२०२२ साली जपानमध्ये एकूण दीड लाख माणसे मृत्यु पावली. हा आकडा दुसऱ्या महायुद्धानंतर सर्वात जास्त आहे.
जपानमध्ये जन्मदर कमी होऊन मृत्युदर वाढतोय. इतका की मेलेल्या माणसांचे अंत्यविधी करायला स्मशानाच्या जागा कमी पडतायत. जपानमध्ये पारंपरिक पद्धतीने अंत्यविधी करायचे असल्यास मृत शरीर जाळले जाते आणि अस्थींचे दफन केले जाते. दफन केलेल्या जागी मृत व्यक्तीच्या नावाने छोटेसे दगडी स्मारक उभारले जाते. २०२० मध्ये जपानमध्ये विविध ठिकाणची मिळून सुमारे एक लाख वीस हजार स्मारके चक्क ‘बंद’ करण्यात आली.
हे असं का होतंय?
एका अर्थाने जपान देशच आता म्हातारा झालाय.
एखाद्या कुटुंबात वृद्ध माणूस मृत्यू पावला तर त्याचे अंत्यविधी करण्यासाठी तरुण माणसे कमी आहेत.
स्मारकांची मालकी संबंधित कुटुंबांकडे असते. माणूस गेल्यावर त्या स्मारकाला ‘जिवंत’ ठेवण्याबद्दल कुटुंबाला तिथल्या जपानी देवळांना दरवर्षी एक तगडी फी द्यावी लागते. त्यामुळे अशा दगडी स्मारकांची मालकी आता तिथल्या लोकांना परवडेनाशी झालीय. शहरांत राहायला आलेल्या लोकांना गावात असलेल्या त्यांच्या पूर्वजांच्या समाधीला भेट देणे त्रासाचे ठरत आहे.
परंपरेला धरून बसणे परवडत नाही, म्हणून आधुनिक जपानी माणूस आता अधिक प्रॅक्टिकल होऊ पाहतोय.
एकतर अंत्यविधी संबंधातील सर्व फाफटपसारा आता कमी केला जातोय. अंत्यविधीसाठी जमणारी भरपूर माणसे, फुलांची आरास, डेकोरेशन, त्यासंबंधी होणारे इतर सर्व कार्यक्रम या सर्वांना चक्क कात्री लावली जातीये. जपानमध्ये सर्वसाधारणपणे अंत्यविधी बौद्ध पद्धतीने केले जातात. आता कुठलेही धार्मिक विधी न करता केवळ दहन करण्याचाही ट्रेंड जपानमध्ये वाढतोय. मृत माणसाच्या अस्थी जमिनीत पुरून तिथे झाड लावण्याची पद्धत काही लोकांना आवडत आहे. या सगळ्याच्या वर कडी करत एका बहाद्दराने एक अनोखी कंपनी सुरु केलीय. या कंपनीचे नाव आहे बलून कोबो ! या कंपनीच्या मदतीने मृत व्यक्तीच्या अस्थी एका भल्या मोठ्या फुग्यात घातल्या जातात आणि तो फुगा हवेत सोडून दिला जातो. अशा प्रकारचे ‘बलून फ्युनरल’ आता जपानमध्ये लोकप्रिय होतंय.
फुगा हवेत फुटून गेल्यावर त्यातील अस्थी जमिनीत मिसळतील हे ठीक, पण फुटलेल्या फुग्यांचे ते अवशेष जे इतरत्र पसरतील तेही decompose होतील असा कंपनीचा दावा आहे.
असो.
माणसाच्या आयुष्यातील सर्वात संवेदनशील मुद्द्यावर जपानमध्ये एक समस्या उभी राहिली आहे.
त्यावर त्या देशातील काही माणसे उत्तर शोधू पाहतायत. ती उत्तरे योग्य की अयोग्य हा मुद्दा नाही.
बदलत्या काळानुसार जे नवे प्रश्न उभे राहतात त्या प्रश्नांवर नवीन उत्तरे शोधायचा प्रयत्न करणारा समाजच खऱ्या अर्थाने जिवंत असतो !
____________________________________________________________________________________________
आपल्या देशाचा विचार करता अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला दिसतात, ज्यांना आपण वर्तमानाचा मुलामा देण्याची गरज आहे. तुम्हाला अशा कुठल्या गोष्टी वाटतात? तुमचं मत आम्हाला लिहून पाठवा. पण नुसतीच विषयांची नावं नकोत. त्याबरोबर त्याला पर्यायी व्यवस्था काय असावी याचंही थोडं दीर्घ स्पष्टीकरण द्या. यातील लक्षणीय विचारांना तुमच्या नावासहित प्रसिद्धी दिली जाईल.