लहानपणापासून आपण सर्वांनी अनेक सिनेमे पाहिले. त्या असंख्य सिनेमांपैकी आमिर खानचा ‘लगान’ हा सिनेमा आपल्या सर्वांचाच अत्यंत लाडका सिनेमा असावा याची मला खात्री आहे. अनपेक्षित काळात, अनपेक्षित प्रसंगात खेळली गेलेली ती क्रिकेटची मॅच, ‘सरत मंजूर है’ म्हणणारा बाणेदार भुवन, एकापेक्षा एक अत्रंगी लोकांनी भरलेली ती क्रिकेट टीम, अनेक दिलांची धडकन झालेली ग्रेसी सिंग, ए आर रहमानची ती अप्रतिम गाणी…अशा अनेक गोष्टींमुळे ‘लगान’ने आपल्या मनावर राज्य केलं. तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो, अनेक मॅनॅजमेण्ट गुरु आपल्या लीडरशिप प्रोग्रॅम्समध्ये ‘लगान’ ही एक ‘केस स्टडी’ म्हणून घेतात. या सिनेमातील अनेक गोष्टींवर मॅनॅजमेण्ट किंवा लीडरशिपच्या अंगाने चर्चा होऊ शकते. पण आज ‘लगान’ मधल्या एका वेगळ्याच गोष्टीवर मला काही सांगायचंय.
‘लगान’ सिनेमात क्लायमॅक्सच्या आधी एक सिच्युएशन येते. मॅचचा निर्णायक दिवस उद्या आहे. उद्या आपल्या गावची टीम जिंकली तर दोन वर्षांचा ‘लगान’ (टॅक्स) माफ होणार आहे, मात्र टीम हरली तर, आहे त्यापेक्षा तीन पट ‘लगान’ (टॅक्स) द्यावा लागणार आहे. संपूर्ण गावातल्या लोकांच्या आयुष्याचा ‘स्टेक’ उद्याच्या मॅचवर लागलाय. जीवन मरणाचा प्रश्न ! या सिच्युएशनमध्ये दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरने एक अप्रतिम प्रार्थना ठेवली आहे. सिनेमाचा चढत गेलेल्या ग्राफ या संथ गाण्यामुळे कदाचित खाली येऊ शकतो याची संपूर्ण रिस्क घेऊन. पण या प्रार्थनेचं ‘प्लेसमेंट’ इतकं भारी आहे, की त्याजागी आपण दुसऱ्या कशाचा विचारच करू शकत नाही.
परिस्थितीने हताश झालेली भुवनची सगळी क्रिकेट टीम आणि आपलं अंधारलेलं भविष्य समोर दिसत असलेले गावकरी उध्वस्त होऊन गावातील मंदिरासमोर बसलेत… आणि मंदिरातून शब्द येतात..
ओ पालनहारे, निर्गुण और न्यारे
तुमरे बिन हमरा कौनो नाहीं
हमरी उलझन, सुलझाओ भगवन
तुमरे बिन हमरा कौनो नाहीं
प्रत्येकाच्या मनातलेच हे शब्द !
जावेद अख्तर यांची लेखणी हे शब्द अक्षरशः जगते. मला त्यांची ही प्रार्थना अनेक कारणांसाठी ग्रेट वाटते.
एका कडव्यात ते म्हणतात -
प्रभुजी हमरी है बिनती
दुखी जन को, धीरज दो
हारे नहीं वो कभी दुखसे
तुम निर्बल को रक्षा दो
रह पाएं निर्बल सुख से
भक्ति को, शक्ति दो
दुखी जन को, धीरज दो ! आमचं दुःख कमी कर असं आम्ही मागत नाही, तर ते दुःख सहन करण्याचा ‘पेशन्स’ मागत आहोत. हे खूप कमाल आहे ! विपत्तीमध्ये तू माझं रक्षण कर असं मी म्हणणार नाही, पण संकटांचं मला भय वाटू नये हीच प्रार्थना या रवींद्रनाथांच्या ओळींची थेट आठवण करून देणारी.
‘काही कर आणि उद्या मॅच जिंकण्यासाठी आमची मदत कर’ असं एखादा सहज मागू शकला असता. पण लगान सिनेमातला भुवन तसं मागत नाही. तो म्हणतो - ‘भक्ती को शक्ती दो !’ मला तुझ्या भक्तीत दुबळं करू नकोस, उलट माझ्या भक्तीला शक्तीची साथ दे. म्हणजे अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी करण्याचीही ताकद माझ्यामध्ये येईल.
दिग्दर्शक, लेखक, कवी, गीतकार, संगीतकार, गायक सिनेमातलं पात्र कसं उभं करतात, एका संपूर्ण फिक्शनल पात्राला एक व्यक्तिमत्व कसं देतात याचं एक अप्रतिम उदाहरण म्हणजे ही प्रार्थना आहे. हे गाणे इथे पाहाता येईल.
आता थोडं सिनेमाच्या बाहेर येऊया.
मला ‘प्रार्थना’ या विचाराचं नेहमीच कुतूहल वाटत आलंय. आपण ‘प्रार्थना’ या गोष्टीकडे खूप ढोबळ पद्धतीने पाहतो. प्रार्थना म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते एखाद्या देवाची मूर्ती अथवा काही प्रतिमा आणि समोर, त्या देवाची आळवणी करणारे भाविक ! पण ‘प्रार्थना’ या शब्दाचा परीघ केवढा रुंद आहे याचा कधी विचार केलाय का ? भर ट्रॅफिकमध्ये डोक्यावरचा सायरन वाजणारी एक ऍम्ब्युलन्स अडकलेली असते. त्यावेळी आपल्या मनात काय येतं? या ऍम्ब्युलन्समधला पेशंट सुखरूप पोहोचू दे आणि त्यावर लवकरात लवकर इलाज सुरु होऊ देत ! ही देखील प्रार्थनाच आहे की ! पेपरमध्ये ‘याही वर्षी मराठवाड्यात दुष्काळ’ असं म्हणताच ‘पाऊस पडू दे बाबा तिथे’ असं मनात येणं ही देखील प्रार्थनाच !
माझ्या दृष्टीने प्रार्थनेचा आणि कुठल्या देवाचा वा धर्माचा काहीही संबंध नाही. प्रार्थना म्हणजे स्वतःशी केलेला संवाद !
प्रार्थना म्हणजे काही मागणं नाही. ‘सगळं संपलंय’ असं वाटत असतानाही ज्याला पकडून माणूस पुन्हा उभा राहतो तो चिवट धागा म्हणजे प्रार्थना ! आपल्या रोजच्या वैयक्तिक आयुष्यात म्हणा किंवा कामाच्या बाबतीत म्हणा असे अनेक प्रसंग येतात जिथे आपले प्रयत्न संपतात. कर्ता म्हणून जे जे आवश्यक होतं ते सगळं करून झालंय आणि आता ती गोष्ट घडण्यासाठी फक्त एका ‘हलक्या पुश’ची गरज आहे, तो ‘पुश’ म्हणजे प्रार्थना ! एक नाटक लिहिलं जातं. त्याच्या रिहर्सल्स घडतात. नाटक आकाराला येतं. पण ते रंगमंचावर सादर करण्याआधी ‘आता सगळं काही नीट होऊ दे’ या भावनेने त्या रंगमंचाला जो नमस्कार केला जातो, त्याला म्हणतात प्रार्थना !
एखादी गोष्ट घडण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. पण ती गोष्ट घडत असताना आपल्या पलीकडे अनेक ‘फोर्सेस’ काम करत असतात. काही गोष्टी आपल्या हातात असतात तर काही संपूर्णपणे आपल्या कक्षेच्या बाहेर. अशावेळी त्या कक्षेबाहेरील गोष्टींना नम्रपणे शरण जावं लागतं. त्या कक्षेबाहेरील गोष्टींना कोणी नशीब म्हणेल तर कोणी देव ! तुम्ही देव माना किंवा मानू नका, पण काही गोष्टी आपल्या मर्यादेच्या पलीकडे असतात याची नम्र जाणीव असलेली बरी असते. प्रार्थना करताना - म्हणजेच स्वतःशी संवाद साधताना - ही जाणीव अधिक तीव्र होते. यासाठी स्वतःला वेळ द्यावा लागेल. दिवसातला काही वेळ स्वतःजवळ बसावं लागेल. स्वतःशी बोलावं लागेल. सराव झाला की पूर्वी ऐकलेल्या इतरांच्या प्रार्थना धूसर होतील. हळूहळू प्रार्थनेमध्ये स्वतःचे शब्द आकार घेऊ लागतील.
गप्पांमध्ये कधी ‘लगान’चा विषय निघाला की मी अनेकदा ‘ओ पालनहारे’ चा उल्लेख करतो.
‘अच्छा ! म्हणजे त्या शेवटच्या प्रार्थनेमुळे मॅच जिंकले होय !’ काहीजण मस्करीच्या टोनमध्ये विचारतात !
मी शांतपणे त्यांना माझं एक आवडतं वाक्य ऐकवतो.
Prayers don’t change things.
Prayers change people and people change things.’