संगीत आणि नात्याची सुंदर ‘अमेरिकन सिंफनी’! - Welcome to Swayam Talks
×

संगीत आणि नात्याची सुंदर ‘अमेरिकन सिंफनी’!

सुनील गोडसे

OTT च्या काळात अनेक पर्याय उपलब्ध असताना मोजक्या वेळात नक्की काय ‘पाहायचं’ हा सध्या सतावणारा प्रश्न आहे. अशावेळी ‘अमेरिकन सिंफनी’ सारखी एक सुंदर डॉक्युमेंटरी एक वेगळाच जीवनानुभव देते. जाणून घ्या तिच्याविषयी या ब्लॉग मध्ये.
 

Published : 15 March, 2024

संगीत आणि नात्याची सुंदर ‘अमेरिकन सिंफनी’!

Get Better Each Week #38

संगीत आणि त्यातही पाश्चात्य संगीत यात अजिबात गम्य नसताना पाश्चात्य संगीतातल्या वादक, गायक, संगीत दिग्दर्शक असणाऱ्या जॉन बटीस्टी सारख्या पाच ग्रॅमी अवॉर्ड जिंकणाऱ्या व्यक्तीवरची  ‘अमेरिकन सिम्फनी’ ही डॉक्युमेंटरी ‘नेटफ्लिक्स’ वर अचानक हाती लागते तेंव्हा ती पाहात असताना, त्या संगीतातलं आपल्याला काहीही कळत नाही ही भावनाच मनातून निघून जाते. 

मुळात ही फिल्म पाहण्यासाठी तुम्हाला संगीताची आवड असलीच पाहिजे ही अट नाही. पण समजा तशी ती असेल तर अजूनच उत्तम. इथे आवश्यकता आहे ती केवळ अत्यंत शांतपणे मनाची सगळी कवाडे उघडी ठेवण्याची. कारण जॉन आणि त्याची पत्नी सुलैका यांची आयुष्य, आयुष्याकडे आत्यंतिक सकारात्मकरित्या पाहण्याची त्यांची जीवनदृष्टी ही एकीकडे, तर जॉनचा संगीत रचनेचा, त्यातल्या ताणतणावांचा, चढ उतारांचा  सर्जक प्रवास दुसरीकडे; अशा या दोन पातळ्यांवर ही फिल्म आपल्याला गुंतवून ठेवते. 

जॉन हा आफ्रिकी वंशाचा, आई-वडिलांकडून संगीताचा वारसा लाभलेला, अमेरिकन पॉप, जॅझ यात अल्पावधीत नाव कमावलेला थोर माणूस. त्याच्या टीकाकरांच्या मते हा शास्त्रीय संगीतात काय करणार? आणि इथेच आपल्याला सापडतो तो एक अतिशय बुद्धिमान असा कलाकार; जो कलेकडे फक्त कला म्हणून न पाहता जीवनानुभव म्हणून बघतो, कला ही प्रार्थना आहे असं समजतो. एके ठिकाणी तो सांगतो, की प्रत्येक रसिकाला जिथे अत्यंत गरज असते अशा वेळी त्याला ती-ती कलाकृती मिळतेच. मग ते संगीत असो किंवा इतर कुठलीही कला. त्यामूळेच खरं म्हणजे कुठलाही कलाकार हा त्याच्या कलेपेक्षा मोठा नसतो. इथेच हा कलाकार मोठा होऊनही आपले पाय किती घट्टपणे जमिनीवर रोवून उभा आहे याचा प्रत्यय येतो. 

फिल्ममध्ये जॉन जवळ-जवळ चार वर्ष सिंफनीची तयारी करतोय. त्याचा एक आराखडा, त्यातला तपशील न तपशील तो पारखून घेताना सहानुभव, सह-अस्तित्व आणि सहजीवन याचा एक वेगळाच अनुभव या निर्मिती प्रक्रियेत आपण बघत जातो. ज्या इंस्टीट्यूट मध्ये त्याने सात वर्षे संगीताचे शिक्षण घेतले तिथल्या शिक्षकांनाही तो जाऊन भेटतो. 2022 या वर्षी तयार होणारी सिंफनी कशी असेल या अतिशय गुंतागुंतीच्या विचाराने तो सतत अस्वस्थ आहे. त्याच्या शिक्षकांना तो पियानोवर जे वाजवून दाखवतो त्यावेळी त्याला ते शिक्षक जे सांगतात तो सगळा भाग तर अफलातून आहे. या निमित्ताने त्याचे मग होणारे शोज, दौरे, कॉनसर्ट्स, एक अव्याहत निर्मिती प्रक्रिया जी त्याच्या मनात सतत चालू आहे त्याने प्रेक्षक स्तिमित होऊन जातो . 

जॉनची पत्नी सुलैका, वयाच्या अवघ्या बाविसाव्या वर्षी तिला ल्युकेमिया हा रक्ताच्या कॅन्सरचे निदान होते. त्यावर उपचार घेत ती आपलं रोजचं जगणं जगू लागल्यावर दहा वर्षानी तोच कॅन्सर तिला पुन्हा गाठतो. पण ती खचून जात नाही. उलट जॉनला त्याच्या कामासाठी सतत प्रोत्साहित करताना स्वतःलाही ती प्रेरित करीत राहते. अर्थात याचा अर्थ सगळंच काही गोड आणि सोपं आहे असं नाही. परिस्थितीप्रमाणे ती आणि जॉन या दोघांच्याही भावनांचा आलेख खाली-वर होत राहतो. एका प्रसंगात सुलैका म्हणते, ‘आज जॉनच्या ग्रॅमीसाठी नॉमिनेशन आणि माझी पहिली केमो हे दोन्ही एकाच दिवशी आहेत’ अंगावर काटाच येतो हे ऐकताना! 

Reading Between the lines हे  लेखनात नेहमीच बोललं जातं. इथे फक्त माध्यम बदललं आहे. पण काही वेळा दोन shots च्या मधला जो अवकाश आहे, तोही  खूप काही सांगून जातो. या संदर्भात एका concert मधला प्रसंग या फिल्म मध्ये आहे. तो त्याचं गाणं आपल्या पत्नीला समर्पित म्हणून वाजवणार आहे म्हणून प्रेक्षकांना सांगतो. त्यानंतर जो एक भला मोठा pause आहे .तो कुठल्याही संवेदनशील प्रेक्षकाच्या अंगावर येणारा आहे . त्याची होणारी सगळी तगमग, अस्वस्थता, कधी वाटणारी हतबलता, भीती आणि मनात दाटून येणारी सुलैकाची बेफाम आठवण हे सगळं-सगळं जणू काही तो pause सांगत राहतोच पण नंतर जेंव्हा जॉन पियानोचे सुर आळवायला लागतो तेंव्हा त्यातही या सगळ्या भावना उतरताना दिसतात. यात अनेकवेळा तर जॉन आणि सुलैका जे अगदी सहजगत्या एकमेकांशी बोलून जातात ते केवळ संवाद राहात नाहीत, तर तो त्यांच्या जगण्याच्या तत्वज्ञानाचा आणि एक प्रकारे अध्यात्मिकतेचा  सहजोद्गार वाटतो. कारण त्याला  त्यांच्या खडतर अनुभवाचा आधार आहे.    

ही डॉक्युमेंटरी पाहात असताना लक्षात येतं, की आजच्या घडीला केवळ सदतीस वर्ष वयाच्या या कलाकाराची, त्याच्याबरोबर  त्याची पत्नी सुलैका हिची, त्या दोघांच्या, सर्जक प्रवासाची, उत्कट सहजीवनाची जणू काही ही एक दीर्घ कविताच आहे. आणि एकदा कविता म्हटली की आशय आविष्काराच्या अनेक शक्यता त्यात दडलेल्या असतात. ज्याला जी आवडेल, जवळची वाटेल ती त्याने घ्यावी.  त्यामुळेच screen वर जरी फिल्म संपली तरी ती आपल्या मनात मात्र बराच काळ नंतरही चालूच राहते!

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

काळजी वाहणारे Robot युग!

Robots बद्दल गेले अनेक वर्ष आपल्याला कुतूहल आहे. मानवी गरजा समजून त्यावर supercomputing च्या साहाय्याने emotional support देणारा robot बनवता आला...

चेकलिस्ट: मतदान करण्यापूर्वीची!

निवडणुकांत मतदान करण्यापूर्वी आपण कधी चेकलिस्ट बनवली आहे का? मतदार राजा सजग झाला तर राजकारण अधिक गंभीर होऊ शकते. आता...

चांगुलपणाची प्रतिमा : मिसेस हॅरिस

कधी उगाच उदास वाटतं, माणुसकी, चांगुलपणा यावरचा विश्वास कमी व्हायला लागतो, उगीच चिडचिड होत असते, राग राग करून काही होणार...