आपण एखादा नवीन शर्ट किंवा नवीन ड्रेस विकत घेऊन घरी येतो.
तो आणल्यावर तुम्हाला घरातले इतर कपडे अचानक जुने वाटायला लागतात.
आणि ते तसे वाटतात म्हणून आपण आणखी नवीन कपडे घेतो. तुमचं असं होतं का?
आपण समजा नवीन घरात राहायला गेलो, किंवा आहे ते घर नवीन केलं, तर नवीन घराला मॅचिंग म्हणून आपण सगळ्या जुन्या गोष्टी टाकून नव्या गोष्टी घेतो. तुमचं असं होतं का ?
आपण नवीन वस्तू विकत घेतल्यावर आधीच्या गोष्टी जुन्या वाटतात. यामधून desiresची एक न संपणारी साखळी तयार होते. त्या नवीन वस्तूला ‘मॅच’ करण्यासाठी आपण नवीन गोष्टी विकत घेऊ लागतो. याला डीडेरॉट (Diderot) effect म्हणतात.
डीडेरॉट effect? म्हणजे काय?
त्यासाठी आपल्याला तीनशे वर्षे मागे जावं लागेल. डेनिस डीडेरॉट नावाचा एक फ्रेंच फिलॉसॉफर होता. सर्वात पहिला Encyclopédie लिहिणाऱ्यांपैकी तो एक होता. तो अत्यंत गरीब होता. इतका की तेव्हाच्या प्रथेप्रमाणे मुलीच्या लग्नात हुंडा द्यायला देखील त्याच्याकडे पैसे नव्हते. रशियामधील एका धनिक राणीला त्याची दया येऊन त्याची संपूर्ण लायब्ररी तिने विकत घेतली. आलेल्या पैशांतून डेनिसने एक गाऊन घेतला होता. तो नवीन गाऊन विकत घेताच डेनिसला त्याचे असलेले कपडे जुने वाटू लागले. नवीन कपडे येताच त्याला घरातील इतर वस्तू जुन्या वाटू लागल्या. हे इतकं झालं की त्याने अक्षरशः कर्ज घेऊन नवीन वस्तू घेतल्या. हे सगळं डेनिसने त्याच्या ‘Regrets of parting with my old gown’ निबंधात लिहून ठेवलं आहे. तेव्हापासून जेव्हा माणसाच्या मनात नवनवीन desires ची साखळी सुरु होते त्याला डीडेरॉट effect म्हणू लागले.
यावरून तुमच्या लक्षात येईल, संपूर्ण मार्केटिंगची दुनिया या ‘इफेक्ट’चा वापर करून आपल्याला अधिकाधिक वस्तू घ्यायला भाग पाडते.
डीडेरॉट effect चा सामना कसा करावा ?
१. नवीन वस्तू घेतल्यामुळे असलेल्या वस्तू जुन्या वाटू लागल्या तर तुमच्यात ‘डेनिस डीडेरॉट’चं भूत शिरलंय याची नुसती जाणीव होणं हीच त्यावरील विजयाची पहिली पायरी आहे.
२. नवीन वस्तू घ्यायचा विचार मनात येताच त्यावर लगेच अंमलबजावणी न करता तो निर्णय पुढे ढकला. बऱ्याचदा, दुसऱ्या दिवशी तुमच्या मनात निर्माण झालेलं ‘वस्तू विकत घेण्याचं ते वादळ’ शांत झालेलं असेल.
३. फिरायला जाण्यासाठी मॉल्स, शॉपिंग सेंटर्स याच्या व्यतिरिक्त काही वेगळ्या जागा असू शकतात का? याचा विचार करा.
४. Wants आणि Needs यातला फरक ओळखा.
५. स्वतःकडे असलेल्या गोष्टींबाबतीत कृतज्ञ राहा. अशी अनेक लोकं आहेत ज्यांच्याकडे तुमच्याकडे आहे त्यापेक्षाही कमी आहे.
यापुढे नव्या वस्तूंना ‘मॅच’ करण्यासाठी आणखी वस्तू विकत घ्याव्याशा वाटल्या तर डेनिस डीडेरॉटचा तो गाऊन आणि आजचा ब्लॉग तुम्हाला नक्की आठवूदेत यासाठी शुभेच्छा देतो !
The best productivity App in your mobile phone is the Airplane Mode!
- Ben Meer
तेव्हा मंडळी, हा ब्लॉग कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा.
मंडळी, तुम्ही सुद्धा छान छान सिनेमा-वेबसिरीज पाहात असाल, पॉडकास्ट ऐकत असाल. पुस्तकं वाचत असाल. माणसांना भेटत असाल. प्रवास करत असाल. तुम्हाला ज्या गोष्टी interesting आणि inspiring वाटल्या त्या आम्हाला कळवा. जर त्या आम्हालाही आवडल्या तर आम्ही त्या तुमच्या नावासहित इथे देऊ. मग वाट कसली पाहताय? Content@swayamtalks.org वर तुमच्या गोष्टी आम्हाला पाठवा. त्यात तुमचे नाव, फोन नंबर आणि शहराचे नाव नक्की लिहा.