Get Better Each Week #12 - Welcome to Swayam Talks
×

Get Better Each Week #12

नविन काळे

हा ब्लॉग म्हणजे तुमच्या मेंदूचा दर आठवड्याचा व्यायाम आहे! या ब्लॉगमुळे तुम्ही दर आठवड्याला काही नवीन तर शिकालच, पण जगापेक्षा एक पाऊल पुढे राहाल याची आम्ही खात्री देतो.
 

Published : 1 September, 2023

Get Better Each Week #12

खेळता खेळता भाषा शिकवणारे Duolingo ! 

या पृथ्वीवर माणसाचा जन्म झाल्यापासून माणसाच्या कल्पनेतून असंख्य गोष्टींची निर्मिती झाली. अग्नी पासून ते अगदी ‘AI’ पर्यंत माणसाने किती नवनवीन गोष्टींना जन्म दिला. त्या असंख्य शोधांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात प्रभावी शोध म्हणजे - भाषा ! माणसाच्या गळ्यातून निघणाऱ्या विविध आवाजांना, ध्वनींना माणसाने भाषेमध्ये बांधून छान अर्थ दिला. आपल्या मनातल्या भावना अधिक प्रभावी पद्धतीने मांडण्यासाठी एक पद्धत निर्माण केली. आज इंटरनेटमुळे जगाच्या वेगवेगळ्या भागांत काय घडतंय हे अगदी सहज कळतंय. वेगवेगळ्या भाषांमधील साहित्य, सिनेमा, खाद्यसंस्कृती, संगीत आपल्या समोर येतंय. यामुळेच की काय, आपल्याला इतर जागतिक भाषांबद्दल कमालीची उत्सुकता वाटत आहे. आपली मायबोली आणि हिंदी सिनेमा बघून बघून येत गेलेली हिंदी, या व्यतिरिक्त आणखी काही भाषा शिकल्या पाहिजेत असं अनेकांना वाटतं पण ते शिकण्याचा मार्ग सापडत नसतो. 

म्हटलं तर परदेशी भाषा शिकवणारे क्लासेस, शिक्षक आपल्या आजूबाजूला असतात. पण ज्यांच्या आजूबाजूला असे क्लासेस किंवा शिक्षक नसतील किंवा ज्यांना आपली नोकरी-व्यवसाय-कामं सांभाळून एखादी परदेशी भाषा नव्याने शिकायची असेल त्यांच्यासाठी DuoLingo हा एक उत्तम पर्याय आहे. DuoLingo या मोबाईल App वरून तुम्ही घरबसल्या किंवा जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून तुम्हाला हवी ती भाषा तुमच्या सोयीने शिकता येते. आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे भाषा शिकण्याचं Basic App पूर्णपणे मोफत आहे. तेव्हा तुमच्या खऱ्या किंवा डिजिटल पाकिटातला एकही पैसा खर्च न करता, पण वेळ खर्च करून तुम्ही एक नवीन भाषा शिकू शकता. 

तुमच्या फोनवर Playstore (Android) किंवा App Store (iOS) वर जाऊन DuoLingo हे App डाऊनलोड करा. काही मोजकी माहिती भरून तुम्हाला हवी ती भाषा शिकायला घ्या. नवीन भाषा शिकण्याचा उत्साह ताजा असताना तुम्ही DuoLingo वरच भाषा का शिकावी याची काही महत्त्वाची कारणे: 

१. DuoLingo वर तुम्हाला पूर्णपणे मोफत शिकण्याची मुभा आहे. 

अनेकदा नवीन काही शिकण्याचा उत्साह असतो. आपण लगेच भरपूर फी वगैरे भरून ऍडमिशन घेतो. पण काही दिवसांनी उत्साह मावळतो. वेळ आणि पैसे दोन्ही फुकट जातात. अशावेळी तुम्ही एखादी भाषा नव्याने शिकायला घेत असाल तर ती DuoLingo वर आधी शिकायला घ्या. त्यात तुमचा इंटरेस्ट वाढत गेला आणि तुम्हाला ती भाषा अधिक सखोल शिकण्याची इच्छा झाली तर जरूर क्लासमध्ये किंवा एखाद्या कुशल शिक्षकाकडे शिका. 

२. शिकायचं नाहीये - खेळायचंय ! 

DuoLingo App तयार करणारी माणसे खूप हुशार आहेत. लोकांना शिकायचा कंटाळा येतो, पण खेळायला आवडतं हे त्यांना माहीत आहे. म्हणूनच त्यांनी भाषा शिकण्याचा हा संपूर्ण कोर्स एखाद्या खेळासारखा तयार केलाय. तुम्ही जे काही शिकताय त्याला ‘पॉईंट्स’ आहेत ! तुम्ही चांगली कामगिरी केलीत तर अधिक पॉईंट्सच्या रूपात ‘बक्षिसे’ आहेत ! तुम्ही शिकताय तीच भाषा शिकणाऱ्या इतर लोकांची कामगिरी कशी आहे आणि त्या लोकांमध्ये तुमचा नंबर कितवा आहे हे तुम्ही तपासू शकता. यामुळे नकळतपणे एक स्पर्धा निर्माण होते आणि आपण त्या ‘स्पिरिट’ने शिकत, सॉरी खेळत राहतो ! 

३. सोप्या सोप्या शब्दांनी सुरुवात 

व्याकरणाच्या जड जटिल नियमांमध्ये तुम्हाला अडकवून न टाकता इथे सोप्या सोप्या शब्दांनी सुरुवात केली जाते. पुरुष, स्त्री, मुलगा, मुलगी, फळ, दूध, कुत्रा, मांजर, ब्रेड वगैरे गोष्टींना त्या भाषेत काय म्हणतात ते चित्रांमधून शिकवले जाते. याशिवाय त्यांचा उच्चार ऐकण्याची देखील तिथे सोय असते. त्यानंतर तुम्हाला तेच शब्द वेगवेगळ्या पद्धतींनी पुन्हा पुन्हा विचारून तुमच्याकडून पक्के केले जातात. ‘खेळताना’ ते लक्षातही येत नाही. एकदा ते शब्द पक्के झाले याची DuoLingoला खात्री पटली की मग पुढच्या लेव्हलमध्ये त्या शब्दांचा वाक्यात उपयोग कसा केला जातो, हे आपण शिकतो. या टप्प्यावर माझा स्वतःचा अनुभव सांगतो. पहिल्या दोन दिवसांमध्ये आपण खूप सोपे सोपे शब्द शिकतो. ते पुन्हा पुन्हा शिकताना आपल्याला सहज येत जातात आणि आपण सगळ्या लेव्हल्स जिंकत जातो. आपल्याला भरपूर पॉईंट्स मिळतात. त्या दिवशी आपल्याला जणू ही भाषा यायलाच लागली असा एक ‘भ्रम’ निर्माण होऊन आपण ‘सातवे आसमान’पर जातो. तिसऱ्या आणि पुढचे अनेक दिवस आपण DuoLingo वर येत राहण्याचा, ती भाषा नेटाने शिकत राहण्याचा तो एक पाया असतो !                 

४. ‘स्ट्रीक’ नावाचा छडी घेतलेला मास्तर ! 

मी आधी म्हटल्याप्रमाणे आपण ती नवीन भाषा शिकण्यासाठी रोज नेटाने वीस मिनिटे भक्तिभावाने बसतो. पण मग हळूहळू ती आग थंड होते किंवा इतर काही कारणांमुळे म्हणा, शिकण्याची नियमितता कमी होते. यासाठी DuoLingo ने एक छान आयडिया केलीय. तुमच्या नियमित येण्याची जी नोंद होते त्याला ते ‘स्ट्रीक’ म्हणतात. समजा तुम्ही दररोज संध्याकाळी DuoLingo वर एक भाषा शिकताय. सात-आठ दिवस नियमित येताय. तुमची नेहमीची वेळ उलटून गेली की तुम्हाला DuoLingo कडून एक मेसेज येतो. तुम्ही आज तुमचं सेशन पूर्ण केलं नाहीत तर तुमची इतक्या दिवसांची ‘स्ट्रीक’ मोडेल अशी एक प्रेमळ धमकी त्यात असते. कुठे ती ‘स्ट्रीक’ मोडा, म्हणून तुम्ही ते सेशन पूर्ण करता ! हा सिलसिला मग रोज सुरु राहतो. 

चायनीज, जॅपनीज, स्पॅनिश, जर्मन, अरेबिक, फ्रेंच या भाषांसहित चाळीसहुन अधिक भाषा तुम्ही DuoLingo वर शिकू शकता. DuoLingo वर भाषा शिकून तुम्हाला एखाद्या भाषेवर प्रभुत्व मिळेल का ? तर याचं उत्तर अर्थातच ‘नाही’ असं आहे. भाषा एक गुंतागुंतीचं प्रकरण आहे. काही प्राथमिक गोष्टी शिकून (आणि त्याबद्दल पॉईंट्स मिळवून) भाषा आली असं म्हणणं मूर्खपणाचं ठरेल. भाषा शिकण्याच्या, आत्मसात करण्याच्या अनेक पायऱ्या आहेत. त्या भाषेतील काहीतरी वाचत राहणं, त्या भाषेतील काही ऐकणं-पाहणं, ती भाषा येणाऱ्या लोकांबरोबर गप्पा मारणं, या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन लोकांमध्ये रुजलेले, त्या संस्कृतीत रुजलेले शब्द शोधून त्यांचा मागोवा घेणं अशा अनेक पायऱ्या चढल्यावर आपल्याला ती भाषा थोडीथोडी आत्मसात झाली आहे, असं म्हणायला वाव असतो. DuoLingo वर या सगळ्या गोष्टी होणं कठीण आहे, पण निदान भाषा शिकण्याची पहिली पायरी DuoLingo पूर्ण करतो असं निश्चितच म्हणता येईल. 

एक नवीन भाषा शिकणं म्हणजे एका नवीन संस्कृतीची ओळख होणं. दोन भाषांमधील टोकाचे फरक आणि त्याच दोन भाषांमधील एकाच शब्दासाठी असलेली साम्यस्थळं अनुभवताना विस्मयचकित होणं म्हणजे भाषा शिकणं. नवीन भाषा शिकता शिकता एक नवीन गोष्ट कळल्यावर ‘गुगल’वर जाऊन शोध घेण्याची उत्सुकता चाळवणं म्हणजे भाषा शिकणं. या सगळ्यात आपण वेगळ्या अर्थाने समृद्ध होत असतो. माणूस म्हणून श्रीमंत होण्याच्या या प्रवासात DuoLingo थोडा वेळ का होईना, पण आपल्याला साथ करतं. यासाठीच DuoLingo आणि ते तयार करणाऱ्या सर्व टीमचे आपण ऋणी राहायला हवं. 

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

देणगी काहीतरी सुचत राहण्याची!

सर्जनशील असणं याची मुभा सगळ्यांना आहे. आपण एखाद्या गोष्टीचा विचार कसा करतो? आणि त्याचा अवलंब कसा करतो? यावर सारं अवलंबून...

आसामच्या 'लक्ष्मी माँ': पद्मश्री लखिमी बरूआ

आसाम सारख्या दुर्गम भागातील राज्यात महिला सक्षमीकरण आणि सहकार क्षेत्रांत आसामी महिलांचे आर्थिक सशक्तीकरण करण्यात...

कल्पनाशक्तीची नवी 'LINE'

कल्पनाशक्ती जादुई असते. ती नवे क्षितिज दाखवते आणि त्या पलीकडे काय असेल ह्या विचारात पाडते. अशाच एका अद्भुत विचाराला...