योगायोग बघा. मी मागच्याच ब्लॉगमध्ये The wonderful story of Henry Sugar चा दाखला देत ‘storytelling’ विषयी लिहिलं, आणि याच आठवड्यात storytelling चा आणखी एक वेगळा प्रकार आपल्या मराठीत पाहायला मिळाला.
ते ताजं असताना त्या वेगळेपणाची नोंद घेणं अगत्याचं ठरतं. त्यात काय वेगळं आहे, हा सिनेमा का आवडतो किंवा आवडत नाही, तो पाहावा की पाहू नये याविषयी जरा बोलू. तुमच्याही मतांचं स्वागत आहे.
‘आत्मपॅम्फ्लेट’ या सिनेमाच्या नावामध्येच सिनेमाच्या ‘अत्रंगी’पणाचा वास यायला लागतो. त्यात सिनेमाचा लेखक परेश मोकाशी आहे म्हटल्यावर तर खात्रीच पटू लागते. साध्या साध्या गोष्टींमध्ये देखील तिरकसपणा शोधणारा हा माणूस या सिनेमामध्ये वेगळं काय करतोय हे जाणून घेण्याची उत्सुकता होती.
‘आत्मपॅम्फ्लेट’ म्हणजे ज्या माणसाचं ‘आत्मचरित्र’ वगैरे होऊ शकत नाही (म्हणजे होऊ शकतं पण कोणी वाचणार नाही !), पण फार फार तर एका साध्या पॅम्फ्लेटवर ज्याचं चरित्र येऊ शकतं अशा माणसाची गोष्ट. आशिष बेंडे नाव असलेल्या एका शाळकरी मुलाची ही गोष्ट आहे. हे सिनेमाच्या दिग्दर्शकाचंही नाव आहे. त्यामुळे ही दिग्दर्शकाची स्वतःची गोष्ट आहे असं मानायला वाव आहे. दिग्दर्शकाचं वय आणि सिनेमात येणारे तत्कालीन संदर्भ, लेखकाने उघडपणे वा आडून व्यक्त केलेल्या सोशल कमेंट्स, जात-धर्म यासारखे कायमच ज्वलंत असलेल्या विषयांमधून वाद निर्माण न होण्याच्या दृष्टीने हा मार्ग निवडला असावा असे वाटते.
एका दलित शाळकरी मुलाला आपल्या वर्गातली एक ब्राह्मण मुलगी आवडत असते. त्या मुलाच्या (एकतर्फी) प्रेमकथेच्या गुलाबी पार्श्वभूमीवर लेखक-दिग्दर्शकाने जात-धर्म-भाषा वगैरेंची यथासांग धुलाई केलीय. याच विषयावर आजवर ‘एक दुजे के लिये’ टाईप्स अगणित फिल्म्स आल्यात. ये शादी नही हो सकती, दुनिया की कोई भी ताकद....., रडून रडून सुजलेले (प्रेक्षकांचे) डोळे, कहाणीचे ते करुण शेवट या सगळ्या ‘मेंढुरपाक’ (याच चित्रपटातला शब्द) गोष्टींना भंगारात काढत लेखक-दिग्दर्शकाने एक वेगळाच फॉरमॅट काढलाय. शाळेत गेलेल्या प्रत्येकाचं घासून घासून गुळमुळीत झालेलं एक ‘पॅम्फ्लेट चरित्र’ इथे एका चटकदार आणि चमचमीत प्लॅटरच्या स्वरूपात सादर केलंय. पडद्यावर दिसणाऱ्या त्या गुलाबी प्रेमकथेला जाणीवपूर्वक तत्कालीन राजकीय आणि सामाजिक संदर्भ ठेवलेत. ८३ साली भारताने क्रिकेट विश्वचषक जिंकणं, व्ही पी सिंग यांचे पंतप्रधान होणं, अयोध्या-बाबरी मशीद, दंगली, मुंबईतले बॉम्बस्फोट, गणपतीने दूध पिणं या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर प्रेमकथा घडत राहते. देशातील जनमानस कसं आकाराला येत होतं हे अधोरेखित करण्यासाठी या घटना एक पात्र बनून या सिनेमात येतात. हे ‘चरित्र’ आपल्यासमोर उलगडणारे एक प्रथम पुरुषी एकवचनातील निवेदन आपण संपूर्ण सिनेमाभर ऐकत असतो. अधून मधून प्रेक्षकांशी गप्पा मारत सिनेमाची गोष्ट पुढे नेणारा narrator आपण अनेक सिनेमांमध्ये ऐकलेला असतो. पण याच ‘narrator’ माध्यमाचा इतका अफलातून वापर ‘आत्मपॅम्फ्लेट’च्या आधी मी तरी पाहिलेला नाही. ‘आत्मपॅम्फ्लेट’ वजा narrator असं समीकरण मांडलं तर त्याचं उत्तर शून्य येईल इतकं या सिनेमात narrator चं महत्त्व आहे. पूर्वी ‘फिल्म्स डिव्हिजन’च्या फिल्म्समध्ये ऐकू येणारं - भाज्या खा, फळे खा आणि धष्टपुष्ट व्हा - या स्टाईलचं परेश मोकाशींच्याच आवाजात येणारं ते तटस्थ आवाजातलं narration हा या सिनेमाचा प्राण आहे. निव्वळ शाब्दिक विनोदाच्या शक्तीवर तोलून धरलेलं हे narration तुम्हाला अनेक वेळा हसवतं, काही वेळा अंतर्मुख करतं. दुसऱ्या दिवशी सिनेमाबद्दल विचार करताना आपण काल स्वतःवरच हसलो हेही जाणवून देण्याची ताकद त्या लिखाणात आणि सादरीकरणात आहे. जिथे हा सिनेमा काही ‘शिकवू’ पाहतो, सांगू पाहतो तिथे तो मुद्दामहून मेलोड्रॅमॅटिक करत त्या शिकवण्याची / प्रिचिंगची धार कमी करण्याचा प्रयत्न केलाय. फक्त ९० मिनिटांच्या या फिल्ममध्ये थेटरमधले पोपोकॉर्न्स विकले जावेत म्हणून इंटरव्हल दिलाय.
हा सिनेमा परिपूर्ण आहे का ? कुठलाच नसतो. तसा हा देखील नाही. क्लायमॅक्स मला ठिगळ लावल्यासारखा वाटला. उत्तरार्धात काही ठिकाणी आणि अगदी काही क्षण सिनेमा कंटाळवाणा होतो. मुख्य बालकलाकारांच्या अभिनयावर जितकी मेहनत घेतली जाते तितकी मेहनत इतर मुलांवर घेतली जात नाही असं माझं आपल्या सिनेमांविषयी निरीक्षण आहे. (इतर देशांच्या सिनेमात ती घेतलेली दिसते.) (या सिनेमात अपवाद अर्थातच बोऱ्याचं काम केलेला चेतन वाघ).
अर्थात या मला स्वतःला वाटलेल्या उणिवा. म्हणून अख्खा सिनेमा मोडीत काढता येणार नाही. तमाशा, कुस्ती, ‘आमच्यावर एक माणूस रागावलाय वाटतं’ इथपासून विनोदी अंगविक्षेप करणाऱ्या सिनेमापर्यंत मराठी सिनेमाने अनेक टप्पे पाहिले. धापा टाकत टाकत तो ‘श्वास’ पर्यंत पोहोचला पण पुढे पुन्हा एकदा वेगळ्याच confusion मध्ये अडकला. आपला खरा प्रेक्षक कोण? शहरी की ग्रामीण? तरुण की म्हातारा ? कौटुंबिक सिनेमा आवडणारा की ऐतिहासिक सिनेमांचा भक्त? प्रेमकथा की वास्तवदर्शी? याच सगळ्या अगम्य पार्श्वभूमीवर ‘आत्मपॅम्फ्लेट’ सिनेमाने एक वेगळीच - शब्दशः वाकडी - वाट निर्माण केलीय. हा प्रयोग काही लोकांना आवडेल किंवा काही लोकांना थिल्लर वाटेल. जितक्या व्यक्ती तितकी मतं. पण अशा वेगवगेळ्या प्रयोगांच्या मागे आपल्या प्रेक्षकांनी उभं राहिलं पाहिजे. प्रत्येक वेगळा प्रयोग आवडायलाच हवा असा अजिबात आग्रह नाही. पण प्रयोग आवडला नाही तर तिकिटाचे पैसे फुकट गेले, असं निदान आपल्या मुलांसमोर तरी म्हणू नका. या प्रयोगांना बळ मिळत राहण्यासाठी आपण थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहायला हवेत.
आयुष्यातल्या सगळ्याच गोष्टी खूप सिरियसली घ्यायच्या नसतात. काही गोष्टींकडे तिरकस विनोदी चष्म्यातून पाहिलं तर कधीही न पाहिलेली एक रंगीबेरंगी दुनिया आपल्यासमोर उभी राहते. संस्कृती, परंपरा, देव, महापुरुष यांना ‘मानण्यापेक्षा’ ‘जाणण्याचा’ प्रयत्न केला तर आयुष्य अधिक अर्थपूर्ण होईल का? आपल्याबरोबर इतरांचंही ? लास्ट बट नॉट द लिस्ट. आत्ता जे जे घडतंय त्याचा पुढे जाऊन ‘नॉस्टॅलजिया’ होणारे आणि मी त्या आठवणींमध्ये रमणारे हे आधीच कळलं तर मग आत्ता जे जे घडतंय तेच एन्जॉय केलं तर? ‘आत्मपॅम्फ्लेट’ या सिनेमाने माझ्याच मनातल्या काही प्रश्नांची उत्तरं दिली आणि माझ्यासमोर काही नवीन प्रश्न उभे केले. प्रेक्षक म्हणून माझ्यासाठी हे इतकं पुरेसं आहे.