मागच्या आठवड्यात संपूर्ण भारतासाठी चर्चेचे फक्त दोनच विषय होते. एक म्हणजे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचलेले चंद्रयान -3 आणि दुसरा प्रज्ञानानंद रमेशबाबू ! प्रत्येक माध्यमातून हे आपल्यापर्यंत पोहचू लागले. Isro चे Chief एस. सोमनाथ आणि बुद्धिबळ खेळाडू प्रज्ञानानंद अचानक आपल्यासाठी हीरो झाले. तेव्हा डोक्यात विचार आला, आपल्या हातात आलेल्या ह्या मोबाईलमुळे कसली जादू घडते नाही का? आता तुम्हीच विचार करा ना, ह्याच दोन्ही घटना चाळीस वर्षापूर्वी घडल्या असत्या तर हे यश एवढं भव्यदिव्य वाटलं असतं का? दूरदर्शन किंवा आकाशवाणीचा तो काळ आठवा.. ठरलेले Anchors, ठरलेल्या गायकांचीच गाणी, सर्वांची आवड जपत ठरवलेला एक सर्वांगीण असा बऱ्यापैकी निश्चित प्रोग्राम .. त्यात फार कोणी बदल करायला जात नसे. आता या उलट आपल्यासमोर एवढं खाद्य वाढून ठेवले आहे की एखाद्या ६ महिन्याच्या बाळापासून १०० वर्षाच्या आजीपर्यंत सगळ्यांसाठी एवढे पर्याय आहेत की विचारता सोय नाही. त्यातून नवनवीन कलाकार आपल्या भेटीस येत असतात यातल्याच मला भावलेल्या एका कलाकाराची गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्या कलाकाराचं नाव आहे - लाखो तरुण तरुणींच्या गळ्यातला ताईत झालेला ‘राहगीर’!
राजस्थानच्या खंडेला गावातल्या सुनील कुमार गुर्जर याने B.Techची पदवी computers हा विषय घेऊन पूर्ण केली. पुण्यातल्या Accentureया प्रसिद्ध IT कंपनीत नोकरी पण मिळवली. पण काही केल्या मन रमेना. मग याने २०१६ मध्ये वयाच्या २३ वर्षी नोकरीच सोडून दिली. पण आता पुढे काय? म्हणून सुरुवातीला खिशात २००० रुपये घेऊन ७ राज्याचा दौरा करायचा याने ठरवलं. पाठीवरच्या बॅगेत स्वतःचा एक तंबू, Sleeping Bag होतीच. त्याच्यामुळे लिफ्ट घेत पुढच्या ठिकाणी पोहचायचे, मिळेल तिथे रहायचे, मिळेल ते खायचे, वेगवेगळ्या लोकांना भेटायचं त्याच्याशीं गप्पा मारायच्या आणि मग पुढच्या गावाला. या प्रवासात त्याच्या सोबत अजून एक जण होती ती म्हणजे ‘फिरदोसी’ ही त्याची गिटार! त्याची Travel Partner! हातात एक गिटार आहे म्हटल्यावर कुठेही जेवायला मिळते, किमान एक चहा तर मिळतो म्हणून गिटार कितीतरी वेळेला त्याचे Meal Ticket झाले असे तो सांगतो. या प्रवासातच तो सुनील कुमार गुर्जर याचा ‘राहगीर’ (भटका कलाकार) झाला. राहगीर हे नाव निवडण्यामागे तो सांगतो "या नावाला कुठलं आडनाव नाही म्हणजे कुठलं लेबल नाही, कुठलीच जात नाही. या नावातून माझ्याबद्दल जेवढी माहिती मिळायला हवी तेवढीच मिळते की मी लिहिणारा, गाणारा आणि प्रवास करणारा एक भटका कलाकार आहे. मला आयुष्यात काय करायचे आहे? मी कोण आहे? हे माझं नाव सांगतं आणि तेवढंच पुरेसं आहे.”
त्याचे हे वर लिहिलेले विधान त्याच्या कविता संग्रहाची ओळख करून देताना पहिल्याच पानावर चपखल बसते:
इसी दुनिया के किसी दूरस्थ कोने में लोग हैं जिन्हें फ़र्क नहीं पड़ता मेरे होने न होने में
वहाँ जाना है मुझे अपने वजूद की ख़बर देनी है। हर बंदे से मिलना है दस्तक दर-दर देनी है
बहुत लंबा सफ़र तय करना है।
राहगीर इस रूह को थकाने के लिए
कुछ कहानियाँ मेरे अपने लिए हैं
कुछ कहानियाँ ज़माने के लिए
.......
-जानने और चाहने वालों के लिए 'राहगीर भाई', अनजानों के लिए भीड़ में गुज़रता एक और 'राहगीर'।
मी राहगीर याच जे पहिलं गाणं ऐकलं ते होतं ‘गुजरती हवा हस के साय साय करे ... .. बाय बाय करे-राहगीर’. त्याची सुरुवातीची चाल आणि शब्द एवढे मजेशीर वाटले की मी ते गाणं मस्त मजा घेऊन ऐकत असतानाच अचानक त्या lyrics ने U -Turn घेतल्यासारखं ते गाणं गंभीर होत गेलं.
मी जेव्हा राहगीरची अजून काही गाणी ऐकली तेव्हा लक्षात आलं की हा गडी तर चक्क आपल्याला फसवतो. त्याचा हसरा भोळा चेहरा, फक्त आणि फक्त गिटारवर सेट केलेली साधी सोपी, मजेशीर चाल आपल्याला ते गाणं ऐकायला भाग पाडते आणि मग अलगद एखाद्या गंभीर विषयाकडे घेऊन जाते. तो हे ज्या शिताफीने करतो ते एखाद्या आईसारखं असतं. कसं ते सांगते: त्याने टिपलेली सगळी दृश्य तो आपल्यासमोर गोष्टी रूपात उभी करतो. त्याला न आवडलेल्या गोष्टीच्या विरोधात आवाज उठवतो, रागावतो. पण त्याच्या रागावण्यात पण मातृत्व दिसतं. म्हणूनच तर राहगीरच्या अश्या गाण्यांचाही राग नाही येत, त्याची काळजी दिसते. आता हे पुढचं गीतच पाहा ना ...
आदमी चू** है
फूलों की लाशों में ताज़गी चाहता है आदमी चू** है कुछभी चाहता है
जिंदा है तो आसमान में उड़ने की ज़िद है।
मर जाए तो सड़ने को ज़मीं चाहता है आदमी चू** है कुछ भी चाहता है
.......
काट के सारे झाड़-वाड़ मकाँ बना लिया खेत में
सीमेंट बिछाकर ज़मीं सजा दी मार के कीड़े रेत में
लगा के परदे चारों ओर, क़ैद है चार दीवारी में
मिट्टी को छूने नहीं देता, मस्त है किसी ख़ुमारी में
और वो ही आदमी अपने घर के आगे नदी चाहता है।
आदमी चू** है कुछ भी चाहता है
या गाण्यातल्या त्या शब्दाबद्दल एकदा एका मुलाखतकाराने त्याला विचारले “हा शब्द गरजेचा होता का?.”त्यावर तो सांगतो “योग्य वेळेवर चू** ला चू** बोलणे पण गरजेचे असते कारण त्याच वेळेला त्या भावना, त्याच तीव्रतेने त्याच्या पर्यंत पोहचवल्या नाहीत कदाचित तर खूप उशीर होऊन जातो.”
त्याचं अजून एक असंच गाणं ज्याला खूप प्रसिद्धी मिळाली ते जाहिलो को कोई शहर नही ... क्या जयपुर क्या दिल्ली Jahilon Ka Koi Shahar Nahin Kya Jaipur Kya Dilli | Rahgir | Jashn-e-Rekhta 2022 ह्या सगळ्यातून तो जी Social Commentary देतो त्यातून जे चित्र उभं करतो ते आपण कुठेतरी पाहिलेलं आणि आपल्या सोयीने त्या चित्राकडे दुर्लक्ष केलेलं असतं पण हा त्याच्या कवितेतून ते चित्र पुन्हा आपल्यासमोर जिवंत करतो आणि आपण दुर्लक्ष केलेल्या गोष्टीकडे आपल्याला घेऊन जातो. खरं तर भीती दाखवतो आपल्याला आणि विचारतो असा हवा आहे का आपल्याला आपला समाज? असं हव आहे का आपलं कुटुंब? असे हवे आहात का तुम्ही स्वतःला?
तुम्हाला वाटू शकतं की हा तर फक्त अशी विद्रोही गाणी लिहितो पण तसं नाही ! त्याच्याकडे वेगवेगळ्या गाण्यांचा अक्षरशः खजिना आहे.
‘I Love To travel’ या गाण्यातल्या ‘इतना कुछ तो खुश हो ने को’ या ओळी
I Love to Travel (Khush Hone Ko) by Rahgir | Song of Gratitude | Shubhodeep Roy | Lateeb Khan “अजूनही सगळंच किती छान चालले आहे” .. हे सांगायची त्याची पद्धत… काय सांगू ..! ‘कान्या मान्या क़ुर्र’ ह्या गोविंद सिंह राठौड़ यांच्या जुन्या गाण्याच Remix लहान मुलांमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. ‘राहगीर मिला कबीर से’ या गाण्यात तर संत कबीर आणि राहगीर एका प्रवासात भेटल्या नंतर त्या दोघातल्या गप्पा/वाद हे चित्रच किती भारी आहे. आपण नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा पोवड्यातून ऐकतो पण महाराणा प्रताप सिंग यांची शौर्यगाथा राहगीर style मध्ये नक्की ऐकावी. ‘ये हम कौनसी गाडी पे चढ गये’ या गाण्यात भारत-पाक सीमेचे वाद, एका लेखकाचा विचार, अधीर झालेल्या पुढच्या पिढीचे विचार जर चुकीच्या दिशेला गेले तर काय काय होऊ शकेल हे राहगीर ज्या पद्धतीने सांगतो त्याला तोडच नाही! Kaun Si Gadi Pe Chadhh Gaye | Rahgir | Jashn-e-Rekhta 2022. ‘एक आलसी दोपहार मे’ - या गाण्यातल्या एका कडव्यात युद्धानंतर घरी परतलेल्या सैनिकाला झालेला साक्षात्कार मांडला आहे, तर दुसऱ्या कडव्यात गावाच्या विहीर वरचं भांडण तो सांगतो Aalsi Dopher | Soulful Singing | Rahgir | Jashn-e-Rekhta 2022. तुम्ही म्हणाल प्रेम गीत- विरह गीत लिहीत नाही असे कसे ? तर तसे नाही Mere Gaon Aaoge… | Rahgir | Jashn-e-Rekhta 2022 ‘मेरे गाँव आओगे’ -ती जेव्हा मला शोधत माझ्या गावी येईल तेव्हा पाहिल्यासारख काहीच राहणार नाही असे राहगीर तिला सांगतो.
एक कच्चा घड़ा हूँ मैं फिर भी बरसात में खड़ा हूँ मैं
बूँदें बेरहम हैं उनको ये वहम है।
कि मैं टूट रहा हूँ जो मैं चीख़ रहा हूँ पर वो बेवकूफ़ हैं मैं तो सीख रहा हूँ ऐसे,
पहले भी लड़ा हूँ मैं
एक कच्चा घड़ा हूँ मैं
.. ..
ये जो हँस रही है दुनिया, मेरी नाकामियों पर,
ताने कस रही है दुनिया, मेरी नादानियों पर,
पर मैं काम कर रहा हूँ, मेरी सारी खामियों पर,
कल ये मारेंगे ताली, मेरी कहानियों पर,
कल जो बदलेगी हवा, ये सारे शरमाएँगे,
हमारे अपने हो कहकर, ये बाँहें गरमाएँगे,
क्योंकि, ज़िद्दी बड़ा हूँ मैं एक कच्चा घड़ा हूँ मैं
Kachcha Ghada Hun Main... | Rahgir Live at Jashn-e-Rekhta 2022
त्याचं हे गाणं ऐकताना तर आपले सगळे संघर्ष आपल्या समोर उभे राहतात, त्या प्रत्येक कामगिरीनंतर आपणच आपली पाठ थोपटतो आणि पुढच्या अश्या कितीतरी लढायांसाठी स्वतःला हसत हसत तयार करतो.
राहगीरने पण प्रसिद्धीचं हे टोक पाहण्याआधी एक संघर्ष केला आहे. आता हेच पाहा. एकतर एकदम जुनीच गाणी नाहीतर धांगडधिंगा असलेली गाणी या दोन्ही टोकाच्या प्रकारांचा ट्रेंड मोडीत काढत नुसत्या गिटारच्या साथीने बसवलेली साधी सोपी सहज पण तेवढीच मनाला भिडणारी गाणी गात राहगीरने तरुणाईच्या जोडीने जुन्या पिढीच्या मनात पण आपलं असं एक वेगळं स्थान मिळवलं आहे. गाण्यात चालीपेक्षा सुद्धा शब्दांना अधिक महत्व देऊन प्रसिद्ध होता येतं हे दाखवत, नवीन कलाकारांसाठी त्याने एक नवीन Trend सुरू करून दिला आहे.
राहगीर म्हणजे One Man Army. कारण तोच गाणं लिहितो. मग त्यावर एकदम साधी सोपी चाल सेट करतो. मग तोच चित्रीकरण करतो आणि पुन्हा तोच स्वतः Edit करून सोशल मिडियावर आपल्यापर्यंत पोहचवतो. आताचे हे सगळेच कलाकार हातातल्या मोबाईलवर Record बटण प्रेस करून हे थेट श्रोत्यांपर्यंत पोहचू शकतात. राहगीर गमतीत सांगतो, “सध्या मला कुठल्या स्टेज, Concert ची पण गरज नाही .. जिकडे श्रोते मिळाले तिकडे मी गाऊ शकतो, माझी कला सादर करू शकतो.”
Isro चे Chief एस. सोमनाथ आणि बुद्धिबळ खेळाडू प्रज्ञानानंद यांना जसं सोशल मीडियाने हीरो बनवलं तसं राहगीरसारख्या कितीतरी कलाकारांना सोशल मीडिया आपल्या समोर घेऊन आलं.. हे सगळेच छोटे-मोठे कलाकार प्रसिद्ध होण्यासाठी कोण्या मोठ्या producer किंवा Channel वर अवलंबून नाहीत. आता ते प्रत्यक्षपणे तुमच्या-माझ्यासारख्या श्रोत्यांवर अवलंबून आहेत. म्हणूनच फक्त जुनी गाणी, जुने चित्रपट, जुन्या मालिका यात रमण्यापेक्षा या सोशल मीडिया च्या जमान्यात तुमच्यासमोर एवढं काही वाढलेलं असताना एकदा त्याची पण चव चाखून बघा, अनुभव घेऊन तर बघा आणि मग ठरवा काय खायचं.. म्हणजे काय ऐकायचं, काय पाहायचं ते!
आणि हो ....तुमच्या माहितीत पण असे अजून कोणी कलाकार असतील तर त्यांची माहीती आमच्यापर्यंत / सगळ्यापर्यंत पोहचवण्यासाठी comments मध्ये लिहा.