उलटा मर्फी - Welcome to Swayam Talks
×

उलटा मर्फी

सुनील गोडसे

हा ब्लॉग म्हणजे तुमच्या मेंदूचा दर आठवड्याचा व्यायाम आहे! या ब्लॉगमुळे तुम्ही दर आठवड्याला काही नवीन तर शिकालच, पण जगापेक्षा एक पाऊल पुढे राहाल हे निश्चित!
 

Published : 23 February, 2024

उलटा मर्फी

Get Better Each Week #35

आपलं असं कितीवेळा होतं ? आपण गाडीत आहोत . टोलच्याजवळ पोचलो की कुठली लेन फास्ट चालू आहे ते बघून आपण त्या लेन मध्ये जातो. आणि आपली गाडी त्या लेन मध्ये गेली की मग नेमका तिथेच उशीर लागायला लागतो. किंवा मग ऑफिस मध्ये अगदी महत्वाचं प्रेझेंटेशन आहे . मीटिंग रूम मध्ये आधीच जाऊन लॅपटॉप , प्रॉजेक्टर सगळं सगळं नीट चेक केलेलं आहे . मीटिंग सुरू होते आणि नेमका प्रॉजेक्टर दगा देतो . चेकिंग करताना ठणठणीत चालणारी विडिओ क्लिप चालूच होत नाही . चालू झाली तर आवाजाच येत नाही ... किंवा मग खूप दिवसांनी एखादं मनासारखं नाटक पाहावं असं वाटतं . ते जवळच्या नाट्यगृहात असतं . नाटक पाहायची खरी मजा पहिल्या चार रांगेतून आणि  तेही मध्य भागी असणार्‍या सीटवर बसून -  असं तुमचं खास मत असतं . तुम्ही तिकीट काढायला जाता तेंव्हा नेमक्या या चार रांगेत तिकीट नसतं. असलंच तर अगदी कडेची तिकीटं असतात किंवा मग हमखास घडणारा प्रसंग म्हणजे वातावरण ढगाळ आहे . पाऊस नक्की येणार म्हणून आपण छत्री घेऊन बाहेर पडावे आणि त्या दिवशी पाऊस पडतच नाही  ... 

हे असे अनेक प्रसंग आपल्यापैकी प्रत्येकाला सांगता येतीलच . कारण ते आपण कधी न कधी कुठ न कुठं अनुभवलेलं असतंच . यालाच मर्फी’ज लॉ असं म्हणतात . Anything that can go wrong will go wrong हाच तो मर्फी ज लॉ. खरं तर याच्या पुढे जाऊन असंही म्हटलं जातं , Anything that can go wrong will go wrong, and at the worst possible time. जरा आठवून पाहिलं तर अशी अनेक उदाहरणं सांगता येतील . अगदी ऐन वेळी शर्टचं बटन तुटणं, पायजम्याची नाडीच आत जाणं , ड्रेसवर चहा सांडणं असं काहीही आपल्या आयुष्यात घडत असतं . 

गोष्ट जुनी आहे .  1949 या वर्षी एक अमेरिकन एरोस्पेस इंजिनीअर एडवर्ड मर्फी आणि त्याचे सहकारी रॉकेट संबंधातल्या एका दुर्घटनेचा जेंव्हा अभ्यास करत होते तेंव्हा हा मर्फी बाबा जे बोलला ते म्हणजे असं जेंव्हा एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी दोन किंवा दोनापेक्षा जास्त मार्ग असतील तर त्यातला एक मार्ग हा हमखास अपयशाचा असतो आणि तो कुणीतरी घेतोच घेतो . मजाय की नाही ? 

पण हे सगळं लोकांसमोर  “ मर्फिज लॉ” या स्वरुपात यायला तब्बल पुढची एकवीस वर्ष जायला लागली . आर्थर ब्लोक  या लेखकानं “ Murphy's Law, and Other Reasons Why Things Go WRONG “ या त्याच्या पुस्तकातून हे लोकांसमोर आणलं. त्यामध्ये इतरही अनेक मजेदार आणि तितकेच मर्फीच्या दृष्टीकोनाला पुष्टी देणारे त्याला भेटले. त्यातल्या काही जणांचाच संदर्भ द्यायचा झाला तर तोही इथे पुरेसा आहे . जसे की , जॉर्ज चा लॉं सांगतो की “ All pluses have their minuses , किंवा जिली ज लॉं म्हणतो की , The worse the hair cut , the slower it grows out , जॉन्सन आणि लेअर्डस म्हणतात – A toothache tends to start on Saturday night ! तात्पर्य काय ? आपल्या रोजच्या जगण्यात , जगण्यातल्या वेगवेगळ्या अनुभवात हे येतच राहतं .आणि त्यात हा मर्फी बाबा किंवा त्याच्यासारखाच विचार करणारे इतरही अनेकजण भेटत राहतात .  पण आर्थर ने पहिल्यांदा हे पुस्तक रूपात आणलं आणि मर्फी’ज लॉं हा यानिमित्ताने  सर्वदूरपर्यन्त पोचला.  त्याचं हे पुस्तक आपण वाचायला घेतलं की त्यातलं प्रत्येक वाक्य जणू काही आपल्या आयुष्यातल्या घटना पाहूनच लिहिलं आहे की काय असं वाटावं इतकं साधर्म्य यातल्या वेगवेगळ्या “ लॉं ‘ज “ मध्ये आहे . नमुनाच सांगायचा झाला तर , 

Nothing is as easy as it looks किंवा

Every solution breeds new problems 

खरं सांगायचं तर हसूच येतं . कारण अशी अनेक उदाहरणं आपण अनुभवत असतोच . आणि जेवढं जास्त खोलात जाऊन आपण ते वाचायला लागतो तेवढं त्यात गुंतत तर जातोच पण मग एका क्षणी आपल्याला सगळं नकारात्मकच  आहे की काय असं वाटायला लागतं. आपण किती हतबल आहोत असही वाटायला लागतं . आणि त्याही पुढे जात , असंच जर घडणार असेल तर मग “ ठेविले अनंते तैसेची राहावे ‘ की काय , असाही विचार कुणीतरी करू शकतो .   

पण  मग मनात येतं , मर्फीची जशी ही एक बाजू आहे तशी आपण जी अनुभवतो ती दुसरी बाजूही आहेच की ! 

म्हणजे असं की , आपली बस , ट्रेन किंवा फ्लाइट चुकणार हे जवळ जवळ निश्चित असतं . आपण ती मिळण्याची आशाच सोडून दिलेली असते . पण असं काहीतरी घडतं की आपण उशिरा जाऊनही ती बस , ट्रेन किंवा फ्लाइट मिळते . आपण थिएटरवर जातो . नाटक / सिनेमा हाऊसफुल  असतो . आपण परत निघणार येवढ्यात कुणीतरी येतं आणि विचारतं , दोन तिकीटं हवीयेत ? आमचे मित्र येत नाहीयेत .. प्रोजेक्टचं शेवटचं काम थोडं राहिलेलं असतं . तुम्हाला अगदी थोडासा वेळ हवा असतो . थोडा म्हणजे किती तर , जास्तीत जास्त 2 तास . पण ऑफिसात गेल्या गेल्या बॉस ते विचारणार हे नक्की असतं  कारण त्याने तशी मीटिंग कालच ठरवलेली आहे. पण तुम्ही ऑफिसात जाता आणि बॉस नेमका दुपारी येणार असल्याचा मेसेज येतो ... UPSC किंवा MPSC ची परीक्षा देणारा विद्यार्थी “ बास झालं आता , नकोच जायला परीक्षेला . इतक्या वर्षात नाही सुटलो आता काय होणार आहे , असा विचार करीत असतो  आणि त्याच्या जवळचं कुणीतरी सांगतं , एवीतेवी तू नापास होणार आहेस हे ठरवलं आहेसच न , तयारी केलीय तर निदान परीक्षेला बसून तरी नापास हो की . तो परीक्षेला बसतो आणि पासही होतो .. 

म्हणूनच मला नेहमी वाटतं , मर्फीज लॉं कडे पाहायचं( च ) झालं तर गम्मत म्हणून पाहावं . मर्फी ला खोटे ठरवणारे अनेक प्रसंग आपल्या आयष्यात येत असतात . त्यांनाच मी “ उलटा मर्फी “ असं म्हणतो !  

गोष्टी आपल्या मनासारख्या घडायच्या असतील तर त्या घडतातच ! नाही का ? लगे रहो हे तत्व सोडायचं नाही हेच खरं!  

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

पिप्लंत्री ग्रामदूत - पद्मश्री श्यामसुंदर पालीवाल

'बेटी धनाची पेटी' हे आपण ऐकतो, वाचतो. पण हे प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवलं आहे पद्मश्री श्यामसुंदर पालीवाल यांनी! त्यांनी...

काळजी वाहणारे Robot युग!

Robots बद्दल गेले अनेक वर्ष आपल्याला कुतूहल आहे. मानवी गरजा समजून त्यावर supercomputing च्या साहाय्याने emotional support देणारा robot बनवता आला...

चेकलिस्ट: मतदान करण्यापूर्वीची!

निवडणुकांत मतदान करण्यापूर्वी आपण कधी चेकलिस्ट बनवली आहे का? मतदार राजा सजग झाला तर राजकारण अधिक गंभीर होऊ शकते. आता...