आज २९ फेब्रुवारी आहे आणि आजचा दिवस खास आहे.
कारण आजचा दिवस चक्क १४६१ दिवसांनी आलाय.
२९ फेब्रुवारी. लीप वर्षातला तो एक ‘एक्स्ट्रा’ दिवस !
चार वर्षांनी येणारे लीप वर्ष यावर्षी आहे.
म्हणून या वर्षी ‘२९ फेब्रुवारी’ आहे आणि तो आज आहे.
ज्या लोकांचा २९ फेब्रुवारी या दिवशी वाढदिवस असतो त्यांच्याबद्दल मला कायमच गंमत वाटते. २९ फेब्रुवारी रोजी जन्मलेल्या मंडळींना ‘लिपलिंग्स’ म्हणतात. यांना स्वतःचा खर्राखुर्रा वाढदिवस साजरा करण्यासाठी चार वर्षे वाट बघावी लागते. मग, नाईलाजाने तो २८ फेब्रुवारी किंवा १ मार्चला साजरा करावा लागतो. त्यामुळे यांना नक्की कधी ‘विश’ करायचं याचं लोकांना कायम कन्फ्युजन! आणि दुसऱ्या बाजूला, हे लोक वयाने अगदी ७२ जरी झाले तरी कॅलेंडरप्रमाणे यांचं वय अठराच! त्यामुळे ही माणसे इतर लोकांपेक्षा कायम ‘एव्हरग्रीन’ असणे अपेक्षित आहे! बाय द वे, आपला सर्वांचा लाडका कॉमिक हिरो ‘सुपरमॅन’ याची (काल्पनिक) जन्मतारीख देखील २९ फेब्रुवारीच ! असो.
दर चार वर्षांनी येतं त्याला लीप वर्ष म्हणतात आणि त्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात २८ च्या ऐवजी २९ दिवस असतात, हे आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक असतं. पण लीप वर्ष म्हणजे नेमकं काय असतं? ते चार वर्षांनीच का येतं? तो एक दिवस फेब्रुवारीमध्येच का घातला जातो? हे प्रश्न तुम्हाला कधी पडलेत का?
यावेळच्या ब्लॉगमधून याच प्रश्नांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करूया.
त्यासाठी आपल्याला दोन हजार वर्षे मागे जावं लागेल.
इ.स. पूर्व इतिहास पाहिला तर लक्षात येतं की रोममध्ये जी सुरुवातीला काल आणि दिन गणना केली जात होती ती रोमन कॅलेंडरनुसार केली जात होती. त्यावेळी एका वर्षात ३५५ दिवस होते. मात्र या कॅलेंडरमध्ये काही त्रुटी आहेत हे त्यावेळचा रोमन सम्राट ज्युलियस सीझरच्या लक्षात आलं. त्याने इ.स. पूर्व ४६ मध्ये या कॅलेंडरची पुनर्रचना केली. सर्वात आधी त्याने आधीच्या दिवसांमध्ये १० दिवस वाढवून ते ३६५ दिवस केले. (जानेवारी, ऑगस्ट आणि डिसेंबर मध्ये दोन दोन दिवस वाढवले व एप्रिल, जून, सप्टेंबर व नोव्हेंबरमध्ये एकेक दिवस वाढवला). फेब्रुवारीचे २८ दिवस तसेच ठेवले. मात्र दर चार वर्षांनी फेब्रुवारीमध्ये एक दिवस वाढवायचा निर्देश दिला. त्यालाच लीप वर्ष म्हटलं जाऊ लागलं. पण प्रश्न आहे की लीप वर्ष कशासाठी ?
पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याची एक प्रदक्षिणा पूर्ण होण्यासाठी ३६५ दिवस लागतात असं आपण ढोबळपणे म्हणतो. पण वस्तूत: सूर्याभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण होण्यासाठी पृथ्वीला ३६५.२५ दिवस लागतात हे ज्युलियस सीझरच्या लक्षात आलं. आपण जर या वरच्या .२५ कडे दुर्लक्ष केलं तर एक दिवस असा येईल की आपलं कॅलेंडर आणि पृथ्वीवर घडणारे ऋतुमान यांचा ताळमेळ बसणार नाही. (इतका की शंभर वर्षांनी सुमारे चोवीस दिवसांचा फरक पडेल.) चार वर्षांनी त्या चार .२५ चे रूपांतर एका पूर्ण दिवसात होईल. हा विचार करून ज्युलियस सीझरने तो ‘एक दिवस’ दर चार वर्षांनी फेब्रुवारी महिन्यात वाढवण्याचे निर्देश दिले. त्या अर्थाने ज्युलियस सीझरला लीप वर्ष या संकल्पनेचा निर्माता म्हणता येईल. या कॅलेंडरला ज्युलियन कॅलेंडर हे नाव पडले. पुढे १५८२ मध्ये पोप ग्रेगरी यांनी याही कॅलेंडरमधील काही त्रुटी दूर केल्या आणि एका नवीन पद्धतीच्या कॅलेंडरची निर्मिती केली. (त्यातील एक त्रुटी म्हणजे सूर्याभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण होण्यासाठी ३६५.२५ दिवस लागत नसून ३६५.२४२२ दिवस लागतात !) आपण सध्या वापरतोय ते आहे ग्रेगरीयन कॅलेंडर ! काही तज्ञांच्या मते, यामध्ये देखील बारीकशी त्रुटी आहे. त्यांच्या मते, दर ३२३६ वर्षांनी एका दिवसाचा फरक पडेल. तेव्हा आपल्याला सध्या तरी चिंता करण्याचं काही कारण नाही !
आपण अनेक गोष्टी विचार न करता केवळ ‘फॉलो’ करत असतो. पण त्यामागचा इतिहास आणि विज्ञान जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटतं. लीप वर्ष हे असंच एक उदाहरण आहे.
विश्वाचा पसारा अफाट आहे. पण मानवाने ते आव्हान स्वीकारलं. आपली उत्सुकता आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर मानवाने त्या प्रश्नांवर उत्तरे शोधली आणि यामुळे आपल्या सर्वांचेच आयुष्य सुखकर केले. या सगळ्यावर विचार करण्यासाठी तुम्हाला आज वर्षातला एक दिवस जास्त मिळालाय. तुम्ही या ‘बोनस’ दिवसाचा योग्य वापर कराल अशी मी आशा करतो !