व्यवसायाचे ‘शार्क’ सूत्र! - Welcome to Swayam Talks
×

व्यवसायाचे ‘शार्क’ सूत्र!

आदित्य दवणे

प्रत्येकजण आयुष्यात व्यवसाय करू शकेल अशातला भाग नाही, मात्र 'शार्क टॅंक इंडिया' या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून आपण आत्ता करत असलेल्या कामात, मग तो अभ्यास, संशोधन, नोकरी किंवा काहीही असेल, आवश्यक सुधारणा कुठल्या करायला हव्यात हे उमगू शकेल.
 

Published : 10 May, 2024

व्यवसायाचे ‘शार्क’ सूत्र!

#Get Better Each Week 46

‘नोकऱ्या मागणारे नाही, नोकऱ्या देणारे बना’ ही आणि अशी वाक्य प्रेरणादाई ठरून नवे उद्योजक देशभरात आज तयार होत आहेत. सरकारनं सुरू केल्या मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया सारख्या योजनांतून, काही स्वयंप्रेरणेतून तयार झाल्या या नव्या उद्योजकांच्या नव्या कल्पनांना बळ देण्यासाठी, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक अतिशय स्तुत्य कार्यक्रम सध्या माध्यमातून प्रसारित होत आहे, ज्याचं नाव आहे ‘शार्क टॅंक इंडिया’! या कार्यक्रमानं भारतभरात उद्योगीकतेची नवी लाट आणली आहे. यात सहभागी होणारे शार्क्स म्हणजे आत्ताच्या उद्योग क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांचे मालक- योग्य वाटणाऱ्या, उद्या मोठ्या होऊ शकणाऱ्या, भविष्यात छलांग घेऊ शकणाऱ्या व्यवसायांत स्वतःचे पैसे गुंतवतात, त्याबदल्यात त्यांना या नव्या व्यवसायातील ठराविक भागीदारी दिली जाते. अनेकदा वाढ नसलेल्या, तोट्यातल्या व्यवसायांना हे शार्क्स नाकारतात, मात्र त्यांना नाकारताना ते अनेक अशा गोष्टी सांगतात ज्या नक्कीच त्या नव्या व्यावसायिकांना विचार करण्यास प्रवृत्त करतील. 

हे शार्क्स स्वतःच्या किंवा एखाद्या क्ष व्यवसायाविषयी चर्चा करताना, तो व्यवसाय स्पर्धेत टिकावा यासाठी उद्योगाचा  मोट (moat) तयार करावा असं अनेकदा म्हणतात. हे मोट म्हणजे त्या व्यवसायचं स्पर्धेत टिकून राहण्याचं कारण, जे अद्वितीय आणि सर्वमान्य असावं असं एकंदर उद्योगाच्या परिभाषेत म्हटलं जातं. एक संशोधन असं सांगतं की आज जे स्टार्टप्स सुरू होतायत, त्यापैकी बहुतांश लगेचच बंद पडतात, यामागे कारण त्या व्यवसायांना स्वतःचा मोट तयार करता आला नाही हे असतंच, मात्र त्याहूनही अलीकडे त्या उद्योजकांना नसलेली दूरदृष्टी हे अधिक असतं. एखादा प्रॉडक्ट मार्केटमध्ये चालून गेला म्हणून तशाच प्रकारचा प्रॉडक्ट बनवण्यात किंवा स्वतःला भावलं म्हणून काही मार्केटमध्ये आणण्यात काही अर्थ नाही. कॉपी केलेला प्रॉडक्ट हमखास फसणार कारण नक्कल केलेली ग्राहकांना तितकीशी रुचत नाही आणि स्वतःला भावलं म्हणून ग्राहकांना ते आवडेलच अशातला भाग नाही, त्यामुळे व्यावसायिकांनी व्यवसायाचा मोट शोधण्यापूर्वी स्वतःचा मोट तयार करणं आत्यंतिक गरजेचं आहे. प्रॉडक्ट मार्केट फिट होण्याअगोदर आपण स्वतः मार्केट फिट आहोत का? सध्याच्या ट्रेंडस सोबत चालताना, भविष्यात येऊ घातलेले ट्रेंडस आपण हेरण्या इतपत सजग आणि हुशार आहोत का? याचा शोध घ्यायला हवा. 

अनेकदा हे शार्क्स व्यवसायांत पैसा न गुंतवता व्यावसायिकांवर गुंतवतात! म्हणजे अनेकदा व्यवसाय डबघाईला आलेला असतो, अगदी नवा असतो, त्यात काहीतरी कमतरता असते, मात्र तो चालवणारा व्यावसायिक बाकी हुशार, दूरदृष्टीचा आणि जिद्दी असतो ज्यावर पैसा लावला जातो; त्याच्या आत्मविश्वासावर एका प्रकारचा जुगारच खेळला जातो. अशा होतकरू व्यावसायिकांना थोडं मार्गदर्शन मिळालं, आर्थिक, मानसिक, तांत्रिक आधार मिळाला तर हे कुठच्या कुठे जाऊ शकतात. शार्क्स नक्की या व्यावसायिकांत नेमकं काय पाहत असतील? काय हेरत असतील? कुठली चमक बघत असतील? याची उत्सुकता वाटते, मात्र एक नक्की, की हे बडे व्यावसायिक त्यांचा भूतकाळ आणि भविष्यात सिद्ध होऊ शकणारं आपल्या इतकंच यांच्याही पंखांत ते बळ हेरतात!

मराठीत जरी ‘दूरदृष्टी’ शब्द असला तरी इंग्रजीतला ‘व्हीजन’ शब्द अशा उद्योगाबाबत चर्चा करताना चपखल बसतो. कारण या शब्दात त्या व्यवसायिकाचे व्यक्तिमत्व, विचार क्षमता आणि स्वप्न पाहण्याची त्याची इच्छा डोकावते. व्यवसायिकाचे व्हीजन व्यवसायाला बनवते, त्याची व्याप्ती ठरवते! आज टाटा, रिलायन्स सारखे भारतातले उद्योग, टेसला, अॅपल सारखे जागतिक उद्योग ज्यांनी सुरू केले त्या उद्योजकांच्या कहाण्या झाल्या, त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन तरुणांनी त्याकाळात व्यवसायात उड्या घेतल्या आणि आजही हे व्यवसाय अनेकांना आकर्षित करत आहेत. 

एकंदर पाहता व्यवसायिकाचे ‘व्हीजन’ आणि व्यवसायाचा ‘मोट’ जर जमान्याशी संयुक्तीक असेल, या दोन गोष्टींमध्ये जर योग्य ती सांगड असेल, तर नक्कीच कुठलाही व्यवसाय उंच भरारी घेऊ शकेल यात शंका नाही. अर्थातच व्यवसायिकाचं सातत्य, त्याची हुशारी, अभ्यास, गुंतवणुकीची क्षमता, त्याचप्रमाणे व्यवसायाच्या आसपास असेलली परिस्थिति, स्पर्धा, सरकारचा हस्तक्षेप या सगळ्या गोष्टी ओघाने नंतर येतातच मात्र यांचा उगमबिंदू हा इथून सुरू होतो. शार्क टॅंक या कार्यक्रमाने अशा अनेक व्यवसायांना आणि व्यावसायिकांना आपल्या समोर आणले. आपण जरी आज विद्यार्थी असू किंवा नोकरीत असू किंवा छोटा व्यवसाय आपण नुकताच सुरू केला असेल, तरी या गोष्टी आपण  समजून स्वतःच्या कामात, अभ्यासात, नोकरीत आपापल्यापरीने अंमलात आणूच शकतो आणि भविष्यातील एका स्वतंत्र व्यवसायाच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकूच शकतो.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

स्वप्नाचे अंतर मिटवणारा: मडू

गायकाने अगदी नजाकतीनं एखादा राग घेऊन त्यातली सौंदर्यस्थळं दाखवत मैफिल सजवावी तसाच जिवंत अनुभव इथे आपल्याला येतो....

पिप्लंत्री ग्रामदूत - पद्मश्री श्यामसुंदर पालीवाल

'बेटी धनाची पेटी' हे आपण ऐकतो, वाचतो. पण हे प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवलं आहे पद्मश्री श्यामसुंदर पालीवाल यांनी! त्यांनी...

काळजी वाहणारे Robot युग!

Robots बद्दल गेले अनेक वर्ष आपल्याला कुतूहल आहे. मानवी गरजा समजून त्यावर supercomputing च्या साहाय्याने emotional support देणारा robot बनवता आला...