देणगी काहीतरी सुचत राहण्याची! - Welcome to Swayam Talks
×

देणगी काहीतरी सुचत राहण्याची!

आदित्य दवणे

सर्जनशील असणं याची मुभा सगळ्यांना आहे. आपण एखाद्या गोष्टीचा विचार कसा करतो? आणि त्याचा अवलंब कसा करतो? यावर सारं अवलंबून आहे. त्याविषयी वाचा आजच्या ब्लॉगमध्ये.
 

Published : 7 June, 2024

देणगी काहीतरी सुचत राहण्याची!

#Get Better Each Week 50

काहीतरी सुचण्याची, सुचत राहण्याची देणगी विलक्षण आहे!

आता काही सुचण्याचा उल्लेख झाल्यानंतर साहजिकच कलाकार या प्रजातीचा विचार मनात येऊ शकतो; कवी, चित्रकार, संगीतकार इत्यादी ज्यांना सुचतं, ज्यांना सृजनाची हाक ऐकू येते आणि मग काही साकार होतं असे कलाकार आपल्याला आठवू लागतात! मात्र आज थोडा वेगळा विचार करून बघू. 

कल्पना करा, एखाद्या सुट्टीच्या दिवशी आठवड्याभराचा ताण आलेला असताना तुम्ही लवकर जागे झालात, आता तुमच्याकडे दोन पर्याय असतात- पहिला- अंगावर पुन्हा चादर घेऊन राहिलेली झोप पूर्ण करणं आणि अलेला दिवस जाईल तसा व्यतीत होऊ देणं किंवा दूसरा- अनायासे जाग आलेली असताना आता पुढचा दिवस ठरवून घडवण्यासाठी झडझडून उठणं! आपण दुसऱ्या पर्यायचा विचार तात्पुरता करू. 

आता दूसरा पर्याय योजायचा असेल, तर उठून विधी उरकल्यानंतर कुणी सोबत येतंय किंवा येत नाहीये याची परवा न करता स्पोर्ट शूज घालून जवळच्या टेकडीवर (आसपास असली तर) किंवा बाहेर मोकळ्यावर तुम्ही फिरायला गेलात, दोन अडीच तासानं दमून घरी येताना एखाद्या उडप्याच्या हॉटेलात वडा सांबार चापून, गमावलेल्या कॅलरीज दुपटीनं सोबत घेऊन परतलात. आवरून झाल्यानंतर आता एक बऱ्याच दिवसांपासून अर्धवट राहिलेलं पुस्तक घरी तुमची वाट बघत असतं, ते तुम्ही बुक मार्क बाजूला करून वाचायला घेतलंत. बऱ्याच वेळ त्याच्यात रमलात. मग जेवणाची वेळ झाली. तेव्हा आज घरात आणि घरातल्या फ्रीज नावाच्या थंड कपाटात उपलब्ध वस्तूंमधून काय वेगळं बनवू शकतो, याचा तुम्ही अंदाज घेतलात, तवा, कढई बाहेर काढून ‘फसला तरी बेहत्तर’ म्हणत एखादा पदार्थ करायला लागलात. आश्चर्य म्हणजे तो पदार्थ अपेक्षेच्या जवळपास पोहोचतो. त्याचा आस्वाद घेऊन, दुपारी, सुरू असलेल्या ott सिरिजचे ठरवून दोनच भाग तुम्ही बघितलेत, तिसरा बघायचा मोह झाला, पण तो तुम्ही टाळलात. तरी अर्धा दिवस अजून शिल्लक राहतोच. 

मिळालेला एक पूर्ण दिवस, हातात घेतलेलं कुठलंही काम, सुरू करत असलेला प्रोजेक्ट, आखत असलेली ट्रीप या आणि आशा अनेक गोष्टींमध्ये सृजन-शक्यता आहेत. या आधी नमूद केलेल्या सगळ्या गोष्टी अगदी सपक पद्धतीने देखील पार पाडल्या जाऊच शकतात, मात्र त्यात उत्सव नाही; जो मेंदूचा उजव्या भागाचा वापर करून त्या-त्या गोष्टीत निर्माण होऊ शकतो. करत असलेली गोष्ट फसुच शकते किंवा काहीही अनपेक्षित घडू शकतं, मात्र मेंदूच्या त्या भागाची स्वतःहून मशागत करत राहणं आपलं काम आहे, किंबहुना ज्याचं-त्याचं कर्तव्य आहे, जे निसर्गानं मोठ्या जबाबदारीनं आपल्यावर सोपवलंय. 

तर आपल्याला तशी सृजन शक्यता स्वतःत चाचपण्यासाठी काय करता येईल?

1. थिंक हटके 

एखादी गोष्ट ठरवताना किंवा करताना येणारा अगदी पहिला विचार हा जरा बाजूला ठेवून, त्याशिवाय आणखीन वेगळं काही सुचतय का? ते तपासवं. बऱ्याचदा पहिला विचार आपल्याला आला, म्हणजे तो सहज, सोपा असून आणि इतरांनाही सुचू शकतो, त्यामुळे थोडं थांबून आणखीन वेगळ्या प्रकारे ती गोष्ट होऊ शकते याचा विचार व्हावा. उदा. एखाद्या व्यावसायिकाला ‘फास्ट फूड’ व्यवसयात शिरायच आहे, तर पहिला विचार डोक्यात येतो ‘सरळ हॉटेल टाकू’, पण हा विचार कुणीही करू शकतं. त्यामुळे आलेला हा प्रथम विचार बाजूला ठेवून फास्ट फूड व्यवसायात आपण काय वेगळं करू शकतो याचा विचार व्हावा. काही वर्षांपूर्वी क्लाउड किचन हा पर्याय होऊ शकला असता, आज तोही जुना झाला, त्यामुळे आणखीन नवं काय जमू शकेल आपल्याला याचा त्या व्यवसायिकाकडून विचार व्हावा. 

2. नव्या क्रिएटिव्ह प्रक्रियेचा शोध घ्या 

एखादी गोष्ट पूर्ण करण्याची प्रक्रिया आपण वेगळी अवलंबू शकतो. सगळे एकाच ठिकाणी पोहोचणार असतात, मात्र तिथपर्यंत पोहोचायचा मार्ग निराळा- क्रिएटिव्ह, इंटरेस्टिंग, इतर कुणी आवलंबणार नाही असा असू शकतो. म्हणजे एखाद्याला एखादी गोष्ट पूर्ण करायला दोन तास अवधी लागतो, पण ती पूर्ण करण्यासाठी योजलेली जी प्रक्रिया आहे, तिच्यात काय क्रिएटिव्ह बदल केल्यामुळे हा कालावधी दीड किंवा सव्वा तासावर येईल ते बघावे. 

3. असामान्य जगण्याची शक्यता तपासा 

असामान्य जगण्याची ओढ आंगीकरू शकतो का आपण? हे तपासू शकतो. सामान्य जगण्यात काही गैर नाही, मात्र त्याहून वेगळं, हटके काही जगण्यात भिनेल का? तपासायला काय हरकत आह! उदा. शिक्षण, नोकरी, लग्न हा जगण्याचा सपक मार्ग झाला, पण आपल्यातला स्पार्क ओळखून आणखीन निराळं आपण काय करू शकतो, मिळालेल्या एकाच आयुष्याचा विनियोग असामान्य शक्यतांचा शोध घेऊन आपल्याला करता येतोय का? याचा शोध घ्यावा. 

4. तुमचे मित्र कोण आहेत?

समविचारी किंवा आपल्याहून सृजनशील व्यक्तींशी जोडले जाऊ शकतो. जर संपर्कतील व्यक्ति या नॉन-क्रिएटिव्ह विचारसरणीच्या असतील, तर आपणही तसे होत जातो, म्हणून आपल्याहून बरा विचार करणाऱ्या चांगल्या व्यक्तिमत्वाचा सहवास हा केव्हाही लाभदायक. उदा. तुमचे भविष्य तपासायचे असेल तर सोबतचे मित्र तपासा! असं म्हटलं जातं. अनेकदा सोबतचे मित्र जरी जिवलग असले, तरी ते जगण्याच्या दृष्टीने आऊटडेटेड होऊन जातात, म्हणजे याचा अर्थ आता त्यांना तोडायचं असा होत नाही, परंतु त्यांची मैत्री अबाधित ठेऊन अधिक सर्जनशील, उत्सुक, हुशार, जगण्याला बळ देणाऱ्या माणसांसोबत आपण राहिलो, तरी आपल्या विचार प्रक्रियेत फरक पडू शकेल आणि त्याचा फायदा आपल्या जुन्या मित्रांना त्यांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी झाला तर होऊ शकेल. 

सृजन ही अजिबातच केवळ कलाकारांची मक्तेदारी नाही, त्या शक्यतेवर हरएकाचा तितकाच अधिकार आहे. त्यामुळे लगेचच आपल्यातली ती शक्यता तपासून पाहायची असेल, तर वर प्लॅन केलेला आणि उरलेला अर्धा दिवस जर तुम्ही खरंच व्यतीत करत असाल, तर आपण काय कराल? याचा विचार करा आणि आयुष्य सुंदर रितीनं साकार करणारे कलाकार व्हा!

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

आसामच्या 'लक्ष्मी माँ': पद्मश्री लखिमी बरूआ

आसाम सारख्या दुर्गम भागातील राज्यात महिला सक्षमीकरण आणि सहकार क्षेत्रांत आसामी महिलांचे आर्थिक सशक्तीकरण करण्यात...

कल्पनाशक्तीची नवी 'LINE'

कल्पनाशक्ती जादुई असते. ती नवे क्षितिज दाखवते आणि त्या पलीकडे काय असेल ह्या विचारात पाडते. अशाच एका अद्भुत विचाराला...

स्वप्नाचे अंतर मिटवणारा: मडू

गायकाने अगदी नजाकतीनं एखादा राग घेऊन त्यातली सौंदर्यस्थळं दाखवत मैफिल सजवावी तसाच जिवंत अनुभव इथे आपल्याला येतो....