तुम्ही गोष्ट कशीही सांगू शकता. जशी घडली तशी सांगू शकता. जशी घडली नाही तशीही सांगू शकता. घडलेल्या घटना त्या त्या क्रमाने सांगू शकता. भूतकाळ-वर्तमानकाळ यांची सरमिसळ करून सांगू शकता. तुम्ही एखादी गोष्ट गाण्यातून सांगू शकता. तुम्ही एखादी गोष्ट चित्रांतून सांगू शकता. गोष्ट कशी आहे यापेक्षा गोष्ट कशी सांगितली जाते यात गंमत असते.
एक उदाहरण देतो, म्हणजे लगेच कळेल. कुटुंबाच्या हत्येचा सूड घेण्यासाठी एक माणूस दोन चोरांची मदत घेऊन एका डाकूला संपवतो. या एका लाईनवर सलीम-जावेदनी ‘शोले’ हा साडेतीन तासाचा अख्खा सिनेमा लिहिलाय. पण काय लिहिलाय ! आणखी एक उदाहरण देतो. तुम्ही मला ‘दिल चाहता है’ ची गोष्ट सांगून दाखवा. सांगणं कठीण आहे. पण काय सिनेमा आहे ! थोडक्यात, more than the story, how you tell the story is important.
Storytelling चा एक अद्भुत प्रकार नुकताच पाहण्यात आला.
Netflix वर नुकतीच रिलीज झालेली फक्त चाळीस मिनिटांची फिल्म - The Wonderful Story of Henry Sugar !
हेनरी शुगर हा एका गडगंज श्रीमंत माणसाचा मुलगा आहे. इतका पैसा आहे की तो काहीही काम न करता फक्त चैन करतो.
इमदाद खान नावाच्या एका माणसाबद्दल लिहिलेलं एक पुस्तक त्याच्या हाती लागतं. डोळे बंद करूनही ‘गोष्टी दिसण्याची’ कला इमदाद खानकडे होती. हेनरीला हे खूप थ्रिलिंग वाटतं. काही वर्षांमध्ये त्याला ती कला अवगत होते. या कलेचा वापर करून तो कॅसिनोमध्ये जाऊन जुगारातला प्रत्येक डाव जिंकू लागतो. लोकांना संशय येऊ नये म्हणून तो अधूनमधून हरत असतो, वेष पालटून जात असतो. इतका पैसा मिळून एक दिवस त्याला या सगळ्यातला फोलपणा लक्षात येतो. सगळ्याच गोष्टी आधी कळल्या तर आता आयुष्यात थ्रिल ते काय राहिलं? त्याच्याकडे इतके पैसे जमा होतात की तो एक दिवस त्याच्या गॅलरीमधून नोटा खाली फेकून देतो. पुढे आपल्याला कळतं की हेनरीने या जगाचा निरोप घेण्यापूर्वी त्याने जगभर अनेक हॉस्पिटल्स आणि आश्रम बांधले. गोष्ट संपते.
तुम्ही म्हणाल, अख्खी गोष्ट कळली. आता फिल्म का पाहायची?
That is precisely the point. वर मी सांगितलेली गोष्ट लेखक-दिग्दर्शक वेस अँडरसनने कसली भन्नाट सांगितलीय, हे पाहाण्यासाठी ही फिल्म पाहणं must आहे.
आपण फिल्म बघतोय, नाटक बघतोय की पुस्तक वाचतोय की हे तिन्ही करतोय, हे कळण्याच्याही आपण पलीकडे जातो.
चाळीस मिनिटांची फिल्म वीस मिनिटांत संपली असं वाटावं, असा या फिल्मचा स्पीड आहे.
जेव्हा ही फिल्म पाहायची ठरवाल तेव्हा फक्त ही फिल्म पाहा. ज्या पोझिशनमध्ये असाल त्याच पोझिशनमध्ये बघून संपवा.
क्यों की, नज़र हटी तो दुर्घटना घटी !
हीच गोष्ट किती वेगवेगळ्या पद्धतीने सांगता येऊ शकते याचा मी मनातल्या मनात exercise करून पाहिला.
तेव्हा लक्षात आलं, प्रत्येक गोष्टीकडे नेहमीपेक्षा वाकड्या पद्धतीने पाहायचा एक ‘स्नायू’ आपल्या आत निर्माण करावा लागतो. रियाझाने तो बळकट करता येऊ शकतो. जगातल्या सगळ्या महान कलाकृती लोकांसमोर येण्याआधी त्या कलाकृती घडवणारी माणसं हा रियाझ कित्येक वर्षे करत होते. हा रियाझ आहे वेगळ्या विचारांनी जगण्याचा, established गोष्टींवर सतत प्रश्न निर्माण करण्याचा. यात निंदा, अपयश, चेष्टा, निराशा या सगळ्याचा सामना करण्याची हिंमत असावी लागते. तेव्हा कुठे इमदाद खान किंवा हेनरी शुगरसारखं डोळ्यांशिवाय दिसायला लागतं. कोणी पाहिलं नाही ते जग दिसायला लागतं.
आपलं रोजचं आयुष्य वेगळं काय आहे ! एक गोष्टच तर आहे.
रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत या गोष्टीत तुमच्याबरोबर अनेक पात्रं येतात-जातात. अनेक घटना घडतात.
दर क्षणाला गोष्ट तयार होत असते. प्रत्येक वेळी ही गोष्ट तुमच्या मनासारखी होईलच असं नाही.
पण गोष्ट महत्त्वाची नाही. गोष्ट कशी सांगतोय ते महत्त्वाचं.
तुमच्या गोष्टीचे लेखक तुम्हीच आहात. त्यामुळे रात्री झोपताना तुमची रोजची गोष्ट रटाळ आहे की ‘The Wonderful Story of Me’ आहे, हे सर्वस्वी तुमच्याच हातात आहे !
The Wonderful Story of Henry Sugar’ (Netflix) (Duration: 41 Mins)