Get Better Each Week #11 - Welcome to Swayam Talks
×

Get Better Each Week #11

नविन काळे

हा ब्लॉग म्हणजे तुमच्या मेंदूचा दर आठवड्याचा व्यायाम आहे! या ब्लॉगमुळे तुम्ही दर आठवड्याला काही नवीन तर शिकालच, पण जगापेक्षा एक पाऊल पुढे राहाल याची आम्ही खात्री देतो.
 

Published : 25 August, 2023

Get Better Each Week #11

गुगल लेन्स - जगाची माहिती एका नव्या लेन्समधून !

मी आज ज्याबद्दल सांगणार आहे ती गोष्ट तशी सहा वर्षं जुनी आहे. पण माझी खात्री आहे की किमान सत्तर टक्के वाचकांना याची माहिती नसण्याची शक्यता आहे. मंडळी, मी आज तुम्हाला 'गुगल लेन्स' बद्दल सांगणार आहे. गुगल लेन्स म्हणजे काय, ते का वापरतात, कसं वापरतात हे तुम्हाला माहीत असेल तर पुढचा ब्लॉग वाचायची गरज नाही. पण ज्यांना काहीच माहीत नाही, त्यांच्यासाठी मात्र एक अलिबाबाची गुहा उघडणार आहे हे नक्की.

'गुगल' आता आपल्या जगण्याचा भाग झालंय.
(बाय द वे, मी हा ब्लॉग आत्ता ट्रेनमध्ये बसून 'गुगल कीप'वर लिहितोय ! गुगल कीप विषयी नंतर कधीतरी विस्ताराने बोलूया) 'गुगल' आताच्या जगातला कल्पवृक्ष झालाय. नवनवीन तंत्रज्ञानाचा आधार घेऊन माणसाचं जगणं अधिक सुसह्य कसं होईल यावर 'गुगल'मध्ये सतत संशोधन सुरू असतं. मुख्य म्हणजे, पाठीमागची टेक्नॉलॉजी कितीही किचकट असली तरी सामान्यातील सामान्य माणसासाठी ते वापरायला नेहमीच सोपं ठेवतात. 'गुगल लेन्स' हा त्याच विचारांचा आविष्कार आहे.

आपल्या सर्वांच्या स्मार्टफोनमध्ये गुगल लेन्स असतं. खालच्या चित्रात त्या माईकच्या बाजूला जो चौकोन दिसतोय ते आहे गुगल लेन्स ! आता तुमच्या फोनवर ही खूण कुठे आहे ते एकदा तपासून बघा, म्हणजे तुम्हाला अलिबाबाच्या गुहेचा पत्ता सापडलाच म्हणून समजा !

'गुगल लेन्स' Optical Recognition Character (OCR) या टेक्नॉलॉजीच्या मदतीने काम करतं. हे इतकं जड नाव वाचून अजिबात घाबरून जाऊ नका. एक सोप्पं उदाहरण देतो. आपल्या आजूबाजूच्या नेहमीच्या लोकांना आपण नावासाहित ओळखतो कारण आपल्या मेंदूने ती माहिती तशी साठवलेली असते. ती व्यक्ती समोर आल्यानंतर त्या व्यक्तीची इमेज मेंदूत जाऊन मेंदू आपल्या अगणित फाईल्समधून बरोब्बर तेच नाव आपल्या मनात 'उमटवतो' तीसुद्धा एका अर्थी Optical Recognition Technology झाली की ! गुगल लेन्स नेमकं हेच करतं ! एखादी इमेज पाहून त्या इमेजबद्दल गुगलच्या डेटाबेसमध्ये जितकी माहिती आहे ती तुम्हाला उपयुक्त पद्धतीने आणून देतं.

'गुगल लेन्स'वर क्लिक केल्यावर तुम्हाला काही options दिसतील. त्यातील Translate, Text, Search याबद्दल आपण आज पाहूया.

1. Translate

आपल्यासमोर विविध विषयांचा आणि कधीकधी वेगवेगळ्या भाषांचाही content येत असतो. मग ते पुस्तक असेल, पेपर असेल, स्क्रीनवरचं काही असेल किंवा एखाद्या प्रॉडक्टचा बॉक्स असेल ! त्यावेळी 'गुगल लेन्स'चे हे Application आपल्या चांगलेच उपयोगी येते. समजा, तुम्हाला कोणी जपानवरून एखादं चॉकलेट आणून दिलं. त्यावर सगळं काही जपानी भाषेत असल्यामुळे तुम्हाला काय लिहिलंय हे वाचता येत नाहीये. अशावेळी 'गुगल लेन्स' उघडायचं. Translate मध्ये जाऊन जपानी अक्षरं असलेल्या बॉक्सवर कॅमेरा ठेवायचा आणि तुम्हाला ते कुठल्या भाषेत भाषांतरित करून हवंय ती भाषा निवडायची ! कहाणी सेकंदात तुम्हाला स्क्रीनवर तुम्हाला हव्या असलेल्या भाषेतील अक्षरं दिसायला लागतील ! विचार करा, तुम्ही समजा चेन्नईमध्ये फिरताय आणि दुकानांच्या पाट्या तुम्हाला वाचता येत नाहीयेत. नो प्रॉब्लेम ! तुम्ही गुगल लेन्स उघडून त्या पाट्या तुम्हाला हव्या त्या भाषेत वाचून पाहू शकता ! हा प्रयोग तुम्ही आत्ताही करून पाहा. या ब्लॉगच्या अक्षरांवर गुगल लेन्सच्या Translate मधून ही अक्षरं तुम्हाला हव्या त्या भाषेत भाषांतरित करून बघू शकता. इथे एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे. प्रत्येक वेळी 'गुगल लेन्स'मध्ये साहित्यिक मूल्याचे भाषांतर नाही मिळणार. पण दूध समजून फिनाईल पिणार असाल तर त्यापासून नक्कीच रक्षण होऊ शकेल !

2. Text

'गुगल लेन्स'मधलं हे एक भन्नाट Application आहे. हे वापरून तुमचा खूप वेळ वाचेल.
अनेकदा आपल्याला एखाद्या पुस्तकातला एक उतारा आवडतो. आपल्याला तो कुणाबरोबर तरी शेअर करावासा वाटतो. अशावेळी आपण त्या पानाचा फोटो काढून पाठवतो किंवा ते सगळं आपल्या हाताने टाईप करून पाठवतो. टाईप करण्यासाठी जो वेळ जातो तो तुम्ही गुगल लेन्स च्या Text application ने वाचवू शकता.

इथेही आणखी एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे. अनेकदा आपल्या फोनच्या कॅमेरामध्ये काही शब्द अस्पष्ट येतात, ज्यामुळे त्याचं योग्य ते अक्षर किंवा शब्द उमटत नाही. परंतु हे अपवादाने होत असल्यामुळे आपण चुकलेला शब्द किंवा न उमटलेला शब्द आपल्या हाताने manually टाईप करावे लागतील. पण संपूर्ण उतारा टाईप करण्यासाठी लागणाऱ्या वेळेचा विचार करता हा वेळ काहीच नाही ! या application मुळे तुमचे टाईप करण्याचे कष्ट वाचतात आणि खूप वेळात तुम्हाला (कुठल्याही भाषेतील) हवं ते text टाईप करून मिळतं.

3. Search

अनेकदा आपण झाडावर एक पक्षी बघतो किंवा एखादं फुल बघतो; पण आपल्याला त्याचं नाव माहीत नसतं. ते नाव माहित असणारी व्यक्तीही आपल्या आजूबाजूला नसते. अशावेळी तुम्ही गुगल लेन्सची मदत घेऊ शकता. गुगल लेन्समध्ये जाऊन तुम्ही त्या फुलाचा फोटो घेतल्यावर त्या फुलाला 'मॅच' होणारी सगळी माहिती तुमच्या फोनवर ताबडतोब उपलब्ध होते. अशा प्रकारे गुगल लेन्सचा उपयोग तुमच्या आजूबाजूच्या अनेक गोष्टींविषयी अधिक माहिती करून घेण्यासाठी करू शकता.

'इंटरनेटने नव्या पिढीची वाट लावली' असं मानणारा एक खूप मोठा वर्ग आपल्याकडे आहे.
मला वाटतं, इंटरनेटच्या आगपेटीत 'हुकूम मेरा आका' म्हणत गुगलचा तो राक्षस बसलाय. त्या रिकाम्या सर्च बार मध्ये आपण काय 'आज्ञा' लिहितोय यावर 'कोणाची वाट लागत्ये' की कोणासाठी एक नवीन वाट निर्माण होत्ये हे ठरणार आहे.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

देणगी काहीतरी सुचत राहण्याची!

सर्जनशील असणं याची मुभा सगळ्यांना आहे. आपण एखाद्या गोष्टीचा विचार कसा करतो? आणि त्याचा अवलंब कसा करतो? यावर सारं अवलंबून...

आसामच्या 'लक्ष्मी माँ': पद्मश्री लखिमी बरूआ

आसाम सारख्या दुर्गम भागातील राज्यात महिला सक्षमीकरण आणि सहकार क्षेत्रांत आसामी महिलांचे आर्थिक सशक्तीकरण करण्यात...

कल्पनाशक्तीची नवी 'LINE'

कल्पनाशक्ती जादुई असते. ती नवे क्षितिज दाखवते आणि त्या पलीकडे काय असेल ह्या विचारात पाडते. अशाच एका अद्भुत विचाराला...