Get Better Each Week #19 - Welcome to Swayam Talks
×

Get Better Each Week #19

नविन काळे

हा ब्लॉग म्हणजे तुमच्या मेंदूचा दर आठवड्याचा व्यायाम आहे! या ब्लॉगमुळे तुम्ही दर आठवड्याला काही नवीन तर शिकालच, पण जगापेक्षा एक पाऊल पुढे राहाल याची आम्ही खात्री देतो.
 

Published : 20 October, 2023

Get Better Each Week #19

तुम्हाला तुमचा पंचविसावा तास सापडला आहे का ?

व्यायाम होत नाही. आवडीची पुस्तकं वाचून होत नाहीत. मित्रांना भेटता येत नाही. 

आवडीचे छंद जोपासता येत नाहीत. अनेक दिवसांपासून आवडीच्या ठिकाणी प्रवास केलेला नाही.  

….ठरवलेल्या गोष्टी आता फक्त डायरीतल्या जानेवारीच्या पानांवर पडून आहेत. 

हे असं का होतं ? या सगळ्याला प्रत्येकाचं एकच उत्तर आहे. 

वेळ नाही ! 

‘माझ्याकडे वेळ नाही’ ही तक्रार, पुलं म्हणतात तशी, बालवाडीतल्या पोरांपासून ते पेन्शनर्सपर्यंत सर्वांची आहे. 

माणसं इतकी बिझी झाल्येत? दिवसाचे तास कमी झालेत? नक्की झालंय काय?  

चोवीस तासातले झोपेचे ८ तास सोडून दिल्यावर १६ तास उरतात. त्यातील कामाचे १० तास सोडून द्या. 

मग उरलेले ६ तास नेमके कुठे जातात? 

‘वेळ पुरत नाही’ ही समस्या माणसाला गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावत आहे. या एका समस्येवर ‘Time Management’ नावाची एक भली मोठी इंडस्ट्री उभी आहे. ‘कळतंय पण वळत नाही’ अशा स्थितीत गोंधळलेले आपण सर्वजण एका जादूच्या छडीची वाट पाहतोय. ती जादू झाल्यावर आपल्या हाताशी भरपूर वेळ असणार आहे असं आपल्याला वाटतंय. 

आपल्या आयुष्यात अशी जादू घडणं शक्य आहे का? 

२०१९ साली माझी डॉ हिरेन शाह यांच्याशी ओळख झाली. डॉ शाह सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ आहेत आणि अहमदाबादमध्ये प्रॅक्टिस करतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉ शाह आणि त्यांच्या डॉक्टर पत्नीने मिळून अहमदाबादमधील त्यांच्या घरात एक अतिशय देखणं ‘प्रायव्हेट म्युझियम’ निर्माण केलंय. म्युझियमचं नाव आहे Locks, Clocks & Peacocks ! त्यामध्ये जुनी घड्याळं, दुर्मिळ कुलुपांचे प्रकार, जगभरातील विविध प्रकारची कोडी (puzzles) अशा हजारो गोष्टी या म्युझियममध्ये आहेत. आम्ही त्यांना भेटायला गेलो तेव्हा रात्रीचे आठ वाजले होते. म्युझियमचा फेरफटका, कॉफी आणि गप्पा यामध्ये रात्रीचे  बारा वाजले होते. डॉक्टर साहेबांचं महाराष्ट्रात झालेलं शिक्षण, काही कॉमन आवडी यामुळे गप्पा उत्तरोत्तर रंगतच गेल्या. दिवसभर ‘डॉक्टरकी’ केल्यानंतरही रात्री बारा वाजता डॉक्टर साहेब फ्रेश दिसत होते. साहजिकपणे माझ्या मनात आलेला प्रश्न शेवटी ओठांवर आला - ‘डॉक्टर साहेब, हे सगळं करण्यासाठी वेळ कुठून काढता?’ 

हा प्रश्न त्यांना अनेकांनी विचारला असावा. चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवत डॉक्टर साहेबांनी जे उत्तर दिलं ते माझ्यासाठी कायमचं दिशादर्शक ठरलं. डॉक्टर शाह म्हणाले, ‘मी माझ्या आयुष्यातला पंचविसावा तास शोधला !’ 

आमच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह पाहून डॉ शाह पुढे सांगू लागले. 

‘आपल्या प्रत्येकाकडे चोवीस तास आहेत. त्या चोवीस तासांचं काय करायचं हे प्रत्येकाने ठरवायचं असतं. सगळे जण तसं करतातही. पण ज्याला स्वतःच्या आवडीच्या गोष्टींसाठी वेळ द्यायचा आहे त्याला ते चोवीस तास कधीच पुरणार नाहीयेत. त्यासाठी त्याला पंचविसावा तास निर्माण करावा लागणार आहे. हा पंचविसावा तास अस्तित्वात नसतो. तो प्रत्येकाने ज्याचा त्याचा identify करायचा असतो. आपल्याकडे असलेल्या चोवीस तासांमधून काही मिनिटांची ‘चोरी’ करून तुम्हाला आपला स्वतःचा ‘पंचविसावा तास’ निर्माण करायचा असतो. This museum is my 25th hour !’  

केवढं खोल सांगितलं डॉक्टर साहेबांनी ! तो पंचविसावा तास कसा निर्माण करायचा आणि तो कुठल्या गोष्टीसाठी निर्माण करायचा हे दोन्ही शोध महत्त्वाचे ! 

मग Time Management विषयाचा अभ्यास करताना अनेक नव्या insights मिळत गेल्या. त्यात एक महत्त्वाची insight मिळाली ती म्हणजे ‘Time Management’ हा मूळ शब्दच चुकीचा आहे. You cannot manage time ! At the most, you can manage yourself ! आणखी एक कळलं की शेवटी हा सगळा Priorties ठरवण्याचा खेळ आहे. त्याबद्दल कधीतरी विस्ताराने बोलू पण तुमच्या आयुष्यातल्या priorities नेमक्या कुठल्या आहेत, त्यातल्या urgent किती, important किती हे एकदा कळलं की गोष्टी सोप्या होतात.   

डॉक्टर साहेबांनी सांगितलेली पंचविसाव्या तासाची कल्पना मनात खोलवर रुतून बसली. 

आता तीच संकल्पना स्वतःच्या आयुष्यात आणायचा प्रयत्न करतोय. रोजच्या दिवसात वेळ कुठे कुठे जातोय त्याचे ‘लिकेजेस’ शोधू लागलो. वेळ कुठून ‘चोरता’ येईल याचं निरीक्षण केलं. काही जागा सापडतायत. 

पुस्तकाचं वाचन होत नाहीये हे लक्षात आलं. आता सकाळी वॉकला जाताना बॅगमधून एक पुस्तक घेऊन जातो. वॉक, इतर व्यायाम झाला की थोडा वेळ पुस्तक वाचत बसतो. वीस-पंचवीस मिनिटं वाचून मग घरी जातो. वॉकचा, प्रवासाचा वेळ चांगले पॉडकास्ट आणि संगीत ऐकण्यात घालवू लागलो. (‘प्रवासाचा वेळ’ हा तर एका स्वतंत्र ब्लॉगचा विषय आहे. त्याविषयी नंतर कधीतरी.) सकाळचा एक तास मनासारखा गेला की पुढचा दिवस अंगावर घ्यायला एक वेगळीच एनर्जी मिळते. खूप वर्षांपूर्वी मी नोकरी करायचो तेव्हा एक प्रयोग करून पाहिला होता. चांगला महिनाभर केला होता. काही कारणांनी पुढे नाही जमलं. मी रोज ऑफिसला जायच्या आधी तीन तास आधी उठायचो. त्या तीन तासांत माझ्या आवडीच्या सगळ्या गोष्टी मी करायचो. मी गमतीने म्हणायचोही की आवडत्या गोष्टी करून झाल्या, म्हणजे माझं ‘जगून झालं’ आता ऑफिसमध्ये काय व्हायचं ते होऊ दे ! 

रिटायर झाल्यावर मी माझ्या आवडत्या गोष्टी करणार आहे, असं तुम्हाला वाटत असेल तर वेळीच सावध व्हा. आत्ताच जागे व्हा. हीच ती वेळ ! हाच तो क्षण ! तुमच्या आवडत्या गोष्टी करण्याचा मुहूर्त एकच. आज ! थोड्या प्रमाणात का होईना, पण रोज करा. मग हळूहळू तुम्हाला त्या पंचविसाव्या तासाचा शोध लागेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो पंचविसावा तास कशासाठी हवाय त्याचाही ! 

(डॉ हिरेन शाह यांच्या म्युझियमवर आम्ही ‘स्वयं’च्या अंतर्गत एक छोटीशी फिल्म केली होती. ती इथे पाहाता येईल.)  

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

पिप्लंत्री ग्रामदूत - पद्मश्री श्यामसुंदर पालीवाल

'बेटी धनाची पेटी' हे आपण ऐकतो, वाचतो. पण हे प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवलं आहे पद्मश्री श्यामसुंदर पालीवाल यांनी! त्यांनी...

काळजी वाहणारे Robot युग!

Robots बद्दल गेले अनेक वर्ष आपल्याला कुतूहल आहे. मानवी गरजा समजून त्यावर supercomputing च्या साहाय्याने emotional support देणारा robot बनवता आला...

चेकलिस्ट: मतदान करण्यापूर्वीची!

निवडणुकांत मतदान करण्यापूर्वी आपण कधी चेकलिस्ट बनवली आहे का? मतदार राजा सजग झाला तर राजकारण अधिक गंभीर होऊ शकते. आता...