं पाणी घेऊन.”
निघताना सहज आम्ही तिला कपड्यांची दुकानं कुठे आहेत असं विचारलं.
“काय हवंय?”
“पाण्यात घालण्याच्या शॉर्ट्स.. हाफ पॅंट्स हव्या होत्या!”
“माज्याकडे हायेत की!” असं म्हणत तिने आपल्या सामानातून एक मोठी पिशवी काढली. त्यात नशिबाने आम्हाला हवे ते कपडे सापडले. आमच्या पैशांचा भराभर हिशोब करून होईस्तोवर तिथे एक मोठा ग्रूप आला तसा मग तिने त्यांच्याकडे मोर्चा वळवला. तोडक्यामोडक्या हिंदीत ती त्यांच्याशी व्यवस्थित बोलत होती. आपला लहानसा व्यवसाय मोठ्या हिकमतीने सांभाळणाऱ्या या कष्टाळू, हसतमुख बायकांचं मला फार कौतुक वाटलं.

तिथल्या वास्तव्यात चारपाच वेळा समुद्रावर जाणं झालं. स्टॉल्सवरच्या बायकांशीही चांगला परिचय झाला. आम्ही मुद्दामच वेगवेगळ्या स्टॉल्सवर चहापाणी करायचो. गिऱ्हाईकं नसली की त्या एकमेकींशी गप्पा मारताना दिसायच्या. सरकारकडून मिळणारी नुकसानभरपाई हा मुख्य विषय कानावर पडत होता. पाच-सहा महिन्यांपूर्वीच या भागातल्या किनारपट्ट्यांवर ’निसर्ग’ वादळाने प्रचंड हैदोस घातला होता. या बायकांकडून त्या कहाण्या ऐकताना तर अंगावर शहारे आले.

“ताई, आत्ता तुमच्या अंगावर उन येतंय पण चार महिन्यांपूर्वी असं नव्हतं. समोर सुरुची, माडाची उंच झाडं होती. त्यांची दिवसभर सावली असायची. पलीकडचं दिसायचं नाय. हितंच नुस्त्या खुर्च्या टाकून लोक बसायचे चाय-नाश्टा करायला. आता छत्र्या लावायला लागतात.”
“वादळाला खूप जोर होता ना? छपरं उडाली असतील ना?”
“छपरं? सगळ्या टपऱ्या उलट्यापालट्या झाल्या. ही टपरी लावून तर सहा महिने जाले होते. काय नाय राहिलं. कपबशा, ग्लासं, बरण्या.. सगळा माल, टेबलं… सगळं तुटून फुटून गेलं. गॅसची शेगडी पन कामातून गेली. वादळापेक्षा नंतरच्या पावसानं पार वाट लागली बगा ताई! चार दिवस पाऊस थांबायलाच तयार नाई. घरातलं भरलेलं धान्य, कपडे, सगळं सामान चिखलात कुसून फुकट गेलं. आमी मिळेल ती मीठभाकर खाऊन सुखात राहणारी मानसं, पन या वादळानं भिकाऱ्यासारखी अवस्था झाली. घराचं छप्पर उडून गेलं, कपाटं पडली. अंगावरच्या कपड्यानिशी बाहेर पडलो. स्लॅबची घरं होती त्यांच्या दारात सगळ्यांनी चार दिवस काढले, कोनी शाळेत आसऱ्याला गेले. मिळेल ते खाऊन, ओल्या कपड्यांवर होतो. म्हातारी मानसं आणि ल्हान पोरांचे लई हाल झाले …” भोगलेलं सगळं पुन्हा आठवताना तिच्या डोळ्यात पाणी तरळलं.
“गेल्या महिन्यात पुन्हा कर्ज काढून ही बारकीशी टपरी बांधून घेतली. करोनामुळे नेहमीसारखा धंदा न्हाई. पण आता हळूहळू गिऱ्हाईकं यायला लागलीत. शनिवार रविवारी जेवणाच्या ऑर्डरी मिळतात. आता होईल सगळं व्यवस्थित! हरिहरेश्वराची कृपा आहे ताई आमच्या गावावर, इतकं नुकसान जालं पण एकही जीव गेला नाही! पैशाचं काय, गेला तसा परत येईल! लागेल तेवढी मेहनत करण्याची आपली तयारी आहे. मी सकाळी उठून जेवण करून इथे येते. मग दिवसभर इथेच असते. नवरा श्रीवर्धनला कामाला जातो. पोरं असतात घरीच! आजूबाजूला आपलीच मानसं हायेत, मला काय काळजी नाय!”

काहीही न बोलता मी ऐकतच राहिले. या खेडवळ बायकांचं लाखमोलाचं शहाणपण, त्यांची जिद्द आणि उदंड आशावाद मनात साठवत राहिले. पॉझिटिव्ह थिंकिंगवरची पुस्तकं, वर्कशॉप्स, भाषणं अशातून न सापडणारे असले परिस्थितीतून तावून सुलाखून आलेले जिवंत अनुभव आपल्याला किती सहजपणे मोलाच्या गोष्टी शिकवून जातात नाही? वादळं येतात, पूर येतात आणि आपापल्या कुवतीनुसार पडझड करून जातात पण ही शहाणी माणसं मात्र त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीने एकत्र येतात, एकमेकांना सावरतात आणि उभी राहतात. माझ्यासारखी शहरात राहणारी माणसं खरंतर हवापालट व्हावा म्हणून अशा ठिकाणी जातात आणि जगण्यासाठी आवश्यक असणारी अशा अनुभवांची शिदोरी सोबतच घेऊन परततात.

रोजच्या नवनव्या वादळांना तोंड देण्यासाठी …
 
-चित्रा वाघ

‘स्वयं’च्या पाहुण्या लेखिका विविध माध्यमांतून ललित आणि वैचारिक लिखाण करत असतात.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

लॉजिकला गुंडाळून मॅजिकल भरारी घेणारा Fly Away Home!

हा ब्लॉग म्हणजे तुमच्या मेंदूचा दर आठवड्याचा व्यायाम आहे! या ब्लॉगमुळे तुम्ही दर आठवड्याला काही नवीन तर शिकालच, पण...

ही दिवाळी अधिक 'productive' करूया का?

हा ब्लॉग म्हणजे तुमच्या मेंदूचा दर आठवड्याचा व्यायाम आहे! या ब्लॉगमुळे तुम्ही दर आठवड्याला काही नवीन तर शिकालच, पण...