सदाबहार ‘लिज्जत’ वाढवणाऱ्या: पद्मश्री जसवंतीबेन पोपट - Welcome to Swayam Talks
×

सदाबहार ‘लिज्जत’ वाढवणाऱ्या: पद्मश्री जसवंतीबेन पोपट

सर्वेश फडणवीस

जसवंतीबेन जमनादास पोपट हे नाव अनेकांना नवे असेलही, पण ‘पद्मश्री’ जसवंतीबेन जमनादास पोपट या बिरुदावलीत हे नाव अधिक शोभून दिसते आहे. ‘लिज्जत’ वाढवणारी संस्था म्हणून लिज्जत पापड निर्माण करणाऱ्या पद्मश्री जसवंतीबेन यांच्या कार्याबद्दल या वेळी आपण जाणून घेणार आहोत. यांचा प्रवास खऱ्या अर्थाने जागतिक पटलावर सुवर्णाक्षराने ‘लिज्जत’ वाढवणारा आहे..
 

Published : 8 March, 2024

सदाबहार ‘लिज्जत’ वाढवणाऱ्या: पद्मश्री जसवंतीबेन पोपट

Get Better Each Week #37

भारतीयांच्या भोजनात प्रत्येक गोष्टीचे आपापले स्थान आहे. वरण, भात, भाजी, पोळी ते अगदी कोशिंबीर आणि लोणचं बनवण्याच्या पद्धती गेल्या कित्येक पिढ्यांपासून चालत आलेल्या आहेत. त्यातीलच एक पदार्थ म्हणजे ‘पापड’. सद्य:स्थितीत अनेकांना पापड घरी बनवणे शक्य नसल्यानं  ते बाजारातून विकत घेतात आणि हा पापड म्हटले की एकच नाव समोर येते, ते म्हणजे ‘लिज्जत’ पापड. हाच ‘लिज्जत पापड’ निर्माण करणाऱ्या पद्मश्री जयवंतीबेन यांच्या कार्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. हा प्रवास जागतिक पटलावर सुवर्णाक्षराने ‘लिज्जत’ वाढवणारा आहेच, परंतु त्याचबरोबर महाराष्ट्रातील प्रत्येकाला प्रेरणादायी आणि अभिमान वाटावा असाही तो आहे. 

मुंबईत ६४ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या व्यवसायाने आजपर्यंत ४५ हजार महिलांना स्वावलंबी केले आहे.  २४ देशांमध्ये १६०० कोटींपेक्षा जास्त रकमेची उलाढाल असणाऱ्या ‘श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड’ समूहाच्या जसवंतीबेन पोपट एक संस्थापक सदस्य होत्या. नव्वदी पार केलेल्या, जसवंतीबेन आताआतापर्यंत रोजच्या कामकाजात पूर्णवेळ सहभागी होत असत. याच त्यांच्या कार्यमग्नतेमुळे प्रत्येक खवय्याच्या जेवणाची, तसेच जीवनाची ‘लिज्जत’ वाढली आणि त्याच सतत्यामुळे ही संस्था आज इतकी मोठी झाली आहे.

जसवंतीबेन पोपट या कर्जतजवळील एका खेड्यातल्या सामान्य गुजराती कुटुंबातील अल्पशिक्षित महिला होत्या. लहान वयात लग्न होऊन १९५० च्या दशकात त्या मुंबईतील गिरगाव येथे आल्या. काही समविचारी स्त्रियांसह त्यांनी कुटुंबाला हातभार लावण्यासाठी पापड लाटून विकायला सुरुवात केली. नंतर तेच त्यांचे उपजीविकेचे साधन झाले. इथपासून सुरू झालेला हा प्रवास लिज्जत उद्योग समूहाच्या स्थापनेपर्यंत येऊन पोहोचला. दुपारच्या वेळेचा सदुपयोग आणि कुटुंबाला मदत करण्याच्या हेतूने, कमी भांडवल, उपलब्ध कौशल्यातून करता येणारे आणि घरोघरी आवडणारे पापड लाटून विकण्याची कल्पना ६४ वर्षांपूर्वी मुंबईच्या गिरगाव भागात लहान चाळींमध्ये काही गृहिणींना सुचली. चाळीच्या तत्कालीन विश्वस्तांनी चाळीची गच्ची त्यांना या कामासाठी उपलब्ध करून दिली. या स्त्रियांनी पहिल्या दिवशी एक किलो पापड लाटून परिसरातील ‘आनंदजी प्रेमजी आणि कंपनी’ या दुकानात विक्रीसाठी दिले. ते सगळे पापड हातोहात खपले आणि त्यातून स्त्रियांना पन्नास पैशांचा नफा मिळाला. दुसऱ्या दिवशी त्यांनी दोन किलो पापड लाटून दिले, तेही लगेच विकले जाऊन एक रुपयाचा नफा झाला. पापड विक्रीतून मिळकत होऊ शकते, असा विश्वास या स्त्रियांच्या मनात निर्माण झाला. त्यातूनच या घरगुती उद्योगाला व्यापक स्वरूप देण्याचे ठरले आणि ‘लिज्जत पापड’चा आणि पर्यायाने ‘श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड’चा जन्म झाला.

जसवंतीबेन पोपट, जयाबेन विठलानी, पार्वतीबेन थोडानी, उजमबेन कुंडलिया, बानूबेन तन्ना, चुताडबेन गावडे आणि लगूबेन गोकानी या सात अल्पशिक्षित गृहिणींनी आपले लक्ष्य ठरवले. त्यांना त्यांच्या परिसरातील उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते छगनलाल करमसी पारेख यांनी प्रोत्साहन आणि ८० रुपये भांडवल उपलब्ध करून दिले. त्यातून १५ मार्च १९५९ रोजी एका उद्योगाची सुरुवात झाली. त्याचा एवढा मोठा उद्योग समूह होईल याची कल्पनाही या स्त्रियांना नव्हती. पुरुषोत्तम दामोदर दत्तानी उर्फ दत्तानीबाप्पा यांनी त्यांना मार्गदर्शन केले. पुढच्या तीन-चार महिन्यांत स्त्रियांची संख्या वाढत जाऊन दोनशेपर्यंत पोहोचली आणि वडाळा येथे एक शाखा सुरू झाली. १९६६ मध्ये मुंबई विश्वस्त कायद्यांतर्गत संस्थेची आणि सोसायटी नोंदणी कायद्यांतर्गत नोंदणी करण्यात आली. तसेच खादी आणि ग्रामोद्योग आयोगाकडूनही त्यांना मान्यता मिळाली. त्याच वर्षी महाराष्ट्राबाहेर पहिली शाखा गुजरातमधील वालोद येथे उघडण्यात आली. आज देशभरात त्यांच्या ८५ हुन अधिक शाखा असून, अमेरिका, इंग्लंड, थायलंड, जपान, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांमध्ये संस्थेच्या उत्पादनांची निर्यात होते. पापडांबरोबरच ‘श्री महिला गृह उद्योग- लिज्जत पापड’ या संस्थेकडून आता गव्हाचे पीठ, चपात्या, अप्पलम (दक्षिणेत लोकप्रिय असलेले पापड), कपडे धुण्याची पावडर, साबण  आणि मसाले अशा अनेक पदार्थाचे उत्पादन केले जाते.

‘महिलांकडून महिलांसाठी’ चालवली जाणारी ही सहकारी संस्था आहे. या संस्थेत कुणीही एक मालक नसून सर्व सहभागी स्त्रियांना बेन असे संबोधले जाते. संस्थेला होणारा नफा किंवा तोटा याच्या त्या समान भागीदार आहेत. संस्थेत सहभागी होणाऱ्या स्त्रीला तिची जात, धर्म, शिक्षण, कौटुंबिक माहिती विचारण्यात येत नाही, मात्र तिला एक शपथपत्र भरून द्यावे लागते. दर्जाचे सातत्य राखण्यासाठी त्यांनी पदार्थामधील घटकांचे प्रमाणीकरण केले असून पदार्थ तयार करण्याची एक कार्यप्रणाली विकसित केली आहे. उदा. उडदाची डाळ म्यानमार तसेच काठियावाडमधून, हिंग अफगाणिस्तानमधून, काळीमिरी आणि इतर मसाल्याचे पदार्थ केरळमधून आणण्यात येतात आणि म्हणूनच देशभरातील कोणत्याही शाखेत तयार होणाऱ्या पदार्थाची चव, तसेच दर्जा समान राखणे त्यांना शक्य झाले आहे. संस्थेच्या प्रत्येक शाखेच्या परिसरात राहणाऱ्या स्त्रिया सकाळी स्वत:हून पीठ न्यायला केंद्रावर येतात; लांब राहाणाऱ्या स्त्रियांना मात्र संस्थेतर्फेवाहतुकीची सुविधा दिली जाते. संस्थेत पापड लाटून अनेक स्त्रियांच्या संसाराला आजपर्यंत आर्थिक हातभार लागला असून त्यांचे आयुष्य सुखकर झाले आहे. मुलांचे शिक्षण, घरबांधणी संस्थेतून होणाऱ्या मिळकतीतून भागवण्यात येत असल्याने स्त्रियांना संस्थेचा मोठा आधार वाटतो, किंबहुना ते त्यांना दुसरे माहेरच वाटते. व्यवसायाच्या नफ्यातील वाटा स्त्रियांना दिला जातोच आणि त्यांनी संस्थेसाठी केलेल्या उत्कृष्ट कामाची पावती म्हणून आर्थिक बक्षीसही वेळोवेळी दिले जाते.

वर्क फ्रॉम होम, आत्मनिर्भर भारत, महिला सबलीकरण, मेक इन इंडिया या संकल्पना आपण आज पाहतो, पण या गृह उद्योगाने ६४ वर्षांपूर्वीच त्या कृतीत आणून दाखवल्या; तेव्हा अशा सहकारी तत्त्वावर चालणारा हा भारतातील महत्वाचा उद्योग ठरला आहे.

जसवंतीबेन पोपट यांच्या सहकार क्षेत्रातल्या याच उत्तुंग कार्यासाठी भारत सरकारने व्यापार आणि उद्योग श्रेणीतील पद्मश्री सन्मान देऊन त्यांचा गौरव केला. अशा जसवंतीबेन यांचे २१ सप्टेंबर २०२३ रोजी वयाच्या ९२ वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. भारतीय स्त्री तिने ठरवले तर सहकार क्षेत्रातील एक उत्तुंग उद्योग उभारून आपल्याबरोबर हजारो भारतीय स्त्रियांचे आयुष्य सुखकर करू शकते, या गोष्टीचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजेच पद्मश्री जसवंतीबेन पोपट यांचा यशस्वी प्रवास ठरला आहे.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

काळजी वाहणारे Robot युग!

Robots बद्दल गेले अनेक वर्ष आपल्याला कुतूहल आहे. मानवी गरजा समजून त्यावर supercomputing च्या साहाय्याने emotional support देणारा robot बनवता आला...

चेकलिस्ट: मतदान करण्यापूर्वीची!

निवडणुकांत मतदान करण्यापूर्वी आपण कधी चेकलिस्ट बनवली आहे का? मतदार राजा सजग झाला तर राजकारण अधिक गंभीर होऊ शकते. आता...

चांगुलपणाची प्रतिमा : मिसेस हॅरिस

कधी उगाच उदास वाटतं, माणुसकी, चांगुलपणा यावरचा विश्वास कमी व्हायला लागतो, उगीच चिडचिड होत असते, राग राग करून काही होणार...