३००० वर्षांचा इतिहास असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धा आपल्याला सर्वांना माहित असतात. पण डॉ लुडविग गटमन नावाच्या एका प्रतिभावान ज्यू डॉक्टरला प्रश्न पडला की धडधाकट लोकांची ऑलिम्पिक स्पर्धा असते तर अपंग लोकांची का नसावी ? यातून त्यांच्या क्षमतांना एक नवं आव्हान मिळेल, त्यांच्यामध्ये एक ‘स्पिरिट’ निर्माण होईल आणि हा संपूर्ण अनुभव त्यांचं आयुष्य बदलणारा असेल असा त्यांना विश्वास होता. याच भूमिकेतून पहिली पॅरालिम्पिक स्पर्धा डॉ गटमन यांनी २९ जुलै १९४८ या दिवशी सुरु केली. ‘पॅरालिम्पिक म्हणजे अपंग लोकांचे ऑलिम्पिक’ अशी झापडं लावून आपण Rising Pheonix ही फिल्म पाहायला बसतो आणि फिल्म संपल्यावर ‘नक्की अपंग कोण?’ विचारणाऱ्या अनेक नजरा आपल्यावरच रोखलेल्या असतात.
ही फिल्म अशा नऊ पॅरालिम्पिक खेळाडूंची गोष्ट सांगते. काही स्त्रिया काही पुरुष. कोणी ऑस्ट्रेलियामधलं, कोणी आफ्रिकेतल्या सिव्हिल वॉरचं बळी ठरलेलं, कोणी रशियामध्ये जन्म घेऊन अमेरिकेसाठी खेळणारं, कोणाचे पाय नाहीत, कोणाला हात-पाय दोन्ही नाही, कुणाचे कॅन्सरमुळे पाय कापावे लागलेत… असं काय काय ! हात पाय नसलेली ही माणसं धावतात, लॉंग जम्प मारतात, पोहतात, नेमबाजी करतात...हे पाहून आपण थक्क होण्याच्याही पलीकडे जातो… ही फिल्म आपल्याला प्रत्येकाचा इतिहास सांगते, त्यांच्या अंतरंगात घेऊन जाते. या गोष्टी सांगता सांगता ही फिल्म आपल्याला हळूच पॅरालिम्पिकचा इतिहास सांगते. ऑलिम्पिक समिती आणि पॅरालिम्पिक समिती यांच्यातलं शीतयुद्ध, पडद्यामागचं राजकारण अशा अनेक गोष्टी आपल्याला जाता जाता कळतात. पण खरे लक्षात राहतात ते नऊ वीर !
या फिल्मला एखाद्या टिपिकल डॉक्युमेंटरी प्रमाणे करणं सहज सोपं होतं. पण फिल्ममेकर्सनी याला एखाद्या सिनेमाप्रमाणे ट्रीटमेंट दिली आहे. एखाद्या स्क्रीनप्लेमध्ये असतो त्याप्रमाणे Setup - Conflict - Resolution हा ढाचा इथेही कमालीच्या सफाईने आणि अत्यंत प्रभावीपणे वापरला आहे. यातलं पार्श्वसंगीत, संवाद, दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग, व्हिज्यूल्स तुम्हाला खिळवून ठेवतात. संपूर्ण फिल्ममधलं visual documentation आणि रिसर्च तुम्हाला थक्क करून सोडतो.
अपंगत्व - मग ते शारीरिक असेल वा मानसिक, तो एक फक्त अपघात असतो. एक त्रुटी असते.
तुमच्या कवटीत असलेल्या त्या मांसाच्या गोळ्यात काय प्रोसेसिंग घडतंय, हे महत्त्वाचं !
खरा ऍथलिट खेळतो कसा याही पेक्षा तो विचार कसा करतो, हे पाहायचं असेल तर ही फिल्म तुम्ही पाहिली पाहिजे.
तुमच्या संपूर्ण कुटुंबासह - विशेषतः वयात येणाऱ्या संस्कारक्षम मुलांबरोबर नक्की पाहा. फक्त पावणे दोन तासांचं हे गिफ्ट तुमची मुलं कायम लक्षात ठेवतील.
Rising Phoenix पाहताना नेमकं काय वाटतं सांगू ?
‘मी खरंच लकी आहे की आत्ता मी ही फिल्म पाहू शकतोय. अनुभवू शकतोय. थँक गॉड, माझ्यात ती संवेदना आहे की स्क्रीनवरच्या त्या माणसांना काय वाटतंय, काय म्हणायचंय हे मी, थोडंसं का होईना, समजू शकतोय.’ असं तुम्हाला सुप्तपणे वाटत राहील. तुम्ही त्या नऊ लोकांच्या गोष्टीत इतके गुंतून जाता की त्यांच्या अडचणी, त्यांची आव्हानं तुम्हाला तुमची वाटतात. पॅरालिम्पिकमध्ये जेव्हा ‘ते’ मेडल मिळवतात तेव्हा ‘तुमचे’ डोळे वाहत असतात. ही फिल्म पाहताना अनेक वेळा मी माझे असलेले पाय हलवून पाहिले. मनात आलं, ‘आत्ता माझे पाय आहेत, उद्या काही कारणाने ते गेले तर? आत्ता उठून कुठेतरी धावत जाऊया !’ सकाळी चालायला जायचा कंटाळा आला की मला ही फिल्म आठवते आणि मी गादीतून उठत निमूटपणे पायात बूट चढवतो.
ही फिल्म पाहताना माणसाच्या असीम शारीरिक क्षमतेची आणि मनाच्या सामर्थ्याची कमाल वाटते…आणि आपल्यातही हेच सामर्थ्य आहे याची जाणीव होऊन नवीन आव्हाने झेलण्यासाठी आपणही सज्ज होतो !
Rising Phoenix (2020) - Netflix - १ तास ४६ मिनिटं
तुमचा स्क्रीनटाईम वाढलाय? रील्स बघता बघता दोन तास कधी झाले ते कळतंच नाही? तुम्हाला ऑनलाईन शॉपिंगचं वेड लागलंय? गरज नसताना तुम्ही स्क्रोल करत बसता का? स्क्रीनटाईम कमी केला पाहिजे हे कळतंय, पण वळत नाही? मग हा ब्लॉग तुमच्यासाठी आहे. स्क्रीनटाईम कमी झाला पाहिजे असं तुम्हाला खरंच वाटत असेल, तर मी तुम्हाला आज एका मस्त Appची माहिती देणार आहे. हे App मी स्वतः देखील वापरतो.
तुम्ही काय पाहताय, किती वेळ स्क्रोल करताय याबद्दल सारखं तुम्हाला कोणी सांगितलं तर ते कोणाला आवडेल ! ("पहिला फोन खाली ठेव" - इति प्रत्येकाची आई !)
पण आपल्या आईचा रोल आपल्याच फोन मधल्या एखाद्या Appने केला तर? म्हणजे, फक्त थोडी शिस्त लावण्यापुरतं... तर?
तर मंडळी तुमच्या स्क्रीनटाईमवर लक्ष ठेवणारी अनेक Apps मी स्वतः वापरून पाहिली आहेत. पण नुकतंच मी एक App पाहिलं, मला ते आवडलं आणि मी ते डाऊनलोड देखील केलं. त्याबद्दलच मी आज सांगणारे. ऐकणार ? वन सेक !
इतकी उत्सुकता असेल, तर आधीचं वाक्य परत एकदा वाचा ! नाही कळलं? अहो, App चं नावच One Sec आहे !
हे App काय करतं ते एका उदाहरणामधून पाहूया. समजा तुम्ही इंस्टाग्रामवर खूप वेळा असता आणि इंस्टाग्रामचा स्क्रीनटाईम तुम्हाला कमी करायचाय.
तुम्ही One Sec App च्या सेटिंगमध्ये जाऊन इंस्टाग्राम सिलेक्ट करायचं. तुम्ही जेव्हा जेव्हा इंस्टाग्राम उघडाल, तेव्हा इंस्टाग्रामवर तीन सेकंदासाठी एक पडदा येतो आणि त्यावर अक्षरं येतात - Take a deep breath ! यामुळे आपल्या उतावीळपणाला एक छान पॉज मिळतो. इतकंच नाही, तर तुम्ही गेल्या २४ तासांत इंस्टाग्रामवर कितव्यांदा गेला आहात, ते देखील हे App दाखवतं. जर तुम्हाला एकाहून अधिक Apps साठी हे वापरायचं असेल तर तुम्हाला त्यांचं Paid App घ्यावं लागतं. (मी घेतलं होतं तेव्हा संपूर्ण वर्षाचे फक्त ४९ रुपये होते.) हे तुम्हाला हवं तेव्हा enable / disable करता येतं. लक्ष ठेवण्यासाठी जितकी Apps तुम्ही निवडता त्या सर्वांचा आठवड्याचा लेखाजोखा तुम्हाला यामध्ये मिळतो. स्क्रीनटाईम कमी असावा का जास्त असावा, तो किती असावा हा मुद्दा वैयक्तिक आहे. आपलं रोजचं काम स्क्रीन पाहिल्याशिवाय होत नाही ही आजची वस्तुस्थिती आहे. या Appमुळे सर्वात महत्वाचं काय होत असेल तर आपण किती वेळ स्क्रीनवर असतो याचा एक 'awareness' आपल्यामध्ये येतो. या घडीला तेच सर्वात महत्त्वाचं आहे.
Gmail कळायच्या आधी हे नाव आपण सर्वांनी पाहिलं होतं. मागच्या आठवड्यात या ब्रँडचा full form कळला तेव्हा मी बसमध्ये होतो. तुम्ही विश्वास नाही ठेवणार, मी बसमध्ये Yahoooooo असं ओरडलोच ! इतर लोकांना कुठे सांगत बसू की मला काय भारी गोष्ट कळली होती !
आता मी full form सांगतो. तो कळल्यावर तुम्ही सुद्धा जोरात ओरडाल की नाही बघा !
Yahoo = Yet Another Hierarchical Officious Oracle !
तेव्हा मंडळी, हा ब्लॉग कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा.
मंडळी, तुम्ही सुद्धा छान छान सिनेमा-वेबसिरीज पाहात असाल, पॉडकास्ट ऐकत असाल. पुस्तकं वाचत असाल. माणसांना भेटत असाल. प्रवास करत असाल. तुम्हाला ज्या गोष्टी interesting आणि inspiring वाटल्या त्या आम्हाला कळवा. जर त्या आम्हालाही आवडल्या तर आम्ही त्या तुमच्या नावासहित इथे देऊ. मग वाट कसली पाहताय? Content@swayamtalks.org वर तुमच्या गोष्टी आम्हाला पाठवा. त्यात तुमचे नाव, फोन नंबर आणि शहराचे नाव नक्की लिहा.