रोजच्या जगण्यातल्या कोलाहलातून कुठेतरी दूर, अगदी दूर जाण्याची आपल्याला इच्छा होते. मग आपण कुठलंतरी ‘शांत’ ठिकाण शोधून तिथे निदान दोन दिवस तरी जाऊन येतो. ‘तिथे विशेष असं काय असतं?’ असं जर विचारलं तर ते म्हणजे तिथली ‘शांतता’! तिथे फारसे आवाज नसतात. आजूबाजूच्या झाडांच्या हिरवाईकडे कधी नव्हे ते आपलं लक्ष जातं. छान वाटतं. आपण ‘रिफ्रेश’ होतो.
खून, मारामार्या, चोरीचे प्लॉटस, राजकारण, त्यामधले सत्तासंघर्ष , कुरघोड्या यांच्या कोलाहलाचा जर असाच उबग आला असेल तर मन शांत करण्यासाठी नेट्फ्लिक्सवरचा अँथनी फॅबियन या दिग्दर्शकाचा ‘मिसेस हॅरिस गोज टू पॅरिस’ हा चित्रपट पाहायलाच हवा. पॉल गॅलिको या लेखकाच्या कादंबरीवर आधारित हा सिनेमा असाच आपल्याला रीफ्रेश करतो .
कथा 1950 मधली आहे. लंडन मध्ये घरकाम-स्वछ्ता करणारी कुणी एक अॅडा हॅरिस ही विधवा तिच्या एका घरमालकिणीकडे पॅरिसच्या जगप्रसिद्ध ‘डीऑर’ या ब्रॅंडचा ड्रेस पाहते. त्याची त्या काळातली किंमत ही पण शेकडो पाउंडसमध्ये असते. पण अॅडा जणू एखाद्या लहान मुलीसारखी त्या ड्रेसचंच स्वप्नं पाहू लागते. जणू काही ते तिचं जीवनध्येयच होऊन जातं. या स्वप्नपूर्तीसाठी तिची धडपड सुरू होते. पण आयुष्य कधी साधं, सोपं आणि सरळ असतं का? अर्थातच नाही. पण तरीही एक मात्र नक्की आयुष्यकडे, जगण्याकडे आणि अगदी कठीण काळातही या सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र कसा असावा हे मात्र आपल्या हातात असतं. अॅडा याचाच एक अनुभव आपल्याला देते.
निराशा आणि नैराश्य यात फरक असतो. निराश होणं हे अनेकदा अपरिहार्य आणि स्वाभाविक असतं. पण नैराश्य हे लढण्याची सगळी उमेद हिरावून घेत असतं. अॅडासुद्धा निराश होतेच. पण नैराश्यात अडकून राहत नाही. एक प्रकारे ही त्याचीच कथा आहे. यात नाट्य आहे. नाट्यमयता आहे. पण त्याहीपेक्षा महत्वाचं जर काही असेल तर यात एक निखालस चांगुलपणा आहे. त्याचबरोबर मिसेस हॅरिस आपल्या कामाप्रती असणारी अविचल निष्ठा, जे करू ते चांगलंच असा गुणवत्तेचा ती ध्यासही सांभाळते. यासोबतच फॅशनच्या जगात उघड-उघड दिसून येणारा भेदभाव, द्वेष, सगळ्या गोष्टींना पैशांच्या तराजूत तोलण्याची मानसिकता अशा कुठल्याच गोष्टींनी विचलित न होता आत्मसन्मान जपत ही बाई विलक्षण साधेपणाने आणि सहजपणे वावरते. अतिशय साधं आणि खरं सांगायचं तर आर्थिकदृष्ट्या कनिष्ठ वर्गाचं प्रतिनिधित्व जरी ती करीत असली तरी कुठल्याही आणि कसल्याही बडेजावापुढे ती दबून जात नाही. समोर आलेल्या प्रसंगाला सामोरं जाण्याचं– त्याला भिडण्याचं एक अंगभूत कौशल्य तिच्याकडे आहे. छोट्या छोट्या गोष्टीत सौंदर्य बघण्याची निरलस दृष्टी तिच्यापाशी आहे. मिसेस हॅरिसची भूमिका करणार्या लेसले मॅनविल या ब्रिटिश अभिनेत्रीने यात कमाल केली आहे.
सध्याच्या काळात अगदी सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यानेही जो वेग पकडलेला आहे, मग ती अस्तित्वाची लढाई असो, स्पर्धा, तुलना काहीही असो, त्यात सर्वात आधी आहुति पडते ती म्हणजे स्वतः मधल्या चांगुलपणाची! आपणही नकळत दुसर्यांशी तर सोडा पण स्वतःशीही केव्हा कठोर होतो हे आपल्यालाच उमगत नाही. पण खरच त्याची गरज असते का? की आपणच आपलं आयुष्य जास्त गुंतागुंतीचं करून घेतो?
मिसेस हॅरिस गोज टु पॅरिस पाहात असताना हे सगळे विचार मनात आल्याशिवाय राहत नाहीत. तंत्रज्ञानाने आपण कुठल्याकुठे येऊन पोचलो आहोत; सिनेमा हे माध्यम म्हणून तर त्या बाबतीत चार पावले नेहमीच पुढे आहे. पण 2022 साली प्रदर्शित झालेली ही फिल्म जो 1950 चा काळ आपल्यापुढे उभा करते, तोसुद्धा कुठेही विसंगत वाटत नाही. सर्वसाधारणपणे आता प्रेक्षक म्हणून सिनेमाच्या वेगाची जी एक सवय आपल्याला लागली आहे त्या कसोटीवरही हा सिनेमा अजिबात ‘स्लो’ वाटत नाही हे विशेष आहे.
रूढार्थाने यात खलनायक किंवा खलनायिका असे कुणीही नाही. असलीच तर त्या त्या वेळी अनपेक्षितपणे निर्माण होणारी परिस्थिती हीच खलनायिका आहे. पण त्याही परिस्थितीत आपला अंगभूत चांगुलपणा जपणारी पात्रं इथं दिसतात. वास्तवात हे सगळं घडणं अवघड वाटेल, पण तरीही ते पाहायला छान वाटतं.
आता मिसेस हॅरिस पॅरिसला गेल्यावर काय होतं, त्यांच्या ड्रेसचं काय होतं अशा प्रश्नांची उत्तरं इथे देण्यात काहीच अर्थ नाही. कारण ते अनुभवायला सिनेमा बघायला हवा. एक मात्र नक्की, संध्याकाळी दमून घरी आला आहात, कंटाळा आलाय, उगाच मारामार्या, खून आणि डोक्याला त्रास देणारं काही पाहायचा अजिबातच मूड नाहीये, अशा वेळी मिसेस हॅरिस गोज टू पॅरिस पाहावा. तो पाहिल्यानंतर आपला माणुसकीवरचा विश्वास नक्कीच पुन्हा बळकट होईल! अजून काय हवं ?
OTT: Netflix
कालावधी: १ तास ५५ मिनिटे