Get Better Each Week #9 - Welcome to Swayam Talks
×

Get Better Each Week #9

नविन काळे

हा ब्लॉग म्हणजे तुमच्या मेंदूचा दर आठवड्याचा व्यायाम आहे! या ब्लॉगमुळे तुम्ही दर आठवड्याला काही नवीन तर शिकालच, पण जगापेक्षा एक पाऊल पुढे राहाल याची आम्ही खात्री देतो.
 

Published : 11 August, 2023

Get Better Each Week #9

AI च्या साम्राज्यात माणूस कुठे असणार आहे?

📽️ Video of the Week 😎

जग झपाट्याने बदलतंय.
मी हे वाक्य लिहीपर्यंत जग पुढे गेलंय. हे वाक्य तुम्ही वाचेपर्यंत जग पुढे जातंय.
म्हणूनच आजचा ब्लॉग विशेष आहे. माझी खात्री आहे की ज्या व्हिडीओ सिरीजबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे ती व्हिडीओ सिरीज आपल्यापैकी कुणीही पाहिली असण्याची शक्यता जवळजवळ नाही. आणि म्हणूनच ही सिरीज तीन वर्षांपूर्वीची असूनही आपल्यासाठी नवीन असणार आहे, आपल्याला ती खूप आधुनिक वगैरे वाटणार आहे.

मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये Open AI किंवा Chat GPT आलं. फेसबुकला पाच वर्षांत जितके downloads मिळाले असतील तितके downloads यांना म्हणे पाच दिवसांत मिळाले. Chat GPT च्या येण्याने संपूर्ण जग हादरून गेलंय. आता माणसाच्या स्वतःच्या बुद्धीचं काय होणार? मुलं स्वतःचं डोकंच चालवणार नसतील आणि त्यांना अशी रेडिमेड उत्तरं मिळणार असतील तर शिक्षणाचं भविष्य धोक्यात आहे असं अनेकांना वाटतंय. यामुळे अनेक ठिकाणी 'AI - शाप का वरदान ?' छाप निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा सुरु झाल्यात. पण AI हा विषय शाळेतला अभ्यास, PPTs, भाषांतर, चित्रकला याच्या कितीतरी पुढे गेलाय. तो आता अधिक खोल होतोय. तुम्हाला मान्य असो वा नसो, AI म्हणजेच Artificial Intelligence आता तुमच्या आयुष्याचा भाग झाला आहे. AI आणि तुम्ही compatible आहात की नाही हा आता प्रश्न नसून, how are we going to manage this compatibility हा खरा प्रश्न आहे.

नेमक्या याच टप्प्यावर 'YouTube Originals' ने The Age of AI नावाची नऊ भागांची एक सिरीज YouTube वर आणली आहे. त्यातले दोन भाग पाहून झोप उडाली. ते पाहून तुमचीही झोप उडावी ही माझी मनापासून इच्छा आहे. काळाप्रमाणे आता रद्दीत जायला हव्यात अशा आपल्या जुन्या परंपरा-रूढी, आजूबाजूला सुरु असलेल्या राजकारणाचा चिखल, सोशल मीडियावर सुरु असलेल्या पोकळ चर्चा, रील्स-व्हिडीओ गेम्सचं बेधुंद जग यातून नव्या फ्रेश विचारांच्या खुल्या हवेत येऊया. AI चा उपयोग करून आता जगभरातले शास्त्रज्ञ एकत्र येऊन माणसाचं आयुष्य अधिक सुखी करण्यासाठी, माणसाच्या आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी, माणसाची कलादृष्टी अधिक व्यापक करण्यासाठी कसा प्रयत्न करतायत याबद्दलची ही सिरीज आहे. उदा. ज्या लोकांना बोलण्याची अडचण आहे, अशा लोकांसाठी या शास्त्रज्ञांनी AI च्या मदतीने असं एक device तयार केलंय की समोरच्या माणसाला हा काय बोलतोय हे Text मधून किंवा त्या माणसाच्या पूर्वीच्या 'स्वच्छ' आवाजात ऐकू येईल. इतकंच नाही, तर AI च्या मदतीने डोळ्यांमधले दोष काही सेकंदात शोधता येतायत, आणि अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांनी केलेल्या या प्रयोगाची यशस्वी चाचणी आपल्या मदुराईतल्या गावांमध्येही केली गेलीय. एका गायकाचा 'डिजिटल क्लोन' तयार करून त्याला या गायकाचा आवाज, त्याच्या सवयी शिकवण्यात आल्यात. याचा अर्थ, तो मूळ गायक कधीतरी मरेल. पण या क्लोनच्या रूपातून तो एका अर्थी अमर होणार आहे. अपघातात हाताची बोटं गेलेल्या माणसांना हाताचा कृत्रिम पंजा मिळतोय आणि AI च्या साहाय्याने ती व्यक्तीचा मेंदू कृत्रिम पंज्याच्या हव्या त्या बोटाला आदेश देऊ शकतोय ! AI चा वापर करून मनुष्य जातीला अधिक निर्बुद्ध आणि निरुपयोगी करणाऱ्या बातम्या येत असताना 'YouTube Originals' ची ही सिरीज अधिक आश्वासक आणि आशादायी आहे. म्हणूनच तीस चाळीस मिनिटांचा एकेक भाग असलेली ही सिरीज तुमच्या मुलांसोबत बघा अशी माझी तुम्हाला खास विनंती आहे. जग कुठे चाललंय आणि जग अधिक सुंदर होण्यासाठी या ज्ञानाचा उपयोग कसा केला जातोय, हे पुढल्या पिढीलाही कळायला हवं.

या सीरिजचा पहिला भाग एका मूलभूत प्रश्नाशी येऊन थांबतो. AI म्हणजे Artificial Intelligence. याचा अर्थ माणसाचा intelligence हा Natural आहे हे यात गृहीत धरलेलं आहे. आपण जे पेरणार आहोत, तसं उगवणार आहे. मशीन लर्निंग मधून ही मशिन्स आणखी आणखी हुशार होत जाणार आहेत. पण मशीनचं संपूर्ण शिक्षण Pattens वर आधारित आहे. मग प्रश्न हा आहे की, मशीनने कधीतरी या Pattenच्या बाहेर जाऊन विचार केला तर? माणसाप्रमाणे मशीनने स्वतःचा विचार (free will) केला तर? हे जर खरंच घडलं तर AI च्या या साम्राज्यात माणूस कुठे असेल?

ही सिरीज पाहा आणि या प्रश्नावर विचार करा. आणि हो ! जमल्यास स्वतः विचार करा. निदान तुम्ही हा प्रश्न तरी Chat GPT ला विचारणार नाही अशी मी आशा करतो.

_______________________________

जाता जाता एक bonus content !

Open AI चा जनक सॅम अल्टमॅनला याची खात्री आहे, की AI मुळे जगात अनेक माणसे बेरोजगार होणार आहे. म्हणून सॅमच्या मनात एक 'उदात्त' विचार आलाय. तो अशा लोकांना जिवंत राहण्यासाठी दर महिना एक रक्कम देणार आहे. त्यासाठी तो Worldcoin नावाची एक करन्सी तयार करतोय. जगात अशा लाखो लोकांना दिला जाणाऱ्या या रकमेला त्याने नाव दिलंय - UBI - म्हणजेच Universal Basic Income ! तेव्हा AI मुळे उद्या बेकार होण्याची वेळ तुमच्यावर आलीच तर हा सॅम भाऊ तुम्हाला दर महिन्याला एक रक्कम पाठवणार आहे !

थांबा थांबा ! इतके खुश होऊ नका ! ही रक्कम मिळण्यासाठी सॅमच्या काही अटी आहे.
एक म्हणजे, तुम्ही एका ठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या डोळ्याचे biometric sample द्यायचे आहे. जे देण्यासाठी जगभरात लोकांच्या रांगा लागतायत. ते दिल्यावर तुम्हाला एक युनिक आयडी मिळेल.
ज्या आयडीवर तुम्हाला ती रक्कम मिळेल. थांबा. आणखी एक अट. Worldcoin ही एक Crypto currency आहे. तेव्हा तुम्हाला तेवढ्या पैशाची बिटकॉईन्स मिळतील ! तुमच्या डोळ्यांची सॅम्पल्स घेऊन सॅम अल्टमॅन काय करणार वगैरे फालतू प्रश्न तुम्ही विचारायचे नाहीत. तुम्ही फक्त बिटकॉईन्स घेऊन जिवंत राहायचं.

असो. हे आपल्या देशात यायला अजून वेळ आहे.
तोपर्यंत ती वर सांगितलेली सिरीज पाहून ठेवा.
सॅम अल्टमॅनचं World Coin असेल, ही YouTube ची सिरीज असेल किंवा यापुढे एकूणच जगताना ... या सर्व ठिकाणी एकच मुख्य अट आहे... फक्त तुमचे डोळे उघडे ठेवा म्हणजे झालं !

व्हिडीओ सिरीजची लिंक: https://youtube.com/playlist?list=PLhA-wpCoELfsjhy8R8H0sjUm8YPc7x8S2

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

देणगी काहीतरी सुचत राहण्याची!

सर्जनशील असणं याची मुभा सगळ्यांना आहे. आपण एखाद्या गोष्टीचा विचार कसा करतो? आणि त्याचा अवलंब कसा करतो? यावर सारं अवलंबून...

आसामच्या 'लक्ष्मी माँ': पद्मश्री लखिमी बरूआ

आसाम सारख्या दुर्गम भागातील राज्यात महिला सक्षमीकरण आणि सहकार क्षेत्रांत आसामी महिलांचे आर्थिक सशक्तीकरण करण्यात...

कल्पनाशक्तीची नवी 'LINE'

कल्पनाशक्ती जादुई असते. ती नवे क्षितिज दाखवते आणि त्या पलीकडे काय असेल ह्या विचारात पाडते. अशाच एका अद्भुत विचाराला...