निसर्ग माणसाला भरभरून देत असतो आणि जेव्हा आपण त्याला समर्पण भावनेने अर्पण करतो तेव्हा तो त्याची परतफेड कशी करतो याचे उदाहरण म्हणजे पद्मश्री तुलसी गौडा यांना म्हणता येईल. कर्नाटकच्या प्रसिद्ध पर्यावरणवादी तुलसी गौडा यांचे राष्ट्रपती भवनातील अनवाणी आणि पारंपारिक धोतीसारखे कपडे परिधान केलेले फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतांना त्यांच्या साधेपणाने त्यांनी अनेकांची मने जिंकली आहेत.
पद्मश्री तुलसी गौडा यांना आज "वनांचा विश्वकोश" म्हणून ओळखले जाते कारण त्यांच्या विविध प्रजातींच्या वनस्पती आणि वनौषधींबद्दलच्या प्रचंड ज्ञानामुळे त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. कर्नाटकातील होनाली गावातील रहिवासी असलेल्या तुलसी गौडा यांनी सहा दशकांहून अधिक काळ पर्यावरणासाठी काम केले असून त्यांनी एक लाखांहून अधिक रोपे लावली आहेत. गेल्या सात दशकांपासून पर्यावरण संवर्धन कार्यात त्या सहभागी आहेत.
कर्नाटकातल्या वनांत राहणारी आणि मातृसत्ताक पद्धती पाळणारी ‘हल्लाकी वोक्कालिगा’ जमात आणि याच जमातीतील तुलसी गौडा कर्नाटक राज्यातील अंकोला तालुक्यातील होणाल्ली नावाच्या गावातून पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यासाठी २०२० मध्ये दिल्लीला गेल्या. वन खात्याच्या रोपवाटिका संभाळण्याचे काम करणाऱ्या निरक्षर तुलसी यांनी त्यांच्या हयातीत एक लाखाहून अधिक वृक्षारोपण केले. लौकिक अर्थाने कोणतेही शिक्षण न घेतलेली ही महिला पर्यावरणाविषयी अत्यंत सजग आहे. आणि तुलसी नावातच विलक्षण आत्मीयता आणि वेगळेपण जाणवते आणि त्यांच्या कार्यातून त्यांची ओळख करून देण्याचा प्रयत्न आहे.
एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या, तुलसी गौडा यांनी वयाच्या दुसऱ्या वर्षी आपल्या वडिलांना गमावले आणि अगदी लहान असतानाच त्यांनी त्यांच्या आईसोबत स्थानिक पाळणाघरात काम करायला सुरुवात केली. त्या कधीही शाळेत गेल्या नाहीत आणि त्या लहान असतांना घरच्या परिस्थितीमुळे त्यांचे लवकर लग्न झाले होते. सरकारी रोपवाटिकेत ३० वर्षांहून अधिक काळ काम केल्यानंतर, तुलसी गौडा यांना वन विभागात कायमस्वरूपी नोकरीची ऑफर देण्यात आली, जिथे त्यांनी १५ वर्षे काम केले आणि वयाच्या ७० व्या वर्षी त्या खात्यातून निवृत्त झाल्या आहेत.
वन विभागात असतांना त्यांनी हजारो रोपे तयार केली आहेत जी हिंदी महासागराच्या किनाऱ्यावर असलेल्या मंगळुरू शहरात नागरी पुनर्विकास प्रकल्पाचा भाग म्हणून वितरित केली गेली आहेत. या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात हरित क्षेत्र निर्माण करणे तसेच उत्पादकांना आधार देणे हे उद्दिष्ट समाविष्ट आहे. किनारी शहराच्या शाश्वत विकासाच्या समर्थनार्थ मंगळुरु स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी ३५ विविध जातींची पहिली १०,००० रोपे लावली आहेत. साग, चंदन आणि ४९ इतर प्रजातींसह उर्वरित, शाळा, स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था, जमीन मालक आणि अगदी ज्या व्यक्तींना ते विनामूल्य किंवा माफक योगदानाच्या बदल्यात मिळतात त्यांना उपलब्ध करून दिले जात आहेत.
या आधी त्यांना 'इंदिरा प्रियदर्शिनी वृक्ष मित्र अवार्ड', 'राज्योत्सव अवार्ड' आणि 'कविता मेमोरियल' यांसारखे कित्येक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. अनवाणी पायांनी चालत मा.राष्ट्रपतींकडून सन्मान प्राप्त करतांना त्यांनी दाखवले की जिथे डोकं ठेवावं असे पाय अजूनही आपल्या देशात आहेत. भारताची खरी ओळख जगाला आता होते आहे आणि हीच ओळख अनेकांना कार्य करायला प्रेरणा देणारी ठरेल यात शंकाच नाही. यावेळी बा.भ.बोरकरांच्या ओळीच आठवत आहेत..ते म्हणतात,
देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती ।
वाळ्वंटातूनी सुध्दा स्वस्तिपद्मे रेखिती ।।