Get Better Each Week #8 - Welcome to Swayam Talks
×

Get Better Each Week #8

नविन काळे

हा ब्लॉग म्हणजे तुमच्या मेंदूचा दर आठवड्याचा व्यायाम आहे! या ब्लॉगमुळे तुम्ही दर आठवड्याला काही नवीन तर शिकालच, पण जगापेक्षा एक पाऊल पुढे राहाल याची आम्ही खात्री देतो.
 

Published : 4 August, 2023

Get Better Each Week #8

Amor Fati - आनंदी जगण्याची गुरुकिल्ली !

एक मोठ्ठा बंगला, घराच्या बाहेर गाड्यांचा ताफा, दिमतीला नोकरचाकर, दिवस-रात्र धमाल करणारी - गोड गोड बोलणारी -अंताक्षरी खेळणारी - नटून थटून बसणारी - जीवाला जीव देणारी घरातली माणसं, भांडणं झालीच तर यावर्षी फिरायला न्यूझीलंडला जायचं की युरोपला यावरून...असं आयुष्य फक्त सुरज बडजात्याच्या फिल्ममध्येच असू शकतं.

वास्तवातलं आयुष्य अनुराग कश्यपच्या फिल्मसारखं ग्रे असतं.

सगळं काही छान आहे असं वाटत असूनही डोक्यात सतत भुणभुण करणारा एक प्रॉब्लेम, पैशाची तंगी, वास्तव आणि अपेक्षा यात वाढत गेलेली दरी, कामातली टेन्शन्स, घरातला नळ गळतोय इथपासून घरातलं एक मूल सतत आजारी असतं इथपर्यंत कुठल्याही रेंजमधल्या घरगुती समस्या... असं आपलं वास्तवातलं आयुष्य असतं.
ये जीवन है, इस जीवन का
यहीं है यहीं है यहीं है रंगरूप... हे गाणं आपलं रोजच्या जगण्याचं anthem असतं.

मग प्रश्न पडतो, नक्की जगावं तरी कसं ?
समस्यांना तोंड देऊन जगणारे आपण एकटेच नाही. याआधी हजारो वर्षे माणसं कदाचित आजच्याहून जास्त समस्या असतानाही जगत आली आहेत. याला एक असं उत्तर देणं कठीण आहे. पण प्रत्येक संस्कृतीमधील लोकांनी यावर बराच विचार करून ठेवलाय, आजही करत आहेत. यातली एक संकल्पना आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. या पाश्चात्त्य संकल्पनेचं नाव आहे -
Amor Fati ! - अमोर फाटी !

Amor Fati हे लॅटिन शब्द आहेत. या संकल्पनेचा अर्थ आहे, Love one's fate !
थोडक्यात तुमच्या नशिबात जे काही आहे त्याचा प्रेमाने स्वीकार करा ! ही एक Stoic संकल्पना आहे. Stoicism ही पाश्चिमात्त्य विचारधारा इ.पू. ३०० वर्षे जुनी आहे. स्वतःच्या आंतरिक विकासासाठी या आधुनिक तत्त्वज्ञानाची शिकवण अनेक लोकं आजही मानतात. त्यांचं असं म्हणणं आहे की तुमची सध्याची परिस्थिती ही अनेक गोष्टींचा परिपाक आहे. त्यात काही गोष्टी तुमच्या नियंत्रणामधील आहेत, तर काही नाहीत. तेव्हा अमुक एक गोष्ट माझ्याच नशिबी का आली, यावर शोक न करता परिस्थितीचा स्वीकार करून पुढे सरका. अपेक्षित परिस्थिती निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करा. इथे आणखी एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे. 'Amor Fati' या संकल्पनेचा उपयोग केवळ वाईट परिस्थितीतच करायचा नसून चांगल्या दिवसांतही याचा विचार करायचा आहे. याचाच अर्थ सुख आणि दुःख एकाच पातळीवर पाहाता येणे म्हणजे Amor Fati !

इथे मला साहिर लुधियानवीच्या त्या प्रसिद्ध ओळी आठवतात -

ग़म और ख़ुशी में फर्क न हो महसूस हो जहाँ
मै दिल को उस मक़ाम पे लाता चला गया....

गीतेमध्ये सांगितलेले 'स्थितप्रज्ञ' माणसाचे लक्षण याहून अधिक चांगले कुठे असू शकेल?

सुखाच्या दिवसांमध्ये तत्त्वज्ञान वगैरे ऐकायला छान वाटतं. पण वाईट दिवसांमध्ये? यासाठीच हा मनाचा रियाझ दिलाय. सुखाचे रूपांतर उन्मादात न होणं दुःखाचे रूपांतर गंभीर निराशेत न होणं यासाठी मनाची बैठक तयार करणं म्हणजेच Amor Fati !

याक्षणी मला आणखीन आठवतायत डॉ सुनंदा अवचट. अनिल अवचट यांच्या पत्नी. सुनंदा ताईंनी आनंदाने जगण्याची स्वतःपुरती एक 'युक्ती' शोधली होती. कुठलाही वाईट प्रसंग घडला की तो सांगून झाला की सुनंदा ताई सुरुवातच एका जादुई शब्दाने करायच्या - तरी बरं....! त्यांना स्वतःला कॅन्सर झाला होता. त्याबद्दल बोलतानाही सुनंदा ताई म्हणायच्या, 'तरी बरं...कॅन्सर झाला. मला आता माझ्या 'मृत्यूचं प्लॅनिंग' करता येईल. अपघातात अचानक गेले असते तर?'

जगण्याची ही दृष्टी केवळ सकारात्मक विचारांमधून येत नाही. त्यासाठी तुमच्या जगण्यात 'Amor Fati' असावा लागतो. सुखाला आणि दुःखाला एकाच पातळीवर बघण्याची ताकद असावी लागते. जगणं निरंतर आहे; सुख आणि दुःख हे केवळ त्यातले ऋतू आहेत हे ओळखण्याची पात्रता ज्यांच्यात असते, तीच माणसं आयुष्यात येणाऱ्या कितीही मोठ्या आपत्तीकडे इतक्या 'सहज' वृत्तीने पाहू शकतात.

मग Amor Fati म्हणजे जे घडतंय ते मान्य करत हातावर हात ठेवून जगत राहाणे का?
अजिबात नाही! Amor Fati म्हणजे गोष्टींचा स्वीकार करून सर्वात आधी आतून शांत होणे.
घडणाऱ्या गोष्टींवर प्रतिक्रिया (reaction) न देता प्रतिसाद (response) देण्यासाठीचा जो मधला वेळ आहे तो म्हणजे Amor Fati !

आर्थर ऍश नावाचा एक सुप्रसिद्ध टेनिसपटू होता. तो एड्सने मरण पावला. दुसऱ्या एका बाधित रुग्णाची सुई आर्थरसाठी 'चुकून' वापरली गेली आणि आर्थरला एड्स झाला. ते कळल्यावर आर्थरचं सुप्रसिद्ध वाक्य होतं - “If I were to say 'God, why me? ' about the bad things, then I should have said 'God, why me? ' about the good things that happened in my life.”

जाता जाता आनंदी-समाधानी जगण्याचा गुरुमंत्र घेऊन जा ! लक्षात ठेवायला आणि म्हणायला खूप सोपा आहे.... Amor Fati !

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

देणगी काहीतरी सुचत राहण्याची!

सर्जनशील असणं याची मुभा सगळ्यांना आहे. आपण एखाद्या गोष्टीचा विचार कसा करतो? आणि त्याचा अवलंब कसा करतो? यावर सारं अवलंबून...

आसामच्या 'लक्ष्मी माँ': पद्मश्री लखिमी बरूआ

आसाम सारख्या दुर्गम भागातील राज्यात महिला सक्षमीकरण आणि सहकार क्षेत्रांत आसामी महिलांचे आर्थिक सशक्तीकरण करण्यात...

कल्पनाशक्तीची नवी 'LINE'

कल्पनाशक्ती जादुई असते. ती नवे क्षितिज दाखवते आणि त्या पलीकडे काय असेल ह्या विचारात पाडते. अशाच एका अद्भुत विचाराला...