उगाच, निर्हेतुक, बेमतलाब… वगैरे वगैरे ! - Welcome to Swayam Talks
×

उगाच, निर्हेतुक, बेमतलाब… वगैरे वगैरे !

नविन काळे

हा ब्लॉग म्हणजे तुमच्या मेंदूचा दर आठवड्याचा व्यायाम आहे! या ब्लॉगमुळे तुम्ही दर आठवड्याला काही नवीन तर शिकालच, पण जगापेक्षा एक पाऊल पुढे राहाल याची आम्ही खात्री देतो.
 

Published : 29 December, 2023

उगाच, निर्हेतुक, बेमतलाब… वगैरे वगैरे !

Get Better Each Week #28

अमृत फडके हा माझा मित्र इंग्लंडमध्ये राहतो. परवा पंधरा वर्षांनी घरी भेटायला आला होता. 

गप्पांची गाडी अर्थातच आमच्या कॉलेज लायब्ररी मध्येच बराच वेळ फिरत होती. वीस पंचवीस वर्षांपूर्वीचं काय काय आठवत होतं. त्यावेळी आम्ही दोघेही पोस्ट ग्रॅज्युएशनच्या अभ्यासासाठी कॉलेजच्या लायब्ररीत बसायचो. ब्रेक्समध्ये जेव्हा भेटायचो तेव्हा अमृत मला त्याची एक कविता द्यायचा आणि काही दिवसांत मी त्याला चाल लावून त्याला ऐकवायचो. 

परवा भेटलो तेव्हा त्या सगळ्या कविता आम्ही आठवणींच्या ट्रंकमधून बाहेर काढल्या. आठवत आठवत एक एक कविता म्हणू लागलो. बऱ्याच कवितांचे शब्द-चाली आठवत होते तसं आम्ही गद्यात-गाण्यात म्हणत होतो. शेवट झाला तो एका अशा गाण्याने की जे आम्ही कॉलेजला ग्रुप सॉंग म्हणून दिलं आणि त्याला युनिव्हर्सिटीमध्ये पहिलं बक्षीसही मिळालं होतं. (या ग्रुप सॉंगची शेवटची एक ओळ मात्र रात्री अडीच वाजता अचानक आठवली. असो.) त्यावेळी असं जाणवलं की यातल्या ते ग्रुप सॉंग कुठेतरी वापरलं तरी गेलं पण बाकीच्या कविता / गाणी फक्त आमच्यापुरत्या राहिल्या. व्हर्जिन ! 

यातली एकही कविता किंवा त्याची चाल आम्ही ना कुठल्या प्रोजेक्टसाठी केली होती, ना कुठल्या कार्यक्रमासाठी. ना कुठल्या पुस्तकासाठी. ही त्या वयातली एक झिंग होती. You can call it as child’s play ! आपणही लहान असताना असेच खेळायचो की. Playing just for the sake of playing. ग्रुप सॉंगची ती शेवटची ओळ सापडत नसताना मी गमतीने अमृताला म्हटलंही, हे जगातलं एकमेव चांगलं गाणं आहे, जे गुगलवर उपलब्ध नाही !’ आम्ही दोघेही मोठ्यांदा हसलो. आमच्या कवितांचे आणि गाण्यांचे फक्त आम्ही दोघेच प्रेक्षक होतो ! 

मी हे बोलून गेलो आणि पुढच्या क्षणी मनात आलं, आपली शेवटची अशी कुठली कृती-कलाकृती आहे ज्याच्या कुठेही ‘डिजिटल पाऊलखुणा’ नाहीत? स्मरणशक्तीला ताण देऊन मला आठवायला लागेल. मी आता जे काही लिहितो त्याचा ‘मेसेज’होतो, पोस्ट होते किंवा ब्लॉग तरी होतो. फक्त माझ्यासाठी लिहिलं असं आता काही आहे का? इतर वाचक असल्याशिवाय मला यापुढे काही लिहिता येईल का? फक्त माझ्यासाठी? 

याठिकाणी मला चित्रकार सुभाष अवचट यांचा एक लेख आठवतो. ते नावाजलेले चित्रकार झाल्यानंतर परदेशी गेले होते. तिथे एका माणसाने त्यांना विचारलं where are your sketches? साक्षात्कार झाल्याप्रमाणे अवचटांच्या लक्षात आलं की गेले अनेक वर्षे आपण फक्त इतर लोकांनी सांगितलेली चित्रं काढत आलो. खूप मोठे नावाजलेले चित्रकार झालो. पण गेल्या अनेक वर्षांत आपण स्वतःसाठी चित्रच काढलं नाहीये. हे लक्षात आल्यावर अवचटांनी म्हणे काही काळासाठी आपलं कमर्शियल काम बंद करून स्वतःसाठी काम केलं. 

मी काय म्हणतोय हे आता तुमच्या लक्षात येत असावं. पूर्वी आपण अनेक गोष्टी उगाच, उगीच, निर्हेतुक करत होतो. आपण खेळायचो. मित्रांबरोबर उंडारायचो. वाट्टेल ते खायचो. हातगाडीवर कुठल्याही पाण्याचं सरबत प्यायचो. धावायचो. पडायचो. आई वडिलांचा मार खायचो. मनात येईल तेव्हा झोपायचो. गाण्यांवर-चेहऱ्यांवर-अदांवर फिदा व्हायचो. चुकायचो. डोळ्यांतून पाणी येईस्तोवर हसायचो. पांघरुणात डोकं लपवून रडायचो. भांडायचो. भांडणं मिटवून पुन्हा गळ्यात गळे घालून फिरायचो. ही सगळी मस्ती आपल्या सगळ्यांच्या पुसट होत गेलेल्या आठवणींमध्ये, काही तोडक्या मोडक्या जुन्या वस्तूंमध्ये, पिवळ्या पडलेल्या जुन्या कागदांमध्ये किंवा अल्बममध्ये सुरक्षित आहे. आम्ही मित्रांनी एकत्र असताना जी अप्रतिम, अद्वितीय, अभूतपूर्व अशी धमाल केली आहे त्याचे साक्षीदार फक्त आम्हीच आहोत (आणि फार फार तर चित्रगुप्त). या आठवणी आम्ही आमच्याबरोबर घेऊन जाणार. Thank God यातलं काही सोशल मीडियावर नाही ! कुठलाही संबंध नसलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया बाळगत या आठवणी सोशल मीडियावर ‘नाहीत’ हे केवढं मोठं सुख आहे ! नेटफ्लिक्सवर मिथिला पालकरची Little Things नावाची एक खूप छान सिरीज आहे. त्यात एका प्रसंगात मिथिलाचा पार्टनर ध्रुव तिच्या (सिरीजमधल्या) आईला एकदा विचारतो, हे सगळं तुमच्या लक्षात कसं राहिलं? त्यावर मिथिलाची आई म्हणते, कदाचित या सगळ्याचे मी कधी फोटो काढले नव्हते, म्हणून असेल !  

सोशल मीडिया आपल्या सगळ्यांच्या अविभाज्य भाग झालाय हे मान्य. पण जगण्यातला काही भाग तरी असा असू दे जो सोशल मीडियावर नाही. प्रत्येक गोष्टीची डिजिटल मेमरी व्हायलाच हवी असं नाही. 

२०२३ संपून आता २०२४ सुरु होईल. माझी खात्री आहे की, तुम्ही नवीन वर्षासाठी काही resolutions करत असाल. 

तुमचं वैयक्तिक आयुष्य आणि व्यावसायिक करियर यशस्वी होण्यासाठी नवीन वर्षात करायच्या अनेक गोष्टींची यादी तुमच्या मनात किंवा डायरीत तयार असेल. नियमित व्यायाम (यादीत नेहमी हेच पहिलं का असतं?), खर्चावर नियंत्रण, ड्रायव्हिंग शिकणे, भाषा शिकणे, स्क्रीन टाईमवर नियंत्रण अशी किंवा अनेक resolutions तुमच्या लिस्टमध्ये असतील. हरकत नाही. ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा ! पण हे सगळं करत असताना रोजच्या चोवीस तासात एक कप्पा फक्त स्वतःसाठी ठेवा. 

निदा फाज़ली यांचा एक अप्रतिम शेर आहे. 

घर की तामीर चाहे जैसी हो    (तामीर म्हणजे इमारत)  

घर की तामीर चाहे जैसी हो 

उसमे रोने की कुछ जगह रखना 

कुठली तरी अशी गोष्ट जी ‘काही’ साध्य करण्यासाठी नाही, तर ती गोष्ट करायला मिळणे हेच साध्य आहे. त्याचा कुठे गवगवा नको. सोशल मीडियावर पोस्ट नको. स्टोरी नको. स्टेटस नको. काळाबरोबर धूर होऊन ती नष्ट होईल, पण मनात त्याचा सुगंध राहील ! बेमतलबकी कोई भी चीज़ ! 

तुम्हाला नवीन वर्षाच्या खुप शुभेच्छा ! 

दर आठवड्याला ‘better’ होत राहण्याचा आपला प्रवास नवीन वर्षातही असाच सुरु ठेवू या !  

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

देणगी काहीतरी सुचत राहण्याची!

सर्जनशील असणं याची मुभा सगळ्यांना आहे. आपण एखाद्या गोष्टीचा विचार कसा करतो? आणि त्याचा अवलंब कसा करतो? यावर सारं अवलंबून...

आसामच्या 'लक्ष्मी माँ': पद्मश्री लखिमी बरूआ

आसाम सारख्या दुर्गम भागातील राज्यात महिला सक्षमीकरण आणि सहकार क्षेत्रांत आसामी महिलांचे आर्थिक सशक्तीकरण करण्यात...

कल्पनाशक्तीची नवी 'LINE'

कल्पनाशक्ती जादुई असते. ती नवे क्षितिज दाखवते आणि त्या पलीकडे काय असेल ह्या विचारात पाडते. अशाच एका अद्भुत विचाराला...