‘लोकबिरादरी’ प्रकल्पाने आपल्याला काय दिलं? - Welcome to Swayam Talks
×

‘लोकबिरादरी’ प्रकल्पाने आपल्याला काय दिलं?

नविन काळे

हा ब्लॉग म्हणजे तुमच्या मेंदूचा दर आठवड्याचा व्यायाम आहे! या ब्लॉगमुळे तुम्ही दर आठवड्याला काही नवीन तर शिकालच, पण जगापेक्षा एक पाऊल पुढे राहाल याची आम्ही खात्री देतो.
 

Published : 22 December, 2023

‘लोकबिरादरी’ प्रकल्पाने आपल्याला काय दिलं?

Get Better Each Week #27

माझा जन्म मुंबईत झाला. तिथेच लहानाचा मोठा झालो. कामाचं ठिकाणही तिथेच आहे. सुंदर समुद्र किनारा, मोठमोठ्या इमारती, दिव्यांचा झगमगाट, महागड्या गाड्या, मोठे रस्ते, गर्दी, घड्याळाच्या काट्याला बांधलेलं लोकांचं आयुष्य, जगण्याचा अफाट स्पीड, चकचकीत दुकानं, दहा रुपयाच्या वडापावपासून दहा हजाराच्या बुफेपर्यंत रेंजमध्ये तुमच्या खिशाला परवडतील अशी खाण्याची हॉटेल्स, हवी ती गोष्ट कधीही आणि कितीही मिळण्याइतकी सुबत्ता, अयोग्य आणि अतिवापरामुळे पाणी-वीज फुकट जातील इतकी उद्दाम मुबलकता या वातावरणात मी राहतो. यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि अशा काही जिल्ह्यांनी बनलेला विदर्भ फक्त भूगोलाच्या पुस्तकातून, वर्तनमानपत्रातून वाचलेला किंवा टीव्हीवर ऐकलेला. महाराष्ट्रात प्रवास झाला तरी रत्नागिरी, पुणे, नाशिक याच्या पलीकडे नाही. मुंबई-रत्नागिरी-पुणे-नाशिक या चौकटीत सगळा प्रवास झालेला. त्यामुळे मुंबईबाहेरच्या महाराष्ट्राचं एक चित्र मनात तयार झालं होतं. त्या चित्राला पहिला सुरुंग लागला २०११ मध्ये! 

२००८ मध्ये माझ्या वडिलांनी (अनिल काळे) स्वतःच्या वयाच्या साठाव्या वर्षी आनंदवन-हेमलकसाला भेट देऊन हे प्रकल्प दाखवायचं पर्यटन सुरु केलं होतं. त्यामुळे घरात याविषयीची चर्चा नित्याची झाली होती. २०११ च्या जानेवारी महिन्यात आम्ही चार मित्र पहिल्यांदा आनंदवन हेमलकसा पाहायला गेलो. या निमित्ताने पहिल्यांदा ‘विदर्भ’ दर्शन झालं. चंद्रपूर मधला तो उजाड रखरखीत प्रदेश, कोळशाच्या खाणींमुळे पूर्ण आसमंतात एक काळसर शेड, मधूनच दिसणारी कापसाची शेतं, चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यांना छेदून जाणारी विदर्भाची गंगा - वैनगंगा नदी, नाक्यानाक्यावर दिवसरात्र खर्रा कुटत असलेल्या  पानबिडीच्या टपऱ्या, निसर्गात ब्राऊन रंगाने व्यापून गेलेला एक कोरडेपणा, सोयीसुविधा पोहोचवणारा पाईप इथे यायच्या आधीच पोखरलेला, वातावरणात गरिबीचा धूर पसरलेला, ब्लँक भाव असलेले लोकांचे चेहरे… हे सगळं चित्र सुन्न करणारं होतं. चंद्रपूरची हद्द ओलांडून गडचिरोलीत आल्यावर गोंडपिंपरी-आष्टी ओलांडल्यावर सुरु होणारं सागाच्या झाडांनी नटलेलं ते घनदाट जंगल, आदिवासींच्या झोपड्या, नाक्यानाक्यांवर बिड्या पीत गप्पा मारत बसलेली पुरुष मंडळी, चारचाकी गाड्यांकडे आश्चर्याने पाहणारी लहान आदिवासी मुलं, आलापल्ली-एटापल्ली अशी तेलगू वास येणारी गावांची नावं, आदिवासी लोकं ज्यांना पूजतात अशी कधीही न पाहिलेली वेगळीच प्रतीकं… हे सगळंच आयुष्यात पहिल्यांदा पाहात होतो-अनुभवत होतो. ‘खडतर’ रस्ता आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला फक्त घनदाट जंगल असा सलग वीस किलोमीटर प्रवास झाल्यावर रस्त्याच्या उजव्या बाजूला ‘लोकबिरादरी’ आल्याची चाहूल लागली. एका मोठ्या गेटमधून आत गेलो. त्यावेळी गेटच्या बाजूलाच एक गेस्टहाऊस होतं. आम्हाला तिथेच बॅग्स ठेवून काही वेळाने प्रकल्प पाहण्यासाठी यायला सांगण्यात आलं. मनात आलं, लोकबिरादरीची स्थापना होऊन जवळजवळ चाळीस वर्षांनी मी आज आलो. मला हा प्रदेश, हा प्रवास २०११ मध्येही खडतर वाटला. एकाच महाराष्ट्रात असून मी पाहिलेल्या महाराष्ट्राशी मला या भागाला ‘रिलेट’ करता येत नाहीये इतका हा वेगळा भाग आहे. चाळीस वर्षांनी प्रकल्प, गेस्टहाऊस वगैरे… चाळीस वर्षांपूर्वी पहिल्यांदा बाबा आमटे, प्रकाशभाऊ, विकासभाऊ, मंदाताई, विलास काका मनोहर वगैरे आले असतील तेव्हा काय असेल इथे? आपण इथेच राहून बघू, येणाऱ्या प्रसंगांना एकत्र सामोरे जाऊ… असं वाटण्याचं मोटिव्हेशन केवढं विलक्षण असेल? आम्ही अजून प्रकल्प पाहायला देखील नव्हता. आमटे कुटुंबीयांची भेट देखील झाली नव्हती. पण तरीही पहिल्यांदा लोकबिरादरी प्रकल्पाची ताकद कळली ती अशी ! त्या दिवशी लोकबिरादरीचा सगळा प्रकल्प अनिकेतने दाखवला. प्रकाशभाऊ आणि मंदाताई बाहेरगावी असल्यामुळे त्यांची भेट झाली नाही. पण त्या दोन दिवसांत अनिकेतबरोबर खूप गप्पा झाल्या. हेमलकसाच्या त्या शांततेत लहान मुलींच्या आवाजातली ती संध्याकाळची प्रार्थना ऐकताना डोळे पाणावले नाहीत तरच नवल. लोकबिरादरी प्रकल्प आणि तिथलं वैद्यकीय आणि शिक्षण क्षेत्रातलं काम पाहून आपण सूक्ष्म असल्याचा एक नम्र भाव आला. तो प्रकल्प, तिथली माणसं या सगळ्यांबरोबर आपलं काही ‘कनेक्शन’ आहे असं वाटलं. आपण इथे येत राहायला हवं असं वाटून गेलं. हेच फिलिंग त्यानंतर पण येत राहिलं. पुढे खूप काळ टिकलं. आज इतक्या वर्षांनंतर आत्ता लिहितानाही तसंच वाटतंय.  

पुढे मी नोकरी सोडून पूर्णवेळ ‘अमृतयात्रा’ (सामाजिक पर्यटन) आणि ‘स्वयं’ करायचं ठरवल्यावर मी हेमलकसामध्ये किती वेळा आलो हे मोजायचं देखील बंद केलं. चोवीस पंचवीस लोकांना घेऊन मी आनंदवन-हेमलकसा-सोमनाथ प्रकल्प दाखवायला घेऊन येत असे. अशा कितीतरी सहली मी केल्या. मुंबई नागपूर हा प्रवास रेल्वेने होत असे. पुढे सगळा प्रवास बसने. पण या प्रवासाचा कधीच कंटाळा आला नाही. हेमलकसाला आल्यावर आमच्या टूरमधल्या लोकांना सचिनच्या हवाली केलं की मी मोकळा होत असे. हेमलकसामध्ये मला स्वतःला सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे तुम्ही कुठले कपडे घातलेत, तुम्ही दाढी केलीय का, तुमचे केस कसे आहेत या सगळ्याचा विसर पडतो आणि तुम्ही खूप सैलावता. तुमच्यावर कुठलंही सोशल प्रेशर नसतं. तुम्ही तुमचे असता. घराच्या बाहेर असलेल्या त्या शेकोटीवर अनिकेत, समीक्षा, दिगंत, अनघा यांच्याबरोबरच्या होणाऱ्या गप्पांना माझ्या मनात एक वेगळंच स्थान आहे. अनेकदा प्रकाशभाऊ-मंदाताई देखील असत पण त्यांची निजायची वेळ झाली की शांतपणे आतल्या खोलीत निघून जात. त्या रात्रीच्या गप्पांमध्ये आज काय काय झालं इथपासून ते वेगवेगळी माणसं, पुस्तकं, सिनेमा, राजकारण अशा चौफेर गप्पा चालत. एकदा रात्रीचे नऊ वगैरे झाले असतील. प्रकल्पावर निजानीज झाली होती. अनिकेत म्हणाला, जरा चक्कर मारून येऊ. आम्ही मुख्य रस्त्यावर येऊन भामरागडच्या दिशेने चालू लागलो. समोर फक्त टॉर्चचा प्रकाश आणि मागे मिट्ट काळोख. अनिकेत बोलत होता पण मी घाबरून फक्त टॉर्चच्या प्रकाशात बघत गुपचूप चालत होतो. काय माहीत, पायाखालून-मागून-समोरून काय येईल ! इतक्यात अनिकेत म्हणाला, समोर बघ. अनिकेतने टॉर्च बंद केला. बाजूला उभा असलेला अनिकेतसुद्धा दिसत नव्हता. मी समोर पाहिलं. वरचं आकाश चांदण्यांनी भरलेलं आणि समोरचं संपूर्ण झाड काजव्यांनी ! हे दृश्य मनावर कायमचं कोरलं गेलंय. अनिकेतने मला त्या परिसरात फिरवून तिथे लोकबिरादरीच्या साहाय्यातून होत असलेली पाण्याची कामे दाखवली. एक प्रसंग माझ्या मनावर कायमचा कोरला गेलाय. एकदा अनिकेत आणि समीक्षा आम्हाला होडीतून समोरच्या तीरावर घेऊन गेले. श्रीलंका-बाली मधलं शोभावं असं ते एक निर्जन बेट होतं. एका जंगलात आम्ही बराच वेळ चालून गेल्यावर एक झोपडी लागली. झोपडीत एक बाई होत्या. समीक्षा आत गेली आणि माडिया भाषेत तिच्याशी बोलत त्या दोघीही बाहेर आल्या. तिच्या नवऱ्याला ‘नक्षलवादी’ समजून पोलीस त्याला दहा दिवसांपूर्वी घेऊन गेले होते. तो दहा दिवस घरी आला नव्हता. ती बाई रडत नव्हती. डोळे कोरडेठाक होते. पण तिच्या चेहऱ्यावर एक हताशा होती. या समाजाकडून तिला न्याय मिळेल याची कणभरही आशा तिच्या डोळ्यांत नव्हती. का माहीत नाही, मी तिच्या नजरेला नजर देऊ शकलो नव्हतो. 

लोकबिरादरीमधलं प्राण्यांचं अनाथालय आणि प्रकाशभाऊंचा तिथला वावर याविषयी खूप लोकांना आकर्षण आहे. प्रकाशभाऊ आणि त्या सर्व प्राण्यांमधील नातं-प्रेम आपल्या शहरातील लोकांना आश्चर्य वाटेल असंच आहे. पण माझ्या अल्प अनुभवातून मला जे उमगलंय त्याप्रमाणे, मला वाटतं तो प्रकाशभाऊंच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग आहे. सात अष्टमांश प्रकाशभाऊ बरेचसे अज्ञात आहेत. ते खूप वाचतात. माणसांबद्दलचं, महाराष्ट्राच्या सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचं त्यांचं आकलन खूप विलक्षण आहे. ते कमी बोलतात. पण नेमकं बोलतात. त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर अद्वितीय आहे. प्रकल्प चालवायचा म्हणजे सोपी गोष्ट नाही. प्रकल्प चालवण्यासाठी देणग्यांची अवश्यकता असते हे मान्य. पण प्रकल्प फक्त त्यावर चालत नाही. प्रकल्प चालवण्यासाठी आधी कुणाला तरी त्या प्रकल्पाचा आई बाप व्हावं लागतं. प्रकाशभाऊ आणि मंदाताईं एका अर्थाने लोकबिरादरीचे आई बाप झाले. विलास काका मनोहर, रेणुका ताई यांनीही त्यांना या संपूर्ण प्रवासात जिवाभावाची साथ केली. प्रकल्प चालवण्यासाठी सतत त्या कामाचा core सांभाळावा लागतो. पावसात रस्ते वाहून जातात. जगाशी संपर्क तुटतो. नेटवर्क, वीज सगळं जातं. या परिस्थितीत देखील काम करत राहावं लागतं. स्वतःची झोपमोड करून रात्री अपरात्री येणाऱ्या आदिवासी लोकांना वैद्यकीय सेवा द्यावी लागते, फी वगैरे तर सोडा साध्या Thank you ची देखील अपेक्षा न करता त्यांच्यावर उपचार करावे लागतात. अनेक मोहांवर विजय मिळवावा लागतो. तुमची प्रशासनावर पकड असावी लागते. वेगवेगळ्या स्वभावाच्या लोकांना सांभाळावं लागतं. त्यांना एकत्र ठेवावं लागतं. कधी प्रेमाने. कधी शिस्तीचा वापर करून. शाळेतल्या मुलांची नैतिक जबाबदारी घ्यावी लागते. सरकारी नियम कितीही जाचक असले तरी पाळावे लागतात. एक व्यक्ती म्हणून स्वतःच्या आचरणावर - वाणीवर नियंत्रण ठेवावे लागते. मला आनंद आहे की हे सगळं प्रकाशभाऊ-मंदाताई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेली पन्नास वर्षे यशस्वीपणे केलं आणि आता त्यांची पुढची पिढी आणि त्यांची टीम पुढची पन्नास वर्षे यशस्वीपणे करणार आहे ! 

लोकबिरादरी प्रकल्प ही एक सामाजिक संस्था असली तरी मी त्याकडे सामाजिक अर्थाने एक ‘इकॉनॉमिक मॉडेल’ म्हणून बघतो. हा सामाजिक प्रकल्प असला तरी तो एखाद्या कंपनीप्रमाणे चालवावा लागतो. कुठल्याही मॉडेलमध्ये sustainability and scalability हे दोन निकष महत्त्वाचे मानले जातात. लोकबिरादरीने अतिशय विचारपूर्वक या दोन्ही गोष्टी खूप छान सांभाळल्या. इमारती, जमिनी याचा विस्तार न करता, आहे ते काम अधिक सक्षम होण्याकडे लक्ष दिलं. हॉस्पिटल आणि शाळा अधिकाधिक अद्ययावत केल्या. संस्था सतत काळाप्रमाणे बदलत राहिली. तरुण कार्यकर्त्यांची फळी उभी होत राहिली. जुन्या लोकांचे मार्गदर्शन घेत नवीन तरुण पिढी नव्या ऊर्जेने काम करत राहिली. अनिकेत, समीक्षा, दिगंत, अनघा ही नवी पिढी संस्थेत innovation आणत राहिली. शेती, शिक्षण, ऊर्जा, कला, वैद्यकीय, व्यवसाय, तंत्रज्ञान यात जे जे काही नवं येतंय त्यातील शक्य असेल त्या त्या गोष्टींचा संस्थेमध्ये अंतर्भूत करण्यात आला. यामुळे आज पन्नास वर्षांनंतरही संस्था तरुण आणि ताजी राहिली. प्रत्येक संस्थेने - मग ती व्यावसायिक असो वा सामाजिक - हे लोकबिरादरीकडून शिकायला हवं असं मला वाटतं. 

आज लोकबिरादरी आपल्या पन्नासाव्या वर्षात पदार्पण करते आहे. काय काय घडलं असेल या पन्नास वर्षांत. नुसती कल्पना केली तरी नतमस्तक व्हायला होतं. आदिवासी समाजाचा विकास व्हायला हवा, आदिवासी समाज शिक्षण-आरोग्य-प्रशासन आणि मूलभूत सुविधांपासून वंचित राहता कामा नये हे बाबा आमटे यांनी पाहिलेलं स्वप्न आज लोकबिरादरीच्या माध्यमातून अगदी संपूर्ण नाही, तरी काही अंशी तरी पूर्ण झालं आहे. इथल्या शाळेत शिकून आयुष्यात स्वतःच्या पायांवर उभी राहिलेली मुलं ही खरी या संस्थेची सन्मानचिन्हं आहेत. या संस्थेच्या उभारणीत ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं आणि पुढील वाटचालीत जे जे देत आहेत त्या सर्वांचं स्मरण आणि अभिनंदन ! पुढील वाटचालीसाठी सर्वांना निरोगी आणि निरामय आयुष्य लाभो ही प्रार्थना. 

लोकबिरादरी प्रकल्पाने माझ्यासारख्या अनेकांना माणूस म्हणून घडवलंय, समृद्ध केलंय. 

त्याबद्दल आपण लोकबिरादरीचे आजन्म ऋणी राहायला हवं.  

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

पिप्लंत्री ग्रामदूत - पद्मश्री श्यामसुंदर पालीवाल

'बेटी धनाची पेटी' हे आपण ऐकतो, वाचतो. पण हे प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवलं आहे पद्मश्री श्यामसुंदर पालीवाल यांनी! त्यांनी...

काळजी वाहणारे Robot युग!

Robots बद्दल गेले अनेक वर्ष आपल्याला कुतूहल आहे. मानवी गरजा समजून त्यावर supercomputing च्या साहाय्याने emotional support देणारा robot बनवता आला...

चेकलिस्ट: मतदान करण्यापूर्वीची!

निवडणुकांत मतदान करण्यापूर्वी आपण कधी चेकलिस्ट बनवली आहे का? मतदार राजा सजग झाला तर राजकारण अधिक गंभीर होऊ शकते. आता...